लहर
मी होते एक थंड आणि पातळशार धार
जंगल आणि पर्वतातून धावणारी
दऱ्याखोऱ्यांतून मला जाणवले
की साचलेले, थांबलेले पाणी आतून मरून जाते
मला जाणवले की सागरलहरींना भेटणे
हे इवल्याशा धारांना नवजीवन देणे आहे
ना दीर्घ पल्ल्याचा रस्ता ना पाताळी खड्डा
ना थांबण्याची लालसा.. थांबवू शकेल मला वाहण्यापासून
आता मी समाहित झाले आहे चिरंतन लहरींमध्ये
आता संघर्षात माझे अस्तित्व आणि
मृत्यूत विश्रांती.
– मर्ज़िएह ऑस्कोई
(ईराणी क्रांतिकारी कवयित्री ज्यांची इराणच्या शाहच्या एजंटांनी हत्या केली होती.)
अनुवाद: अमन
स्वप्नांना
स्वप्नांना आवळून ठेवा घट्ट,
त्यांच्या मृत्यूनंतर
जीवन आहे एक पंख तुटलेली चिमणी
जी उडू शकत नाही..
स्वप्नं आवळून ठेवा,
स्वप्नांशिवाय
जीवन आहे बर्फाच्छादित
नापीक जमीन.
– लॅंगस्टन ह्यूज. अनुवाद: अमन