‘कामगार बिगुल’ आपल्यामध्ये कशासाठी?

संपादक मंडल

आम्ही ‘कामगार बिगुल’चा प्रवेशांक घेऊन आपल्यामध्ये आलोय. एका कठीण आणि महत्त्वहपूर्ण काळात आम्ही हे मराठी कामगार वृत्तपत्र घेऊन तुमच्यामध्ये आलोय. साहजिकच आपल्या मनात हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की कामगारांच्या स्वतंत्र वृत्तपत्राची गरज काय? ह्याची बरीच कारणे आहेत. परंतु आपण सर्वप्रथम त्या कारणाबद्दल बोलूयात जे आपण सर्व कामगारांना माहित आहे.

आज जेवढीही वृत्तपत्रे व वाहिन्या आहेत, ती कोणाच्या मालकीची आहेत? त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे? त्यांच्यावर एक तर अंबानी, अदानी, टाटा, बिर्लासारख्या मोठमोठ्या भांडवलदारांचे नियंत्रण आहे किंवा मग ह्या भांडवलदारांचे हस्तक बनून काम करणाऱ्या सरकारचे नियंत्रण आहे. ज्या वृत्तपत्रांवर प्रत्यक्षपणे कुठल्याही मोठ्या औद्योगिक घराण्याचे वर्चस्व नाही, ती वृत्तपत्रे सुद्धा भांडवलदारांकडून दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर चालतात. म्हतणूनच ह्या वृत्तपत्रांमध्ये व वृत्त वाहिन्यांवर कधीही कामगार-कष्टकरी वर्गाचे जीवन, त्यांची दु:खे आणि समस्या ह्यापैकी कोणतीच गोष्ट लिहिण्यात, दाखवण्यात येत नाही. ह्या वृत्तपत्रांच्या दृष्टींने मालक व भांडवलदार हा नेहमीच बरोबर असतो आणि कामगार नेहमीच चूक असतात! जर कामगारांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला किंवा संप केला, तर ह्या वृत्तपत्रांच्या मते आपोआपच ते समाजकंटक, दंगेखोर, अराजकतावादी व आतंकवादी ठरतात! जर का कामगारांनी किमान वेतनाची मागणी केली असेल, आठ तासांच्या कामाच्या दिवसाची मागणी केली असेल, “देशाच्या प्रगतीसाठी” ते पोटावर पट्टी बांधून उपाशी पोटी झोपण्यासाठी तयार नसतील तर मग ते “देशद्रोही” व “विकासातील बाधा” आहेत! धनदांडग्यांच्या ह्या वृत्तपत्रांच्या मते मालक नेहमीच बरोबर असतात आणि कामगार नेहमीच चूक! असे असूनही आपण धनदांडग्यांच्या ह्या गल्लाभरू वृत्तपत्रांना वाचण्यासाठी बाध्य आहोत. कारण कुठलाही जिज्ञासू कामगार देशात, जगात काय चालू आहे हे जाणून घेऊ इच्छितो.

Mast headपरंतु आपल्याला ह्या वृत्तपत्रांमधून त्या गोष्टी सांगण्यात येतात ज्या भांडवलदार आपल्याला सांगू इच्छितात; आपल्याला जे आपले वर्गीय मित्र आहेत त्यांच्याबद्दल तिरस्कार करायला आणि जे आपले वर्गीय शत्रू आहेत त्यांच्याबद्दल सद्भाव ठेवण्यास शिकवले जाते. आपल्याला सामान्य तथ्ये सुद्धा असा प्रकारे सांगितली जातात की त्यामुळे भांडवलदारांचा फायदा व्हावा आणि कामगार वर्ग आणि त्याच्या राजकारणाचे नुकसान व्हावे! आपण कामगार भांडवलदारांचे वृत्तपत्रे व वाहिन्यांकडून निष्पक्षता, न्याय ह्याची अपेक्षा ठेऊ शकत नाही. ही सर्व भांडवलदारांची मुखपत्रे आहेत आणि त्यांच्या फायद्यासाठी चालतात. कामगार वर्गाचे त्याचे स्वतःचे वृत्तपत्र का असावे ह्याचे हेच सर्वात पहिले आणि सहज समजू शकणारे कारण आहे. परंतु केवळ देश-जगभरातील घटना कामगाराच्या नजरेतून जाणून घेणे एवढेच पुरेसे नाही. कारण प्रश्न केवळ जग जाणून घेण्याचा नाही तर त्याला बदलण्याचा आहे. त्यामुळेच आपण ‘कामगार बिगुल’ची गरज काय ह्या बद्दल थोडंसं सविस्तर जाणून घेऊयात.

असमाधेय भांडवली संकट आणि कामगार चळवळ

संपूर्ण जागतिक भांडवली अर्थव्यवस्था आज आर्थिक संकटात आहे. व्यवस्थेची चाकरी करणाऱ्या भांडवली अर्थतज्ञांनी सुचवलेले विविध उपाय काम करेनासे झाले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थासुद्धा संकटात सापडली आहे. कामगार विरोधी मोदी सरकारकडून विकासाचे कितीही दावे केले जात असले तरी कामगार-कष्टकरी जनतेच्या पदरात शोषण, बेरोजगारी आणि महागाई ह्या व्यतिरिक्त दुसरे काहीही पडलेले नाहीये. खरं तर आज सगळ्या जगातच भांडवली व्यवस्था कष्टकरी जनतेला शोषण, बेरोजगारी, भूक, महागाई, गरिबी, असुरक्षा, पर्यावरणाची हानी आणि युद्ध ह्या शिवाय दुसरे काही देऊ शकत नाहीये.

हे संकट काय आहे, हे थोडक्यात समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. भांडवली व्यवस्था एक नफेखोर व्यवस्था आहे. ह्या व्यवस्थेमध्ये सर्व वस्तूंचे उत्पादन आणि त्यांचे वितरण लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी न होता मुठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी केले जाते. ह्या नफ्यात वाढ व्हावी म्हणून भांडवलदार एकमेकांशी आंधळ्या प्रतिस्पर्धेत गुंतलेले असतात. नफ्यासाठी ते उत्पादन मूल्य (वस्तू तयार करण्यासाठीचा खर्च) कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे उत्पादन मूल्य कमी करण्यासाठी त्यांना कामाचा मोबदला कमी करणे आणि आधुनिक मशिन्सच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वस्तूंचे उत्पादन करणे आवश्यक असते. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया अधिकाधिक व्यापक आणि मोठ्या प्रमाणात व्हायला लागते, म्हणजेच, उत्पादन प्रक्रियेचे अधिकाधिक सामाजिकीकरण होत जाते. एखादी वस्तू संपूर्णपणे मी बनवली आहे असा दावा आज कोणताही कामगार करू शकणार नाही. प्रत्येक वस्तूच्या उत्पादनामध्ये हजारो कामगार गुंतलेले असतात. त्यामुळे एकीकडे उत्पादन प्रक्रिया अधिकाधिक सामाजिक होत जाते, परंतु दुसरीकडे ह्या उत्पादन प्रक्रियेची मालकी खाजगी हातांमध्ये असते.  साहजिकच आपल्याला नफा मिळेल असा किमतीलाच भांडवलदार उत्पादन केलेला माल विकतात. परंतु ह्या वस्तू खरेदी करण्यासाठी समाजामध्ये खरेदीदारच शिल्लक नसतात, कारण भांडवलदारांनी कामगारांचा कामाचा मोबदला कमी केलेला असतो. त्यांचे इतके शोषण केलेले असते की त्यांची क्रयशक्ती (वस्तू विकत घेण्याची ऐपत) कमी कमी होत जाते आणि ते जगण्यासाठीच्या किमान वस्तूसुद्धा खरेदी करू शकत नाहीत. ह्याचा परिणाम हा होतो की एकीकडे बाजारपेठांमध्ये वस्तूंचा ढीग लागतो आणि दुसरीकडे त्या वस्तू खरेदी न करू शकणारी गरीब व दरिद्री लोकांची संख्या वाढत जाते. हे वस्तूंचे ‘अति-उत्पादन’च भांडवली संकटाचे मूळ कारण आहे. भांडवली व्यवस्थेच्या ह्या संकटावर कुठलाही उपाय नाही कारण ह्या व्यवस्थेमध्ये उत्पादन लोकांच्या गरज पूर्ण करण्यासाठी न होता मालकांच्या नफ्यासाठी होते. हे संकट भांडवली व्यवस्था नष्ट करूनच संपवता येऊ शकते आणि तेव्हाच कामगार वर्गाला बेरोजगारी, गरिबी, नोकरीतील अनिश्चितता, भूक यांसारख्या दैत्यांपासून मुक्ती मिळू शकते. त्यामुळेच “ह्या नफेखोर व्यवस्थेचा पर्याय कसा निर्माण केला जावा?” हा आज आपण कामगारांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. एका चांगल्या आणि समतामूलक समाजाची निर्मिती कशी केली जावी? कामगार वर्गाच्या सत्तेची स्थापना कश्या प्रकारे केली जाऊ शकते? त्यासाठीची सुरुवात कुठून केली जाऊ शकते?

जगभरात आर्थिक संकटाचे ओझे कष्टकरी, कामगारांवर टाकण्यात येत आहे. अफाट नफ्याची हाव, सट्टेबाजी आदी कारणांमुळे दिवाळखोरीत निघणाऱ्या जगभरातील बँका व कंपन्यांना तिथली सरकारे जनतेने रक्त आटवून, घाम गाळून निर्माण केलेल्या संपत्ती द्वारे वाचवत आहेत. त्यासाठी जगभरातील सरकारे सातत्याने जनतेच्या सार्वजनिक सुविधांमध्ये कपात करून त्याबदल्यात भांडवलदारांना सबसिडी, बेल-आउट पॅकेजेस आणि नगण्य व्याज दराने प्रचंड मोठी कर्जे वाटत आहेत. त्याच बरोबर, मंदीचे कारण देऊन सगळीकडे कामगार कपात आणि कारखाने बंद करण्यात येत आहेत. नवीन रोजगार निर्माण होणे दूरच, पण आहेत ते रोजगार सुद्धा कमी केले जात आहेत. जे थोडे फार रोजगार निर्माण होत आहेत त्यातही कंत्राटी पद्धत, रोजंदारी पद्धत जोर धरत आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे हाताला काम असलेल्या कामगारांची हक्कांसाठी घासाघीस करण्याची ताकत कमी होत चालली आहे आणि त्यांना बहुतेक वेळा गुलामासारखे राबवले जात आहे. अंबानी-अदानीच्या मालकीची वृत्तपत्रे, वाहिन्या काहीही सांगोत, सत्य परिस्थिती काय आहे ते आपण कामगारच जाणतो!

ह्याचा अर्थ असा नाही की देशभरातील कामगार, कष्टकरी आपल्या दिवसेंदिवस बिघडणाऱ्या परिस्थितीवर गप्प बसून आहेत. मारुती सुझुकी, बजाज, ह्युंडाई, होंडा, टोयोटा सारख्या प्रचंड मोठ्या कार उत्पादक कंपन्यांमधील कामगारांपासून दिल्लीमधील पोलाद कारखान्यांमधील कामगार, लुधियाना मधील कपड्यांच्या कारखान्यांमधील कामगार, तीरपूर-यमन मधील कामगार, हरियानातील कंत्राटी शिक्षक आणि त्याच बरोबर देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगार आपल्या हक्कांसाठी लढत आहेत. ते रस्त्यावर उतरले आहेत. संप करत आहेत, आंदोलनं करत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेळोवेळी कामगारांमध्ये खदखदत असलेला असंतोष विविध मार्गानी बाहेर पडत आहे. परंतु आपल्या देशातील आणि जगभरातील कामगार चळवळीमध्ये अश्या प्रकारची स्वतःस्फूर्त (आपोआप निर्माण होणारी) आंदोलनं आणि संघर्ष वेळोवेळी झालेले आहेत. मागच्या दहा वर्षांच्या काळातच इजिप्त, ट्युनिशिया, ग्रीस, स्पेन इत्यादी देशांमध्ये झालेली जबरदस्त आंदोलनं ह्याचा पुरावा आहेत. परंतु असे स्वतःस्फूर्त कामगार विद्रोह आणि आंदोलने कोणत्याही क्रांतिकारी विचारधारेच्या आणि संघटनेच्या अभावी सध्याच्या नफेखोर व्यवस्थेला पर्याय निर्माण करू शकलेले नाहीत. इजिप्त मागील काही वर्षांमध्ये कित्येक वेळा क्रांतीच्या उंबरठ्यावर पोहोचला परंतु कामगार वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या क्रांतिकारी पक्षाच्या अभावी प्रत्येक वेळी ही संधी हातातून निघून गेली. ‘ग्रीस’मध्ये सुद्धा राजकीय संकट क्रांतिकारी परिस्थिती निर्माण करण्याच्या मार्गावर होते, परंतु ‘सिरीजा’ नावाच्या लोकानुनय करणाऱ्या संधीसाधू डाव्या पक्षाने ही प्रक्रिया मध्येच खंडित केली. ही सगळी उदाहरणे काय दाखवत आहेत? ही उदाहरणे दाखवून देत आहेत की जगभरातील कामगार, कष्टकरी जनता भांडवलशाहीच्या विरुद्ध रस्त्यांवर उतरत आहे, परंतु अशी आंदोलनं, विद्रोह आपोआप क्रांती करू शकत नाहीत. त्यासाठी आवश्यकता आहे ती क्रांतिकारी विचारधारेची आणि क्रांतिकारी पार्टीची! ह्या दोन घटकांशिवाय कुठलाही जनविद्रोह फारफार तर एका भांडवली सरकारच्या जागी दुसरे भांडवली सरकार बसवू शकतो, पण तो कुठलेही व्यवस्था परिवर्तन करू शकत नाही! म्हणजेच असे विद्रोह फारफार तर सरकार बदलवू शकतात, पण कुठलेही व्यवस्था परिवर्तन करू शकत नाहीत!

कामगार चळवळ एकजूट करून तिला क्रांतिकारी दिशा देण्याची आवश्यकता

हे खरं आहे की ह्या जनविद्रोहांमुळे व आंदोलनांमुळे आणि त्याच बरोबर उपायहीन आर्थिक संकटामुळे भांडवलदार वर्गाच्या “समाजवादाचा मृत्यू” किंवा “भांडवलशाहीचा अंतिम विजय” सारख्या मनोरंजक घोषणा आणि त्यातील उन्माद थंड पडला आहे. आज भांडवलदारांचे भाट असलेले लेखणी बहाद्दर बुद्धीजीवी सुद्धा भांडवलशाहीला “इतिहासाचा अंत” म्हणण्याचे धाडस करण्यास धजावत नाहीयेत. ज्यांनी कोणी भांडवलशाहीला “इतिहासाचा अंत” घोषित केले होते, त्यांना स्वतःचे म्हणणे माघारी घेणे भाग पडले आहे. १९९० मध्ये जेव्हा सोविएत संघराज्यातील नकली समाजवादाचे पतन झाले, त्यावेळी भांडवलदारांच्या दलालांनी “कामगार वर्गाच्या विचारधारेचा अंत झाला आहे आणि त्याच बरोबर इतिहासाचा सुद्धा अंत झाला आहे. कारण मानवी समाज विकसित होऊन त्याच्या सर्वोच्च उन्नत अवस्थेत म्हणजेच भांडवलशाही पर्यंत पोहोचला आहे” सारख्या  घोषणा दिल्या होत्या. परंतु २००० साल उजाडता उजाडता ह्या भाडोत्री दलालांची तोंडे बंद झाली कारण जागतिक भांडवली व्यवस्था उपायहीन संकटाच्या गर्तेत सापडली होती. एकीकडे भांडवलशाही ह्या मृतप्राय, पतनशील अवस्थेत होतीच, तर दुसरीकडे जनतेची आंदोलने सुद्धा विखुरलेली, विस्कळीत होती; व ती स्वतःस्फूर्ततावाद, विचारधारात्मक कमकुवतपणा आणि नेतृत्वाचा अभाव ह्यांची बळी पडली आहेत. परिणामतः, ते असा कुठलाही व्यावहारिक पर्याय निर्माण करू शकत नाहीयेत; ते विसाव्या शतकातील कामगार क्रांत्यांुच्या सकारात्मक व नकारात्मक पैलूंबद्दल अनभिज्ञ तरी आहेत किंवा त्याबाबत अत्यंत कमी जाणतात; ही आंदोलने समाजवादाच्या भूतकाळातील प्रयोगांमधून योग्य निष्कर्ष काढून नवीन प्रयोग करण्याची क्षमता आत्मसात करू शकलेली नाहीत; ही आंदोलने एकमेकांबरोबर सहकार्य करत व्यवस्थाविरोधी राजकीय क्रांतिकारी आंदोलन बनण्याच्या दिशेने सुद्धा काही प्रगती करू शकलेली नाहीत. आपल्या देशात सुद्धा कष्टकरी, कामगार आपल्या हलाखीच्या परिस्थिती विरुद्ध संघर्ष करत आहे. परंतु हे संघर्ष विखुरलेले आणि स्थानिक आहेत. ह्या संघर्षांचा शत्रू एकच आहे : भांडवलदार वर्ग आणि त्यांची सेवा करणारे सरकार! परंतु ह्या संघर्षांमध्ये कुठलाही ताळमेळ व संबंध नाही. आज गरज ह्या संघर्षांना हे सत्य पटवून देण्याची आहे की आपला सर्वांचा शत्रू समान आहे आणि म्हणून आपला संघर्ष सुद्धा एकत्र व्हायला हवा, एकजूट होऊन व्हायला हवा. परंतु सध्या हे काम पूर्ण करू शकेल अशी कोणतीही राजकीय शक्ती अस्तित्वात नाही. आपल्या ह्या कमकुवतपणामुळेच अत्यंत जीर्ण, सडलेल्या आणि जर्जर अवस्थेत असूनही जागतिक भांडवलशाही टिकून आहे. जोपर्यंत कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करणारी क्रांतिकारी पार्टी सर्व देशांमध्ये निर्माण होऊन कामगार आंदोलनामधील विस्कळीतपणा संपवून त्याला एका व्यवस्था विरोधी क्रांतिकारी चळवळीत बदलत नाही आणि जनतेच्या समोर एक व्यावहारिक आणि वैज्ञानिक पर्याय ठेवत नाही तोपर्यंत ही जीर्ण, सडलेली आणि जर्जर भांडवली व्यवस्था स्वतःहून कोसळणार नाही. त्यामुळे कामगार चळवळीची आजची सर्वात मोठी गरज आहे – एका अखिल भारतीय क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टीची निर्मिती! जेव्हा आम्ही कम्युनिस्ट पार्टीबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच आम्ही  संसदीय डावे आणि संशोधनवादी पक्ष यांच्याबद्दल बोलत नसतो. भाकप (सीपीआई), माकप (सीपीआई-एम) वा भाकप (माले) (सीपीआई-एमएल) सारखे संसदीय डावे पक्ष आज कामगार वर्गासाठी सर्वात धोकादायक शत्रूंपैकी एक आहेत. हे पक्ष म्हणजे संसदीय सत्तेची लाल मिर्ची खाऊन विरोधाची पोपटपंची करणारे पोपट आहेत. ह्यांचे खरे काम ह्या व्यवस्थेमध्येच सुधार करून ह्या व्यवस्थेचे संरक्षण करणे हे आहे. ह्या संशोधनवाद्यांनी मार्क्सवादी क्रांतिकारी विचारांमध्ये “संशोधना”च्या नावाखाली त्यातील क्रांतिकारी सार काढून टाकले आहे आणि मार्क्सवादाला एका प्रतिक्रियावादी, कामगार विरोधी सुधारवादामध्ये रुपांतरीत केले आहे. संशोधन वादाचा अर्थच आहे – केवळ नावामध्ये कम्युनिस्ट आणि कृतीमध्ये भांडवली सुधारवाद! कामगारांना केवळ ह्या पक्षांपासूनच नव्हे  तर त्यांच्याशी संबंधित ट्रेड युनियन्स पासून सुद्धा सावध राहीले पाहिजे. केवळ इतकेच नाही तर कुठल्याही निवडणूकबाज पक्षाशी संबंधित कामगार युनियन्स पासून कामगारांना सावध राहीले पाहिजे आणि त्या ऐवजी आपली स्वतःची स्वतंत्र व क्रांतिकारी कामगार चळवळ उभारली पाहिजे.

तसेच आम्ही जेव्हा क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षाच्या आवश्यकतेबद्दल बोलतो त्यावेळी आम्हाला सी. पी. आई.(माओवादी) सारखा अति-साहसवादी डावा पक्ष अभिप्रेत नसतो, जे त्यांच्या असंख्य बलिदानानंतरही भारतीय कम्युनिस्ट आंदोलनाचे नुकसान करत आहेत. त्यांची विचारधारात्मक समज कमी आहे, त्यांचा क्रांतीचा कार्यक्रम चुकीचा आहे आणि ते भयंकर पोथीनिष्ठ बनले आहेत. देशातील सर्वात मोठा वर्ग असलेल्या कामगार वर्गामध्ये ह्यांचे अस्तित्व नगण्य आहे कारण कामगारांमध्ये काम करणे त्यांच्या अजेंड्यावर नाही. ह्यांच्या कडून कामगार वर्गाला भांडवली निवडणूकबाज पक्ष आणि नकली डाव्यांच्या भरोश्यावर सोडून देण्यात आले आहे. म्हगणूनच आम्ही आज देशात एका नवीन क्रांतिकारी पक्षाच्याव बांधणीचे कार्य अत्यंत महत्वाचे मानतो, ज्याद्वारे नवीन विचार-केंद्रे, नवीन भरती-केंद्रे आणि नवीन प्रयोग-केंद्रे कार्यान्वित केली जातील. हे काम करण्यासाठी आम्हाला एका कामगारांच्या राजकीय वृत्तपत्राची गरज वाटते. अगोदरच ह्या कामात खूप उशीर झाला आहे.

आज कामगार वर्गातील उन्नत राजकीय चेतनेच्या घटकांना संघटित करून, त्याच्या विखुरलेल्या शक्तीला संघटीत करून कामगार वर्गाची क्रांतिकारी पार्टी निर्माण करण्यासाठी कामगार वर्गाच्या राजकीय वृत्तपत्राची गरज आहे, जे वृत्तपत्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगार वर्गामध्ये राजकीय प्रचार सातत्याने चालू ठेवू शकेल, कामगारांच्या प्रत्येक न्याय्य संघर्षामध्ये भागीदारी करेल, त्या संघर्षांना समर्थन व मार्गदर्शन देऊ शकेल, सर्व संघर्षांना एका सूत्रामध्ये बांधून एकत्र आणू शकेल आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व कामगार वर्गाला भांडवली व्यवस्थेवर निर्णायक प्रहार करण्यासाठी तयार करू शकेल.

कामगार वर्गाचे राजकीय वृत्तपत्र कसे असायला हवे?

कामगार वर्गाची नेतृत्वकारी क्रांतिकारी पार्टी बनवण्यासाठी सर्वात पहिली आणि अनिवार्य गोष्ट आहे ती म्हणजे कामगार वर्गाचे स्वतःचे क्रांतिकारी राजकीय वृत्तपत्र! ‘कामगार बिगुल’ हीच गरज पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. हे वृत्तपत्र कामगारांमध्ये सामान्य राजकीय प्रचार आणि ठोस आंदोलनात्मक प्रचार व शिक्षण देऊ करेल. त्याच बरोबर विविध राजकीय, आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर कामगार वर्गात स्वतंत्र क्रांतिकारी दृष्टीकोन विकसित करण्याचा प्रयत्न करेल. ही जबाबदारी तेच वृत्तपत्र पूर्ण करू शकेल जे अधिकाधिक सातत्याने प्रकाशित होईल, एकाच वेळी अनेक भाषांमध्ये आणि देशव्यापी स्तरावर प्रकाशित होईल. सध्या आम्ही हे वृत्तपत्र दोन भाषांमध्ये – हिंदी व मराठी – प्रकाशित करू शकत आहोत आणि ते सुद्धा महिन्यातून एक वेळ. निश्चितपणे हे पुरेसं नाही. परंतु सध्या आम्ही इथूनच सुरुवात करत आहोत. त्या नंतर आम्ही हे वृत्तपत्र पंधरवड्यात आणि पुढे आठवड्यातून एकदा प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू.

अशा राजकीय वृत्तपत्राशिवाय अश्या प्रकारचे राजकीय कामगार आंदोलन उभे करणे शक्य नाही, कारण अश्या मुखपत्राच्या माध्यमातूनच राजकीय आंदोलनाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. ह्या राजकीय गरजा पुढील प्रमाणे आहेत. पहिली, कामगार वर्गात खदखदत असलेला असंतोष आणि त्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व घटकांना एकत्र करणे. दुसरे, सर्वहारा वर्गातील राजकीय असंतोषाला एक योग्य क्रांतिकारी राजकीय दिशा देऊन सशक्त बनवणे. तिसरे, वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघर्ष न करता सर्व भांडवली व्यवस्थेचे खरे स्वरूप जनतेसमोर नागडे करणे; म्हणजेच केवळ आर्थिक प्रश्नांवर संघर्ष न करता राजकीय सत्तेसाठीच्या संघर्षाचा प्रश्न उपस्थित करणे. आज अश्या राजकीय प्रचाराचा आवाज अगदीच क्षीण आहे, पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. आपल्याला त्याची काळजी न करता मराठी भाषेत अश्या राजकीय कामगार वृत्तपत्राची सुरुवात करावी लागेल, ज्या मार्फत व्यवस्थेचे घृणास्पद वास्तव उघड करू इच्छिणारे सर्व आवाज व्यक्त होऊ शकतील.

आज देशभरात आणि महाराष्ट्रात कामगार वर्गाचा एक मोठा भाग लिहू-वाचू शकतो, जो अश्या प्रकारच्या राजकीय प्रचाराची गरज अनुभवत आहे, जो आजूबाजूच्या घटनांमागचे कांगोरे जाणून घेऊ इच्छितो, जो संघर्ष करण्यासाठी आणि संघटित होण्यासाठी तयार आहे. आज देशामध्ये ६० कोटी कामगार आहेत, ज्यांच्याकडे त्यांची श्रमशक्ती विकण्याशिवाय उपजीविकेचे दुसरे कुठलेही साधन नाही. जर ह्यात त्या ३०-३५ कोटी शेतकऱ्यांना जोडले ज्यांची उपजीविका मुख्यत्वे शेतीवर अवलंबून नसून मजुरीवर अवलंबून आहे, तर सबंध देशातील सर्वहारा व अर्ध-सर्वहारा वर्गाची एकूण लोकसंख्या ८५-९० कोटी इतकी प्रचंड भरते. ह्यापैकी २५ कोटी सरळ-सरळ औद्योगिक कामगार आहेत; ह्या व्यतिरिक्त, शहरी गरीब कामगार व अर्ध-कामगार ह्यांची लोकसंख्या सुद्धा कोटींमध्ये आहे. शेती मधील मजुरांची संख्या सुद्धा ३५ कोटींच्या घरात आहे. इतक्या प्रचंड लोकसंख्येच्या कामगार वर्गात उन्नत, लिहू-वाचू शकणाऱ्या कामगारांची मोठी संख्या अस्तित्वात आहे, जो आज क्रांतिकारी प्रचार व आंदोलन, शिक्षण-प्रशिक्षणासाठी केवळ तयारच नाही तर त्यांची गरज आहे असे सुद्धा मानतो. महाराष्ट्र तुलनात्मकदृष्ट्या अधिक औद्योगिक विकास झालेले राज्य आहे आणि इथे सुद्धा कामगारांची संख्या कोटींमध्ये आहे. २०१४ मध्येच महाराष्ट्रातील कार्यशक्ती ५ कोटींच्या घरात पोहोचली होती. देशातील एकूण औद्योगिक रोजगारापैकी १३ टक्के रोजगार महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे उघडच आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा कामगार वर्गामध्ये राजकीय व आंदोलनात्मक प्रचार, शिक्षण-प्रशिक्षणाची गरज आहेच, पण कामगारांचे स्वतःचे असे एकही कामगार वृत्तपत्र नाही. भांडवलदार वर्ग आणि त्याचे भाट ह्यांच्या पेक्षा वेगळा असा कामगार वर्गाचा स्वतंत्र क्रांतिकारी दृष्टीकोन समाजापुढे ठेऊ शकणाऱ्या एका राजकीय कामगार वृत्तपत्राच्या अभावी हा कामगार वर्ग राजकीय दृष्ट्या विखुरलेला आहे आणि काही प्रमाणात अराजकीय सुद्धा झालेला आहे. त्याला निश्चित दिशा मिळू शकलेली नाही. त्यामुळेच कामगार वर्गाचा एक मोठा भाग भांडवली प्रचाराचा बळी पडला आहे आणि वेळप्रसंगी तो भांडवलदार वर्गाचे शेपूट सुद्धा बनतो. ही स्थिती कामगार वर्गाच्या एका राजकीय वृत्तपत्राच्या माध्यमातूनच बदलता येऊ शकते.

केवळ प्रचारक नाही तर संघटनकर्ता सुद्धा!

असे राजकीय वृत्तपत्र केवळ आंदोलक व प्रचारकाचे काम करणार नाही तर संघटनकर्त्याचे काम सुद्धा पार पाडेल. हे वृत्तपत्र कामगार वर्गाच्या क्रांतिकारी पार्टीच्या निर्माण कार्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावेल ज्याच्या भोवती संपूर्ण पार्टीची बांधणी होईल. त्यासाठी हे वृत्तपत्र स्थानिक घडामोडींमध्ये सहभागी होईल, नियमितपणे सामान्य राजकीय प्रचार करेल, आपल्या वाचकांना राजकीय घडामोडींबद्दल आणि त्यांचा समाजाच्या विविध घटकांवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी शिक्षित-प्रशिक्षित करेल आणि अशी प्रभावी माध्यमं निर्माण करेल ज्या मार्फत अश्या राजकीय घडामोडींमध्ये हस्तक्षेप करून त्यांना प्रभावित करता येऊ शकेल.

अर्थातच, हे वृत्तपत्र कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात व नियमित पोहोचण्यासाठी ह्या कामगार वृत्तपत्राचे स्वतःचे एजंट व पक्षधर वितरक यांची आवश्यकता भासेल, जे स्वतः कामगार वर्गातूनच तयार होऊ शकतात. हे वृत्तपत्र नियमित वाचणाऱ्या वाचकांची वाचक मंडळं निर्माण केली जाऊ शकतात, आणि पुढे चालून त्यांना ह्या वृत्तपत्राशी संबंधित समित्यांचे, गटांचे रूप दिले जाऊ शकते. हे गट व समित्या ह्या वृत्तपत्राचे प्रभावक्षेत्र अधिकाधिक व्यापक करण्यासाठी काम करतील आणि कामगार वर्गातील उन्नत घटकांना ह्यासोबत जोडतील. अश्या समित्यांचे एक व्यापक जाळे निर्माण करावे लागेल. केवळ तेव्हाच आपण कामगार वर्गाच्या एका क्रांतिकारी पार्टीच्या निर्मितीच्या दिशेने पुढे जाऊ शकू. ‘बिगुलवादी कामगार समित्यां’च्या अश्या जाळ्याच्या माध्यमातून अशी राजकीय पार्टी निर्माण होऊ शकते. ह्या समित्यांच्या जाळ्यांना राजकीय चेतना, दूरदर्शिता आणि लवचिकता ह्यांनी परिपूर्ण करावे लागेल, जेणे करून ते आशा वा निराशा, गतिशीलता वा साचलेपणा यांसारख्या प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य व संयम ठेऊन सातत्याने काम करत राहतील.

कामगार वर्गाची आजची लढाई भांडवलशाहीच्या गड-किल्ल्यांवर सरळ हल्ल्यांची लढाई नाही. आज कामगार वर्गाची अशी कोणतीही नेतृत्वकारी संघटनात्मक शक्ती अस्तित्वात नाही, जी विचारधारात्मक स्पष्टता आणि प्रसंगावधान ठेवून आहे; आणि कामगार वर्ग सुद्धा त्यासाठी राजकीय आणि संघटनात्मक दृष्ट्या एकजूट, संघटीत व तयार नाही. आजची तयारी ही भांडवलशाहीच्या गड-किल्ल्यांना घेरण्याची दीर्घ कालीन लढाई आहे. त्यासाठीची सर्वात पहिली गरज आहे ती कामगार वर्गाच्या नेतृत्वकारी क्रांतिकारी पार्टीची! आणि अश्या पार्टी साठी सर्वात पहिली गरज आहे ती कामगार वर्गाच्या स्वतंत्र क्रांतिकारी राजकीय वृत्तपत्राची! कामगार वर्गाला अधिक उन्नत रूपांमध्ये प्रभावित करण्या अगोदर, जोडण्या अगोदर आणि संघटीत करण्या अगोदर त्यांना क्रांतिकारी प्रचाराच्या माध्यमातून प्रभावित करावे लागेल, जोडावे लागेल आणि संघटीत करावे लागेल. ‘कामगार बिगुल’चा उद्देश हे काम पूर्ण करणे हाच आहे. शेवटी आम्ही ह्या वृत्तपत्राचे लक्ष्य आणि स्वरूप काही ठोस बिंदूंमध्ये (पहा – ‘कामगार बिगुल’चे स्वरूप, उद्देश आणि जबाबदाऱ्या) तुमच्या पुढे स्पष्ट मांडू इच्छितो आणि तुम्हाला हे आवाहन करू इच्छितो की स्वतःला ह्या वृत्तपत्राशी जोडा, त्याचे नियमित वाचक बना आणि हे वृत्तपत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी आपले योगदान द्या.

‘कामगार बिगुल’चे स्वरूप, उद्देश आणि जबाबदाऱ्या

  1. ‘कामगार बिगुल’ व्यापक कष्टकरी जनतेमध्ये क्रांतिकारी राजकीय शिक्षक व प्रचारकाची भूमिका पार पाडेल. हे वृत्तपत्र कामगारांमध्ये क्रांतिकारी वैज्ञानिक विचारधारेचा प्रचार करेल आणि खऱ्याखुऱ्या सर्वहारा संस्कृतीचा वाहक बनेल. हे वृत्तपत्र जगभरातील क्रांतींचा इतिहास आणि त्यांच्यातून घ्यावयाचे शिक्षण, आपल्या देशातील वर्ग संघर्ष, कामगार चळवळीचा इतिहास आणि त्यातून घ्यावयाचे धडे यांच्याशी कामगार वर्गाला परिचित करेल. त्याच बरोबर समस्त भांडवली अफवा-दुष्प्रचारांचा भांडाफोड करेल.
  2. ‘कामगार बिगुल’ भारतीय क्रांतीचे स्वरूप, मार्ग आणि समस्यांविषयी क्रांतिकारी कम्युनिस्टांमध्ये चालणाऱ्या विविध चर्चा नियमित रुपात छापेल आणि देश-विदेशातील राजकीय घटना आणि आर्थिक परिस्थितीचे योग्य विश्लेषण मांडून कामगार वर्गाला शिक्षित करण्याचे काम करेल.
  3. ‘कामगार बिगुल’ स्वतः अश्या चर्चा चालवेल जेणे करून कामगारांचे राजकीय शिक्षण होईल. तसेच  त्यांच्यामध्ये योग्य लाइनची समज विकसित होऊन ते क्रांतिकारी पार्टी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील आणि त्यातून व्यवहारामध्ये योग्य लाइनच्या सत्यापानचा आधार तयार होऊ शकेल.
  4. ‘कामगार बिगुल’ कामगार वर्गामध्ये राजकीय प्रचार आणि शिक्षणाचे कार्य चालवत सर्वहारा क्रांतीच्या ऐतिहासिक जबाबदारीशी त्याला परिचित करेल, त्याला आर्थिक संघर्षांसोबतच त्याच्या राजकीय अधिकारांसाठी लढायला शिकवेल,  चार आणे-आठ आण्याच्या किरकोळ आर्थिक लढायांमध्ये कामगारांना अडकावून टाकणाऱ्या नकली कम्युनिस्टांपासून आणि भांडवली राजकीय पक्षांचे शेपूट असलेल्या किंवा व्यक्तिवादी-अराजकतावादी ट्रेड युनियन्स पासून सावध करत त्याला हरतऱ्हेच्या अर्थवाद व सुधारवादाविरुद्ध लढायला शिकवेल, त्याच बरोबर त्याच्यात सच्ची क्रांतिकारी चेतना निर्माण करेल. ‘कामगार बिगुल’ सर्वहारा वर्गाच्या फळ्यांमधून क्रांतीकारकांची भरती करण्याच्या कामात सहाय्यक बनेल.
  5. ‘कामगार बिगुल’ हे वृत्तपत्र कामगार वर्गाचा क्रांतिकारी शिक्षक, प्रचारक आणि आवाहनकर्ता ह्या भूमिकांबरोबरच क्रांतिकारी संघटनकर्ता व आंदोलनकर्त्याची भूमिका सुद्धा पार पाडेल.

कामगार बिगुल, ऑगस्‍ट २०१५