कोरोना लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही जात-धर्म-वंशवादी, अवैज्ञानिक प्रचार सुरूच
रवी
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सर्व बातम्या, सोशल मीडिया आणि आपली सभांषणे कोरोनाविषाणूने व्यापली होती. सर्व जगंच ठप्प झाले होते. वृत्त वाहिन्यांनी कोरोनाविषाणू विरुद्ध एकता असल्याचे चित्र रंगवले. शारीरिक अंतर आणि स्वच्छतेचे विशेषाधिकार असो किंवा कोरोनाच्या उगमाचा प्रश्न असो, अशा सर्वच प्रश्नांमधून अनेकांचे जातीय आणि वर्गीय पूर्वाग्रह स्पष्टपणे दिसून आले. कोरोनासारख्या भीषण संकटातही जात-जमातवाद्यांनी, हिंदुत्ववाद्यांनी आपले विज्ञानविरोधी प्रचार-प्रसार करणे थांबवले नाही.
शाकाहार-मांसाहारालबद्दल शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पना पूर्वीपासूनच आहेत. उदाहरणार्थ आय.आय.टी. बॉम्बे सारख्या देशातील अभियांत्रिकीमध्ये अव्वल क्रमांकाच्या संस्थेमध्ये उच्चवर्णीय विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी खाणावळीमध्ये शाकाहाऱ्यांचे जेवण बनविण्यासाठी आणि खाण्यासाठी वेगळी भांडी असावीत अशी मागणी उचलली. मांस आणि मांस खाणाऱ्यांची स्पर्शाने त्यांचे शरीर आणि मन दूषित होणार होते कि काय कोण जाणे! वास्तवात भारतात शाकाहाराचा पुरस्कार प्राण्यांची काळजी म्हणून नाही तर जातीय शुद्ध-अशुद्धतेच्या कल्पनांमुळेच जास्त केला जातो. ब्राह्मणी विचारधारे प्रमाणे शाकाहार हा शरीर आणि आत्म्याला शुद्ध ठेवतो. देवाच्या जवळ असलेले श्रेष्ठ लोक या नियमाचे काटेकोरपणे पालन करतात. भारतातील जातिव्यवस्थेमध्ये ब्राह्मण शुद्ध शाकाहार ग्रहण करतात आणि खालच्या जातीतील जनतेला अशुद्ध मानले जाते, कारण त्यांना मांसाहार करण्यास परवानगी आहे. जातिव्यवस्थेमध्ये विभागलेल्या या खानपानाच्या फरकांमुळे मांसाहाराला कारण सांगून खालच्या जातीतील लोकांना दोषी ठरवले गेले. याची अनेक उदाहरणे सोशल मीडियावर सापडतील. हा फरक करणारे फक्त अशिक्षितच नाहीत तर उच्च शिक्षित सुद्धा सापडतात.
आता तर कोरोना विषाणूच्या शोधानंतर लगेचच ‘कर्तव्यदक्ष’ ब्राह्मणी वर्चस्ववाद्यांनी मांसाहार करणाऱ्यांच्या अशुध्दतेला या रोगाचा स्त्रोत म्हणून जाहीर केले. या असंवेदनशीलतेचा कळस म्हणून कि काय ट्विटर नावाच्या सोशल मीडिया वर “NoMeatNoCoronavirus” (मांस नाही तर कोरोनाविषाणू नाही) असे ट्विट करून अनेकांनी जागतिक महामारीला ‘उपाय’च दिला. खरे पाहता कोरोनाविषाणूच्या संपर्कात येणाऱ्या कोणालाही हा रोग होऊ शकतो. जात, धर्म किंवा अन्न न पाहता तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. पण अनेकांनी तर कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शाकाहारी व्हा असा उपदेश केला, जो पूर्णपणे चुकीचा आणि मूर्खपणाचा आहे. या खोट्या उपदेशामध्ये भर म्हणून हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी जाहीर केले कि “कोरोना हा विषाणू नसून छोट्या जीवांच्या रक्षणासाठी आलेला एक अवतार आहे. त्यांना खाणाऱ्यांना मृत्यू आणि शिक्षेचा संदेश देण्यासाठी तो आला आहे. भारतीयांना विषाणूला घाबरण्याची काहीही गरज नाही; कारण ईश्वराची पूजा आणि गाईची रक्षण करण्यात विश्वास ठेवणारे भारतीय या विषाणूपासून सुरक्षित आहेत.”.
समाजातील अस्पृश्यता नष्ट झाली आहे असे अनेकांना वाटत असतानांच कोरोनामुळे भारतातील उच्च जातीयांच्या मनामध्ये रुजलेली जातीभेदाची आणि दलित तिरस्काराची रूपे उघड उघड दिसू लागली आहेत. विजयवाड्यातील एका गावामध्ये तर दलित वस्तीमधून बाहेर पडण्यास दलितांना मनाई करण्यात आली होती आणि त्यांच्यावर पहारा ठेवण्याचे काम तेथील काही उच्चभ्रू जातीतील पुढारी करत. अनेक दिवस त्यांना भाज्या, दूध आणि औषधांविना राहावे लागले. जर तुम्हाला वाटत असेल कि हि परिस्थिती फक्त खेड्यांमध्ये आहे तर तुमचा समज चुकीचा आहे. दिल्लीमध्ये झालेल्या तबलीगी जमातीच्या धार्मिक संमेलनानंतर देशामध्ये मुस्लिमांना हिणवण्याचे हिंतुत्ववाद्यांना कारणच मिळाले. त्यानंतर अल्पसंख्यांक मुस्लिम जनतेला देशातील बहुसंख्यांक हिंदू कट्टरपंथीयांचा रोष सोसावा लागला. पाटण्यात संघी परिवाराचा भाग असलेल्या बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंच्या दुकानांसमोर भगवे झेंडे लावले आणि हिंदूंना आवाहन केले कि फक्त याच दुकानांमधून किराणा, भाज्या आणि फळे विकत घ्यावीत. अहमदाबादेत सरकारी दवाखान्यात हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे वॉर्ड करण्यात आले आहेत. त्याच वेळी पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधूंच्या मॉब-लिंचिंग घटनेला जातीयवादी रूप देण्यात आले. “८० टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या देशात हिंदूंची हत्या कशी होते?” अशा हेडलाईन्सच्या बातम्या गोदी मीडियाने अनेक दिवस चालवल्या. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी बहुतांश जण भाजपचे कार्यकर्ते होते, या तथ्यांवर मात्र पडदा टाकण्यात आला.
कोरोनाविषाणूचा उगम चीनमध्ये झाल्याने संपूर्ण जगामध्येच पूर्व आशियायी देशांतील नागरिकांना वर्णद्वेषी भेदभावाला सामोरे जावे लागले. भारतामध्येही अशा प्रकारच्या वर्णद्वेषाचा सामना उत्तर पूर्व भारतीयांना करावा लागला. अशीच एक घटना मुंबई मध्ये घडली. टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टी.आय.एस.एस.) येथील एका नागालॅंड मधील विद्यार्थिनीला ती राहत असलेल्या इमारतीच्या भागातील एका स्थानिक इसमाने तिला घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली. ती महिला चिनी असून कोरोनाविषाणूने ग्रासली आहे असा त्याचा समज झाला होता. उत्तर पूर्व राज्यांमधील भारतीयांना आणि चिनी जनतेला हिणवणारे अनेक संदेश सोशल मीडियावर आणि व्हाट्सऍप वर फिरवले गेले. एवढेच नाही तर अनेकांनी चिनी खाद्य पदार्थांवर सुद्धा आक्षेप घेतला. परंतु असा वंश-वर्णद्वेष करणारे हा विषाणू भारतात येईपर्यंत आणि आल्यानंतरसुद्धा निष्क्रिय राहिलेल्या सरकारला मात्र अजिबात दोषी मानताना दिसत नाहीत.
भारतीय समाजामध्ये रुजलेले धार्मिक-जातीय-वांशिक भेदभाव अशाप्रकारे कोरोनासारख्या आपत्तीमध्येही लोकांना रोगाची वैज्ञानिक माहिती मिळण्यापासून, योग्य इलाजाकडे जाण्यापासून फक्त रोखत नाहीत तर कामगार-वर्गीय जनतेमध्ये दुही माजवण्याचे काम सुद्धा करतात आणि पर्यायाने सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चुकांपासून मुक्त करण्याचेच काम करतात.
कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020