सिनेमाद्वारे अंधराष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचा प्रचार: कामकऱ्यांना भरकटवणारे प्रचारतंत्र

रवि

19व्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या सिनेमाच्या उदयापासून आजपर्यंत तो कधीही तत्कालीन राजकारणापासून वेगळा राहिलेला नाही. त्या त्या देशातील सत्ताधारी वर्ग सिनेमाचा उपयोग आपल्या विचारधारेचे वर्चस्व स्थापित करण्यासाठी करत असतो. भारतात फॅशिझम सत्तेत आल्यानंतर  गेल्या 10 वर्षांतील अनेक, आणि तात्कालिकरित्या बघायचे झाले तर नजिकच्या काळात प्रदर्शित झालेले—काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, रामसेतू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सम्राट पृथ्वीराज, आर्टीकल 370, धर्मवीर, शेर शिवराज, मै अटल हूॅं, आदिपुरुष, शेरशाह, अटॅक, मेजर, आणि असे अनेक—मोठ्या बजेटचे सिनेमे हिंदुत्व आणि अंधराष्ट्रवादाच्या राजकीय प्रचारासाठी आणि हिंदुत्वाचे राजकारण जनतेत मुरवण्यासाठी बनवले जात आहेत. संघ-भाजपचा राजकीय प्रचार पुढे रेटण्यासोबत सिनेमा बनवणाऱ्या भांडवलदारांच्या तिजोऱ्या भरणे असे दोन पक्षी एका दगडात मारले जात आहेत. याद्वारे सिनेमात गुंतवणूक करून नफा कमावणाऱ्या भांडवलदार वर्गाचे हित आज हिंदुत्वासोबत, अंधराष्ट्रवादासोबत जोडले आहे हे दिसून येते.

आज मुख्य प्रवाहातील अनेक चित्रपटांतून धर्मवादी आणि फॅसिस्ट प्रचाराला खतपाणी घालत मुस्लिमांना देशाचा शत्रू म्हणून प्रस्तुत केले जात आहे. महागाई, बेरोजगारी, गरिबी, भ्रष्टाचार अशा फॅशिस्ट व्यवस्थेच्या अनेक अपयशांवर पडदा टाकत हा सिनेमा देशातील बहुसंख्याकांसमोर एका अल्पसंख्येला खोटा शत्रू म्हणून उभा करतो, ज्याला या अपयशांच्या कारणांना जबाबदार धरले जाते. फक्त सिनेमेच नाही तर आता न्यूज चॅनेल्स आणि मालिकासुद्धा उघडपणे हिंदुत्वाच्या प्रवक्ता बनल्या आहेत.

2022 मध्ये आलेला “काश्मीर फाईल्स” सिनेमाला मोदी सरकारने हिंदू शासित राज्यांमध्ये करातून मुक्त केले. संघ-भाजपने केलेल्या विखारी प्रचाराच्या जोरावर या सिनेमाने बॉक्सऑफिसवर 300 कोटींची कमाई केली. हा सिनेमा 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या काश्मीरमधून निर्गमनाची कथा सांगण्याचा दावा करतो. काश्मिर प्रश्नाचा कोणताही गंभीर जनपक्षधर अभ्यासक सांगू शकतो की हा सिनेमा अत्यंत एकांगी आणि मुस्लिमविरोधी चित्र निर्माण करण्यासाठीच बनवला आहे, आणि काश्मिर प्रश्नावर नेहरू-कॉंग्रेसने तेथील जनतेचा केलेला विश्वासघात, सार्वमताची मागणी, जनतेवरील अत्याचार, संघ-भाजपने केलेला धर्मभेद, धर्मनिरपेक्ष राजकारणाचा इतिहास व भांडवली पक्षांनी केलेली धोकेबाजी, कॉंग्रेस-भाजपच्या धोरणातील निरंतरता असे अनेक प्रश्न दुर्लक्षून फक्त मुस्लिमांचे दैत्याकार रूप प्रस्तुत करतो. यासाठीच संघ-भाजपकडून सिनेमाघरांच्या आत आणि बाहेर ‘जय श्री राम’ चे नारे देण्यात आले. हीच स्थिती “केरल स्टोरी” (ज्यामध्ये सत्यासोबत पूर्णपणे छेडछाड करून “लव्ह जिहाद”च्या असत्याला सत्य बनवले गेले.)आणि  “फाईल्स” नावे असलेल्या जवळपास सर्व सिनेमांची आहे.  2024 मध्ये आलेला “स्वातंत्र्यवीर सावरकर” सिनेमा माफीवीर सावरकरांच्या जगप्रसिद्ध माफीनाम्यांविषयी न बोलताच हिंदू राष्ट्राचा प्रचार करतो. 2019चा “पीएम नरेंद्र मोदी”, 2024 चा “मै अटल हूॅं” यांसारखे सिनेमे नेत्यांच्या खोट्या प्रतिमानिर्मितीसाठी (म्हणजे देशाच्या प्रगतीमध्ये आणि बांधणीमध्ये असलेला वाटा, त्यांनी केलेला त्याग आणि कष्ट रंगवून) जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि आत्यंतिक देशाभिमान रुजवण्यासाठी बनवले जातात. इतिहासाचे मिथ्याकरण आणि हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी संघ-भाजपकडून सिनेमा निर्मात्यांना आर्थिक साहाय्यसुद्धा मिळत आहे.

देशातील प्रश्नांकडे कानाडोळा व्हावा आणि “परकीय शत्रू”चे मिथक रूढ व्हावे याकरिता कॉंग्रेसकाळात होत आले त्यापेक्षा अधिक जोर देऊनपाकिस्तानला भारताचा “नैसर्गिक” शत्रू म्हणून प्रस्तुत करणाऱ्या सिनेमांच्या निर्मितीने मागच्या काही वर्षांमध्ये जोर पकडला आहे. “मेजर”, “अटॅक”, “शेरशहा”, “उरी सर्जिकल स्ट्राईक”, “राझी”, “गदर 2” सारखे अंधराष्ट्रवादाचे बाळकडू पाजणारे मोठ्या बजेटचे सिनेमे दर काही महिन्यांनी प्रदर्शित होत आहेत. या सिनेमांमधून भारतीय जनतेच्या मनामध्ये पाकिस्तानविरोधात द्वेष निर्माण करून खरेतर देशातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लावले जात आहे. खरे पाहता दोन देशांमधील युद्ध आपापल्या देशातल्या भांडवलदार वर्गाचे हित लक्षात घेऊन छेडले जातात आणि त्याचे परिणाम महागाई, बेरोजगारीच्या रूपामध्ये कष्टकरी जनतेलाच सर्वात जास्त भोगावे लागतात.

यासोबतच “आदिपुरुष”, “हनुमान” ह्यांसारखे सिनेमे आज हिंदू देवतांना देशाच्या रक्षणात लावून हिंदुत्वाला एक सामान्य भावना बनवण्याच्या संघाच्या स्वप्नपूर्तीला हातभार लावत आहे. वित्तपुरवठा, करसवलती आणि धर्मवादाचे समर्थन करणाऱ्या जमावाला सिनेमागृहामध्ये खेचण्याची आशा यामुळे अशा चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळत आहे.

सिनेमांचा वापर सत्ताधारी वर्ग आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच करत असतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेस सरकारने भांडवलदारवर्गाच्या विकासासाठी नेहरूंच्या “समाजवादाचा” आसरा घेतला. नेहरू आणि गांधीच्या कल्याणकारी भांडवलशाहीचे गोडगुलाबी चित्रण अनेक तत्कालीन चित्रपटांमध्ये दिसते. “दो बिघा जमीन”, “मदर इंडीया”, “नया दाैर”, “दो ऑंखे बारा हाथ” यांसारख्या सिनेमांमधून कामगारकष्टकरीवर्ग आणि भांडवलदारवर्ग एकोप्याने एकाच व्यवस्थेत कसे राहू शकतात याचे चित्रीकरण करण्यात आलेपरंतु आज याच भांडवली व्यवस्थेचे आर्थिक संकट टोकाला पोहोचल्यामुळे फॅशिझम सत्तेत पोहोचला आहे आणि प्रचाराच्या प्रत्येक मार्गाचा वापर हिंदुत्व आणि मुस्लीम द्वेष नग्नतेने पसरवण्यासाठी केला जात आहे. शिल्लक होते तेवढे पुरोगामीत्त्व बॉलीवूड हरवून बसला आहे, कारण बॉलिवूडचे पोशिंदे भांडवलदार आज हिंदुत्वाच्या राजकारणात नफा बघत आहेत.

एका काळात समांतर सिनेमाच्या नावाने देशभरात कष्टकरी जनतेच्या जीवनाचे वास्तव दाखवणारे उदारवादी कलाकार आज कुठेही दिसत नाहीत. त्यांनी या फॅसिस्ट सरकारसमोर आणि त्यांच्या पाठिराख्या प्रोड्युसर्ससमोर केव्हाच हात वर केले आहेत. मोदीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात भारतातल्या सिनेमा क्षेत्रातील विख्यात तारकांनी हजेरी लावून शुभेच्छा तर दिल्याच; पण सोबतच सोशल मिडीयावर सुद्धा अभीष्टचिंतनाचा वर्षाव केला. मोदींची तारीफ करण्याची संधी आज कोणताच कलाकार सोडत नाही. कारण त्यानेच त्यांचे धंद्याचे गणित जुळून येणार आहे. आज भारतामध्ये बनवले जाणारे बहुतांश सिनेमे टाकाऊ आणि विचारशक्तीला कुंद करणारे असून ते एका सडत चाललेल्या भांडवली संस्कृतीचे दर्शन घडवतात. सिनेमे बनवणारे लोक आपापल्या वैयक्तिक स्वार्थासाठी हिंदुत्ववादी फॅसिस्ट संघभाजप सोबत हातमिळवणी करताना दिसत आहेत.

या सिनेमांच्या प्रचाराला बळी न पडता सर्व जाती-धर्माच्या कामगार-कष्टकऱ्यांना मिळून पर्यायी मिडीया उभा करण्याची गरज आहे जो प्रबोधन करण्यासाठी सिनेमे, मासिक, वर्तमानपत्र, पुस्तकं, न्यूज चॅनेल चालवेल. आज कामगारवर्गाला अशा सिनेमांची गरज आहे जो प्रस्थापित भांडवली व्यवस्थेच्या अपयशांवर प्रकाश टाकेल. शोषण, दमन आणि अत्याचाराच्या सत्याला जगासमोर मांडेल. समस्येला सोडवण्याची शक्यता तेव्हाच निर्माण होते जेव्हा समस्या तिच्या सत्यतेमध्ये मांडली जाते. वास्तविकतेचे प्रामाणिकपणे चित्रण करणे, वास्तविकतेचे सार मांडणारी प्रातिनिधिक तथ्ये अचूकपणे ओळखणे हेच कलेचे पहिले काम आहे. अशी कला व सिनेमे बनवणे आणि जनतेत सत्य, परिवर्तनाचा विचार रुजवणे हे आज क्रांतिकारी कलाकारांचे दायित्व बनले आहे.