जातीभेद माणसांना केवळ तुकड्या-तुकड्या विभाजित करत नाही, तर सोबतच तो त्यांच्या मनामध्ये उच्च-नीचतेची जाणीव निर्माण करतो. ब्राह्मण समजतात, आम्ही उच्च आहोत, राजपूत खालचे आहेत; राजपूत समजतात, आम्ही वरचे आहोत, कहार खालचे; कहार समजतात, आम्ही वरचे आहोत, चांभार खालचे; चांभार समजतात, आम्ही वरचे आहोत, मेहतर खालचे आणि भंगी आपल्या मनाला समजाविण्यासाठी कुणाला तरी खालचे म्हणतातच. हिंदुस्तानामध्ये हजारो जाती आहेत आणि त्या सर्वांमध्ये हीच भावना आहे. राजपूत असल्याने हे समजू नका की ते सर्व एकसमान आहेत, त्यांच्यामध्येही हजारो उप-जाती आहेत. त्यांनी उच्च कुळातील मुलीशी लग्न करून आपल्या जातीचे वरचे स्थान सिद्ध करण्यासाठी आपापसात मोठ-मोठ्या लढाया लढल्या आहेत आणि देशाच्या सैनिकी शक्तीचा खुप मोठा अपव्यय केला आहे. आल्हा-उदलच्या लढाया याबाबतीत प्रसिद्ध आहेत.