वाढते बलात्कार आणि त्यावरील समाजातील अयोग्य प्रतिक्रियांवर प्रकाश

स्वप्नजा

पुण्यात 13 जून रोजी बलात्काराच्या 5 घटना समोर आल्या. ज्या देशात दिवसाला सरासरी 100 बलात्कार होतात म्हणजेच दर 6 मिनिटाला एक बलात्कार, तिथे एकाच दिवशी 5 बलात्काराच्या घटना समोर येणे काही आश्चर्यजनक नाही. पहिल्या घटनेत कोल्हापूरच्या एका 34 वर्षीय महिलेवर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार घडला. दुसऱ्या घटनेत 22 वर्षीय तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला आहे. तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार झाला आहे. चौथ्या घटनेत अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून तिच्याशी मैत्री करुन तिला नातेवाईकाच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. पाचव्या घटनेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला गोव्याला नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. ही बातमी सोशल मीडियावर प्रसारित होताच प्रतिक्रियांमध्ये नागरिकांच्या मतांचा पूर आला. या प्रतिक्रियांपैकी अनेक प्रतिक्रिया ना फक्त सपशेल चुकीच्या आहेत, तर वास्तवात त्याच मानसिकतेचे द्योतक आहेत ज्या मानसिकतेतून बलात्कार होतात.  जो पर्यंत  प्रश्नाच्या मुळाशी आपण जात नाही, प्रश्नाबद्दलच्या चुकीच्या धारणाना खोडत नाही, तोपर्यंत त्याचं खरं कारण समजण्यात आपण अपयशी ठरू आणि त्याच्याशी लढणंही शक्य होणार नाही.  तेव्हा, बलात्काराबद्दल सर्वप्रथम समाजामध्ये रूढ असलेल्या त्या चुकीच्या विचारांचा आढावा घेऊयात, जे विचार स्वत: त्याच पितृसत्ताक मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत, जे बलात्काराला संस्थागत मान्यता देतात.

बलात्कारानंतर पीडितांना दोषी ठरवणे: समाजातील गैरसमज आणि वास्तविकता

महिलांवर अन्याय-अत्याचार झाला असता, तो का झाला असावा यावर सगळेच आपलं मत मांडतात. तसेच काही “जागरूक” नागरिकांनी आपलं मत कमेंट स्वरूपात मांडलं :

मुली खूप माजल्या आहेत मग बलात्कार नाही होणार तर काय तुमचा सत्कार होईल कानालायक मुली आज पाहिले तर मुलींची फॅशन 75% अंग प्रदर्शन करसाल तर होणारच आहे…”

जोपर्यंत मुली आंग भरुन कपडे घालणार नाहीत तोपर्यंत बलात्कार हे होतच राहणार

आता यांच्या मते या “माजलेल्या” मुली ज्यांनी अंगभर कपडे नाही घातले, “अंग प्रदर्शन” केलं म्हणून त्यांच्यावर बलात्कार झाला आणि होणारच, अशा मुलींसोबत अजून होणार तरी काय? याच्या मते त्यात बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा तरी काय दोष? 2 महिन्याच्या लहान मुलीवर लुधियाना मध्ये बलात्कार झाला, दिल्ली मध्ये 3 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, आंध्र प्रदेशात 6 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला आणि 38,000 पेक्षा जास्त बलात्कार लहान मुलांवर झाल्याच्या नोंदी आहेत, ते सुद्धा त्यांनी “अंग प्रदर्शन” केल्यामुळे झाले असावेत? एवढंच नव्हे, नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळावर सुद्धा बलात्कार झाल्याच्या नोंदी आहेत मग त्यात सुद्धा त्या बाळाचा दोष असावा, कारण नुकत्याच जन्मलेल्या बाळाला किमान आपलं अंग झाकण्या इतकी “अक्कल” असावी की नाही?

अगदी लहान वयापासूनच मुलींना “संस्कार” देण्याची प्रथा या पुरुषप्रधान समाजात चालत आली आहे. तिने कसे कपडे घालावे, 7 च्या आत घरी यावं, चारचौघात कसे बोलावे, कसे वागावे, कसे बसावे, कसे हसावे इथपर्यंत सगळ्या गोष्टी मुलींना सांगितल्या जातात आणि या समाजाने तयार केलेल्या साच्याप्रमाणे जर मुलगी वागली नाही तर तिच्यावर “संस्कार” केले गेले नाहीत, पोरगी “हाताबाहेर” गेली आहे, “वाया” गेलेली पोरगी, “माजलेली” पोरगी अशी विशेषणे लागतात. खरतर अंग झाकलेली स्त्री असो किंवा बुरखा घातलेली, कुठलीही स्त्री सुरक्षित नाही. आज स्त्रिया कुठेही गेल्या तरीही त्या सुरक्षित नाही, कामाच्या ठिकाणी अत्याचार, मंदिरात अत्याचार, रस्त्यावर चालताना अत्याचार, ट्रेन मध्ये बसल्यावर अत्याचार, बस मध्ये अत्याचार! कुठलीही जागा आज स्त्रियांसाठी सुरक्षित नाही. स्त्रियांना सांगितलं जातं “घरी बसा”. पण घर तर मुळीच सुरक्षित नाही. घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रिया घरी सुद्धा नवऱ्याचा मार, लाठ्या-काठ्या सहन करतात. 2023 मध्ये 28,000 स्त्री विरोधी अत्याचाराच्या नोंदीपैकी 6,500 पेक्षा जास्त गुन्हे हे घरगुती हिंसाचाराचे नोंदवले गेले. हे तर नोंदवलेले गुन्हे आहेत, कित्येक महिला निमूटपणे त्यांच्यावर होणारे शारीरिक, मानसिक, लैंगिक हिंसाचार सहन करतात आणि गुन्हे नोंदवले जात नाहीत.

बलात्कार करणारे पुरुष दोषी नाहीत, कारण अत्याचार करण्याचा त्यांच्याकडे परवानाच आहे, दोष आहे तो स्त्रीचा की ती त्यांच्या निशाण्यावर का आली ! गुन्ह्याचा दोष पीडिताच्या माथी मारणे, हे अन्यायकारी व्यवस्थेचे एक मोठे वैचारिक हत्यार असते. थोडक्यात हे विचार बलात्काराचे आणि बलात्काऱ्याचे समर्थनच करतात !

बलात्काराचा दोष प्रेम करणाऱ्याच्या माथी मारणारेही कमी नाहीत. या कमेंट्स पहा.

हे सगळे गुन्हे खोटे आहेत पोरी पोरांना फसवत आहेत

“…या पाचही घटना फक्त आणि फक्त प्रेम प्रकरणात झालेल्या आहेत. त्यामुळे बलात्कार होत आहेतएक सामान्य माणूस म्हणून नागरिक म्हणून समाजात जे गढूळ वातावरण झालं आहे मुलींच्या आणि मुलांच्या बाबतीत त्याच परिवर्तन करणे आपले काम आहे.. शासन आणि पोलीस याना दोष देऊन काहीच होणार नाही…. जेव्हा कुठं तरी पोलिसांना एखादं जोडपं किंवा अविवाहित मुलंमुली दिसतात तेव्हा आम्ही सहमतीने सोबत आहोत असं म्हणणारे मुलंमुलीच अश्या प्रकरणाला बळी पडतात…”

थोडक्यात मुलींनी स्वतंत्रपणे आपल्या जीवनाचे निर्णय घेतले, जोडीदार निवडू पाहिले तर त्यांच्या माथी बलात्कारच येणार! स्त्रीकडे एक स्वतंत्र, सक्षम, जबाबदार व्यक्ती म्हणून पाहू न शकणाऱ्या, स्त्री-पुरुष नात्याला फक्त लैंगिक संबंधांच्याच रूपात समजू शकणाऱ्या, लग्नानंतर नवऱ्याने केलेल्या बलात्काराला सुद्धा मान्यता देणाऱ्या  पितृसत्ताक मानसिकतेला हेच समजते की सर्वच प्रेम प्रकरणे बलात्कारात संपतात ! हे खरे आहे की काही प्रेम प्रकरणांमध्ये बलात्कार होतात, परंतु यामागे सुद्धा स्त्रीच्या इच्छेचे अस्तित्त्व न मानणारी पितृसत्ताक मानसिकताच काम करत असते!  बलात्काराचे निमित्त करून स्त्रीला प्रेम करण्याचा अधिकार नाकारणे, तिला तिच्या निवडीचा अधिकार नाकारणे हा सुद्धा समाजाने तिच्या अस्तित्वावर केलेला बलप्रयोगच आहे!

अनेकांनी आपल्या कमेंट मध्ये मुलींना कसं “स्वावलंबी” बनवलं पाहिजे यावर आपलं मत मांडलं :

मुलांना सोबत चटणी पूड आणि धारधार शस्त्र सोबत ठेवत जा.. अस काही झालं की मारायला कमी करू नका पुढचं पुढे पाहून घेऊह्या न्यायव्यवस्था च्या भरवश्यावर बसून राहील तर आयुष्यभर न्याय भेटणार नाही…”

सर्व मुलींना आपल्या वडिलांनी मोबाइल देता आत्मरक्षणाचे क्लास लावावे. म्हणजे कराटेचे प्रशिक्षण देण्यात यावे. आणि तिला हातात मोबाइल ऐवजी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी एक हत्यार द्यावे. म्हणजे ही वेळ येणार नाही

तर या नागरिकांच्या मते एकदा का मुलीच्या हाताततील मोबाईल जप्त केला आणि त्यांच्या हातात मिरचीची पूड, दंडुका, धारदार शस्त्र किंवा इतर हत्यारे दिले तर बलात्काराच्या घटना होणार नाहीत. दिवसाढवळ्या स्त्रियांवर चाकू भोसकून वार होतात, कोयत्याने हल्ले होतात, दगडाने ठेचून हत्या होते अश्या अनेक घटना आपल्या समोर आल्या आहेत. कुस्तीपटू, जे स्वतः इतके बलाढ्य आहेत, जे समोरच्या माणसाला दोन लगावून देऊ शकतात त्यांचे  लैंगिक शोषण झाल्याची बातमी सर्वांनाच माहित आहे. नक्कीच स्वरक्षण करणे प्रत्येकाने शिकले पाहिजे आणि स्त्रियांनी तर नक्कीच शिकले पाहिजे, यात दुमत नाही. त्याकरिता क्रांतिकारी दुर्गावती देवी ब्रिगेडही स्थापन केल्या पाहिजेत. परंतु फक्त स्त्रियांच्या हातात धारदार शास्त्र देऊन काय हे हल्ले थांबणार आहेत? असं केल्याने मूळातून  बदल शक्य नाही, कारण यामुळे फक्त थोडी दहशत निर्माण होईल, पितृसत्ताक विचारांचा पाया खचणार नाही. कठोर शिक्षा केल्याने गुन्हे होणे कधीच थांबलेले नाही.  सर्वात जास्त बलात्कार तर वैवाहिक बलात्कार आहेत, तिथेही स्त्रीच्या हातात शस्त्र देण्याचे समर्थन ही मंडळी करणार आहेत का?

शिकूनसवरूनअन्याय अत्याचार थांबतात हा केवळ एक भ्रम

“शिक्षणाचे माहेर घर” म्हणवणाऱ्या पुण्यासारख्या शहरात अशा अमानवीय घटना घडू शकतात हे ऐकून अनेकांची तारांबळ उडाली. काही दिवसांपूर्वी अतिशय क्रूर आणि अमानवीय घटना समोर आली.  पत्नीवर संशय असल्यामुळे, तिच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, चावी हरवल्यामुळे हा घृणास्पद प्रकार समोर आला. ही घटना सुद्धा पुण्यात घडली. अनेकांनी कॉमेंट्स मध्ये पुण्याविषयी विशेष “काळजी” व्यक्त केली:

शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची ओळख पुसली

पुण्याच झालं आहे बिहार

पुण्यासारख्या शहरात असं होतंय हे आपल्यासाठी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे

खरं तर शिक्षणाचा आणि महिला विरोधी नसण्याचा काही संबंध नाही.  अनेकांचा असा भ्रम आहे की सगळे लोकं शिकले-सवरले की हे जग बदलेल, लोकांची “मानसिकता” बदलेल, अन्याय अत्याचार थांबतील. पुण्या “सारख्या” शहरात सतत होणाऱ्या घटनाच वेगळे  सिद्ध करतात. तथाकथित शिकलेल्या कुटुंबांमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटना समोर येतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण – 5 (NFHS-5), 2019-2021 नुसार, 18 ते 49 वर्षे वयोगटातील 29.3 टक्के विवाहित महिला घरगुती/लैंगिक हिंसाचाराच्या बळी आहेत, 18 ते 49 वयोगटातील 3.1 टक्के गर्भवती महिलांनी त्यांच्या गर्भधारणेदरम्यान शारीरिक हिंसाचार सहन केला आहे. या समोर आलेल्या घटना आहेत, अशा अनेक घटना आहेत ज्या नोंदवल्या गेल्या नाही आणि महिला निमूटपणे शारीरिक आणि लैंगिक शोषण सहन करतात. कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करणारा भाजपचा खासदार ब्रिजभूषण सिंह हा उच्चशिक्षित आहे. श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावणारा आफताब पूनावाला मुंबईच्या एल.एस रहेजा कॉलेज मधून शिकलेला, पेशाने ग्राफिक डिझाईनर आहे. कित्येक उदाहरणे आहेत समाजामध्ये जी दाखवून देतात की नुसतं “शिकून-सवरून” अन्याय-अत्याचार थांबतात हा केवळ एक भ्रम आहे.

बुधवार पेठेत देहविक्रय : नफ्याच्या बाजारपेठेत मानवी शोषण

नफ्यावर आधारलेल्या भांडवली व्यवस्थेत  सगळ्या गोष्टी विकाऊ “माल” बनून राहिल्या आहेत. स्त्रीदेहाला सुद्धा उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जातं आणि त्याचमुळे पैसे फेकून आपल्या लैंगिक स्वार्थासाठी स्त्रिया केव्हाही उपलब्ध असाव्यात यात काही वावगं वाटत नाही. अनेकांना वाटतं की बलात्कार करण्यापेक्षा पैसे देऊन आपली “गरज” भागवता आली पाहिजे. अनेकांनी केलेल्या कॉमेंट्स मधून ते दिसून येतं.

बुधवार पेठ सर्व्हिस चांगली नाही देत वाटतं

बुधवार पेठेत बहुतेक चांगले मॉडेल राहिले नाहीत माझी सरकारला विनंती आहे येणाऱ्या आर्थिक बजेट मध्ये बुधवार पेठ साठी स्वतंत्र निधी द्यावा आणी हो परदेशी गुंतवणूक वाढवावी.”

भारतात देहविक्रीत पुण्यातील बुधवार पेठ तिसऱ्या क्रमांकावर येतं. बुधवार पेठ तब्बल 5000 वेश्यांचं शोषणाचं ठिकाण आहे. हा विक्रय “व्यवसाय” नाही, शोषण आहे. आपले शरीर हा कोणत्याही व्यक्तीच्या स्वतंत्र अस्तित्त्वाचा शेवटचा किल्ला आहे आणि तो विकण्यासाठी व्यक्ती एकतर भांडवली शोषणाने अत्यंत मजबूर झालेली हवी किंवा भांडवली मूल्यमान्यतांनी एकदम बरबटलेली. दोन्ही बाबींमध्ये माल खरेदी-विक्री, “सबकुछ बिकता हैं” ला मान्यता देणारी मानवद्रोही भांडवली व्यवस्थाच काम करत असते.  भांडवलशाहीने एक मुक्त बाजारपेठ जन्माला घातली ज्यामध्ये कारखान्यात उत्पादित केलेल्या मालापासून ते मानवी नातेसंबंध आणि मानवी शरीरा पर्यंत सर्व काही नफ्यासाठी विकले  आणि विकत घेतले जाऊ लागले. आपल्या समाजात प्राचीन काळापासून देहविक्रय चालत आलेला आहे.  त्याची सुरुवात  समाजाची वर्गांमध्ये विभागणी आणि स्त्रियांच्या गुलामगिरीने झाली, परंतु भांडवलशाहीच्या विकासाबरोबरच देहविक्रय हा अधिक व्यापक आणि संघटित स्वरूपात अस्तित्वात आला. भांडवली व्यवस्था स्त्रियांची स्वस्त श्रमशक्ती व देहविक्री यातून अमाप नफा कमावते.  आणि म्हणूनच ती याला “व्यवसाय” म्हणते, आणि तथाकथित दिखाऊ सन्मान देऊ पाहते. जर हा “व्यवसाय” आहे, आणि इतकाच सन्माननीय आहे (इतका की माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नींनी सुद्धा त्याचे समर्थन केले!) तर कॉलेजमध्ये याचे डिग्री कोर्सेस चालवून त्यात प्रवेश घ्यायला जातील का ही “उच्चभ्रू” मंडळी? या शोषणात गुंतलेल्या सर्व महिलांची मुक्ती तेव्हाच शक्य आहे जेव्हा बाजाराच्या, देवाणघेवाणीच्या, माल खरेदी-विक्रीच्या भांडवली व्यवस्थेला नष्ट केले जाईल.

महिलांसाठी न्यायाची खोटी आशा : बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कायदा आणि अंमलबजावणी

भारतात सगळ्या गुन्ह्यांसाठी कायदे केले गेले आहेत.  महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण कायदा – 2005, बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा – 2012 (POCSO), भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत लैंगिक अत्याचाराचे कायदे – धारा 375: लैंगिक अत्याचाराची परिभाषा, धारा 354: स्त्रीच्या शीलाचे उल्लंघन, धारा 354B: स्त्रीला उघड करण्याचा प्रयत्न आणि इतर. इतके सगळे कायदे असून त्याची अंबलबजावणी कशा पद्धतीने होते हा मोठ्ठा प्रश्न आहे. वर्षानुवर्ष संघर्ष करून सुद्धा “न्याय” मिळत नाही.

2002 मध्ये गुजरात दंगलीदरम्यान बिल्कीस बानो वर झालेला बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील 7 लोकांची हत्या कधी न विसरता येण्या इतकं क्रूर आणि अमानवीय आहे. बिल्कीस बानो वर सामूहिक बलात्कार करण्यात आला, 11 बलात्काऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती परंतु मोदी सरकारच्या कृपेने 2022 मध्ये त्यांना सोडलं गेलं, नुसतं तेवढं नव्हे, हार-फुलांनी त्यांचा सत्कार केला गेला. वर्षानुवर्ष चालू असलेली ही लढाई अजून संपुष्टात आलेली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात या  सरकारचं महिला विरोधी चरित्र समोर येतं. भाजपचा आमदार ब्रिजभुषण सिंह वर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल असून तो आज मोकाट फिरतोय. उन्नाव मधील भाजपचा एम.एल.ए कुलदीप सिंह सेंगरने एका मुलीवर बलात्कार केला. या सरकारमधील अनेक नेत्यांवर महीलाविरोधी अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत मग या सरकार कडून तरी काय अपेक्षा केली जाऊ शकते? आणि सरकारच असे असेल, तर जनतेने काय न्यायाची अपेक्षा ठेवायची?

अनेकांनी आपले म्हणणे मांडत सांगितले आहे की शिवकालीन शिक्षा दिली पाहिजे :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायालयातील सजा चवरंग करा आणि भर चवकाता लोकांच्या स्वाधीन करा म्हणजे कळेल लोकांना बलात्कार करणे म्हणजे काय सजा मिळते ते

चौकात गोळ्या झाडल्या पाहिजे त्या वेळी हे बंद होईल

यांना शिवकालीन शिक्षा द्या. म्हणजे असले प्रकार पुन्हा होणार नाहीत. हात पाय तोडून टाका

अशा विचारामागे मध्ययुगीन सामंती मानसिकता काम करते. खूप कडक शिक्षा दिली तर गुन्हे होणार नाहीत असे वाटते. 17व्या शतकात, सिख समुदाय आणि मुघल साम्राज्य यांच्यातील संघर्षांमध्ये बलात्कार आणि इतर हिंसाचाराच्या घटना घडल्या. मुघल साम्राज्याशी मराठा साम्राज्याच्या संघर्षातही बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या घटना घडल्या, विशेषतः किल्ल्यांच्या गनिमी काव्याच्या वेळी. 1739 मध्ये नदीर शाहच्या दिल्लीवरील आक्रमणात लूटमार आणि बलात्कार यांचा समावेश होता. मध्ययुगात महिलांवर होणारे अत्याचार कधी थांबले नाहीत आणि आजही ते जगात कुठेही थांबले नाहीत.  गुन्हेगारांना शिक्षा झाल्याच पाहिजेत, परंतु बलात्कारासाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यामुळे उलट बलात्कारानंतर खून केला जाण्याची शक्यताच बळावते.

अनेकांनी कायद्याची प्रक्रिया, दोन्ही बाजूंना म्हणणं मांडण्याची संधी, गुन्हा सिद्ध होणं हा सगळा फाफटपसारा नकोसा वाटतो आणि गोळ्या घालणे, हात पाय तोडून टाकणे, लोकांच्या हातून चिरडणे हे जास्त योग्य वाटतं. लोकशाही मूल्य-मान्यता न रुजल्यामुळे तडकाफडकी न्यायाची कल्पना अस्तित्वात येते. इतिहासाचं गौरवीकरण करून वर्तमानातील राजकीय प्रगतीला नाकारण्याचं  काम केलं जातं. कायद्याची प्रक्रिया पाळली जाणे, कायद्यासमोर समानता, बचावाची संधी, ह्या त्याच बाबी आहेत ज्या महिलांना सुद्धा याच समाजात स्वत:च्या हक्क अधिकारांसाठी लढण्याची संधी देतात. तेव्हा तडकाफडकी शिक्षेच्या मागणीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.

स्त्रियांवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत!

बलात्कार, ॲसिड अटॅक, घरगुती हिंसा, “एक तर्फी प्रेमातून” होणारी हिंसा, आर्थिक- मानसिक- शारीरिक- लैंगिक शोषण, स्त्रियांच्या शरीराचे होणारे वस्तुकरण, “सौंदर्याच्या” बाजारू कल्पना, वैवाहिक बंधन, मर्यादित स्वातंत्र्य, बेरोजगारी अशा अनेक प्रसंगांना आयुष्यभर स्त्रियांना सामोरे जावे लागते. समाजामध्ये लैंगिक विकृतीसाठी रान मोकळं करून देण्यात भांडवलशाही जबाबदार आहे. स्त्री-पुरुष देहांचा बाजार करून लैंगिक विकृती निर्माण केली जाते ज्या मध्ये अश्लील सिनेमे, गाणी, जाहिराती, व्हिडिओ, फोटो समोर येतात. काही गाण्यांची उदाहरणे-

तूचीज़बडी है मस्त मस्त!

तू हां कर, या ना कर(!), तू हैं मेरी किरन

सेहरा सजाके रखना, डोली सजाके रखना, “लेनेतुझे गोरी आयेंगे तेरे सजना

कभी कभी मेरे दिल में ख़्याल आता है, ये बदन ये निगाहें मेरीअमानतहै!

तुझेडायमंड जैसेसंभालके रखना

अशा अनेक गाण्यांमध्ये स्त्रियांना वस्तू म्हणून प्रस्तुत केलं आहे. स्त्रीचा देह पुरुषाची “अमानत” आहे, पुरुषाची संपत्ती आहे आणि म्हणूनच पुरुष स्त्रीवर अधिकार गाजवू शकतो, तिच्या इच्छेचे काहीच स्थान नाही. आज भांडवलशाहीची हीच शिकवण आहे. माणसाच्या सर्वात निसर्ग सुलभ भावनांना अक्राळ-विक्राळ, आक्रमक, बीभत्स रूप दिले जाते. सर्व मानवी नाती बाजारू आणि लेन-देनची नाती बनून जातात.

स्त्री विरोधी “मानसिकता” मनातून येत नसते तर ती भौतिक वास्तवातून निर्माण होते. समाजात रूढ असलेली शोषणकारी सामाजिक-आर्थिक रचना याला कारणीबूत आहे. ही शोषणकारी रचना आधीपासूनच अस्तित्वात मुळीच नव्हती. मानवी समाजाच्या इतिहासात स्त्री-पुरुष समानता असलेला आदिम साम्यवादी समाज अस्तित्वात होता. स्त्रीच्या दुय्यमत्व असलेल्या समाजाकडे वाटचाल तेव्हाच झाली जेव्हा अगोदर अतिरिक्त उत्पादन, त्यातून खाजगी संपत्ती व त्यावर आधारित वर्गविभाजित समाज उदयाला आला आणि त्यासोबतच खाजगी संपत्तीच्या वंशपरंपरेने हस्तांतरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लग्न, कुटुंब व पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था जन्माला घातली गेली. खासगी संपत्तीशी स्त्रीचं दुय्यमत्व जोडलं गेलं आहे.  भांडवलशाहीमध्ये खाजगी संपत्तीचे महत्त्व पाहता तिला खाजगी संपत्तीचा वारसा टिकवणाऱ्या दमनकारी कुटूंब व्यवस्थेची तर विशेष गरज आहे. रोजगार, शिक्षणाचे ते अधिकार नाकारून जे स्त्रिला व प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देऊ शकतात, भांडवलशाही सतत ती भौतिक परिस्थिती तयार करत राहते जी स्त्रियांना असुरक्षित, असहाय्य करत असते. म्हणूनच भांडवलशाहीमध्ये स्त्रियाच्या दुय्यमत्त्वाला आणि त्यातून जन्माला येणाऱ्या पितृसत्तावादी वर्चस्ववादी विचाराला, आणि त्याच्याच परिणामी होणाऱ्या बलात्कारांना अंत नाही.

आज स्त्री विरोधी अत्याचाराच्या मुळाशी भांडवली पितृसत्ता काम करते. काही मर्यादित अधिकारांसाठी भांडवलशाही अंतर्गत लढा उभा केला जाऊ शकतो पण स्त्रियांना या अन्याय-अत्याचारापासून, दुयमत्वापासून, अर्धवट स्वातंत्र्यापासून तो पर्यंत मुक्ती मिळणार नाही जो पर्यंत या भांडवली व्यवस्थेला मुळापासून उखडून फेकून स्त्री विरोधी मानसिकता निर्माण करणाऱ्या भौतिक परिस्थिती बदलून एका अशा समाजाकडे वाटचाल करत नाही, जिथे खासगी संपत्ती संपुष्टाकडे जाईल आणि कुठल्याही प्रकारच्या शोषणाला, बर्बरतेला वाव नसेल!