तुम्ही नैराश्य ग्रस्त आहात का? खरंतर तुम्ही भांडवलशाहीने ग्रासले आहात!

अनिता (अनुवाद : अश्विनी)

रोजच्या धकाधकीच्या जीवनात मधेच कुठेतरी थांबून जेव्हा आपण रस्त्यांवर, कचेऱ्यांमध्ये, शाळा, महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यांचे निरीक्षण करतो तेव्हा जाणवते कि आजच्या घडीला प्रत्येक जण एकटा, थकलेला व त्रासांच्या ओझ्याने दबलेला असतो. आजची खरी परिस्थिती ही आहे कि हजारो ऑनलाईन मित्र असूनही मनातली खरी गोष्ट एकालाही सांगू शकत नाहीत. मनमोकळे हसणे, सामूहिकतेचा आनंद घेणे, कुठल्याही स्वार्था शिवाय कोणाची मदत करणे ह्या सर्व तर आजकाल फक्त कल्पनेच्या गोष्टी उरल्या आहेत. लोकांमध्ये घृणा, अविश्वास, उद्विग्नता, उबग वाढत चाललाय. २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा एक रिपोर्ट आला, ज्यातून निदर्शनास आले कि जगात सर्वात जास्त मानसिक तणावाचे शिकार असलेले लोक भारतात राहतात.

याच रिपोर्टनुसार भारतात ६.५ टक्के म्हणजे जवळ-जवळ ८.५ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मानसिक रोगाने पीडित आहेत. हे एका महारोगाचे रूप घेत चालले आहे. असेही भरपूर लोक आहेत जे परिस्थिती न झेपल्याने अथवा आयुष्यात कुठल्याही प्रकारची नवी उमेद न दिसल्याने आत्महत्या करून बसतात. वर्ष २०१६ मध्येच भारतात जवळ जवळ अडीच लाख लोकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला होता. संपूर्ण जगभरात आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये ३६.६ टक्के लोक हे भारताचे असतात. सर्वसाधारणपणे लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात येणाऱ्या अडचणीच नैराश्याचे कारण मानल्या जातात. पण ही तर तात्पुरती कारणं असतात. आज जर ह्या समस्येने महारोगाचे रूप घेतले आहे तर नक्कीच त्याची मुळे समाजव्यवस्थेतच्या रचनेत असतील आणि या गोष्टीची अजून खोलात जाऊन पडताळणी करावी लागेल.

मानसिक नैराश्याच्या समस्येने मध्यम वर्गाला मोठ्या प्रमाणात घेरलेले आहे. उत्पादनाची प्रक्रिया आणि शारीरिक श्रमापासून तुटलेले मध्यमवर्गीय लोक अनेक प्रकारच्या वस्तूंचा वापर तर करतात पण त्या वस्तू बनण्यामागच्या प्रक्रियेशी त्यांचा संबंध नसतो. त्यांच्याकडे ही समज नसते कि खरे तर कष्टच माणसाला माणूस बनवतात. कारण माकडाचे रूपांतर मानवात होण्यामागे श्रमाचीच खरी भूमिका आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात एकटेपणाचे खरे कारण हेच आहे. एकटेपणाचे शिकार झालेल्या लोकांना आयुष्यात कुठल्याही गोष्टीविषयी कुठलाच आनंद वाटत नाही, ते प्रत्येक गोष्टीबद्दल बेपर्वाअसतात.

सध्याच्या काळात समाजातील सामान्य कष्टकरी लोकांमध्येही नैराश्य दिसून येते. कारखान्यांमध्ये प्रचंड कंबरतोड कष्ट केल्यानंतरही दोन वेळेचं जेवण मिळवणं कठीण असतं; परंतु या कामगारांच्या कंबरतोड मेहनतीचं शोषण करून भांडवलदार वर्ग ऐशो-आरामात जगत असतो. कामगारांना ही जाणीव असते की त्यांच्याच जीवतोड मेहनतीतून निर्माण झालेली ती वस्तू त्यांची नाही. अशा वेळी कामगारांचे पण कामात लक्ष लागत नाही आणि दिवसभराची थकवणूक, दुखावला गेलेला स्वाभिमान आणि शोषणापासून मुक्तता मिळवण्यासाठीची असहायता त्यांना नैराश्यात पाठवत असते.

नैराश्याचा शिकार असलेला माणूस जर ते नैराश्य दूर करण्यासाठी जागरूक प्रयत्न करत नसेल तर तो मानवीय मूल्य आणि संवेदनांपासून दूर होत जातो. त्याच्यातली योग्य-अयोग्य, न्याय्य-अन्याय्य, चांगले-वाईट ठरवण्याची क्षमता संपून जाते. त्याला सुख-दुःख, प्रेम आदी संवेदनांची जाणीव ही कमी होत जाते ज्यामुळे तो इतर माणसांपासूनही तुटत जातो. तो सर्वाना संशय व अविश्वासाच्या नजरेने बघायला लागतो व कोणाजवळच आपल्या मनातली गोष्ट सांगू शकत नाही. परिस्थिती अशी व्हायला लागते कि तो स्वतःपासुनही तुटत जातो. त्याला जीवनाविषयी सर्वत्र निराशा वाटायला लागते कुठल्याही गोष्टीचा मोह व कशातच रुची राहत नाही. असे लोक आपली सृजनशीलता गमावून बसतात व एकटेच, उदास, कुठल्याही ध्येय व महत्वाकांक्षेविना कायम हरवलेले असतात.

समाजापासून दुरावणे, बेरोजगारी, महागाई, आर्थिक चणचण, जातीभेद, शोषण, हिंसेने भरलेल्या अशा या भांडवलशाहीच्या जगात लोक एक दुसऱ्याला स्वतःचे फक्त स्पर्धक मानू लागतात. दुसऱ्यांच्या आनंदाने त्यांना आनंद होत नाही अथवा दुसऱ्यांच्या दुःखाने ते दुःखीही होत नाहीत. एकाच गटात सोबत काम करणारे लोकही एकमेकांबद्दल द्वेषाची भावना ठेवून असतात. स्वतःच्या गरजा पूर्ण न होण्याच्या असुरक्षिततेमुळे ते दुसऱ्यांनाही मागे खेचण्याच्या वृत्तीत जगतात. मानवीय मूल्य, खऱ्या मैत्रीसंबंधाची भावना व मानवी प्रेम संपुष्टात येतात.

याशिवाय काश्मीर अथवा उत्तरपूर्व भारतातील काही राज्यात राज्यसत्तेकडून सैन्याद्वारे केले जाणारे दमन या कारणांमुळेही मानसिक नैराश्याच्या घटनांमध्ये जबरदस्त वाढ होत आहे. या भागांमध्ये सैन्याला अवाजवी अधिकार दिले गेले आहेत. काश्मीर खोऱ्यात ९ लाखापेक्षा जास्त सैन्य तैनात करून सतत संचारबंदी लावली जात आहे. शांततापूर्ण आंदोलने सुद्धा करू दिल्या जात नाहीत, तसेच पॅलेट गन चा अवाजवी उपयोग, कुठल्याही कारणाशिवाय व गुन्ह्याशिवाय अटक करणे हे नेहमीचेच झाले आहे. रोजच्या जगण्यातील जीवनावश्यक गोष्टी, संपर्क साधने जसे कि भ्रमणध्वनी, इंटरनेट यावर पण सक्तीची बंदी घातली जात आहे. अशा परिस्थितीत राग, अशांतता वाढल्याने लोक मानसिक नैराश्याचे शिकार बनत आहेत. काही दशकांपर्यंत आनंदी मानल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये आता मात्र बहुतेक लोक मानसिक नैराश्याचे शिकार होत आहेत. १९८५ मध्ये काश्मीरमध्ये मानसिक रुग्णांची संख्या ७७५ होती जी २०१५ मध्ये वाढून १ लाख ३० हजारावर जाऊन पोहोचली.

आजच्या काळात लहान मुलेही मानसिक नैराश्यातून जात आहेत. लहान वयापासूनच समवयस्क साथींसोबत होत असणारी तीव्र स्पर्धा, तुलना आणि भविष्याबद्दलच्या काळजीमुळे टाकला गेलेला दबाव या कारणांमुळे ते स्वतःचे बालपण ही व्यवस्थित जगू शकत नाहीत. अशाही घटना समोर आहेत कि दरवर्षी बरीच मुले परीक्षा काळात आत्महत्या करतात. ‘ इकॉनॉमिक टाइम्स’ च्या रिपोर्टनुसार भारतात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. सर्वसाधारण कुटुंबात एकटेपणा व नैराश्य आणि त्याचे परिणाम योग्य प्रकारे माहित नसतात आणि असेही लोक सापडतात जे आपली पोकळ सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी मानसिक आजारांसारख्या गंभीर समस्या लपवून ठेवतात. डॉक्टर कडून योग्य तो इलाज, औषधपाणी करणे सोडून अशा लोकांना समाजापासून वेगळे करून एखाद्या कोपऱ्यात पडून राहण्यासाठी सोडले जाते. भारतात तसे तर सर्वच प्रकारच्या डॉक्टर्स ची संख्या खूपच कमी आहे. पण मनोचिकित्सकांची संख्या तर मानसिक रुग्णांच्या तुलनेत नगण्यचआहे.

नैराश्य व एकटेपणाच्या महारोगापासून सुटका मिळवण्यासाठी नफेखोर, लालची आणि एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा करण्यास भाग पाडणाऱ्या भांडवली व्यवस्थेला संपवावे लागेल. भांडवलशाहीचा नायनाट करून समानता आणि न्यायावर आधारित एक नवीन समाज बनवण्याच्या संघर्षात जोडले जाणे हा आपणहूनच एकटेपण व नैराश्याला दूर ठेवण्याचा योग्य मार्ग आहे. या प्रक्रियेत आपण आयुष्याला जवळून बघतो व कामगार कष्टकऱ्यांच्या जीवन संघर्षाशी जोडून आपण श्रमाचे महत्व खोलात जाणायला लागतो आणि जगण्यावर प्रेम करण्याचे खरे मार्ग जाणायला लागतो. हे सर्व सोडून जेव्हाही शक्य असेल तेव्हा निसर्गात वेळ घालवला पाहिजे कारण निसर्गापासून तुटणे हे ही नैराश्याचे एक कारण आहे. नवीन लोकांशी मैत्री करून, मनमोकळ्या गप्पा करून, कला-साहित्य-संगितासारख्या काही सृजनात्मक कामात रुची वाढवून सुद्धा परात्मभावावर काही प्रमाणापर्यंत मात केली जाऊ शकते.

कामगार बिगुल, जानेवारी 2020