भगतसिंह जे म्हणाले ते आजही प्रासंगिक आहे
समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांरच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्याइतकेदेखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात.