अशा संस्था लोकांचे लक्ष खऱ्या समस्यांपासून, खऱ्या उपायांपासून विचलित करतात व त्यांच्यात भ्रामक जाणिवा निर्माण करतात. यातून एकीकडे परिवर्तनाचे लढे कमकुवत तर होतातच शिवाय सत्ताधारी वर्गाला सोयीच्या विचारांचा प्रचार करून व्यवस्था बळकट करण्याचे, व फॅसिस्ट पक्षांना मजबूत सामाजिक आधार देण्याचे काम अशा संस्था करतात. समाजात पसरलेले दारिद्र्य, विषमता, भेदभाव, दलितांवर-स्त्रियांवर होणारे भीषण अत्याचार यांना ‘सनातन’ने कधी विरोध केला आहे का? उलट अशा प्रकरणांमध्ये नेहमीच अत्यंत प्रतिगामी व मानवद्रोही भूमिकाच सनातनने घेतलेली आहे, व आपली “ईश्वरी राज्या”ची व “धार्मिक उत्थाना”ची पुंगी कर्कशपणे वाजवण्याचे काम केले आहे. सनातन संस्था व अशाच अन्य धार्मिक कट्टरतावादी संस्थांचे हे सत्यस्वरूप सर्वसामान्य जनतेने ओळखले पाहिजे. तसेच अशा कट्टरतावादी शक्तींच्या विरोधात लढणाऱ्यांनीसुद्धा हे लक्षात घेतले पाहिजे की फक्त तर्कशुद्धतेचा प्रचार करणे पुरेसे नाही तर ज्या सामाजिक विषमतेमुळे दैववादाला, धार्मिक भावनेला खतपाणी मिळते ती नष्ट करण्यासाठी परिवर्तनाचा व्यापक सामाजिक लढा उभारणे गरजेचे आहे. त्याशिवाय सनातनसारख्या संस्थांची आधारभूमी नष्ट होणार नाही. वेगवेगळ्या समस्यांनी, दुःखांनी ग्रासलेले जीवन बदलण्यासाठी सर्वसामान्य जनतेला योग्य मार्गाचा पर्याय उपलब्ध करून देणे, हे प्रागतिक शक्तींसमोर आज असलेले खरे आव्हान आहे.