क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका – 10
मालांचे अभिसरण आणि पैसा
✍ अभिनव
(अनुवादकाची टीप: मुद्रा (Money) या हिंदी शब्दाला मराठीत पैसा हा जास्त प्रचलित शब्द वापरला आहे. परंतु मराठीत पैसा शब्द रुपयाचा हिस्सा या अर्थाने सुद्धा वापरला जातो. या लेखात जिथे कुठे पैसा हा शब्द रुपयाचा हिस्सा या अर्थाने येतो, तेथे तसा उल्लेख करण्यात आला आहे.)
मागील अंकात आपण बघितले की कशाप्रकारे सामाजिक श्रम विभाजन आणि विनिमयाच्या विकासासह पैसा-रूपाचा विकास झाला. आपण मूल्याचे एक स्वतंत्र रूप म्हणून पैशाच्या विकासाचे विविध टप्पे समजून घेतले आणि हे पाहिले की विनिमयाचे सर्वात आरंभिक रूप अर्थात आकस्मिक स्वरूपातच पैसा-रूपाच्या उत्पत्तीची बीजे होती. जस-जशी समाजात सामाजिक श्रम विभागणीच्या विकासाबरोबर विनिमयाचा विस्तार आणि तीव्रता वाढत गेली, तस-तसा उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध अधिक तीव्र होत गेला. याबरोबरच एका टप्प्यावर पैसा-रूप विकसित झाले, जे एक प्रकारे सर्व मालांची ‘संयुक्त कारवाई’ होती. जणू काही सर्व मालांनी एकत्र येऊन एका मालाला पैशाची भूमिका प्रदान केली, तिला वैश्विक समतुल्य, मूल्याच्या स्वतंत्र रूपाची पदवी दिली.
आपण हे देखील पाहिले की वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या मालांनी ही भूमिका ग्रहण केली, जे की त्या समाजातील विविध मालांच्या सापेक्ष महत्वावर अवलंबून होते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी गुरे, काही ठिकाणी तंबाखू, काही ठिकाणी कवड्या, तर काही ठिकाणी कापड, तांदूळ किंवा दूध यांना ही पदवी मिळाली. पण ज्याअर्थी पैसा हे मूल्याचे म्हणजेच अमूर्त मानवी श्रमाचे एक स्वतंत्र-रूप होते, त्यामुळे त्याच्यासाठी एखादा असा माल गरजेचा होता जो जगभरात एका रूपात आढळत असेल, तो क्षणभंगुर नसेल, टिकाऊ असेल आणि केवळ प्रमाणाच्या आधारावर विभागला जाऊ शकेल, गुणांच्या आधारावर नव्हे. ही भूमिका चांदी आणि प्रामुख्याने सोन्याने घेतली. सोने किंवा चांदीच्या उत्पादनात गुंतलेले अमूर्त मानवी श्रमच होते जे इतर मालांचे मूल्य निर्धारित करण्यासाठी एक मोजपट्टी म्हणून काम करत होते. साहजिकच, त्यासाठी सोन्या-चांदीचे वेगवेगळ्या वजनाचे तुकडे निश्चित केले गेले जेणेकरून त्यांचा विविध मालांसोबत विनिमय होऊ शकेल. अशा प्रकारचे स्वतंत्र मूल्य-रूप, म्हणजेच पैसा, संपूर्ण समाजाच्या पातळीवर तेव्हाच वैध ठरू शकते जेव्हा एखादी राज्यसत्ता आपल्या शिक्क्यासह त्याला मान्यता प्रदान करेल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की पैशाला राज्यसत्तेने निर्माण केले. पैसा माल उत्पादक समाजात माल उत्पादकांच्या परस्पर देवाणघेवाणीतून निर्माण झाला आणि नंतर वेगवेगळ्या सभ्यतांमध्ये सरकार किंवा राज्यसत्तांनी त्याला मान्यता दिली.
आता आपण पुढे जाऊ. विनिमयाच्या प्रक्रियेच्या काही विशिष्ट वैशिष्ट्यांची थोडक्यात चर्चा करत आपण मालांचे अभिसरण आणि मालांच्या विनिमयाचे प्रारंभिक स्वरूप, म्हणजे त्यांची प्रत्यक्ष देव-घेव किंवा अदला-बदली (barter) यामधील फरक समजून घेऊ आणि नंतर पैसा आणि मालांच्या अभिसरणाचे काय नाते आहे ते बघू. सोबतच आपण पैशाच्या चलनाचा (currency of money) चा काय अर्थ आहे हे समजून घेऊ.
मार्क्सचा पैशाचा सिद्धांत पैशाच्या रूपात एका मालाच्या अस्तित्वाबद्दल बोलतो. म्हणजेच, एक माल ज्यामध्ये एका विशिष्ट प्रमाणात अमूर्त श्रम लागलेले आहेत, केवळ तेच इतर सर्व मालांच्या मूल्याचे मोजमाप म्हणून काम करू शकते. पण मार्क्सने असेही सांगितले की याच सिद्धांताच्या आधारावर सोन्याच्या नाण्यांचे मूल्य तांबे, कांस्य इत्यादी नाण्यांद्वारे देखील दर्शवले जाऊ शकते आणि सोबतच हे काम राज्यसत्तेद्वारे मान्यताप्राप्त कागदी नोटांद्वारे देखील केले जाऊ शकते. पण मार्क्सच्या काळात या कागदी नोटा सोन्याच्या पैशात बदलण्यायोग्य (convertible) होत्या, किंवा जेव्हा त्या अपरिवर्तनीय (inconvertible) होत्या तेव्हाही मूल्याच्या ज्या प्रमाणाचे त्या प्रतिनिधित्व करत होत्या ते सोन्याच्या पैशाचे एक विशिष्ट प्रमाणच होते. अशा प्रकारे सोनेच अजूनही मूल्याच्या मोजमापाची भूमिका बजावत होते. आपण हे जाणतो की आज रिझर्व बँकेने जारी केलेल्या कागदी नोटांचे मूल्य सुवर्ण-समर्थित (gold backed) नाही. मग याचा अर्थ मार्क्सचा पैशाचा सिद्धांत कालबाह्य झाला असा आहे का? नाही. मार्क्सच्या पैशाच्या सिद्धांतामध्येच ती तत्वे आहेत ज्याच्या आधारावर तुम्ही पूर्णपणे प्रतीकात्मक कागदी पैशाचा सिद्धांत निगमित (deduce) करू शकता, असा पैसा जो स्वर्ण-समर्थित नाही, म्हणजे ज्याचे मूल्य सोन्याद्वारे नियंत्रित केले जात नाही. स्वर्ण-समर्थित नसणे याचा अर्थ असा नाही की विद्यमान कागदी पैशाचे मूल्य काल्पनिक आहे आणि राज्यसत्ता मनमानी प्रमाणात कागदी नोट छापून त्यांचे मूल्य ठरवू शकते आणि समाजात मालांच्या किंमतींची पातळी मनमानी पद्धतीने ठरवू शकते. स्वर्ण–समर्थित नसणे याचा अर्थ असा नाही की पैशाचे मूल्य आज सामाजिक स्तरावर मानवी अमूर्त श्रमाद्वारे निर्धारित केले जात नाहीये आणि ते कोणत्याही गोष्टीद्वारे समर्थित नाहीये. परंतु या गोष्टी समजून घेण्यापूर्वी मार्क्सच्या पैशाच्या सिद्धांतातील मूलभूत तत्वांची योग्य समजदारी असणे आवश्यक आहे.
या प्रकरणात आपण मार्क्सचा पैशाचा सिद्धांत समजून घेऊ, पैशाची कार्ये समजून घेऊ, स्वर्ण-समर्थित म्हणजे सोन्यात परिवर्तनीय अथवा अपरिवर्तनीय प्रतीकात्मक पैसा (म्हणजे इतर धातूंचे नाणी किंवा कागदी नोटा) समजून घेऊ. पुढील अंकात स्वर्ण-समर्थित नसलेल्या सध्याच्या कागदी पैशाला आणि त्याच्या मूल्याला मार्क्सवादी पैसा सिद्धांताच्या आधारावर शास्त्रीयदृष्ट्या कसे समजून घेता येईल हे आपण तपशीलवार पाहू.
विनिमय आणि पैसा
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सर्व माल उत्पादकांसाठी त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे काहीही उपयोग-मूल्य नसते, अन्यथा ते त्याला विकणारच नाहीत. त्यांच्याद्वारे उत्पादित माल एक सामाजिक उपयोग–मूल्य असतो म्हणजे तो सामान्यतः समाजासाठी उपयुक्त असतो. म्हणून एका माल उत्पादक समाजात मालाचा उपयोग-मूल्य म्हणून उपभोग व्हावा यासाठी आधी त्याची विक्री होणे आवश्यक आहे. म्हणजेच, उपयोग–मूल्याच्या रूपात वास्तवीकृत होण्याआधी, म्हणजे त्यांचा उपभोग होण्यापूर्वी, त्यांचे मूल्याच्या रूपात वास्तवीकृत होणे, म्हणजेच विकले जाणे अनिवार्य आहे. हा माल उत्पादक समाजाचा एक महत्त्वाचा सामान्य नियम आहे.
मूल्याच्या योगायोगाच्या रूपाच्या किंवा विस्तारित रूपाच्या टप्प्यात (हे समजून घेण्यासाठी मागील प्रकरण वाचावे – लेखक) सर्व माल त्यांचे मूल्य वेगवेगळ्या मालांमध्ये अभिव्यक्त करतात आणि त्यांचे समतुल्य मूल्य बदलत राहते. उदाहरणार्थ, एक लिटर दुधाचे मूल्य दोन मीटर कापड, एक किलो गहू, दोन हातोडे, अर्धा किलो तांदूळ अशा स्वरूपात अभिव्यक्त केले जाऊ शकते. दुसऱ्या शब्दांत, मूल्याने अद्याप कोणतेही स्वतंत्र–रूप धारण केलेले नाही. मूल्याचे कोणतेही स्वतंत्र-रूप उदयास आलेले नाही जे सर्व मालांसाठी समतुल्याची भूमिका बजावू शकेल, म्हणजे जे एक वैश्विक समतुल्य असेल, ज्यामध्ये सर्व माल त्यांचे मूल्य अभिव्यक्त करतील आणि ज्याच्याशी सर्व मालांचा विनिमय होऊ शकेल.
पैशाचा विकास सामाजिक श्रम विभाजन आणि मालांच्या उत्पादन व विनिमयाच्या विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर होतो. जसजशी मानवी श्रमाची अधिकाधिक उत्पादने माल बनत जातात, तसतसा उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध अधिक तीव्र होत जातो कारण परस्पर गरजांचे जुळणे कठीण होत जाते. प्रत्येक माल उत्पादकासाठी त्याच्या मालाला उपयोग मूल्य नसते आणि ते एक सामाजिक उपयोग मूल्य असते, जे तेव्हाच वास्तवीकृत होऊ शकते म्हणजे उपभोगाच्या क्षेत्रात आणले जाऊ शकते जेव्हा त्याचा विनिमय होईल, म्हणजे जेव्हा ते मूल्याच्या रूपात वास्तवीकृत होईल. परंतु हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा दुसऱ्या माल उत्पादकाला पहिल्याच्या मालाची गरज असते आणि पहिल्या माल उत्पादकाला दुसऱ्याच्या मालाची आवश्यकता असते. जसजशी अधिकाधिक उत्पादने माल होत जातात, तसतसे हे अधिक कठीण होत जाते. यालाच आपण उपयोग–मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध तीव्र होणे म्हणत आहोत.
पैसा याच अंतर्विरोधाची प्रतिक्रिया म्हणून सर्व मालांची सामूहिक, संयुक्त आणि सामाजिक कारवाई आहे, ज्यामध्ये एक विशिष्ट माल किंवा काही विशिष्ट मालांना वैश्विक समतुल्य म्हणजेच पैशाची भूमिका पार पाडण्यासाठी बाजूला केले जाते, जे की स्वतःच मूल्याचे मूर्त रूप, त्याचे स्वतंत्र-रूप आणि स्वतःमध्ये जमा झालेले अमूर्त मानवी श्रम आहे. याचप्रकारे, सामान्यतः, उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध पैसा-रूपाच्या माध्यमातून सांभाळला जातो. स्पष्ट आहे की तो सुटत नाही. जर सामाजिक श्रम विभाजन योग्य नसेल तर सामाजिक प्रभावी मागणीपेक्षा जास्त उत्पादित झालेला माल एकतर त्यांच्या मूल्यापेक्षा कमी बाजारभावाने विकला जाईल किंवा काहीवेळा अजिबात विकला जाणार नाही. म्हणून, मालामध्ये अंतर्निहित उपयोग–मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध पैसा–रूपात सांभाळला जातो आणि तात्पुरता सोडवला जातो, परंतु सामाजिकदृष्ट्या त्याचे कायमस्वरूपी निराकरण एका माल–उत्पादक समाजात शक्य नाही. अशा प्रकारे पैसा हा दुसरे काही नसून सर्व मालांमधील मूल्य-संबंधांचा (value-relations) प्रतिक्षेप (reflex) आहे, जो त्यांच्यामध्ये अंतर्निहित अंतर्विरोधांच्या तीव्र होण्यातून जन्माला येतो.
येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की पैशाचे मूल्य सुद्धा पैसा-मालाच्या (म्हणजे चांदी किंवा सोने) उत्पादनासाठी (त्यांचे उत्पादन म्हणजे त्यांना जमिनीतून काढणे, त्याचे शुद्धीकरण इ.) लागणाऱ्या सामाजिकदृष्ट्या आवश्यक अमूर्त मानवी श्रमांच्या प्रमाणावरच अवलंबून असते. अगदी यामुळेच ते सर्व मालांच्या मूल्याच्या मोजमापाची भूमिका पैशाच्या स्वरूपात बजावू शकते.
पैशाचे मुख्य कार्य एक स्वतंत्र मूल्य–स्वरूप (independent value form) प्रदान करणे हे आहे, एक अशी गोष्ट ज्यामध्ये सर्व माल त्यांचे मूल्य अभिव्यक्त करू शकतील. त्यामुळेच सोने हे मूळात या कामासाठी सर्वात योग्य धातू होते कारण ते सर्वत्र एकाच स्वरूपात आढळते आणि सोन्यापासून सोने केवळ प्रमाणाच्या आधारावर वेगळे केले जाऊ शकते, अगदी त्याचप्रमाणे जसे अमूर्त श्रमाला अमूर्त श्रमापासून केवळ प्रमाणाच्या आधारावर वेगळे केले जाऊ शकते. पैशाला नक्कीच मूल्य असते, पण त्याची कुठलीही किंमत नसते. हा पैसाच आहे ज्यामध्ये प्रत्येक माल त्याचे दाम किंवा किंमत अभिव्यक्त करतो, परंतु स्वतः पैशाची काहीही किंमत नसते, त्याचे काहीही दाम नसते.
मार्क्सने डेव्हिड ह्यूम आणि याबाबतीत त्यांचे अनुसरण करणाऱ्या डेव्हिड रिकार्डो यांच्या सिद्धांताचे खंडन केले. ह्यूम आणि रिकार्डो यांचा असा विश्वास होता की पैशाचे मूल्य काल्पनिक आहे. त्यांचा हा दावा त्यांना पैशाच्या प्रमाण-सिद्धांताकडे (Quantity Theory of Money) घेऊन गेला ज्यानुसार पैशाच्या जास्त पुरवठ्यामुळे त्याचे मूल्य घसरते. मार्क्सने सांगितले की जिथवर स्वर्ण-पैसा किंवा त्याच्या सोन्यात रूपांतरित होऊ शकणाऱ्या प्रतीकांचा प्रश्न आहे, जर त्यांचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर ते अभिसरणातून बाहेर जातील आणि त्यांचे ढिग जमा होतील व ते मालांच्या अभिसरणाचे माध्यम म्हणून काम करणार नाहीत. मार्क्स ने सांगितले की पैसा-रूप या अर्थाने निश्चितच काल्पनिक आहे की मालांचे मूल्य आणि पैशाचे मूल्य ही वास्तविक गोष्ट आहे, परंतु त्यांच्यातील समानता काल्पनिक स्वरूपात बाजारात स्थापित होते. उदाहरणार्थ, बाजार माल उत्पादकाला ‘तुमच्या मालाची अशी-अशी किंमत आहे’ हे आधीच सांगत नाही. माल उत्पादक आपल्या मालावर किंमतीचे लेबल लावतो, जे पैशाच्या एका निश्चित रकमेसाठी आमंत्रण असते. जर ही किंमत मूल्यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर, बाजारातील स्पर्धा शेवटी त्याला संतुलित करते. अजून आपण भांडवली माल उत्पादन आणि नफ्याच्या दराच्या सरासरीकरणाची चर्चा केली नाही आणि आपण केवळ साधारण माल उत्पादनाबद्दल बोलत आहोत. अशा स्थितीत बाजारातील स्पर्धेमुळे मालाच्या उत्पादकाने निर्धारित केलेली किंमत मूल्याच्या आसपासच स्थापित होईल. बाजाराची शिस्त असल्यामुळे माल उत्पादक त्याच्या मालाच्या किमतीत बदल करेल. या अर्थाने, पैसा–रूप नक्कीच काल्पनिक आहे, परंतु स्वतः पैशाचे मूल्य काल्पनिक नसते, तर ते अमूर्त श्रमांच्या प्रमाणात निर्धारित केले जाते.
मार्क्स पुढे स्पष्ट करतात की ज्याअर्थी पैसा-रूप (money form) काल्पनिक आहे, त्यामुळे पैशाची भूमिका कोणत्याही काल्पनिक किंवा नमुना पैशाद्वारे पार पाडली जाऊ शकते, उदाहरणार्थ कागदी पैसा. परंतु तेव्हाही केवळ पैशाचे भौतिक अस्तित्व (material existence of money) त्याच्या कार्यात्मक अस्तित्वाद्वारे (functional existence of money) विनियुक्त केले जाईल, परंतु त्याचे मूल्य केवळ सामाजिकदृष्ट्या आवश्यक अमूर्त मानवी श्रमाद्वारेच निश्चित केले जाईल, जे वास्तवात पैसा-मालाच्या उत्पादनात खर्च होतात.
मग हा भ्रम कसा निर्माण झाला की आता पैसा मूल्याची मोजपट्टी राहिला नाही, त्याच्या मूल्याला स्वतःमध्ये काही अर्थ नाही, इत्यादी? याचे एक कारण म्हणजे पैशाची नावे आणि वजनांची नावे यांच्यात फरक निर्माण झाला. इतिहास सांगतो की बहुतेक पैशांची नावे पैसा-मालाच्या (सोने किंवा चांदी) तुकड्यांच्या वजनाच्या आधारावरच ठरवली गेली, उदाहरणार्थ, पौंड (ब्रिटिश पैसा) शब्दाचे मूळ वजनाचे एकक पौंडच आहे. सुरुवातीला अँग्लो-सॅक्सन इंग्लंडमध्ये 776 ईसवीसन मध्ये पौंडचा अर्थ दुसरा काही नसून एक पौंड चांदीच होता. त्याचप्रमाणे, वेगवेगळ्या प्रमाणात होणारे विनिमय शक्य करण्यासाठी आवश्यक असलेले त्याचे छोटे तुकडे देखील सोन्या/चांदीच्या वेगवेगळ्या प्रमाणांना दर्शवत होते. उदाहरणार्थ, समजा की एखाद्या वेळी 10 किलो तांदळाची किंमत 1/16 पौंड किंवा 1 औंस चांदी होती. तसे पैशाचे नाव म्हणून 1 पाउंडमध्ये जवळपास 240 पेनी असतात. वजनाच्या बाबतीत 1 औंस हे अंदाजे 28 ग्रॅम इतके आहे. येथे आपण हा विशिष्ट माल तांदूळ आणि पैसा म्हणून वापरला जाणारा माल म्हणजे चांदी या दोन्हींच्या प्रमाणाला वजनात अभिव्यक्त करत आहोत. कालांतराने 1 औंस चांदीच्या नाण्यांना पेनी म्हटले जाऊ लागले (जसे आपल्याकडे रुपयाचा भाग म्हणून ‘पैसा’ आहे) आणि त्याला d. (दिनारियम) ने चिन्हित केले जाऊ लागले. नंतर 12 पेनीला 1 शिलिंगचे नाव दिले गेले आणि 20 शिलिंग म्हणजे 1 पाउंड स्टर्लिंग निश्चित झाले. हे पैसा-मालच्या प्रमाणाचे वेगवेगळे मूल्य-वर्ग (denominations, परिमाणे) आहेत, ज्याला राज्यसत्ताच निश्चित करते. नंतर जेव्हा वेगवेगळ्या राज्यसत्तांनी सोने किंवा चांदीच्या पैशाच्या जागी मिश्रित किंवा इतर धातूंची नाणी जारी केली, तेव्हा त्यातील सोने किंवा चांदीचे प्रमाण तर कमी झाले (किंवा संपले) परंतु पैशाच्या मूल्य-वर्गाचे नाव तेच राहिले. म्हणजेच पैशाच्या मूल्य-वर्गाचे नाव आणि वजनाच्या एककाचे नाव जे पूर्वी समान होते, ते वेगळे झाले. आता 1 पौंड पैसे प्रत्यक्षात 1 पौंड चांदीचे प्रतिनिधित्व करत नव्हते. उदाहरणार्थ, 1717 मध्ये इंग्लंडने सोने हे मुद्रा-माल म्हणून स्वीकारले आणि 1 औंस सोन्याचे मूल्य 4.25 पौंड ठरवण्यात आले. जर एक औंस सोन्याचे उत्पादन करण्यासाठी 20 तास लागले असतील आणि 10 यार्ड सुती कापड तयार करण्यासाठी 20 तास लागत असतील तर 10 यार्ड सूती कापडाची किंमत 4.25 पौंड असणार. डॉलर-स्वर्ण मानकाच्या युगात 1967 मध्ये, 1 पौंड हे 2.4 डॉलर्स इतके होते, तर 1 डॉलर 0.028 औंस सोन्याच्या बरोबर होता. म्हणजे 1967 मध्ये 1 ब्रिटिश पौंड हा 0.06 औंस सोन्याच्या बरोबर होता. म्हणजेच पैशाचे मूल्य अजूनही पैसा-मालाच्या उत्पादनावरून ठरवले जात होते, परंतु वजनांची नावे आणि पैशाच्या मूल्य-वर्गाची नावे वेगळे झाली होती. पैशाच्या अवमूल्यनाचे काम वेगवेगळ्या राज्यसत्तांनी यामुळे केले कारण ते त्यांच्या राज्याच्या राजकोषात सोने आणि चांदीच्या प्रमाणाच्या तुलनेत कितीतरी जास्त नाणी जारी करू शकत होते आणि त्याद्वारे ते राज्याचे कर्ज फेडू शकत होते, युद्धांचा खर्च भागवू शकत होते, राज्याचा खर्च चालवू शकत होते. आपण पैशाच्या उत्पत्ती आणि विकासाच्या या अत्यंत मनोरंजक इतिहासात फार तपशीलात जाऊ शकत नाही, परंतु ते नक्कीच वाचण्यासारखे आहे. यातून संपूर्ण चित्र आपल्यासमोर उभे राहते आणि आर्थिक इतिहासातील घटनांचे एक जिवंत चित्र मनात उभे राहते.
यानंतर मार्क्स पैशाच्या दोन मूलभूत कार्यांवर येतात: पहिले, मूल्याचे माप आणि दुसरे, किंमतीचे/दामाचे मानक. याचा काय अर्थ आहे? मूल्याचे माप म्हणजे हे की पैशाद्वारेच इतर सर्व मालांचे मूल्य मोजले जाते. परंतु पैशाची निश्चित एकके असतात ज्याद्वारे मूल्याच्या विविध प्रमाणांचा विनिमय होते. उदाहरणार्थ, 1 रुपयात 4 आणे, 1 आण्यामध्ये 25 पैसे. येथे पैसा (Money) हा किमतीच्या मानकाची भूमिका बजावत आहे, म्हणजे पैसा-मालाची विविध प्रमाणे जी सोन्या-चांदीच्या पैशाच्या युगात त्यांची वेगवेगळी वजने दर्शवत होती. ही मानके कोणत्याही अर्थव्यवस्थेत राज्यसत्ता निश्चित करते, ज्याद्वारे पैसा-माल (सोने किंवा चांदी) च्या वेगवेगळ्या प्रमाणांना पैशाच्या मूल्य-वर्गाच्या रूपात निश्चित केले जाते आणि राज्यसत्ताच या विविध मूल्य-वर्गांना नावे देखील देते. उदाहरणार्थ, समजा की एक टन लोखंड तयार करण्यात लागलेले अमूर्त मानवी श्रम हे एक किलोग्राम सोने तयार करण्यात लागलेल्या अमूर्त मानवी श्रमाइतके आहे. त्यामुळे दोघांचे मूल्य समान झाले आणि 1 टन लोखंडाच्या मूल्याला पैशाच्या स्वरूपात सोन्याचे एक निश्चित प्रमाण, 1 किलोग्रॅम, अभिव्यक्त करते. हे मूल्याचे मोजमाप म्हणून पैशाचे कार्य प्रदर्शित करते. जर 1 ग्रॅम सोन्याला राज्यसत्ता 1 रुपया बरोबर मानत असेल तर 1 टन लोखंडाची किंमत 1000 रुपये आहे. येथे माल लोखंड आहे, ज्याचे प्रमाण 1 टन आहे; मूल्याचे माप आहे 1 किलोग्राम सोने; आणि किंमतीचे मानक आहे रु. 1000 जे की 1 किलो सोन्याच्या समतुल्य आहे, किंवा रु. 1000 जे 1000 ग्रॅम सोन्याचे प्रतिनिधित्व करते.
मूल्याच्या मापाच्या रूपात पैशाचा मालांसोबतचा संबंध बदलू शकतो. जर सर्व मालांच्या उत्पादनात उत्पादकता वाढली आणि त्यांचे श्रम-मूल्य कमी झाले आणि सोन्या/चांदीच्या उत्पादनात तसे घडले नसेल किंवा त्याच्या उत्पादकतेत झालेला बदल अगदी त्याच प्रमाणात आणि त्याच दिशेने नसेल, तर मूल्याच्या मापाच्या रूपात पैशाचा सर्व मालांशी संबंध बदलून जाईल. परंतु यामुळे किमतीचे मानक म्हणून पैशाच्या भूमिकेत काही फरक पडणार नाही. 1 पैशाचा 4 आण्यांशी संबंध तोच असेल जो पूर्वी होता आणि 4 आण्याचा 1 रुपयाशी सुद्धा संबंध तोच असेल जो पूर्वी होता. मार्क्स लिहितात:
“मूल्याचे माप आणि किमतीचे मानक या रूपांत पैसा दोन भिन्न कार्ये पूर्ण करतो. मूल्याचे माप म्हणून तो मानवी श्रमाचा सामाजिक अवतार आहे; एखाद्या धातूच्या ठरवलेल्या वजनाच्या निश्चित प्रमाणाच्या स्वरूपात तो किंमतीचे मानक आहे. मूल्याचे माप म्हणून ते सर्व मालांच्या मूल्याला किमतींमध्ये, म्हणजेच सोन्याच्या काल्पनिक परिमाणांमध्ये रूपांतरित करण्याचे काम करतो; किमतीच्या मानकाच्या रूपात तो सोन्याच्या ह्या प्रमाणाला मोजण्याचे कार्य करतो. मूल्यांचे माप म्हणून ते मूल्यांच्या रूपामध्ये मालाला मोजते; याउलट, किंमतीचे मानक म्हणून ते सोन्याच्या विविध प्रमाणांना सोन्याच्या एका एकक परिमाणाद्वारे मोजते, ना की सोन्याच्या एका परिमाणाच्या मूल्याला एखाद्या दुसऱ्या परिमाणाच्या वजनाने. किंमतीच्या मानकांसाठी सोन्याच्या एका निश्चित वजनाला मोजण्याचे एकक म्हणून निश्चित करणे आवश्यक आहे.” (कार्ल मार्क्स, 1982, कॅपिटल, खंड 1, पेंग्विन संस्करण, पृ. 192, जोर आमचा)
स्पष्ट आहे की पैशाच्या या दोन भूमिका समजून घेणे आणि त्यात फरक करणे महत्त्वाचे आहे. पैसा या दोन्ही भूमिका तेव्हाच व्यापक आणि सामाजिक पातळीवर निभावू शकतो जेव्हा त्याला राज्यसत्तेद्वारे कायदेशीर मान्यता दिली गेली असेल. ही बाब समजून घेणे यासाठीही महत्त्वाची आहे कारण नंतर अशा कागदी पैशाच्या उदयाची परीघटना समजून घेण्यासाठी हे आवश्यक आहे, ज्याला सोन्याचे समर्थन नाही म्हणजे जो स्वर्ण-पैशाचा प्रतिनिधी किंवा प्रतीक नाही, ज्यामध्ये सोन्याच्या पैशाच्या भौतिक अस्तित्वाला त्याच्या कार्यात्मक अस्तित्वाने गिळंकृत केले आहे. सोप्या भाषेत, ज्यामध्ये आता भौतिक पातळीवर सोन्याचा पैसा संचारात नाही, परंतु त्याचे कार्य त्याचा प्रतिनिधी किंवा प्रतीक असलेला कागदी पैसा करत आहे.
पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. अशा एखाद्या गोष्टीची किंमत किंवा दाम असू शकते जिचे काही मूल्य नाही. उदाहरणार्थ, जमीन मानवी श्रमाने निर्माण होत नाही. ती एक नैसर्गिक संसाधन आहे जी मर्यादित प्रमाणात आहे. अशा वेळी, जमिनीचे कोणतेही मूल्य नाही कारण ते श्रमाचे उत्पादन नाही. मूल्य म्हणजे दुसरे काही नसून कुठल्यातरी उत्पादन किंवा सेवेच्या रूपात भौतिक रूप धारण केलेले अमूर्त मानवी श्रमच आहे. त्यामुळे जमिनीचे कुठलेही मूल्य नसते. परंतु जर जमिनीची खाजगी मालकी अस्तित्वात आली तर तिचीही खरेदी-विक्री सुरू होते आणि त्यामुळे तिलाही एक किंमत मिळते. पण तरीही तिचे कुठलेही मूल्य नसते. जमिनीचा मालक वर्ग तिचे भाडे किंवा तिच्या किमतीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाकडून एक शुल्क किंवा खंडणी (tribute) वसूल करतो आणि म्हणूनच तो सर्वात परजीवी आणि प्रतिक्रियावादी वर्ग असतो, मग तो भांडवली जमीनदार असो वा सामंती जमीनदार.
पैसा किंवा मालांचे अभिसरण
मालांच्या खरेदी-विक्रीसाठी पैसा हे माध्यम म्हणून काम करते. म्हणजे तो मालांचे अभिसरण आणि त्यांच्या रूपांतरणाचे (metamorphosis) काम करतो. मालाचे रूपांतरण म्हणजे काय? मालाचे रूपांतरण म्हणजे मालाचे पैशात बदलणे आणि नंतर परत पैशाचे मालामध्ये बदलणे. हे मालांच्या अभिसरणाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. म्हणजे एका मालाच्या उत्पादकाने आपला माल खरेदीदाराला विकला आणि त्याच्या हातात पैसे आले; या पैशाने त्याने त्याच्यासाठी आवश्यक माल खरेदी केला. ही प्रक्रिया वस्तूविनिमयापेक्षा (barter) वेगळी आहे, ज्यामध्ये एक माल सरळ दुसऱ्या मालासोबत पैशाच्या मध्यस्थीशिवाय बदलला जातो. या वस्तूविनिमयाल दर्शवण्याचे सूत्र आहे:
माल – माल (मालाची सरळ दुसऱ्या मालासोबत अदला-बदली)
जेव्हाकी मालांचे अभिसरण (circulation of commodities) दर्शविण्याचे सूत्र आहे:
माल – पैसा – माल (मा – पै – मा)
आपण पाहू शकतो की मालांच्या अभिसरणामध्ये दोन रूपांतरणे अस्तित्वात आहेत. प्रथम, मा-पै किंवा माल-पैसा, म्हणजे मालांचे पैशात रूपांतर होणे, त्यांचे विकणे. हे स्वतःच एक जोखमीचे पाऊल आहे. उत्पादकाचा माल विकला जाईल की नाही हे त्याला त्याच्या मालासाठी त्याला खरेदीदार मिळेल की नाही हे यावर अवलंबून आहे. त्याला खरेदीदार मिळेल की नाही हे त्याच्या मालाचे सामाजिक उपयोग-मूल्य आहे की नाही यावर अवलंबून असते. त्याच्या मालाचे सामाजिक उपयोग-मूल्य आहे की नाही हे सामाजिक श्रम विभाजन गुणात्मक आणि परिमाणात्मकदृष्टया कसे आहे यावर अवलंबून असते. जर वरील मालाचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त असेल, म्हणजे या मालाच्या उत्पादनात सामाजिकदृष्ट्या आवश्यकतेपेक्षा जास्त श्रम लागले असतील, तर हा माल विकलाच जाणार नाही किंवा त्याच्या मूल्यापेक्षा कमी किमतीला विकला जाईल. भलेही त्या मालाच्या उत्पादनामध्ये वेगळ्याने सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम (म्हणजे त्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रातील उत्पादनाच्या सरासरी परिस्थितीनुसार निर्धारित होणाऱ्या सामाजिक श्रमाचे प्रमाण) लागले असले तरीही जर त्याचा पुरवठा आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर त्यात लागलेले श्रम समाज सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम म्हणून ओळखले जाणार नाही आणि एकतर तो माल विकला जाणार नाही किंवा त्याच्या मूल्यापेक्षा कमी किमतीत विकला जाईल. गुणात्मक सामाजिक श्रम विभाजन श्रमाच्या उत्पादनांना मालामध्ये रूपांतरित करते आणि परिमाणात्मक सामाजिक श्रम विभाजन त्यांच्या खरेदी–विक्रीला एक अपघाताची बाब बनवून टाकतो. जर एकूण सामाजिक श्रमाचा गरजेपेक्षा जास्त हिस्सा एखाद्या विशिष्ट मालाच्या उत्पादनात लागलेला असेल, आणि परिणामी तो माल त्याच्या मूल्यापेक्षा कमी किमतीला विकला जात असेल, तर बाजारातील परिस्थिती अखेरीस या सामाजिक श्रम विभाजनाला बदलवेल. सामाजिक श्रमाचा काही हिस्सा त्या मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रातून एखाद्या अशा मालाच्या उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये स्थानांतरित होईल ज्या मालाचा पुरवठा त्याच्या प्रभावी मागणीपेक्षा कमी असेल आणि तो बाजारात त्याच्या मूल्यापेक्षा जास्त बाजार-किंमतीला विकला जात असेल. बाजार-किंमत आणि मूल्यामध्ये वेगवेगळ्या मालांच्या पातळीवरील येणारे सर्व फरक सामाजिकरित्या एकमेकांना खोडतात आणि एकूण मूल्य एकूण बाजार-किमतीएवढेच राहते, कारण प्रत्येक खरेदी ही एक विक्री असते आणि प्रत्येक विक्री ही एक खरेदी असते. खरेदीदाराच्या हातात असलेला पैसा देखील त्याने केलेल्या विक्रीचाच परिणाम आहे. त्यामुळे मालांचे रूपांतरण एकमेकांशी विणलेले, एकमेकांशी बांधलेले, एकमेकांशी जोडलेले असते. तथापि, हे सहज समजले जाऊ शकते की मालाची विक्री, म्हणजे एखाद्या माल उत्पादकासाठी मालाचे पहिले रूपांतरण एखाद्या माल उत्पादक अर्थव्यवस्थेत पूर्वप्रदत्त तथ्य नसते, तर तो योगायोगाचा भाग असतो, ज्यामध्ये अनेक जोखमी असतात.
एखाद्या माल उत्पादकासाठी दुसरे रूपांतरण सोपे आहे. कारण दुसऱ्या रूपांतरणात, म्हणजेच पै-मा (पैसा-माल) दरम्यान त्याच्या हातात कुठलाही साधारण माल नसतो तर पैसा असतो, जो सार्वत्रिक समतुल्य असतो, निरपेक्षपणे विनिमेय (absolutely alienable) असतो, ज्याचा विनिमय कोणत्याही मालासोबत होऊ शकतो. हा मालांमधला ईश्वर आहे! पैशाने माल उत्पादक त्याच्यासाठी आवश्यक असलेली सर्व उत्पादने आणि उपभोगाच्या वस्तू खरेदी करू शकतो. यासह माल अभिसरणाचे सर्किट पूर्ण होते, दोन्ही रूपांतरण पूर्ण होऊन जातात. मा–पै–मा पूर्ण होण्यासोबत आपल्याला दोन्ही टोकांना माल मिळतो; हे दोन्ही माल उपयोग-मूल्याच्या दृष्टीने भिन्न आहेत, म्हणजेच त्या दोन भिन्न माल आहेत; परंतु मूल्याच्या बाबतीत दोघांमध्ये काहीही फरक नाही; म्हणजेच, दोन्ही उपयोग-मूल्यांचे मूल्य समान आहे. हे माल अभिसरणाच्या संपूर्ण सूत्राचे वैशिष्ट्य आहे: यात दोन्ही टोकांना भौतिकदृष्ट्या भिन्न माल (उपयोग–मूल्ये) असतात, ज्यांचे मूल्य समान असते आणि ज्यांचा विनिमय पैशाच्या मध्यस्थीने होतो. जेव्हा दोन्ही माल त्यांच्या खरेदीदारांपर्यंत पोहोचतात, तेव्हा ते उत्पादन आणि अभिसरण या दोन्ही क्षेत्रातून निघून उपभोगाच्या क्षेत्रात जातात, त्यांचा उपभोग घेतला जातो आणि ते अभिसरणाच्या बाहेर जातात.
एका माल उत्पादकाच्या मालाचे रूपांतरण इतर अनेक माल उत्पादकांच्या मालाच्या रूपांतरणाशी जोडलेले असते. उदाहरणार्थ, पहिल्या माल उत्पादकाने ज्या माल उत्पादकाला आपला माल विकला, त्याच्याजवळ असलेला पैसा स्वतः त्याने आपला माल विकल्यावरच आला होता आणि हेच तिसऱ्या माल उत्पादकाला लागू होते ज्याने दुसऱ्या माल उत्पादकाकडून माल विकत घेतला होता. अशा प्रकारे, मालांच्या रूपांतरणाचे सर्व सर्किट एकमेकांशी जोडलेले असते. यालाच आपण मालांचे अभिसरण म्हणतो. या प्रक्रियेत, मालांच्या उपभोगाबरोबर स्वतः माल तर या प्रक्रियेतून बाहेर पडतो, परंतु पैशासोबत असे होत नाही. तो एक सर्किट संपल्यानंतरही मालांच्या विनिमयामध्ये मध्यस्थीचे काम करत राहतो, तो मालांनी मोकळ्या केलेल्या जागा भरत राहतो आणि या अभिसरणात अथकपणे फिरत राहते. मार्क्सने आपल्या सुंदर साहित्यिक शैलीत म्हटल्याप्रमाणे: “मालांचे अभिसरण प्रत्येक रंध्रातून निघणाऱ्या घामाप्रमाणे पैशाला काढत राहते.” (कार्ल मार्क्स, उक्त, पृ. 208) म्हणजे, पैशाचे हे सतत फिरत राहणे आणि मालांच्या देवाणघेवाणीत मध्यस्थ म्हणून कार्य करत राहणे, मालांनी रिक्त केलेल्या जागा भरत जाणे चालू राहते. यालाच मार्क्सने पैशाचे चलन (currency of money) म्हटले आहे.
मार्क्सने सांगितले की, पैशाचे हे चलन हे मालांच्या अभिसरणाचे कारण नसून त्याचा परिणाम आहे. सामान्यत: लोकांना असे वाटते की जर मालांची खरेदी-विक्री सुरळीत होत नसेल, तर त्याचे कारण पैशाची म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून काम करणाऱ्या वस्तूची कमतरता झाली आहे. पण हा एक दृष्टीभ्रम आहे. मालांच्या खरेदी-विक्रीत घट होण्याची कारणे काही वेगळी असतात. जेव्हा मालांची सुरळीत आणि गतिमान रूपाने खरेदी होते तेव्हा पैशाचे चलनवलनही तीव्र दराने होते. मालांच्या अभिसरणात खंड पडल्यावर हे चलनवलनही बाधित होते. परंतु यामध्ये निर्णायक भूमिका मालांच्या उत्पादनाची आणि त्यांच्या अभिसरणाची आहे, पैशाच्या प्रमाणाची नाही.
मग एखाद्या वेळी एखाद्या अर्थव्यवस्थेत आवश्यक असलेले पैशाचे प्रमाण कसे ठरवले जाते? ह्यूम आणि रिकार्डो, ज्यांचा वर उल्लेख आला आहे, यांचा असा विश्वास होता की मालांच्या किंमतींची पातळी ही पैशाच्या पुरवठ्याद्वारे निर्धारित केली जाते. हा देखील पैशाच्या प्रमाण सिद्धांतातूनच निघणारा एक युक्तिवाद होता. मार्क्सने सांगितले की ही उलटी गोष्ट आहे. मार्क्सने निदर्शनास आणून दिले की मालांचे अभिसरणच ठरवते की पैशाचे प्रमाण काय असावे. अभिसरणात असलेल्या सर्व मालांची एकूण किंमत हा तो पहिला घटक आहे जो त्यांच्या अभिसरणासाठी आवश्यक पैशांचे प्रमाण निर्धारित करतो. परंतु जर अभिसरणातील मालांची एकूण किंमत रु. 1 कोटी असेल, तर याचा अर्थ असा नाही की त्यांच्या अभिसरणासाठी रु. 1 कोटी एवढ्या पैशांची आवश्यकता असेल. का? कारण पैशाप्रमाणेच नोटा किंवा नाणी अनेक मालांच्या विनिमयाला पार पाडू शकतात. वेगवेगळ्या मूल्य-वर्गांमधील पैशांच्या नोटा आणि नाणी सरासरी किती विनिमयाला घडवू शकतत याला पैशाचा वेग (velocity of money) म्हणतात. सर्व मूल्य-वर्गांमधील पैशांच्या वेगवेगळ्या नोटा आणि नाण्यांची संख्या आणि त्यांच्या वेगाच्या आधारावर पैशाच्या वेगाची गणना केली जाऊ शकते आणि याच आधारावर पैसे जारी केले जातात. जोपर्यंत सोने किंवा चांदीचे पैसे किंवा त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर धातूंच्या नाण्यांचा किंवा परिवर्तनीय (convertible) कागदी पैशाचा संबंध आहे, तर मुद्दा सोपा आहे: जर आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे जारी केले गेले तर ते अभिसरणातून बाहेर जाऊन निष्क्रिय होतात आणि त्याचे निष्क्रिय ढिगारे बनतात. परंतु जर आपण अपरिवर्तनीय (inconvertible) कागदी पैशांबद्दल बोलत असू, तर एखाद्या देशात माल अभिसरणात असलेल्या एकूण मालांची एकूण किंमत आणि पैशाच्या वेगानुसार ठरणाऱ्या स्वर्ण-पैशाच्या प्रमाणापेक्षा जास्त अपरिवर्तनीय कागदी पैसे जारी केले गेले, तर त्या कागदी पैशाचे मूल्य खाली घसरेल. स्वर्ण-पैशामध्ये मालांचे मूल्य यामुळे प्रभावित होत नाही, परंतु अपरिवर्तनीय कागदी पैशाच्या मूल्यात घट झाल्यामुळे त्या कागदी पैशामध्ये मालांची किंमतसुद्धा घसरेल कारण स्वर्ण-पैशाच्या तुलनेत अपरिवर्तनीय कागदी पैशाचे मूल्य कमी होईल. हे मार्क्सच्याच उदाहरणाने समजून घेऊ.
“कागदाचे ते तुकडे ज्यावर पैसा-नाव छापलेले असते, जसे की 1 पौंड, 5 पौंड इत्यादी, त्यांना राज्यसत्तेद्वारे बाहेरून अभिसरणाच्या प्रक्रियेत टाकले जाते. जिथपर्यंत ते सोन्याच्या समान प्रमाणाच्या बदल्यात वास्तवामध्ये संचरित होतात तिथपर्यंत त्यांची हालचाल मौद्रिक अभिसरणांच्या नियमांचेच प्रतिबिंब असते. कागदी पैशाच्या अभिसरणास विशिष्टपणे लागू होणारा कोणताही नियम केवळ त्याच प्रमाणातून निर्माण होऊ शकतो ज्या प्रमाणात कागदी पैसा सोन्याचे प्रतिनिधित्व करतो. सोप्या भाषेत नियम खालीलप्रमाणे आहे: जारी केलेल्या कागदी पैशाचे प्रमाण सोन्याच्या (किंवा चांदीच्या) त्या प्रमाणापर्यंत मर्यादित असले पाहिजे जे वास्तवात अभिसरणात आहे आणि ज्याचे प्रतीकात्मक पातळीवर प्रतिनिधित्व आता कागदी पैसा करत आहे. आता हे खरे आहे की अभिसरणाच्या क्षेत्राद्वारे शोषले जाऊ शकणारे सोन्याचे प्रमाण एका विशिष्ट सरासरी पातळीपेक्षा वरखाली कमी-जास्त होत राहते. परंतु असे असूनही, कोणत्याही देशात अभिसरणाचे माध्यम कधीच एका विशिष्ट किमान प्रमाणापेक्षा खाली येत नाही, जे अनुभवाच्या आधारे निश्चित केले जाऊ शकते. हे किमान प्रमाण त्याच्या घटक अंगांच्या रूपात सतत बदलत राहते, किंवा सोन्याच्या ज्या तुकड्यांपासून हे संपूर्ण प्रमाण बनलेले असते ते सतत बदलत असते, याचा स्वाभाविकरीत्या त्याच्या एकूण रकमेवर किंवा त्या निरंतरतेवर कोणताही परिणाम होत नाही ज्यासह ते अभिसरणाच्या क्षेत्रात प्रवाहित होत राहते. म्हणून त्याची कागदी प्रतीके त्याची जागा घेऊ शकतात. परंतु, अभिसरणाचे सर्व मार्ग जर आज पैशाला संपूर्णपणे शोषून घेण्याची क्षमता असलेल्या कागदी पैशाने भरून जातील, तर कदाचित पुढल्या दिवशी मालांच्या अभिसरणात येणाऱ्या चढ-उतारांमुळे ते आश्यकतेपेक्षा जास्त भरलेले असू शकतात. मग कोणतेही मानक शिल्लक राहणार नाहीत. जर कागदी पैसा त्याच्या उपयोगी मर्यादेपेक्षा जास्त असेल, म्हणजे त्याच मूल्य-वर्गाच्या सोन्याच्या नाण्यांची अशी रक्कम जी अभिसरणात असू शकली असती, तर सार्वत्रिक पातळीवर विश्वास गमावण्याच्या धोक्यासहीत तो मालांच्या जगातील सोन्याच्या तेवढ्याच प्रमाणाचे प्रतिनिधित्व करेल जे की त्याच्या अंतर्गत नियमांद्वारे निश्चित केले जाते. कागदी पैशाद्वारे यापेक्षा जास्त प्रमाणाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्नच उद्भवत नाही. जर कागदी पैसा उपलब्ध सोन्याच्या प्रमाणाच्या दुप्पट प्रमाणाचे प्रतिनिधित्व करत असेल, तर मग व्यावहारिकदृष्ट्या 1 पौंड 1/4 औंस सोन्याचे पैसा-नाव राहणार नाही, तर ते त्याऐवजी 1/8 औंस सोन्याचे नाव बनेल. किंमतीचे मानक असण्याच्या सोन्याच्या कार्यात बदल झाल्याप्रमाणेच हा परिणाम असेल. म्हणजेच आधी 1 पौंड किंमत जेवढे मूल्य अभिव्यक्त करत होती, आता 2 पौंड किंमत तेवढेच मूल्य व्यक्त करेल. (कार्ल मार्क्स, उक्त, पृ. 224-25)
म्हणून मार्क्स स्पष्ट करतात की पैशाचे प्रमाण मालांच्या अभिसरणाद्वारे निर्धारित केले जाते आणि म्हणूनच वास्तविक किमती निर्धारित करण्याचा निकष पैशाचे प्रमाण नव्हे तर स्वतः मालांच्या अभिसरणाच्या परिस्थिती आहेत. या परिस्थितींमध्ये दोन मुख्य कारक आहेत: मालांच्या अभिसरणात असलेल्या सर्व मालांची एकूण किंमत आणि पैशाचा वेग. त्याला एका समीकरणाच्या पातळीवर असे समजू शकतो:
पैशाचे प्रमाण = सर्व मालांची एकूण किंमत/पैशाचा वेग
म्हणजे,
Qm = ΣP/Vm
ज्यामध्ये,
Qm = पैशाचे प्रमाण
ΣP = सर्व मालांची एकूण किंमत
Vm = पैशाचा वेग
याला एका अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा सर्व मालांची एकूण किंमत रु. 100 आहे. जर पैशाचा सरासरी वेग 1 आहे, तर एकूण पैशाचे प्रमाण देखील तेवढेच म्हणजे रु. 100 लागेल. असे गृहीत धरा की समाजात फक्त एकाच मूल्य-वर्गामध्ये पैशाचे चलन आहे: रु. 10. अशावेळी रु. 10 च्या 10 नोटांची किंवा नाण्यांची आवश्यकता असेल. परंतु समजा की 10 रुपयाची एक नोट सरासरी दोन माल विनिमयांना पूर्ण करते, तर पैशाचा सरासरी वेग 2 होईल. या स्थितीमध्ये 100 रुपयांच्या मालांचे अभिसरण करण्यासाठी रु. 50 च्या किंमतीचे पैसे पुरेसे असतील. अर्थव्यवस्थेच्या प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारावर एखाद्या अर्थव्यवस्थेत एखाद्या विशिष्ट वेळी पैशाच्या सरासरी वेगाचा अंदाज लावला जाऊ शकतो आणि अनेक अर्थशास्त्रज्ञ तसे करतातही. यानुसार, मालांचे उत्पादन आणि अभिसरणात येणाऱ्या चढउतारांनुसार जरी करायच्या पैशाचे प्रमाण निर्धारित केले जाते, जे कधीही तंतोतंत असू शकत नाही कारण माल उत्पादनाची प्रक्रियाच उलथापालथीची आणि अराजक असते. परंतु एक अंदाजे प्रमाण म्हणून, सतत चालू असलेली प्रक्रिया म्हणून अर्थव्यवस्थेत याचे निर्धारण केले जात राहते.
जर पैशाचा वेग जास्त असेल तर ते दर्शविते की मालांचे अभिसरण सुरळीत पद्धतीने चालू आहे, त्यात फारसे अडथळे नाहीत, सामाजिक श्रम विभाजन परिमाणात्मक दृष्टीने तुलनेने योग्य स्थितीत आहे कारण ते दर्शवते की मालांची खरेदी-विक्री चांगल्या प्रवाहाने होत आहे, उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध तुलनेने अधिक सहजपणे हाताळला जात आहे. परंतु जर पैशाच्या वेगात गतिरोध असेल तर ते मालांच्या अभिसरणात अडथळा दर्शविते, मालांच्या खरेदी-विक्रीतील अडचणी दर्शविते आणि हे दर्शवते की अर्थव्यवस्थेत उपयोग-मूल्य आणि मूल्य यांच्यातील अंतर्विरोध योग्यरित्या हाताळला जात नाहीये. परंतु माल उत्पादकांना मात्र हे पैशाच्या तुटवड्यामुळे घडत आहे असे वाटते.
मूल्याचे प्रतीक
नाणी किंवा नंतरच्या कागदी नोटा दुसरे काही नसून मूल्याचे प्रतीक आहेत. सोन्याने पैसा-माल म्हणून मालांच्या अभिसरणाच्या माध्यमाची भूमिका बजावण्यासाठी त्याने नाण्यांचे रूप घेणे अनिवार्य असते, जे की स्वतः काही नसून सोन्याच्या एका निश्चित प्रमाणाचे वजन असते, जे प्रमाण काल्पनिकरित्या मालांच्या किंमतींमध्ये अभिव्यक्त होते. मालांच्या अभिसरणामध्ये या नाण्यांना प्रत्यक्षात या मालांना भेटावे लागते. जेव्हा मालांचा एका निश्चित किंमतींवर या नाण्यांशी विनिमय होतो, त्यालाच खरेदी किंवा विक्री म्हणतात. या नाण्यांच्या निर्मितीचे काम राज्यसत्ता करते, अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ती किमतीच्या मानकांना ठरवण्याचे काम करते. परंतु जागतिक बाजारपेठेत हे विविध पैसे त्यांचे विशिष्ट स्वरूप, म्हणजे त्यांचा “राष्ट्रीय पोशाख” सोडून त्यांच्या मूळ स्वरुपात, म्हणजे सोन्याच्या रूपात परत येतात. सोने आणि पैशामध्ये फरक केवळ भौतिक स्वरुपात आहे आणि ते माल अभिसरणाच्या क्षेत्रानुसार आणि गरजेनुसार एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात जाऊ शकतात.
मार्क्स स्पष्ट करतात की मालांच्या अभिसरण प्रक्रियेत सोन्याची नाणी झिजतात. परिणामी, ते सोन्याच्या त्या प्रमाणाचे प्रतिनिधित्व करण्यायोग्य राहत नाहीत ज्याची मोहोर किंमतीचे मानक म्हणून राज्य टांकसाळीने त्यावर मारली आहे. उदाहरणार्थ, जर 1 रुपया 0.1 ग्रॅम सोन्याचे प्रतिनिधित्व करत असेल, तर माल अभिसरणादरम्यान झीज झाल्यामुळे ते भौतिकरीत्या आता 0.05 ग्रॅम एवढेच राहिले आहे, परंतु कार्यात्मक आणि प्रतीकात्मकदृष्ट्या ते अजूनही 0.1 ग्रॅम सोन्याचेच प्रतिनिधित्व करत आहे. यामुळे मध्ययुगाच्या सुरुवातीस, जगभरातील राज्यांनी नाण्यांमधील मूळ सोन्याचे प्रमाण कमी करण्यास आणि त्याला इतर धातूंसोबत मिसळण्यास सुरुवात केली आणि नंतर पूर्णपणे तांबे, कांस्य इत्यादींसारख्या इतर धातूंपासून नाणी तयार करणे सुरु केले, जे कार्यात्मक आणि प्रतीकात्मकदृष्ट्या अजूनही तेवढ्याच सोन्याच्या प्रमाणाचे प्रतिनिधित्व करत होते. यामुळे सर्व राज्यसत्तांना त्यांच्या शाही खर्चाची, उधळपट्टीची आणि शासक वर्गाच्या चैनीची व्यवस्था करण्याची संधी मिळाली आणि त्याच वेळी शाही कर्जाची परतफेड करणे देखील सोपे झाले.
तर अशाप्रकारे नाण्यांची वास्तविक अंतर्वस्तू आणि त्यांची नाममात्र म्हणजे अंकित अंतर्वस्तूमध्ये फरक निर्माण झाला, ज्याने त्यांच्या धातू-भौतिक अस्तित्वाला त्यांच्या प्रतीकात्मक-कार्यात्मक अस्तित्वापासून वेगळे केले. यातूनच कागदी पैशाच्या जन्मासाठी आधार तयार झाला, कारण जर सोन्याच्या विशिष्ट प्रमाणाचे (जे की स्वतः मूल्याचे माप आणि किमतीचे मानक आहे) तांबे किंवा पितळाच्या नाण्याद्वारे प्रतीकात्मक व कार्यात्मकरित्या प्रतिनिधित्व केले जाऊ शकते, तर हेच काम इतर साहित्यापासून बनलेले दुसरे प्रतीक का नाही करू शकत? ही परिस्थिती कागदी पैशाच्या उदय आणि विकासाचा आधार होती. अशा कागदी पैशाला केवळ सामाजिक आणि कायदेशीर वैधता आवश्यक होती जी की राज्यसत्ता देते.
हे संक्रमण यामुळे देखील अपरिहार्य होते कारण अत्यंत कमी मूल्याच्या मालांचा आणि अगदी कमी प्रमाणातील विनिमयासाठी सोन्याच्या अतिशय छोट्या प्रमाणाचे नाणे बनवणे कठीण होते. परिणामी, अत्यंत कमी प्रमाणात सोन्याचे प्रतिनिधित्व करणारी इतर धातूंची नाणी आणि नंतर कागदी नोटा येणे अपरिहार्य होते. ही छोटी नाणी आणखी तीव्र गतीने झिजतात. कागदी पैशाच्या उदयात त्यांची विशेष भूमिका होती. साहजिकच याला जारी करण्याचे कामसुद्धा राज्यसत्ताच करू शकते, कारण राज्यसत्तेद्वारे कायदेशीर मान्यता आणि भरवशाशिवाय कागदी नोट काय आहे? केवळ कागदाचा एक तुकडा ज्याला कोणीही पैसा म्हणून स्विकारणार नाही, जर त्याच्या मागे राज्यसत्तेची कायदेशीर स्वीकार्यता आणि मान्यता नसेल. जसे की आपण वर बघितले, पूर्वी सर्व कागदी नोटा सोन्यामध्ये परिवर्तनीय (convertible) होत्या आणि राज्यसत्ता आश्वासन द्यायची की त्यावर नोंदवलेल्या दर्शनी मूल्यानुसार त्याबदल्यात वास्तविक सोने दिले जाईल. अपवादात्मक परिस्थिती वगळता त्याची गरज नसल्यामुळे कोणीही असे करायचे नाही, परंतु जर कोणी अशी मागणी केली तर ती सत्तेने पूर्ण करणे बंधनकारक होते. त्यामुळे कोणतीही राज्यसत्ता माल उत्पादनाचे प्रमाण आणि त्यानुसार आपल्या सोन्याचा साठा याच्या आधारावरच कागदी नोटा जारी करत असे. अपरिवर्तनीय कागदी नोटा (inconvertible paper notes) आल्यानंतर विविध राज्यसत्तांनी त्यांच्या माल उत्पादन आणि सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त कागदी नोटा जारी केल्या, ज्याच्या परिणामी कागदी नोटेचे अवमूल्यन आणि चलनवाढ झाली. यामुळे ना माल उत्पादनाच्या वास्तविक प्रमाणामध्ये कोणता फरक पडायचा, ना त्याच्या वास्तविक मूल्यामध्ये काही फरक पडायचा, ना सोन्याच्या वास्तविक मूल्यामध्ये व प्रमाणामध्ये काही पडायचा आणि ना ही मालांच्या सोन्यामध्ये (सोन्यासोबत त्याचा विनिमय दर) किंमतीत काही पडायचा. जर काही फरक पडायचा तर तो केवळ (एक माल म्हणून सोन्यासह) सर्व मालांच्या कागदी पैशामध्ये अभिव्यक्त होणाऱ्या किमतींवर पडत होता. कारण हे की अजूनही या अपरिवर्तनीय कागदी नोटा स्वर्ण-पैशाद्वारे समर्थित होत्या, अजूनही सोनेच मूल्याच्या वास्तविक मापाचे काम करत होते, भलेही कागदी नोटेचा 1 रुपया पूर्वी 0.1 ग्रॅम सोन्याचे प्रतिनिधित्व करत असेल आणि नंतर स्वर्ण-पैशापेक्षा अधिक प्रमाणात जारी केल्यामुळे आता 2 रुपये 0.1 ग्रॅमचे प्रतिनिधित्व करत असेल. यामुळे फक्त तोच फरक पडतो जो तेव्हा पडला असता जेव्हा किंमतीच्या मानकांमध्ये राज्यसत्तेने बदल केला असता, म्हणजे तिने असे म्हटले असते की जेवढे मूल्य आधी 1 रुपयाच्या किंमत-नावाने अभिव्यक्त केले जात होते, तेच आता 2 रुपयाच्या किंमत-नावाने अभिव्यक्त होईल. परंतु यामुळे आणखी एक फरक पडतो. जर अपरिवर्तनीय कागदी नोटा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात जारी केल्या गेल्या आणि त्यांचे अवमूल्यन झाले, म्हणजे चलनवाढ झाली, तर मजुरी किंवा वेतन मिळवणाऱ्या वर्गाचे वास्तविक उत्पन्न कमी होते. कामगार वर्गाच्या संघर्षाद्वारे मजुरी वाढवण्याला उत्तर म्हणून भांडवलदार वर्ग अनेकदा महागाईचा मार्ग अवलंबतो, जेणेकरून कामगारांचे नाममात्र वेतन तर तेवढेच राहावे, परंतु वास्तविक वेतन कमी व्हावे आणि त्यांचा नफा वाढावा.
हे लक्षात ठेवले पाहिजे की ‘अपरिवर्तनीय’ (incovertible) हा शब्द थोडा भ्रामक आहे. कोणत्याही माल उत्पादक व्यवस्थेमध्ये पैसा नेहमी मालांमध्ये परिवर्तनीय असतो. फक्त अपरिवर्तनीय कागदी नोटेचा विनिमय सरकारी बँकेच्या खिडकीवर सोन्यासोबत होत नाहीत. एखादा व्यक्ती या कागदी नोटेने बाजारात सोने नक्कीच खरेदी करू शकतो.
पुढील प्रकरणामध्ये आपण बघूया की जेव्हा 1970 च्या दशकापासून सोने किंवा कोणत्याही पैसा-मालाचा आधार नसलेल्या कागदी नोटा (fiat currency not backed by any commodity-money) अस्तित्वात आल्या, तेव्हाही मार्क्सचा पैशाचा सिद्धांत लागू करून त्याला समजता येऊ शकते, ना की पैशाचा प्रमाण सिद्धांत लागू करून, ज्यानुसार सरकार मनमर्जीने कितीही प्रमाणात पैसे जारी करून पैशाचे मूल्य आणि किंमतींची सरासरी पातळी ठरवू शकते. आपण बघू की सध्याच्या कागदी पैशाला सोन्याचा आधार नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याला कोणत्याही कारकाचा पाठिंबा नाही. अजूनही त्याचे मूल्य मूल्याच्या श्रम सिद्धांताद्वारे प्रसृत नियमांद्वारेच निर्धारित केले जाते, परंतु कोणत्याही एका पैसा-माल (उदाहरणार्थ, सोने किंवा चांदी) द्वारे नाही. हे कसे होते ते आपण पुढील अध्यायात पाहू. आता आपण चालू चर्चेकडे वळूया.
धातूची नाणी व कागदी नोटांसारख्या मूल्याच्या या प्रतिकांसोबत हेच होते की पैशाचे भौतिक-धातू अस्तित्व त्याच्या कार्यात्मक-प्रतीकात्मक अस्तित्वाद्वारे गिळंकृत केले जाते किंवा शोषले जाते. सोने हे अजूनही मूल्याचे माप आणि किंमतीचे मानक आहे, परंतु ते आता भौतिक पातळीवर अभिसरणाचे माध्यम राहिलेले नाही.
पैशाची इतर काही कार्ये
मार्क्स सांगतात की पैसा हा असा माल आहे ज्याचा इतर कोणत्याही मालासोबत विनिमय केला जाऊ शकतो, म्हणजेच तो निरपेक्षपणे विनिमेय (absolutely alienable) आहे. त्याचे कारण असे की तो साक्षात मूल्याचा अवतार (incarnation of value) आहे, अवतीर्ण मूल्य (value embodied) आहे, मूल्याचे स्वतंत्र रूप आहे. म्हणून एका माल उत्पादक समाजात तो संपत्तीचे मुख्य रूप देखील बनतो. ज्याअर्थी तो संपत्तीचे मुख्य रूप बनतो, त्यामुळे त्यामुळे प्रत्येक जण पैशाचा साठा करू इच्छितो, त्याचे ढीग जमा करू पाहतो. पैशाची साठवणूक करण्याचा (hoarding of money) अर्थ एका माल उत्पादक समाजात हा आहे की मालाचे पहिले रूपांतर म्हणजे ‘माल – पैसा’ तर केले गेले परंतु दुसरे रूपांतर म्हणजे ‘पैसा – माल’ पूर्ण करण्याऐवजी पैशाला जमा करण्यात आले. या प्रवृत्तीमुळे माल उत्पादक समाजातील सर्व उत्पादक आपला उपभोग कमीत-कमी करण्याचा प्रयत्न करतात, जास्तीत जास्त तास काम करतात आणि त्याद्वारे काही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. साहजिकच, त्यांच्यामध्ये काहीच असे अपवाद असतात जे या पद्धतीने भांडवलदारांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. भांडवलदार वर्गाच्या तयार होण्याचे मुख्य स्त्रोत दुसरे आहेत.
साठवणुकीचे माध्यम असण्याव्यतिरिक्त पैसा आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावतो: देयकाचे (परतफेडीचे) साधन. जसजसे माल-उत्पादक समाजात विनिमयाचे जाळे सघन होत जाते, तसतसे समान पक्षांमधील विनिमय वारंवार होऊ लागतो. जेव्हा असे घडते तेव्हा ते पैशाचा उपयोग देयकाचे माध्यम म्हणून करण्यास सुरु करतात. याचा अर्थ असा की दोन पक्ष जे वारंवार मालांचा विनिमय करतात, ते वर्षभर मालांचा विनिमय पैशाचा वापर न करता करतात आणि वर्षाच्या शेवटी उरलेल्या रकमेची परतफेड पैशात केली जाते. उदाहरणार्थ, समजा की एक माल उत्पादक शेतकरी आणि कृषी उपकरणे बनवणारा कारागीर यांच्यात वर्षभर कृषी उत्पादने आणि कृषी उपकरणांची देवाणघेवाण होते; वर्षअखेरीस कृषी उत्पादने आणि कृषी उपकरणांच्या एकूण मूल्याच्या तुलनेच्या आधारावर जर शेतकऱ्याने कारागिराला रु. 100 चा माल अधिक दिला असेल तर कारागीर वर्षाच्या शेवटी रु. 100 रुपयाची परतफेड करून विनिमयातील असमतोल दूर करेल. असेच तेव्हासुद्धा होऊ शकते जेव्हा दोन मालांचा उत्पादन कालावधी भिन्न असेल आणि त्यांना उत्पादित करणाऱ्या माल उत्पादकांमध्ये नियमित विनिमय होत असेल. अशा परिस्थितीत, कमी कालावधीत उत्पादित होणाऱ्या मालाचा माल उत्पादक आपला माल दुसऱ्या माल उत्पादकाला देत राहतो, ज्याची नोंद खात्यात होत राहते; नंतर, दीर्घ कालावधीत उत्पादित होणाऱ्या मालाचा माल उत्पादक आपला माल पहिल्या माल उत्पादकाला देतो आणि खात्यात त्याच्यावर झालेल्या देयाची परतफेड करतो. जसे पैसे देयकाचे माध्यम म्हणून वापरले जाऊ लागते, तसेच खात्याचे पैसे (money of account) म्हणून देखील पैशाचा उपयोग होऊ लागतो. स्पष्ट आहे की असे होण्यासोबतच एका माल-उत्पादक आणि विशेषतः भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विविध प्रकारचे धोके निर्माण होतात. उदाहरणार्थ, ज्या वेळी एखाद्या पक्षाची देय रक्कम परतफेड होणे ठरलेले आहे, जर त्याच वेळी एखादे औद्योगिक किंवा व्यावसायिक संकट उद्भवले, जे नेहमीच स्वतःसोबत मौद्रिक संकटसुद्धा घेऊन येते, तर ती दुसऱ्या पक्षासाठी धोक्याची घंटा असते. मार्क्स लिहितात:
“देयकाच्या माध्यमाच्या रूपातील पैशाच्या कार्यामध्ये एक अंतर्विरोध अंतर्निहित आहे. जेव्हा देयके एकमेकांना संतुलित करतात, तेव्हा पैसे केवळ खात्याचे पैसे (money of account) या रूपामध्ये, एक मूल्य मोजण्याचे साधन म्हणून काम करतात. परंतु जेव्हा प्रत्यक्ष परतफेड करायची असते, तेव्हा पैसा मंचावर अभिसरणाच्या एका माध्यमाच्या स्वरूपात, म्हणजे सामाजिक चयापचयातील एका मध्यस्थाच्या संक्रमणशील रूपात प्रकट होत नाही, तर सामाजिक श्रमाच्या वैयक्तिक अवताराच्या स्वरूपात, म्हणजेच विनिमय-मूल्याचे स्वतंत्र अस्तित्व-वैश्विक मालाच्या स्वरूपात प्रकट होतो. हा अंतर्विरोध औद्योगिक आणि व्यावसायिक संकटाच्या त्या पैलूमध्ये बाहेर पडतो ज्याला आपण मौद्रिक संकट म्हणून ओळखतो. अशा प्रकारचे संकट केवळ तिथेच दिसून येते जिथे चालू देयकांची एक संपूर्ण शृंखला पूर्णपणे विकसित झालेली असेल आणि सोबतच त्यांच्या निपटाऱ्याची एक कृत्रिम प्रणाली देखील विकसित झालेली असेल.” (कार्ल मार्क्स, उक्त, पृ. 235-36)
मार्क्स इथे सांगतात की, ज्या विश्वासार्हतेच्या आधारावर सर्व माल उत्पादक आपापसात मालांचा विनिमय करत असतात आणि विश्वासाने एक कालावधीनंतर व्यापारातील नफा किंवा तोट्याला पैशाच्या माध्यमातून परतफेड करून संतुलित करत असतात, त्याचा विश्वासाला संकटकाळात तडा जातो आणि प्रत्येकाला आपली शिल्लक पैशाच्या रूपात वास्तवीकृत करायची असते, परंतु संकटाच्या वेळी प्रत्येकाचीच शिल्लक एकमेकांमध्ये अडकलेली असते. परिणामी, ही उधार व्यवस्था (credit system) अचानक मौद्रिक व्यवस्थेत (monetary system) बदलते आणि नगदीच्या स्वरूपात आपला नफा-तोटा निर्धारित करण्यासाठी सर्व भांडवलदार/माल उत्पादकांमध्ये धावपळ सुरु होते. अशा वेळी मालांचे महत्त्व धूसर होते आणि माल उत्पादकांसाठी जी गोष्ट महत्त्वाची राहते ती म्हणजे स्वतंत्र मूल्य स्वरूप अर्थात पैसा. मार्क्स स्पष्ट करतात:
“पतप्रणालीचे असे अचानक मौद्रिक व्यवस्थेत बदलणे हे वास्तवात आधीच अस्तित्वात असलेल्या भीतीच्या वातावरणात वैचारिक अचंब्याची भावनासुद्धा जोडते आणि अभिसरणाच्या प्रक्रियेचा अभिकर्ता आपल्याच संबंधांभोवती असलेल्या अभेद्य गूढतेच्या पडद्याने जणू काही घाबरून जातो.” (कार्ल मार्क्स, 1977, ए काँट्रीब्युशन टू दि क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी, प्रगती प्रकाशन, मॉस्को, पृष्ठ 146)
तथापि, जसजसे पैसा हा देयकाचे माध्यम म्हणून आणि खात्याचे पैसे (money of account) म्हणून वापरला जातो, तसतसे पैशाचा वेग आणखी वाढतो कारण पैशाचा भौतिक वापर न करता, म्हणजे अभिसरणाच्या भौतिक माध्यमाच्या रूपात पैशाचा वापर न करता मोठ्या प्रमाणात मालांचा विनिमय होतो. याच प्रक्रियेत एक क्रेडिट किंवा कर्ज प्रणाली देखील विकसित होते. क्रेडीट-पैशाचा जन्म वास्तवात प्रत्यक्षपणे पैशाच्या देयकाचे साधन म्हणून वापरातूनच होतो आणि जसजसे हे क्रेडिट-पैसे विकसित होतात, तसतसे पैशाचा देयकाचे साधन म्हणून उपयोग आणखी वाढतो. मार्क्स लिहितात:
“क्रेडिट-पैसा (कर्ज- किंवा उधार-पैसा) देयकाच्या साधनाच्या रूपात पैशाच्या उपयोगातून उद्भवतो, जसे की आधीपासून खरेदी केलेल्या मालांसाठी दिल्या गेलेल्या त्या उधार-प्रमाणपत्रांमध्ये, आणि ही उधार-प्रमाणपत्रेच स्वतःचे कर्ज दुसऱ्यांकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रसारित होऊ लागतात. दुसरीकडे, देयकाच्या साधनाच्या रूपातील पैशाचे कार्य देखील त्याच प्रमाणात विस्तारित होते ज्या प्रमाणात क्रेडिट-पैसा विस्तारित होतो. देयकाचे साधन म्हणून उपयोग होणारा पैसा आपल्या अस्तित्वाच्या विशिष्ट स्वरुपांना ग्रहण करत जातो, ज्यामध्ये तो मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक व्यवहारांच्या क्षेत्रात अस्तित्वात असतो. दुसरीकडे, सोने आणि चांदीची नाणी मुख्यतः किरकोळ व्यापाराच्या क्षेत्रापुरती मर्यादित राहतात. (कार्ल मार्क्स, 1982, कॅपिटल, खंड-1, पेंग्विन संस्करण, पृष्ठ 238)
म्हणजे, जसजसे पैसा देयकाचे साधन म्हणून विकसित होत जातो, तसतसे क्रेडिट आणि डेबिटची प्रमाणपत्रे प्रसारित होऊ लागतात आणि देयक प्राप्त करण्याचे किंवा देण्याचे साधन बनतात. हे क्रेडिट-पैशाचेच उदाहरण आहे. भांडवली माल उत्पादनाच्या विकासासह त्याचे विविध प्रकार तयार होतात. बॉण्ड्स, शेअर्स, स्टॉक्स इत्यादीसुद्धा क्रेडिट-पैशाचाच एक प्रकार आहे.
पैशाचे शेवटचे कार्य ज्याबद्दल मार्क्स बोलतात ते आहे वैश्विक पैसा, म्हणजे पैशाचे ते स्वरूप ज्यामध्ये ते एकाच अर्थव्यवस्थेत होणाऱ्या मालांच्या अभिसरणामध्ये नव्हे तर विविध अर्थव्यवस्थांमध्ये होणाऱ्या मालांच्या अभिसरणामध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारात होणाऱ्या मालांच्या अभिसरणामध्ये आपली भूमिका बजावतो. मार्क्स सांगतात की आंतरराष्ट्रीय व्यापारात पैसा त्याचे सर्व राष्ट्रीय पोशाख फेकून देतो आणि त्याच्या खऱ्या मूळ स्वरूपात, म्हणजे सोने/चांदीच्या रूपात प्रकट होतो. येथे स्वर्ण पैशाचा उपयोग व्यापार संतुलन ठेवण्यासाठी देयकाचे माध्यम म्हणून, मालांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रत्यक्षपणे अभिसरणाचे माध्यम म्हणून आणि संपत्तीचे वैश्विक स्वरूप म्हणून केला जातो. निश्चितच विसाव्या शतकाच्या सुरूवातीस आंतरराष्ट्रीय पैसा म्हणून सोन्याची जागा काही आघाडीच्या देशांच्या, विशेषत: अमेरिका आणि ब्रिटनच्या पैशांनी आणि नंतर दुसऱ्या महायुद्धानंतर, केवळ अमेरिकन पैसा डॉलरने घेतली. याचे कारण म्हणजे अमेरिकेन पैसा स्वर्ण-समर्थित होता, जेव्हाकी इतर देशांचा पैसा डॉलर-समर्थित होता, म्हणजेच त्यांचा डॉलरसोबत विनिमयाचा निश्चित दर होता, आणि डॉलरचा स्वतः सोन्यासोबत विनिमयाचा निश्चित दर होता. दुसऱ्या महायुद्धानंतर हा विनिमय दर 35 डॉलर = 1 औंस (सुमारे 28 ग्रॅम) सोने एवढा होता. हे पैसे वेगवेगळ्या वेळी आंतरराष्ट्रीय पैसे म्हणून यामुळे स्वीकारले गेले कारण ते सोन्यामध्ये परिवर्तनीय होते, त्याद्वारे समर्थित होते आणि सोन्याचेच प्रतीक होते. 1970 च्या दशकात डॉलर-स्वर्ण मानक रद्द झाल्यानंतर अस्थायी-चलन (floating currency) आणि अस्थायी-विनिमय दर (floating exchange value) असलेली जी मौद्रिक व्यवस्था उदयास आली ती नक्कीच स्वर्ण समर्थित नाहीये, परंतु अजूनही सर्व पैशांचे मूल्य हे मूल्याच्या श्रम नियमानेच निर्धारित होते आणि त्याला केवळ मार्क्सच्या पैशाच्या सिद्धांताद्वारेच योग्य आणि वैज्ञानिकदृष्ट्या समजल्या जाऊ शकते. पुढील प्रकरणामध्ये आपण यावरच लक्ष केंद्रित करूया आणि बघूया की सोन्याचे समर्थन नसलेला अपरिवर्तनीय कागदी पैसा, जो की अस्थायी-विनिमय दराने निर्धारित आहे, कशा प्रकारे मार्क्सने शोधलेल्या सामान्य नियमांचे, मूलत: मूल्याच्या श्रम सिद्धांताचेच पालन करतो, ना की त्याचे खंडन करतो.
(पुढील अंकात चालू)
(मूळ लेख: मजदूर बिगुल, मार्च 2023; मराठी अनुवाद: जयवर्धन)