हो प्रधानमंत्री महोदय! आम्ही संपदा निर्माण करणाऱ्यांचा सन्मान करतो! पण तुमचे भांडवलदार मित्र संपदा निर्माण करत नाहीत!
अभिनव (अनुवाद, संपादन: अभिजित)
प्रधानमंत्री मोदी 15 ऑगस्ट 2019 रोजी 72 व्या स्वातंत्रदिनी (जो काही कारणांनी त्यांना 75 वा स्वातंत्र्यदिन वाटला!) लाल किल्ल्यावरून भाषण देताना अत्यंत भावविव्हळ झाले. त्यांनी जड अंतकरणाने देशातील कृतघ्न गरिब, कष्टकरी, कामगार, गरिब शेतकरी आणि निम्न मध्यमवर्गाला क्लेषदायक आवाहन केले की त्यांनी देशातील श्रीमंतांना संशयाच्या नजरेने पाहू नये! श्रीमंतांप्रती आभाराच्या भावनेने भरून आलेल्या प्रधानमंत्री महोदयांनी आम्हा कामगार-कष्टकऱ्यांना सांगितले की श्रीमंत लोकच तर आहेत जे संपदा निर्माण करतात ! आणि जेव्हा संपदा निर्माण होईल तेव्हाच तर ती वाटली जाईल आणि आम्हा बेशरम कृतघ्न लोकांपर्यंत पोहोचेल! यावर पुन्हा एकदा मनातून आवाज आला, “वाह मोदी जी, वाह!”
आपल्या या भाषणामध्ये प्रधानमंत्री महोदय देशातील श्रीमंतांप्रती वाढणाऱ्या रागाबद्दल बरेच चिंतित दिसले. त्यांना वाटत होते की मंदीमुळे रोजगार गमवावा लागलेल्या कामगार आणि युवकांना याचे कारण श्रीमंत भांडवलदार आहेत असे तर वाटणार नाही ना! हे बिचारे भांडवलदार तर स्वत:च नफ्याच्या घसरत्या दरामुळे तडफडत आहेत आणि त्या मुंगळ्यांसारखे धावत पळत आहेत ज्यांच्यावर जणू गरम तेल पडले आहे. वरुन आमच्या सारखे बिनकामाचे आणि निर्लज्ज लोक! याच ‘मेहनती’ श्रीमंत भांडवलदारांवर, याच ‘संपदा निर्माण करणाऱ्यां’वर रुबाब झाडत आहेत? किती निर्लज्ज प्रकारचे कृतघ्न लोक आहोत आम्ही !
चला बघूयात की आपले आवडते अंबानी, अडानी, टाटा, बिर्ला, हिंदुजा, गोयंका वगैरे किती हाड-तोड मेहनत करून समाजामध्ये संपदा निर्माण करतात, जी प्रधानमंत्री महोदयांच्या मते वाटण्या होऊन आम्हाला मिळत होती! अहो, त्यामुळेच तर आम्ही गरिब लोक रोज सकाळ–संध्याकाळ अंडे–दूध, कोंबड्या, पनीर खातो, आपल्या मुलांना शिकायला विदेशात पाठवतो आणि आरामदायक घरांमध्ये राहतो! बस्स, आम्ही हे सगळे नंतर विसरून जातो! असो! तर बघूयात की हे मालक आणि ठेकेदार कसे घाण्याच्या बैलासारखे मेहनत करून आमच्यासाठी संपदा निर्माण करतात.
सर्वात अगोदर तर एक मालक, ज्याला कोणताही माल बनवण्यासाठी कारखाना लावायचा आहे, तो मशिन विकत घेतो आणि कारखाना काढतो. यासाठी तो जमीन विकत घेतो, किंवा एखाद्या जमिनमालकाकडून भाड्याने घेतो. बाजारात मशिन विकणाऱ्या व्यापाऱ्याकडून तो मशिन विकत घेतो किंवा सरळ मशिन बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाकडून. जेव्हा तो व्यापाऱ्याकडून घेतो, तेव्हा तो वास्तवामध्ये मशिन बनवणाऱ्या कंपनीकडूनच घेत असतो, ज्याला विकण्याचे काम व्यापाऱ्याला दिलेले असते; याच्या बदल्यात व्यापारी मशिन कंपनी मालकाच्या नफ्याचा एक छोटा हिस्सा घेत असतो. हे मालक, म्हणजे औद्योगिक भांडवलदार आणि व्यापारी भांडवलदार यांच्यामध्ये ‘श्रम’ विभागणी आहे, जिच्यामुळे मशिन कंपनी मालकाला आपल्या मशिनची किंमत लगेच मिळाते आणि पुन्हा उत्पादन करण्यासाठी त्याला मशिन विकण्याची वाट पहावी लागत नाही. असो. तर आपला हुशार मालक मशिन विकत घेतल्यावर, आणि कारखान्यात लावल्यावर कच्चा माल विकत घेतो जो माल बनवण्यासाठी आवश्यक आहे. मग काय होते? मशिन काय स्वत:हून कच्च्या मालापासून पक्का माल तयार करतात का? नाही ! यासाठी आम्हा निराश कामगारांनाच कामाला लागावे लागते. तसे तर आम्हाला 12-12 तास भार उचलणाऱ्या जनावरांसारखे राबावे लागते, पण आम्ही तरीही आभारी असले पाहिजे की आम्हाला आमच्या मेहनती, प्रामाणिक, नैतिक आणि सत्यनिष्ठ मालकांनीच तर नोकरी दिली ! नाहीतर आम्ही सडकेवर मेलो असतो. ही गोष्ट वेगळी की मालकाने कारखाना आम्हाला नोकरी देण्यासाठी नाही उघडलेला, तर नफ्यासाठी उघडला आहे. ही गोष्ट वेगळी की आम्ही 12 तास खपून आणि नंतर 5 ते 10 हजार पगार घेऊन सुद्धा ते आमच्याकडून एका कागदावर सही घेतात, ज्यावर लिहिलेले असते की आम्ही 8 तास काम केले आहे आणि त्याबदल्यात आम्हाला किमान मजुरी मिळाली आहे. तरीही आमचा मालक राजा हरिश्चंद्रासारखा सत्यनिष्ठ आणि कर्णासारखा दानशूर तर मानलाच जाईल! आठवत नाही? प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी मंदिराच्या बाहेर आम्हा उघड्या-नागड्यांना जो भंडारा लागतो ? आणि यावरही जर त्याने लेबर इन्सपेक्टर, फॅक्टरी इन्स्पेक्टरला विकत घेतले, किंवा त्याला खोटे कागद दाखवून आमच्याकडून 12 तास काम करवले आणि आम्हाला कायद्याने ठरवलेली किंमान मजुरी सुद्धा दिली नाही, तर आम्ही त्याच्या इराद्यावर आणि सत्यनिष्ठेवर संशय घेऊ? किती कृतघ्न आहोत आम्ही !
असो ! तर आम्ही लोक त्याच्या कारखान्यामध्ये त्याच्या मशिनवर त्याचा कच्चा माल वापरून त्याच्यासाठी माल तयार करतो, त्यासाठी 12-12 तास खपतो, आणि मग मालक त्या मालाला बाजारात विकतो आणि गुंतवणुकीवर नफा कमावतो. नफ्याच्या एका हिश्श्यातून त्याने जर 10-12 कोटींची गाडी घेतली, 30-35 कोटींचा बंगला घेतला आणि आपल्या मुलांवर लाखो खर्च करून विदेशात शिकायला पाठवले, आणि ऐयाशी करण्यासाठी आपल्या बायका-पोरांच्या कपडे, दागिन्यांवर खर्च केला तर त्याला बिचाऱ्याला इतकाही अधिकार नाही? त्याला इतकाही अधिकार नाही की तो आपल्या उबवणाऱ्या जीवनाला कंटाळून डुकरांसारखे खाईल आणि मग त्याची ढेर फुग्यासारखी फुगेल आणि मग त्याला साखर, अधिक वजन, कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे विकार होतील? तुम्हाला दिसत नाही का की श्रीमंत असल्याची किती मोठी किंमत तो देत आहे? किती निर्लज्ज आहोत आम्ही कामगार !
असो. उत्पादनसाठी त्याला स्वत:चे भांडवल लावावे लागले, ज्यातून त्याने कारखान्याची जमीन घेतली, मशिन आणि कच्चा माल विकत घेतला आणि मजुरांची श्रमशक्ती विकत घेतली. हे भांडवल त्याच्याकडे कुठून आले? त्याच्या बापाकडून, किंवा बॅंकेकडून लोन घेऊन, किंवा कंपनीला शेअर मध्ये तोडून आणि त्यांना विकून हे भांडवल जमा केले. चला आता त्या लाडक्या उद्योगपतींबद्दल बोलूयात ज्यांना त्यांच्या बापाकडून भांडवल वारशाने मिळाले. (अनुवादक: म्हणजे हे भांडवल काही काम न करता फक्त त्यांच्या ताब्यात आले!) त्यांच्या बापाकडे हे भांडवल कसे आले? त्यांच्या बापाच्या बापाने, म्हणजे आज्याने त्यांना दिले. पण या बापांच्या साखळीत जो पहिला बाप होता, त्याच्याकडे भांडवल कुठून आले? त्याने ते भांडवल बऱ्याच कष्टकऱ्यांना लुटून, बरबाद करून, उध्वस्त करून गोळा केले. कसे? हे समजण्यासाठी अगोदर आपल्याला या विषयाला थोडा वेळ बाजूला ठेवून हे समजून घ्यावे लागेल की रुपये–पैसे म्हणजे चलन काय आहे.
जगाच्या इतिहासामध्ये मालाची देवाणघेवाण विकसित होत गेली. या प्रक्रियेत निर्माण झालं ते चलन. आज ज्याला आपण रुपये-पैसे, नोटा-नाणी म्हणून बघतो, ते 500 किंवा 3,000 वर्षांपूर्वी तर नक्कीच अस्तित्वात नव्हते. मग लोक देवाणघेवाण कशी करत होते? तर अगोदर पशुधनाच्या रुपात, नंतर तांबे-सोने-चांदी इत्यादी धातूंच्या रुपात आणि विकसित होत आता कागदी नोटांच्या रुपात. थोडे खोलात जाऊयात. देवाणघेवाण करायला कोणतीही दोन माणसं पाहिली तर एकमेकांच्या वस्तूंची गरज असणे हा योगायोगच असेल. कुऱ्हाड विकून धान्य घ्यायचे असेल तर कुऱ्हाड विक्रेत्याला असा धान्य विक्रेता शोधावा लागेल ज्याला कुऱ्हाड हवी आहे. जर दोन जणांमध्ये देवाणघेवाण हा योगायोगाचा मामला आहे, तर अनेक उत्पादकांमध्ये मालाची देवाणघेवाण गुंतागुंतीची असणारच. अशामध्ये हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये देवाणघेवाणीची प्रक्रिया गुंतागुंतीची होत असताना चलन म्हणजेच मुद्रा, पैसा–रुपये, इत्यादी अस्तित्वात आले. चलन वापरून कोणीही माल विकत घेऊ शकते आणि विकू शकते. चलनामुळे देवाणघेवाण सोपी झाली कारण चलन हे सोबत न्यायला सोपे, टिकाऊ आहे आणि सर्वांनी मान्य केलेले आहे. त्यामुळे मला जर कुऱ्हाड विकून धान्य घ्यायचे असेल तर कुऱ्हाडीची गरज असलेल्या धान्य विक्रेत्याला शोधत बसावे लागत नाही! दुसरे हे समजले पाहिजे की चलनाला स्वत:ला काही किंमत नसते, पण चलन असा माल आहे ज्याचा वापर इतर मालांसोबत समानतादर्शक म्हणून वापर होतो (आणि म्हणूनच चलन सुद्धा एक माल आहे. सोबतच चलनाला मूल्य आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलूयात). चलन म्हणून प्राचीन काळात अगोदर पशूधन होते, नंतर तांबे, कांसे, इत्यादी होते आणि नंतर त्याची जागा सोन्या-चांदीने घेतली; आता जास्त माल घ्यायचा असेल तर सोने-चांदी बैलगाडी वर लादून नेणे नेहमीच शक्य नाही त्यामुळे शेकडो वर्षांच्या काळात सोन्याच्या जागी कागदी नोटा आल्या ज्या सोन्या-चांदीचे प्रतिक होत्या. आता समजण्याची गोष्ट ही की जर समाजात विविध वस्तूंचे उत्पादन होत नसते, तर चलनला अस्तित्वच नसते! तुम्ही ना नोटांना-नाण्यांना खाऊ शकता, ना अंगावर घालू शकता, आणि ना अंथरूण-पांघरूण करु शकता, ना त्याचे घर बनवू शकता, त्यामुळे चलनाला स्वत:ला काहीच किंमत नसते, त्याचा माल म्हणून वापर फक्त देवाणघेवाणीसाठी आहे. त्यामुळे मुळ गोष्ट ही की समाजात खरी संपदा आहे निर्माण होणाऱ्या वस्तू, ज्या नसतील तर चलनाला काहीच किंमत रहात नाही. म्हणजे चलनाच्या रुपातील भांडवल हे समाजातील खऱ्या वस्तुरुपातील भौतिक संपदेचेच प्रतिनिधित्व करते, किंवा दुसऱ्या शब्दात चलन हे समाजातील निर्माण झालेल्या मालावर एक दावा आहे, आणि त्यामुळेच भांडवलदार वर्ग त्याच्याकडील चलन रुपी भांडवलाला उत्पादन साधनांमध्ये (कारखाने, हत्यारं, यंत्र, कच्चा माल, वगैरे) आणि श्रमशक्ती मध्ये बदलवतो आणि कारखान्यामध्ये उत्पादन करवतो, आणि मालकीमुळे त्यातून निर्माण झालेल्या उत्पादनावरही त्याचाच अधिकार असतो. मूळ चर्चेकडे परत जाऊयात.
म्हणजे सर्वात पहिल्या बापाकडे म्हणजे पहिल्या भांडवलदाराकडे जे चलन-भांडवल आहे, ते खरेतर समाजात निर्माण होणाऱ्या मालाचेच प्रतिनिधित्व करते आणि त्या मालाचे अस्तित्व नसेल तर या भांडवलदाराकडे असलेल्या चलन-भांडवलाला काही अर्थ नाही. हेच चलन भांडवल त्या समाजात अस्तित्वात असलेल्या सर्व मालांवर एक निश्चित दावा नक्कीच आहे. हे चलन-भांडवल त्याच्याकडे कुठून आले असेल? ऐतिहासिक रुपाने आणि वस्तुस्थिती पाहिली तर मालकांनी शेतकरी आणि आदिवासींना जमिनींपासून बेदखल करून, वेगवेगळ्या देशांवर कब्जा करून आणि लुटून, स्वत:च्या मेहनतीने आणि हत्यारांनी उत्पादन करणाऱ्या कारागिरांकडून त्यांची उत्पादनाची साधनं, हत्यारं हिसकावून घेऊन आणि विविध प्रकारची जोर जबरदस्ती आणि लुटीच्या माध्यमातून आपले सुरूवातीचे भांडवल एकत्र केले. जाहीर आहे की तेव्हाची राज्यसत्ता आणि सरकारांनी सुद्धा त्यांची मदत केली. सुरुवातीच्या भांडवलदारांकडे साधारणपणे याच खुनी प्रक्रियेतून भांडवल संचय झाला, मग तुम्ही कोणत्याही देशाचा इतिहास घेऊन वाचा. यापैकी काही भांडवलदार व्यापारी होते, तर काही असे कारागिर पण होते ज्यांनी इतर कारागिरांची माल उत्पादकाच्या रुपामध्ये स्वतंत्रता समाप्त करून त्यांना आपले मजूर बनवले. म्हणजे सुरुवातीच्या भांडवलदारांकडे जे भांडवल होते, ते त्यांच्याकडे बापाच्या मेहनतीतून नाही, तर दुसऱ्याच्या मेहनतीची कमाई लुटून आले होते. भांडवलाचे मूळ हेच आहे, ज्याला आदिम भांडवल संचय म्हणू शकतो. हेच ते ‘मूळ पाप‘ आहे ज्याने भांडवलाला जन्म दिला. म्हणजे भांडवलदार वर्गाच्या भांडवलाच्या मुळामध्ये आपल्या मेहनतीतून निर्माण केलेली संपदा होती, जिला जबरदस्तीने हडप केले गेले. आता त्या भांडवलदारांबद्दल बोलूयात, जे फक्त “आपल्या बापाकडून मिळालेल्या” भांडवलाच्या आधारावर गुंतवणूक करत नाहीत.
आजच्या काळात अनेक, खरेतर बहुतांश, भांडवलदार असे आहेत जे आपल्या खाजगी भांडवलाच्या आधारावर उत्पादन करत नाहीत, तर ते सरकारी बॅंकांकडून कर्ज घेऊन किंवा शेअर बाजारामध्ये आपले शेअर सामान्य लोकांना विकून भांडवल गोळा करतात. इथे तर स्पष्टच आहे की हा देशातील सामान्य कष्टकरी लोकांचा पैसा आहे, मग ते बॅंकांमध्ये जमा भांडवल असो किंवा ते भांडवल जे सामान्य लोकांद्वारे शेअर विकत घेऊन जमा केले जाते. साधारणपणे आजच्या भांडवलदारांकडे याच तीन मार्गांनी भांडवल येते कारण उत्पादनाचा स्तर एवढा वाढला आहे की कोणताही भांडवलदार फक्त आपल्या खाजगी भांडवलाच्या आधारावर (जे त्यांच्या पूर्वजांनी कष्टकऱ्यांना लुटून एकत्र केले होते) बाजारात स्पर्धा करण्यासाठी उतरू शकत नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी त्याला कर्जाची आवश्यकता असते आणि कोणत्या ना कोणत्या रुपाने तो सामान्य लोकांचाच पैसा गोळा करतो, मग तो बॅंकांद्वारे असो वा शेअर बाजाराच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या लाडक्या भांडवलदारांकडे जे भांडवल आहे, ते समाजातील कष्टकरी लोकांद्वारे पिढ्यानपिढ्या केलेल्या उत्पादनाचा संचय आहे. आता फक्त एवढ्याशा गोष्टीमुळे जर तुम्ही कामगार बंधु-भगिनी असा विचार तर नाही करू लागला ना, की जर समाजातील सगळे भांडवल, सगळी धन-संपदा आणि वस्तू आम्ही आणि आमच्या कष्टकरी पूर्वजांनी निर्माण केली आहे, तर यावर आमचा सामुदायिक अधिकार असला पाहिजे? असे थोडीच होते. तुम्ही तर डोक्यावर चढायला लागलात. डोकं थंड ठेवा आणि पुढे वाचा !
आमच्या भांडवलदाराने ज्या मशिनी विकत घेतल्या, त्या सुद्धा कोणत्यातरी दुसऱ्या भांडवलदाराने आपल्या कारखान्यात बनवल्या होत्या. या मशिनी सुद्धा आमच्या सारख्याच इतर कामगार-कष्टकऱ्यांनी बनवल्या होत्या आणि बाजारात इतर भांडवलदारांना विकल्या होत्या. या मशिनी बनवणाऱ्या भांडवलदाराकडे भांडवल कसे आले, याची चर्चा आपण वर केलीच आहे: त्याच्या बापाकडून (आणि सर्वात पहिल्या बापाने इतर कष्टकऱ्यांना लुटून हे भांडवल एकत्र केले होते!), किंवा बॅंकेकडून कर्जरुपात किंवा शेअर बाजारातून . त्यामुळे समाजामध्ये जे काही उत्पादित होत आहे, जी काही उत्पादनाची साधनं आहेत, ती खरेतर श्रमातून निर्माण झालेली आहेत आणि त्यांना श्रमाचेच उत्पादन म्हटले गेले पाहिजे. पण या उत्पादनाच्या साधनांवर आणि भांडवलावर तर भांडवलदारांची मालकी असते. जे कामगार आहेत, त्यांच्याकडे उत्पादनाची साधनं नसतात, आणि त्यांना जिवंत राहण्यासाठी आपली श्रमशक्ती विकावीच लागते. पण याचा अर्थ तुम्ही असा तर नाही लावू लागलात ना की उत्पादनाच्या साधनांचं समाजीकरण झालं पाहिजे? बघा, तुम्ही परत जरा जास्तच करायला लागलात! असा विचार करायची हिंमत करू नका!
सर्व मालांचे, मग ती उत्पादनाची साधनं असोत किंवा उपभोग्य वस्तू, एक मूल्य असते. या मुल्यामध्ये काय सामील आहे? दोन गोष्टी: पहिली म्हणजे या मालांच्या उत्पादनामध्ये खर्च झालेली उत्पादनाची साधनं म्हणजे कच्चा माल आणि मशिन, कारखान्याची वास्तू इत्यादीचा घसारा. या सर्व वस्तू पूर्वी केलेल्या श्रमाचाच परिणाम आहेत. दुसरी म्हणजे कामगारांनी श्रमातून निर्माण केलेले नवीन मूल्य. म्हणजे पहिले आहे ते भूतकाळातील श्रम, ज्याला आपण ‘मृत श्रम’ म्हणू शकतो कारण ते बनलेल्या वस्तूच्या रुपात समोर आहे आणि त्याची विक्री झालेली आहे आणि दुसरे आहे ते जिवंत श्रम जे उत्पादन साधनांवर काम करून नवीन मूल्य निर्माण करत आहे आणि उत्पादन साधनांच्या मूल्याला संरक्षित करून नवीन मालामध्ये स्थानांतरित सुद्धा करत आहे. जर मशिनं नुसतीच पडून राहिली, तर झिजतील आणि त्यांचे मूल्य संपून जाईल. कामगारांची मेहनतच मशिनींना कामात लावते आणि या प्रक्रियेत त्यांचे मूल्य सुध्दा संरक्षित करते आणि तुकड्या-तुकड्यांमध्ये (जसे मशिन) किंवा एकसाथ (जसे कच्चा माल) नवीन मालामध्ये स्थानांतरित करते. याप्रकारे नवीन मालामध्ये उत्पादन साधनांचे मूल्य आणि कामगाराद्वारे निर्माण झालेले नवीन मूल्य सामील असते.
आम्ही कामगारांनी निर्माण केलेल्या नवीन मुल्यामध्ये काय सामील आहे? मजुरीएवढे मूल्य आणि मालकाचा नफा! कामगार सुरुवातीचे काही तास तर त्याला मिळणाऱ्या मजुरीइतके मूल्य निर्माण करतो आणि नंतर तो त्याच्या वर अतिरिक्त मूल्य निर्माण करतो. या अतिरिक्त मुल्याच्या बदल्यामध्ये त्याला काही मिळत नाही. त्याला तर फक्त मजुरी मिळते जी त्याला आणि त्याच्या परिवाराला जगण्यासाठी आवश्यक वस्तूंच्या किमतीवर आधारित असते. हेच अतिरिक्त मूल्य मालकाचा नफा असतो. पण आम्हाला जी मजुरी मिळते, तिच्या इतके मूल्य सुद्धा आम्हीच मालकाला निर्माण करून दिले आहे, म्हणजे आमची मजुरी सुद्धा आम्हीच निर्माण करतो आणि मालकाचा नफा सुद्धा ! म्हणजे मालक आम्हाला पोसत नाहीये, तर आम्ही मालकाला पोसायला बाध्य आहोत. का? कारण उत्पादनाच्या साधनांवर मालकाची मालकी आहे, जरी ती साधनं सुद्धा आमच्याच वर्गाने निर्माण केली आहेत. ही गोष्ट लपून का जाते आणि सरळ पद्धतीने समजत का नाही की आम्हीच नफा निर्माण करतो आणि आम्हीच सगळ्या मुल्याचे सर्जक आहोत, जे संपदेचा मोठा हिस्सा आहे? कारण भांडवलशाही येण्यासोबतच मेहनतीची लूट म्हणजे श्रमाच्या शोषणाने एक नवीन रुप धारण केले. अगोदरच्या सामंती काळामध्ये भूदास-शेतकरी आठवड्यातले तीन दिवस स्वत:च्या जमिनीवर काम करायचा ज्यातून त्याला जगण्याइतकं मिळायचं आणि बाकी चार दिवस तो जमिनदाराच्या जमिनीवर बेगार करायचा. पहिले तीन दिवस स्वत:च्या शेतावर केलेले श्रम हे आवश्यक श्रम होते कारण त्यातूनच तो जगायचा, आणि जमिनदाराकडे केलेले चार दिवसाची बेगारी हे अतिरिक्त श्रम होते ज्यातून जमिनदार जगायचा (आणि ऐश करायचा!). भांडवलशाहीच्या अगोदरच्या सर्व व्यवस्थांमध्ये आवश्यक श्रम आणि अतिरिक्त श्रमामध्ये वेळ आणि जागेचा फरक दिसून येत होता, ज्यामुळे दिसून येत होते की शोषक वर्ग कष्टकऱ्यांच्या श्रमावर जगत होता. जसे वरच्या उदाहरणात स्पष्ट दिसून येते की भूदास किंवा अवलंबून असलेला शेतकरी हे किती दिवस आणि कुठे स्वत:साठी काम करायचे आणि किती दिवस आणि कुठे सामंती जमिनदारासाठी काम करायचे. पण भांडवलशाही मध्ये असे होत नाही. सगळे काम एकाच जागी आणि एकाच कालावधीमध्ये केले जाते. कामगार आता एकाच जागी 8 ते 12 तास मजुरी करतो. त्याची श्रम शक्ती (म्हणजे कष्ट करण्याची त्याची क्षमता) स्वत: एक माल बनते आणि त्याची किंमत यावरून ठरते की या श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाची गुंतवणूक किती असेल, म्हणजे कामगार आणि त्याच्या परिवाराच्या उपजीविकेवर होणारा सरासरी खर्चच मजुरी ठरवतो. अशामध्ये होऊ शकते की कामगार 8 तासांपैकी 3 तासामध्येच इतके मूल्य निर्माण करतो जे त्याच्या जिविकोपार्जनासाठी आवश्यक आहे, आणि बाकी श्रमकाळामध्ये तो भांडवलदारसाठी काम करतो. म्हणजे आवश्यक श्रमकाळ आणि अतिरिक्त श्रमकाळ आता एकाच अखंड श्रमकाळाचा हिस्सा बनले आहेत आणि श्रमशक्ती सुद्धा एक माल बनली आहे. श्रमशक्ती माल यामुळे बनते कारण की प्रत्यक्ष उत्पादकाला त्याच्या उत्पादन साधनांपासून वंचित केले जाते, आणि त्याच्या सर्व उप्तादन साधनाचा एकाधिकार भांडवलदार वर्गाच्या हातात येतो. म्हणजे कामगार आता जिवंत राहण्यासाठी आपली श्रमशक्ती विकायला बाध्य असतो. एकदा कामगाराने आपली श्रमशक्ती भांडवलदाराला विकली की त्याच्या पूर्ण कार्यदिवसावर भांडवलदाराचा अधिकार असतो, कारण भांडवलदार उत्पादन साधनांचा स्वामी असतो. अशामध्ये कामगार जे मूल्य निर्माण करतो, त्याला तो श्रमाचे उत्पादन म्हणून न दाखवता, भांडवलाचे उत्पादन म्हणून दाखवतो. त्यामुळे असे वाटते की संपदेचे निर्माण भांडवल करत आहे, कारण उत्पादन साधनांवर आणि श्रम शक्तीवर भांडवलाचा अधिकार आहे. पण सत्य हे आहे की सगळ्या मुल्याचे उत्पादन आणि यामुळेच संपदे च्या मोठ्या हिश्श्याचे उत्पादन आपण कामगार—कष्टकरी करत असतो.
असो. मजुरी, वेतन काय आहे, याला थोडं खोलात समजावं लागेल. भांडवलदारांच्या दृष्टीने मजुरी म्हणजे ‘एका दिवसाच्या कामाचे मोल‘ असते. पण जर आम्ही जितके मूल्य निर्माण करतो, ते जर आम्हाला पूर्ण मिळत असते, तर मग मालकांचा नफा कुठून येतो? मालक म्हणतात की बाजारामध्ये ते मालाला त्याच्या मूल्यापेक्षा जास्त भावाने विकून नफा कमावतात. तर मग, विकणाऱ्याचा लाभ म्हणजे विकत घेणाऱ्याचे नुकसान असले पाहिजे, आणि जर पूर्ण समाजात भांडवलदार वर्ग अशाप्रकारे जास्त मूल्यावर नफा कमावेल, तर जेवढा लाभ विकणाऱ्यांना होईल, तेवढेच नुकसान घेणाऱ्यांना होईल, म्हणजे एकूण लाभ = एकूण हानी ! पण मग समाजातील संपदा तर नाही वाढली ना ! फक्त एकाचा लाभ हे दुसऱ्याचे नुकसान झाले. पण आम्हाला माहित आहे की प्रधानमंत्री मोदींची ही गोष्ट तर खरी आहे की समाजामध्ये सतत संपदा निर्माण होत आहे आणि वाढत आहे. म्हणजे जर संपूर्ण समाजाच्या स्तरावर संपदा वाढत आहे, तर मग मालकांचा नफा ते म्हणतात तसा वाढत नाहीये, म्हणजे मालाला मूल्यापेक्षा जास्त किमतीला विकून वाढत नाहिये, तर या नफ्याचा स्त्रोत काही वेगळाच आहे. माल तर त्याच्या किमतीलाच विकला जात आहे. खरेतर, संपूर्ण भांडवलदार वर्ग आपल्या सगळ्या मालाला त्याच्या मूल्यावरच विकतो, परंतु अनेक कारणांमुळे (उदा. मागणी-पुरवठा, परंतु ज्याची सविस्तर चर्चा इथे करणे शक्य नाही) वेगवेगळ्या मालांचे मूल्य त्यांच्या बाजारातील किमतीच्या खाली किंवा वर असू शकते. सध्या इतके समजणे पुरेसे राहिल की सामाजिक स्तरावर सर्व मालांचे एकूण मूल्य नेहमीच सर्व मालांच्या एकूण किमतीएवढे असते. पण इतके स्पष्ट आहे की नफा बाजारामध्ये मालाला जास्त किमतीला विकून येत नाही. उलट कामगार आपल्या मेहनतीतून आपली मजुरी सुद्धा निर्माण करतो आणि भांडवलदाराचा नफा सुद्धा. नाहीतर संपूर्ण भांडवलदार वर्गाला मिळून ना काही नफा झाला असता आणि ना समाजामध्ये भांडवल आणि संपदे मध्ये काही वाढ झाली असती. कामगार जे नवीन मूल्य निर्माण करतो, ते त्याची मजुरी आणि भांडवलदाराच्या नफ्याएवढे असते.
मग मजुरी कशी ठरते? जसे की आम्ही वर सांगितले, आपली मजुरी खरेतर सरासरी आपल्या आणि आपल्या परिवाराच्या निर्वाहासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंच्या किमतीएवढी असते; म्हणजे आपण जिवंत राहू शकू, कामगारांचा अंश वाढवू शकू आणि पिढ्यानपिढ्या भांडवलदारांसाठी नफा निर्माण करु शकू, यासाठी आम्हाला आणि आमच्या परिवाराला फक्त जगण्याचा खुराक! हीच असते आमची मजुरी ! ती अनेकदा या किमान पातळीच्या खाली आणि वर जाऊ शकते, कारण सामाजिक स्तरावर बेरोजगारी मुळे आम्हा मजुरांमध्ये सुद्धा भांडवलदार वर्ग स्पर्धा लावत असतो. ज्यामुळे उत्पादनाच्या एखाद्या क्षेत्रात कधी मजुरी सरासरीच्या वर असते तर दुसऱ्या क्षेत्रात सरासरीच्या खाली असू शकते. पण हे चढ-उतार झाले तरी मजुरी या सरासरीच्याच खालीवर फिरते. थोडक्यात सांगायचे तर, भांडवलदार/मालक/ठेकेदार आम्हाला पोसत नाहियेत तर आम्ही त्यांना पोसत आहोत, त्यांना खाऊ घालत आहोत आणि त्यांच्या आणि त्यांच्या औलादींच्या ऐयाशीची किंमत चुकवत आहोत. तर काय झाले? याच अर्थ असा थोडीच आहे की आम्ही प्रधानमंत्री मोदींच न ऐकावं आणि या भांडवलदार, धनदांडग्यांना संशयाच्या नजरेने पहावे, त्यांच्या नफ्यावर प्रश्न उपस्थित करावेत, त्यांच्या ऐयाशीवर बोटं ठेवावीत! आणि असा विचार तर आम्ही बिलकुलच केला नाही पाहिजे की जर सगळं काही आम्हीच मिळून निर्माण करतो, जर आम्हीच भांडवलदार वर्गाला पोसत आहोत, जे स्वत: काहीच करत नाहीत, तर मग आम्हीच सर्व कारखाने, खाणी, शेतांवर कब्जा केला पाहिजे! हे तर अतीच होईल ! त्यामुळे असा अजिबात विचार करू नका!
आता या प्रश्नावर येऊयात की संपदा कशाला म्हणतात? मूल्य हीच संपदा आहे का, जी मानवाद्वारे निर्माण होते? नाही! हे तर खरे आहे की सर्व संपदेचे दोन स्त्रोत आहेत: निसर्ग आणि मेहनत. निसर्गावर तर सर्वांचा समान अधिकार आहे. तो कोणत्याही व्यक्तीने किंंवा व्यक्तींनी निर्माण केला नाही, उलट सर्व मनुष्यांना समानतेमध्ये मिळाला होता. पण मुल्याचा एकच स्त्रोत आहे: मेहनत! कारण मूल्य म्हणजे काही नाही तर वस्तूमध्ये समाविष्ट आणि एकरूप झालेले श्रम आहे, अजून काहीच नाही. पण संपदेमध्ये सर्व उत्पादित वस्तूंसोबतच नैसर्गिक वस्तू सुद्धा येतात. संपदेच्या नैसर्गिक रुपांवर तर भांडवलदारांच्या तर्कानुसार कोणतीच खाजगी संपत्ती नसली पाहिजे. उदाहरणासाठी, जमिनीवरच्या कोणत्याही प्रकारच्या खाजगी संपत्तीला लगेच समाप्त केले पाहिजे, कारण हा तर सर्वात अश्लिल प्रकारचा अन्याय आहे की जमिनीवर काही जमिनमालकांचा कब्जा असेल. निसर्गाच्या सर्व निर्मितीवर सर्वांचा समाईक अधिकार असला पाहिजे. पण फक्त निसर्गाने दिलेल्याच नाही तर सर्व मेहनतीतून निर्माण गोष्टींवरही सर्वांचा समाईक अधिकार असला पाहिजे कारण आज प्रत्येक वस्तू च्या उत्पादनामध्ये सामाजिक आणि सामुहिक श्रम लागलेलं आहे. एका कामगार सुद्धा कोणत्याही वस्तू किंवा मालाबद्दल बोलू शकत नाही की “हे माझे आहे.” ते युगच गेले जेव्हा कोणताही उत्पादक असे म्हणू शकला असता. आणि ज्या काळात एखादा उत्पादक हे म्हणू शकत होता की ते त्याचे आहे, तेव्हा सुद्धा त्याला जिवंत राहण्यासाठी इतर अनेक वस्तूंची गरज पडत होती, जिच्यासाठी तो दुसऱ्या उत्पादकांवर अवलंबून होता; म्हणजे तेव्हा सुद्धा त्याचे सामाजिक आणि भौतिक अस्तित्व सामाजिक श्रमावर अवलंबून होते. पण भांडवलाच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे तर सर्व उत्पादनाने सरळ–सरळ सामाजिक चरित्र धारण केले आहे आणि कोणत्याही एका माल किंवा वस्तूबद्दल कोणी म्हणू शकत नाही की ती त्याच्या एकट्याच्या श्रमाचे उत्पादन आहे.
आता खऱ्या अर्थाने पाहिले तर आपल्या प्रधानमंत्री महोदयांचे बिचारे गुजराती भांडवलदार मित्र वास्तवामध्ये संपदेचे उत्पादन करत नाहीत, उलट तिला हडप करतात, तिचे खाजगीकरण करतात. श्रमाच्या उत्पादनावर भांडवलदार वर्गाचे नियंत्रण असते कारण उत्पादनाच्या साधनांवर त्यांचा एकाधिकार आहे आणि यामुळेच कामगाराची श्रमशक्ती सुद्धा एका मालामध्ये रुपांतरित होते ज्याचे भांडवलदार वर्ग शोषण करतो. पण श्रमशक्ती हा एक वेगळ्या प्रकारचा माल आहे जो स्वत:च्या मुल्यापेक्षाही अधिक मुल्याचे उत्पादन करू शकतो कारण श्रमशक्तीची सक्रियता हेच श्रम आहे आणि श्रम हेच मूल्याचे सारतत्व आहे. भांडवलदार वर्ग आपल्या भांडवलाच्या जोरावर नैसर्गिक संपदेचे खाजगीकरण तर करतो आणि जरी जमीन आणि इतर नैसर्गिक संसाधनांचे कोणतेही मूल्य नसते, पण खाजगी संपत्ती बनवले गेल्यामुळे त्यांचीही बाजारात किंमत नक्क्कीच असते. म्हणजे संपदेच्या या दोन्ही स्त्रोतांवर भांडवलदार वर्गाचा अधिकार असतो, जरी त्यांना निर्माण करण्यात त्याचे काहीही योगदान नाही.
म्हणजे थोडक्यात हे की निसर्गाशिवाय देशातील धन-दौलत आणि संपदेचे उप्तादक भारतातील आपण कोट्यवधी कामगार आहोत, पण तरीही आम्हाला उपासमार, गरिबी आणि अनिश्चिततेमध्ये जगावे लागते, जेव्हा की भांडवलदार वर्ग, म्हणजे प्रधानमंत्र्यांचे मित्रगण, या सर्व संपदेच्या सृजनात आणि देश चालवण्यात तितकेच अनुपयोगी आणि बेकार आहेत जितके की स्वत: प्रधानमंत्री मोदी ! सामाजिक रुपाने फालतू झालेल्या या भांडवलदार वर्गाला, सामाजिक रुपाने फालतू झालेला त्यांचा प्रमुख पुढारी संशयाने न पहावे म्हणून भावनिक आवाहन करत आहे. हा तर सगळाच मामला संशयास्पद दिसत आहे!
पण तुम्ही या सगळ्या गोष्टींमधून असा अर्थ तर नाही काढत ना की संपदेचे खरे उत्पादक, निसर्गासहित, आपण कष्टकरी लोक आहोत तर यावर आपला सामुहिक अधिकार असला पाहिजे? तुम्ही हा तर विचार करत नाही आहात ना की परजीवी मालक/ठेकेदारांपासून उत्पादनाची साधनं हिसकावून घेतली पाहिजेत? तुम्ही असा तर विचार नाही करत आहात ना की खाजगी संपत्तीची व्यवस्थाच अन्यायपूर्ण आहे आणि सर्व संपदेला सामाजिक संपत्ती बनवले पाहिजे? तुम्ही या पर्यायावर तर विचार करत नाही ना की उत्पादन, राज्यकारभार आणि समाजाच्या संरचनेवर उत्पादन करणाऱ्या वर्गांचा अधिकार असला पाहिजे आणि निर्णय घेण्याची शक्ती त्यांच्या हातामध्ये असली पाहिजे? काय भयंकर विचार करत आहात तुम्ही? तुम्हाला आपल्या “लाडक्या” मालकांची सेवा करणाऱ्या पोलिस आणि फौजेची भिती वाटत नाही का, की तुम्ही सक्ती करण्याबद्दल विचार करू लागलात? काय म्हणालात, की पोलिस आणि सेनेमध्ये सुद्धा सामान्य जवान तर कामगार आणि गरिब शेतकऱ्यांच्याच घरातून भरती झाले आहेत आणि ते सुद्धा अधिकाऱ्यांद्वारे शोषित-उत्पीडीत आहेत? आता तर तुमच्या बोलण्यातून एकदम देशद्रोहाची दुर्गंध येऊ लागली आहे! काय म्हणालात! देश कागदावर बनलेला नकाशा नसतो, तर त्यामध्ये राहणाऱ्या कष्टकरी आणि कामगारांनी बनतो? आता तर तुम्ही एकदम देशद्रोहीच झालात! प्रधानमंत्री मोदींच्या मते तर अंबानी-अडानींचा नफाच खरी “भारत माता” आहे आणि त्यांच्या नफ्याची भक्तीच खरी “देशभक्ती” आहे! ते काहीच निर्माण करत नाहीत आणि तुमच्या मेहनतीवर ऐशोआराम आणि ऐयाशीचे जीवन जगतात म्हणून काय झाले? तुम्ही कामगार आणि कष्टकरी सुई पासून ते विमानापर्यंत सर्व बनवता आणि तरीही गरिबी आणि उपासमारीत राहता म्हणून काय झाले? सर्व संपदेचे निर्माण तुमचे श्रम आणि निसर्ग करतो म्हणून काय झाले? कायदा म्हणतो की भांडवलदारच सर्व उत्पादन साधनांचे मालक आहेत, त्यामुळे तुम्ही बेकायदेशीर बोलू शकत नाही! काय म्हटले? कायदा माणसाला बनवत नाही, माणूस कायदा बनवतो? की स्वातंत्र्याचा लढा सुद्धा इंग्रजांसाठी बेकायदेशीर होता, अश्वेत लोकांचे आंदोलन सुद्धा अमेरिकन भांडवलदार वर्गासाठी बेकायदेशीर होते, फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा सामंतांच्या कायद्यासाठी बेकायदेशीर होती, रशियन क्रांती सुद्धा झार आणि भांडवलदार वर्गासाठी बेकायदेशीर होती? तर तुम्ही यातून काय निष्कर्ष काढत आहात? की आपल्या देशामध्ये सुद्धा राजकीय, आर्थिक, सामाजिक क्रांती घडवावी लागेल ? आता तर तुम्ही एकदम कम्युनिस्टांसारखे बोलू लागलात! चुकून हीच गोष्ट तर योग्य नाही ना?