कविता – 99 बार तुटतो पेन
संदीप सकट
उभा होतो आरोपीच्या पिंजऱ्यात
शिक्का होता माथी चोरीचा
जज न विचारलं कबुल का?
सांगितलं होतं हा म्हणायच !
मग रंगली कागदं
सावध झाले काळे लुटायला
खादीवाले बेड्या ठोकायला
खटला सुरू
गुन्हा माझा पोटासाठी
म्हणे, तू गॅस चोरला
वडे तळले, विकले
नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास,
कलम — !
आरोपी नंबर – 99!
माझ्या जीवनाचा ऱ्हास, कोर्टाच्या बाहेर
पिढ्यांचा ऱ्हास इतिहासा बाहेर
माझं जगणं-मरणं संविधाना-बाहेर
शिक्षण नाही, हाताला काम नाही
जगण्याची वणवण, जीवाची तडफड
कायद्यात बसत नाही
माझं तोंड कैचीत
कुटुंबाच्या, उपासमारीच्या
कावळा, कावकाव
टोपड्या कोल्हा गोष्ट ऐकतो
खादी माकड दाराबाहेर
फैसला-फैसला, टाका आत
केस बंद, पेन तुटला
99 बार तुटतो पेन
99 च्या विरोधात
99 टक्के आत
उरलेले 1 टक्का फिर्यादी
जेलपण तुमचंच,
पोलिसपण तुमचेच
कायदा आणि जजपण तुमचाच
पण विसरू नका हे तुरूंग
आमच्याच हातानी बांधलेत !