मुद्दा फक्त ‘ढोंगी’ बाबांचा नाही
आज धर्माचं पूर्णता भांडवलीकरण झालं आहे. गुरमीत पासून राधेमा पर्यंत त्याचं हे रूप अतिशय विकृत व कुरूप आहे. भांडवली राजकारणाशी याचं असलेलं साटंलोटं समजायला व भांडवली व्यवस्थेनं निर्माण केलंलं दु:ख, दारिद्रय अनिश्चितता व भीतीचा ठाव घ्यायला सामान्य जनतेची वैज्ञानिक तर्कबुद्धी अजून तितकीशी सक्षम नाही. याची कारणं प्रबोधन व पुनरुज्जीवानाच्या न लाभलेल्या वारश्यात शोधता येतात. भांडवली व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात जनतेनं उभं करू नये म्हणून दैववादाचा उपयोग जनतेची मती बधीर करायला केला जातो. यासाठीच अशा बाबाबुवामाताचं पालनपोषण केलं जातं. सगळे बाबा एकजात धूर्त, प्रतिक्रियावादी, कट्टर फासीवादी प्रवृत्तीचे आहेत. निर्भया बलात्कारानंतर आसारामची भाषा असो की साक्षी महाराजाची बेताल वक्तव्य असो, मग ते कुठल्याही धर्मातले असोत ते घोर स्त्री विरोधी, धर्मांध, तर्कदुष्ट व विज्ञानविरोधी आहेत यात शंकाच नाही. निश्चितच या बाबा बुवांच्या जाळ्यांतून सामान्य जनतेला सोडवायला तिचं प्रबोधन तर करायलाच हवं पण सोबत एक अशी जमिनही घडवायला हवी जीथं ही विषारी बीजं अंकुरणारचं नाहीत कधीही. मुद्दा फक्त ‘ढोंगी बाबाचा’ नाहीच.