ओरियंट क्राफ्ट मधील घटना – गुरगाव मधील कामगारांमध्ये खदखदत असलेल्या जबरदस्त असंतोषाचे आणखी एक उदाहरण

बिगुल वार्ताहर

गुरगाव सेक्टर ३४ मधील हिरो-होंडा चौकाजवळील ओरियंट क्राफ्ट कंपनी मध्ये २० जून रोजी पुन्हा एकदा कामगारांचा असंतोष उफाळून आला आहे. सकाळी काम करत असताना विजेच्या धक्क्याने एक कामगार जबर जखमी झाला. कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला जखमी कामगाराला हॉस्पिटल मध्ये नेण्याची विनंती केली परतू व्यवस्थापनाने त्यास नकार दिला. त्यानंतर कामगारांनी स्वतःच त्यांच्या जखमी सहकाऱ्याला हॉस्पिटल मध्ये भारती केले. काही वेळानंतर त्या कामगाराचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. त्या पश्चात कामगारांमधील संताप उफाळून आला आणि त्यांनी कारखान्यामध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी कंपनीच्या काही भागाला आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांना आगीच्या स्वाधीन केले आणि अधिकाऱ्यांना मारहाण सुद्धा केली. लावण्यात आलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या १२ गाड्या बोलावण्यात आल्या. त्यानंतर साधारण ४०० पोलिसांच्या तुकडीला तिथे पाचारण करण्यात आले. त्यांनी जबरदस्त लाठीहल्ला चढवून कामगारांना तिथून बाहेर काढले.
orient craft-2रेडीमेड गारमेंट बनवणाऱ्या ह्या फैक्ट्री मध्ये घडलेली अश्या प्रकारची ही पहिली घटना नाही. ह्या अगोदर सुद्धा दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या कामगाराला उपचार न पुरवणे, कंत्राटदारांची मनमानी या विरोधात कामगारांनी त्यांच्या असंतोषाचे उग्र प्रदर्शन केलेले आहे. ह्या घटनेतून पुनश्च एकदा हे सिद्ध झाले आहे की गुरगाव औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखान्यांमध्ये कामगारांच्या अमानुष शोषणाच्या विरोधात कामगारांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. नेतृत्वाचा अभाव व आपल्या न्याय्य मागण्याच्या पूर्ततेसाठी संघटीत होऊन संघर्ष न करू शकण्याचा परिणाम हा होतो की कामगारांचा असंतोष अश्या प्रकारच्या घटनांमधून अराजक पद्धतीने रस्त्यावर व्यक्त होतो. अश्या पद्धतीचे अराजक संघर्ष गुंड आणि पोलिसांच्या बळावर मोडून काढण्यात येतात. त्यानंतर बहुतेक कामगार दुसऱ्या ठिकाणी काम शोधतात किंवा न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयांचे उंबरठे झिजवतात.
आज कामगारांमधील असंतोष ज्या पद्धतीने रस्त्यांवर व्यक्त होत आहे त्यावरून हे अगदी स्पष्ट आहे की गुरगाव क्षेत्रामध्ये कामगारांमध्ये त्यांच्या स्थितीबद्दल प्रचंड असंतोष व्याप्त आहे. ह्या असंतोषाला एक दिशा देण्याची गरज आहे आणि त्याच्या शक्यता सुद्धा प्रचंड आहेत. गुरगाव मध्ये जवळपास १०,००० कारखाने आहेत. ह्या कारखान्यांमध्ये सबंध वर्षभर स्थायी काम चालते,पण तरी सुद्धा तिथे काम करणारे बहुतांश कामगार हे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. ह्या १०,००० कारखान्यांपैकी केवळ १०० कारखान्यांमध्येच कामगार आपल्या ट्रेड युनियन्स स्थापन करू शकले आहेत, ह्या वरून चित्र स्पष व्हावे. बहुतांशी ठिकाणी जेव्हा कामगार युनियन बनवण्याची मागणी करतात तेव्हा त्यातील नेतृत्वकारी कामगारांवर हल्ले घडवले जातात किंवा त्यांना कामावरून कमी केले जाते. हे सगळे प्रकार मालक-कंत्राटदार आणि श्रम विभागाच्या संगनमताने होतात.
कित्येक कारखान्यांमधील कामगारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना कळते की कश्या प्रकारे कामगारांकडून जबरदस्तीने ज्यादा वेळ काम करवून घेण्यात येते, आणि जेव्हा एखादा कामगार ज्यादा तास काम करण्यास नकार देतो तेव्हा कसे मालकाचे गुंड त्याला धमक्या देतात आणि बऱ्याच वेळा कामाचे पैसे न देताच कामावरून काढून टाकण्यात येते, जेणे करून कामगारांमध्ये दहशत कायम राहावी. शिवीगाळ तर रोजचाच आहे. कामगारांनी सांगितले की कधी कधी त्यांचा पगार सुद्धा वेळेवर दिला जात नाही आणि ६ दिवसांपासून अगदी एक-एक महिना सुद्धा त्यांचा पगार रोखून धरण्यात येतो. असेच काहीसे ह्याच ओरियंट क्राफ्ट कंपनी मध्ये दोन वर्षापूर्वी घडले होते, जेव्हा कामावर न आल्यामुळे चिडलेल्या कंत्राटदाराने कामगारांना शिवीगाळ केला आणि एका कामगाराच्या पोटात कात्री घुसवून त्याला गंभीर जखमी केले होते. ह्या घटनेनंतर कामगारांमध्ये खदखदणारा असंतोष उग्र रुपात व्यक्त झाला होता आणि त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरु केली होती. त्यावेळी सुद्धा प्रचंड पोलिस बळाच्या जोरावर कामगारांच्या विरोध नियंत्रणात आणण्यात आला होता. ह्या अगोदर सुद्धा उद्योग-विहार परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कामाच्या अमानवीय परिस्थितीच्या विरोधात आवाज उठवण्याचे प्रयत्न केले होते, परंतु मालक व पोलिसांचे संगनमत आणि योग्य नेतृत्वाचा अभाव ह्यांमुळे त्यांचा संघर्ष आंदोलनाचे रूप घेऊ शकला नाही.
प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या कारखान्यामध्ये दुर्घटना होतच असतात. पण कुठल्याच कारखान्यामध्ये ना उपचाराची व्यवस्था असते, ना जखमींना बाहेरून उपचार करण्यास मदत केली जाते. बहुतेकदा जखमी कामगारांना उपचार घेण्यासाठी सुट्टी सुद्धा देण्यात येत नाही आणि सरळ कामावरून काढून टाकण्यात येते. कित्येक वेळा कामावरील दुर्घटनेमध्ये कामगाराचा मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही. आपले होणारे अमानवीय शोषण, कामाचा जबरदस्त दबाव आणि प्रत्येक दिवस जोखीम घेऊन काम करण्यामुळे कामगारांच्या मनात प्रचंड तणाव आणि असंतोष भरला आहे. कुठलेही संघटीत आणि झुंजार कामगार आंदोलन नसल्या कारणाने त्यांचा संताप अश्या अराजक विस्फोटातून अधून-मधून बाहेर पडतो, जो पोलिस-प्रशासन-मालक अगदी सहज दाबून टाकतात.
मागील काही काळापासून गुरगाव मधील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये फुटलेल्या कामगारांच्या संतापाकडे बघून अगदी सहज हा अनुमान बांधला जाऊ शकतो की ह्या औद्योग क्षेत्रामध्ये काम करणारी कामगार जनता प्रचंड शोषणाची बळी पडली आहे. केवळ कंत्राटी कामगाराच ह्या शोषणाचे बळी आहेत असे नाही तर कित्येक कारखान्यांमध्ये स्थायी नोकरी करणाऱ्या कामगारांची स्थिती सुद्धा खूप चांगली नाही. मारुति, पावरट्रेन, हीरो होंडा, मुंजाल शोवा इत्यादी कंपन्या ह्याचे ज्वलंत उदाहरण आहेत. परंतु नेतृत्व आणि क्रांतिकारी विकल्पाच्या अभावी शोषित आणि उत्पिडीत कामगार जनतेचा संताप अराजक पद्धतीने रस्त्यांवर व्यक्त होतो. त्यानंतर पोलिस आणि व्यवस्थापनाचे दमन चक्र वेगाने फिरते ज्याचा सामना विखुरलेले कामगार करू शकत नाहीत. आणि पर्यायाने काही काळानंतर हा असंतोष थंड पडतो.
एटक, सीटू, एचएमएस सारख्या मोठ-मोठ्या केंद्रीय युनियन्स गुरगाव मध्ये उपस्थित आहेत. पण अश्या घटना घडतात तेव्हा ह्यांचे दलाल नेते गायब असतात. ओरियंट क्राफ्ट मधील कामगारांसारख्या लाखो असंघटीत कामगारांचे प्रश्न ह्या दलाल कामगार संघटना उठवत सुद्धा नाहीत आणि न त्यांना संघटीत करण्याचा प्रयत्न करतात. अधून मधून घडणाऱ्या अश्या घटनांवर खुश होऊन टाळ्या वाजवण्यापेक्षा गरज आहे ती ह्या असंघटीत क्षेत्रातील ह्या प्रचंड मोठ्या कामगार जनतेमध्ये क्रांतिकारी प्रचार-प्रसार करून त्यांच्या मूलभूत मागण्या उदाहरणार्थ – कामाचे ठराविक तास, जबरदस्तीने करवून घेण्यात येणारे कामाचे जास्तीचे तास बंद करणे, व्यवस्थापनाची गुंडगिरी थांबवणे, ट्रेड युनियन अधिकार इत्यादींवर कामगारांना संघटीत करण्याचे प्रयत्न करण्याची आणि सुधारवादी, अर्थवादी आणि धंदेबाज ट्रेड युनियन्सचा खरा चेहरा कामगारांना दाखवून देण्याची आणि त्यांच्या मध्ये व्याप्त असंतोषाला एक योग्य क्रांतिकारी दिशा देण्याची सुरुवात करण्याची!

कामगार बिगुल, ऑगस्‍ट २०१५