*शहराला चमकवणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश कधी?*
*शहरातील कामगारांच्या जीवनावर व्यक्तिगत प्रकाश टाकणारा एक प्रत्यक्ष पाहणी अहवाल*

अश्विनी

पुण्यातील अप्पर इंदिरा नगर, शहराच्या कडेचा भाग. अर्थातच मध्यवर्ती शहराला स्वच्छ, चकचकीत ठेवणारे, श्रीमंतांसाठी फ्लॅट्स बांधणारे, त्यांच्या गाड्या बनवणारे, त्यांच्या घरात घरकामासाठी स्वस्तात राबणारे कामगार राहतात त्या वस्त्या. सुमारे वीस वर्षाखाली या भागात जंगले होती. अतिशय विरळ घरे होती. तेव्हाच्या लोकांच्या गरजांनुसार पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन ही व्यवस्था मनपाकडून केलेली. हळू हळू मजुरीसाठी गावाकडून शहराकडे येणाऱ्यांची संख्या वाढली आणि जे काम मिळत गेले त्यानुसार तिथेच स्थायिक झाले. आज इथे राहणारी अंदाजे 15 ते 20 हजार कामगार कष्टकरी जनता जीवनाच्या अत्यंत कष्टप्रद परिस्थितीमध्ये जगायला मजबूर आहे.

अप्पर मधील बहुतांश कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. पक्का रोजगार नसताना घर चालवण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी काहीतरी हातपाय मारावेच लागतील म्हणून बिगारी, घरकाम करणे यासारखे काम अनेकांनी पत्करले आहे. महिला बिगारी, केटरींग, घरकामासोबतच घरी बसून बिडी बनवणे, अगरबत्ती बनवणे, लसूण सोलणे, मका सोलणे, कागदी कंदील बनवणे, पाकिटे बनवणे यासारखी कामे घेतात तर पुरुषांमध्ये हमाली काम, मिस्त्री, गवंडी काम, रिक्षा चालवणे, ट्रक ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड, मार्केटमध्ये छोट्या, मोठ्या दुकानांमध्ये काम करणे, कोणी झाडू खात्यात तर कोणी कचरा वेचण्यासाठी ‘स्वच्छ’ मध्ये 5-7 हजारांसाठी राबतो. रोज सकाळी अप्परच्या दोन्ही कामगार नाक्यावर पाहिल्यास जवळपास 300 – 400 कामगार काम मिळण्याची वाट पाहत उभे असतात. मजुरीचा दर रु 250 पासून सुरू होतो तर कुशल कामगारांसाठी तो 1000 पर्यंत जातो. अगदीच अशिक्षितांपासून तर ग्रॅज्युएशन झालेल्यांपर्यंत तरुण इथे काम शोधायला येतात. चेहरे अन कुशलता पाहून ठेकेदार कामावर घेऊन जातो. काम मिळतं ते 80-100 जणांना. उरलेल्यांना रिकाम्या हाताने घरी जाण्याशिवाय पर्याय नसतो. काम करून घेऊन मजुरी बुडवण्याचे प्रमाणही प्रचंड आहे. मुलांच्या शिक्षणाचे प्रमाणही ह्या भागात अत्यंत कमी आहे.  किमान आपल्यासारखी रोजंदारीची वेळ मुलांवर येऊ नये म्हणून आईबाप मुलांना चांगले शिकवू पाहतात तर महागड्या शिक्षणामुळे 10 वी 12 वीच्या पुढे मुलगा पोचू शकत नाही. खूप कमी संख्या आहे अशा मुला-मुलीची जे स्वतः मेहनत घेऊन डिग्री पर्यंत पोचतात.

श्रेयस नगर, स्वामी समर्थ नगर या भागात कित्येक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. नळ चालू केले की गढूळ पाणी येते. पिण्यासाठी तर दूरच, उलट कपडे वा भांडे धूण्याच्याही लायक ते पाणी नसते. अनेक लहान मुले, वयस्कर, महिला ते पाणी पिऊन आजारी पडत आहेत. गॅस्ट्रो सारख्या आजारांनी हॉस्पिटलची फी भरण्यात कमाई गायब होत आहे. वाढत्या महागाईला तोंड देत असताना पिण्याचे पाणीही दिवसामागे 60 रू.देऊन विकत घ्यावे लागत आहे. स्थानिक प्रशासनाला तक्रार केली असता आठवड्यातून एकदा टँकरने पाणी पुरवतात जे 3 दिवस पुरते, आणि बाकीचे 4 दिवस वणवण पुन्हा नशिबी येते!

अप्परच्या विविध भागात नालेसफाई वेळेत न झाल्याने चेंबरचे पाणी काहींच्या घरात घुसते. तसा तर बाराही महिने दुर्गंधीचा संचार असतो. मनपाच्या इंजिनिअर नुसार अप्परच्या पाण्याची पाइपलाइन व ड्रेनेज व्यवस्था वाढत्या लोकसंख्येनुसार दुरुस्त केली गेली नाही. तिचे संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी 20-25 लाखांचा खर्च आहे आणि तो मंजूर करायला मनपामधील बिल्डर लॉबी तयार नाही. साहजिकच आहे,  उच्च मध्यम वर्ग, शेठ, धनदांडगे राहणाऱ्या सोसायटीत जर असा पाणी प्रश्न उद्भवला, तर महानगरपालिका धावून जाते,  कारण तिथे माणसं राहतात! पण वस्त्यांमध्ये माणसं कुठे राहतात? ते तर हात आणि पोट असलेले, स्वस्तात राबणारे आणि नफा कमावून देणारे मशीन आहेत!

पद्मावती, पवन नगर भागात गेल्या तीन चार महिन्यांपासून  वीजबिल वाढून येत आहे. जेमतेम एका खोलीत रात्रीच चालणारा मिणमिणता पिवळा लाईट आणि एक फॅन इतकी कमी उपकरणे असूनही रु. 700 ते 1000 रुपये वीजबिल येते. वेळेत भरले नाही तर दुसऱ्या दिवशी वीज कर्मचारी वीज कापायला हजर! वीज केंद्रावर तक्रार केली असता मीटर तपासावे लागेल ह्या नावाने वेगळी 750 रुपयाची पावती फाडली, तरी वेळेवर तपासणी सुद्धा होत नाही हा जनतेचा अनुभव.

संसाधनांची ही दैन्यावस्था असताना, उपजीविकेची मात्र भ्रांत! अनेक तास राबूनही मजुरी इतकी अल्प मिळते की मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण करणे अशक्य! याच वस्त्यांमधील काही कामगार-कष्टकऱ्यांशी झालेल्या संवादातून पुढे आलेली काही उदाहरणे पाहूयात.

स्वामी समर्थ नगर मधील सुजाता. युपी वरून येऊन पुण्यात स्थायिक झाल्यात. अतिशय कोंदट खोली, कच्चीच, विटांनी बांधलेली. घरात 4 जण, पण लागणारे सामान ठेवायलाही घरात पुरेशी जागा नाही. सर्व मिळून लसूण सोलण्याचे काम करतात. दिवसाला 30-40 किलो लसणाचं पोतं घरी येतं. तो लसूण वाळवायचा, गाळून साफ करायचा, पायाने फोडायचा आणि नंतर स्वच्छ सोलून पोत्यात भरायचा.  ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे. घरातले चारही जण कामाला लागले तरी दिवसभरातून 20 किलो लसूण सोलला जातो. किलोमागे 15 रुपये मिळतात. त्यातही वजन कमी भरलं म्हणून 20-30 रुपये कापूनच मिळतात. लसणाचा उग्र वास घरभर पसरलेला, लसूण सोलण्याने हातही सोलून लाल झालेले! इतकं केलं तर दोन वेळेचं जेवण कसतरी मिळतं!

पद्मावतीच्या सुरेखा. त्या 3-4 घरात घरकाम करतात.  पती दिवसा बिगारी आणि रात्री दुसरे काम असे दोन जॉब करतात. मोठी मुलगी जॉब करून 8-10 हजार कमवते. दोन बहिणी 10 वीत शिकत आहेत. रूचाला शिक्षणाची खूप आवड! डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे! परंतु आताच शाळेकडून छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रचंड फी आकारली जातेय. मागे वडिलांचा एकच जॉब असल्यामुळे शाळा सोडावी लागलेली. अशी परिस्थिती असताना डॉक्टर होईपर्यंत कसे पोचणार? त्यासाठी लागणारी लाखोंची फी आणायची कुठून? त्यात नीट सारख्या परीक्षांचे घोटाळे. हे अनेक प्रश्न त्या बालवयात आतापासून रुचाला भेडसावत आहेत. इवल्याशा डोळ्यातले स्वप्नही चुरडणारी क्रूर व्यवस्था यातून दिसते.

‘स्वच्छ’ मध्ये काम करणाऱ्या कांबळेताई आणि त्यांचे पती. रोज सकाळी 5 वाजताच घराबाहेर पडावे लागते. सोसायटीतल्या घराघरात जाऊन कचरा गोळा करायचा, तो वेगळा करायचा, जाऊन गाडीत भरायचा! अनेक वेळेस तो कचरा वेगळा करताना फुटलेली काच वगैरे हातात रुतते, रक्ताच्या धारा लागतात. परंतु चांगल्या प्रतीचे हॅण्ड ग्लोव्हज व सुरक्षा साहित्य मागूनही दिले जात नाहीत. एवढे करून पक्का पगार असा नाहीच! प्रत्येक घरामागे 50-70 रुपये आपणच मागायचे! ‘स्वच्छ’ कार्ड, ई-श्रम कार्ड, बांधकाम कामगारांचे लेबर कार्ड, अशा सगळ्या प्रकारचे कार्ड काढून बसलेत पण एका रुपयाने कुठून पैसा खात्यात आला नाही! नातवांना शिकवायच आहे पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा, हा यक्षप्रश्न समोर.

पद्मावतीच्या कविता. कधी कामाची सवय नव्हती. पण मुलांचं शिक्षण आणि आर्थिक चणचणीमुळे कामासाठी बाहेर पडावे लागले. नवरा मार्केट यार्डात काम करतो. व्यसनाधीनतेने घराची दैन्यावस्था झालेली. अनुभव हा की कोणी आजारी पडलं, कोणाला अर्जंट पैसा पाहिजे तर स्थानिक नगरसेवक पुढे येतात, व्याजाने पैसेही देतात, म्हणजे थोडक्यात अपघातावेळी थोडीफार मदत करतात, परंतु रोजच्या जीवनाच्या संकटाकरिता मात्र कामगार वर्गाला वाऱ्यावर सोडलेले!  रोजगार नसेल, जास्त फी मुळे मुलांना शाळेत ॲडमिशन घेता येत नसेल तर ह्यात आम्ही काय करणार असे म्हणून स्थानिक नगरसेवक हात वर करतात.

शिवतेज नगर मधले यादव मिस्त्री जीवनात अनेक मालकांकडे काम केल्याचा अनुभव मांडतात. ते म्हणतात की गेल्या 30 वर्षापासून इथे राहत आहे; आजपर्यंत अनेक प्रकारची कामे केली कारण कोणतंही काम फिक्स नव्हतं; आलो तेव्हा बिगारी कामाने सुरुवात केली, पाऊस लागला आणि ते काम गेलं, मग कॅटरिंग चे काम घेतले, ते ही सुटले; मग काही दिवस रिक्षा चालवली; नंतर चहा विकण्याचं काम केलं, काही दिवस सिक्युरिटी गार्ड म्हणून राहिलो, आणि पुन्हा येऊन बिगारी काम; सर्व प्रकारची कामे करून पाहिली; पण एक गोष्ट जाणली: कुठलेही काम करा, मालक हा तुम्हाला जिवंत ठेवण्यापुरताच पगार देतो, तो कामगार विरोधीच असतो!

सुपरमधील जाधव ताई. वय वर्ष 66. अतिशय छोट्याशा कोंदट खोलीत सर्व सामान. त्यात उंदीर आणि घुशी फिरतात. थोडाही पाऊस आला की घरात पाणी येतं. करोनाच्या अगोदर पर्यंत आय.एम.ए. मध्ये कामाला होत्या, नंतर संधिवाताचा त्रास खूप वाढला. त्या म्हणतात की आता कुठलही काम होईना; बहिण होती तोपर्यंत लसूण सोलण्याचे काम मिळे, पण आता घरही आवरणं होत नाही वयामुळे. पण जगायला पैसा तर लागतो, सरकारकडून एका पैशाने मदत मिळत नाही. लाडकी बहिण अन् लाडका भाऊ योजना आणल्यात पण वयस्करांसाठीच्या योजनेत हजारो अटी! पेन्शन चालू करायची म्हटल्यावर कागदपत्रांची पूर्तता करायलाच 2-3 हजार लागतील, ते कुठून आणायचे?!

सुपरच्याच सीमा. नवरा 15 वर्षापूर्वीच गेला. बसमध्ये कंडक्टर होता. त्यांचं पेन्शन नाही. मुलगा वॉटर प्युरिफायरचं काम करून जेमतेम 5-6 हजार कमावतो. ताईंना त्वचेचा आजार असल्यामुळे काम करण्याची गरज आणि इच्छा असूनही कोणी काम देत नाही. अतिशय कष्टात दिवस काढावे लागत आहेत पण ना काम, ना पेन्शन, ना महागाई कमी व्हायचे चिन्ह. घरभाडे, रेशन मधेच सर्व पैसा संपतो, दवाखान्याचा खर्च वेगळा!

शेळके वस्तीतील अनेक जण बिगारी काम करतात, सतत सिमेंट मध्ये हात असल्यामुळे हाताला फोड येणे, त्वचा लाल होणे हे आजार नेहमीचेच आहेत, पण पैसा नसल्यामुळे आहे तसेच सहन करून रोज कामावर जावेच लागते. अंबिका नगरच्या झुबेदा भाभी अनेक काम करून थकल्या. सतत हात दुखतो पण अनेक औषधं करूनही त्याला आराम नाही. जवळच्या क्लिनिक वर गेलं की स्टिरॉइड देऊन दुखणं दाबण्याचे काम करतात. नंतर ज्याचा खूप त्रास वाढेल. तरीही हॉटेलमध्ये पोळ्या लाटणं, भांडी घासणे, कॅटरिंग मध्ये स्वयंपाकाला जाणं, लाडू वळणं ही कामं करावी लागतात तेव्हाच थोडाफार पैसा येतो. कोणी हॉस्पिटलमध्ये मामा मावशी म्हणून राबतोय, कोणी येईल ते काम करतोय, अनेकांचा कामाच्या जागी नसलेल्या सुरक्षितते मुळे मृत्यू होतोय पण ह्यातही सरकारला काही देणं घेणं नाही!

ह्याच सर्वांच्या काबाड कष्टाने पक्की घर बांधली जाताहेत, घरोघरी चांगला स्वयंपाक बनतोय, श्रीमंत लोकं लहानग्यांना घरी सोडून निर्धास्तपणे कामावर जाऊ शकताय, रस्ते, घरे स्वच्छ होतात, हॉटेलमध्ये चांगलं जेवण जेवू शकता, हवी ती वस्तू पैसेवाला वर्ग विकत घेऊ शकतो, देशाची संपत्ती यांच्याच कष्टातून वाढतेय पण ह्याच कष्ट करणाऱ्या जनतेला चांगलं घर, चांगले दवाखाने, चांगल्या शाळा, पक्का रोजगार नाही! ह्या परिस्थितीत तात्पुरता सुधार करायला भांडवलदारच काही एन.जी.ओ.ना कामाला लावतात आणि खरेतर त्या किरकोळ दानधर्म करून जनतेला लाचार बनवण्याचे आणि विचारशक्ती मारण्याचेच काम करतात!

ही आज फक्त अप्परची परिस्थिती नसून पुण्यातच शेकडो अशा कामगार कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत आणि देशभरात लाखोंनी ह्या वस्त्या आहेत. देश ज्यांच्या श्रमावर चालतो त्यांची स्थिती कमी जास्त प्रमाणात अशीच आहे. परंतु हे त्रिकालाबाधित सत्य नाही! ज्यावेळेस कामगार कष्टकरी आपली संघटित ताकद ओळखतील, त्यासाठी सर्व भेदभाव तोडून एकत्र येतील, आणि क्रांतिकारी लढे उभे करतील, तेव्हा ही परिस्थिती बदलण्याची सुरूवात होईल!