अहमदनगर मध्ये फी वाढी विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

 बिगुल पत्रकार

कॉलेज सुरू होत नाही तेच, अहमदनगर येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील मास कम्युनिकेशन व बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना फी वाढीचा चांगलाच मोठा फटका बसल्याचे दिसून आले. या फी वाढी विरोधात दिशा विद्यार्थी संघटनेच्या साथीने आंदोलन छेडले आहे.

मास कम्युनिकेशन विभागाची पूर्वीची प्रथम वर्षाची खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी 31225 रुपये होती, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी (एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., एन. टी.) 5175 रुपये होती, द्वितीय वर्षाची खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी 27225 रुपये होती, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी 625 रुपये होती. फी वाढीनंतर प्रथम वर्षाची खुल्या प्रवर्गाची फी 31425 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गाची फी 5175 रुपयां वरून 19085 रुपये झाली आणि द्वितीय वर्षाची खुल्या प्रवर्गाची फी 27475 रुपये, मागासवर्गीय़ विद्यार्थ्यांची फी 625 रुपयां वरून 14035 रुपये झाली. बायोटेक्नॉलॉजी विभागाची एम.एस्सी प्रथम वर्षाची फी 5135 रुपयां वरून 27800 झाली आणि एम.एस्सी द्वितीय वर्षाची फी 680 रुपयां वरून 22,735 रुपये झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फी मध्ये वाढ झाल्याची बातमी ही विद्यार्थ्यांना एंट्रन्स झाल्यानंतर माहीत झाली. एवढी फी भरण्यासाठी पैसेच नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर प्रवेश घ्यावा की नाही, कर्ज काढून पैसे गोळा करावे लागणार असे अनेक प्रश्न उभे राहिले.

मास कम्युनिकेशन आणि बायोटेक्नॉलॉजी या दोन्ही विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत या अन्यायाविरुद्ध एकजूट होऊन आवाज उठवायचे ठरवले. बायोटेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांनी फी का वाढली याची चौकशी करण्यासाठी कॉलेज कडे फी स्ट्रक्चर मागितले परंतु प्राचार्यांनी फी स्ट्रक्चर देण्यासाठी नकार दिला. यानंतर मास कम्युनिकेशन च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला व त्यांनी विद्यार्थ्यांना एकत्र करायला सुरुवात केली. या आंदोलनाला साथ देत दिशा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मिळून दोन्ही विषयांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एकत्र केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मिळून विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालय, पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र, आणि शासनाचा समाज कल्याण विभाग या तिन्हींना फी वाढीबाबत 21 जुलै रोजी निवेदन दिले. विद्यार्थ्यांनी निवेदनामध्ये फी पूर्ववत करा नाहीतर विद्यार्थी 29 जुलैला पुणे उपकेंद्राला टाळे ठोकतील असा इशारा दिला. निवेदन द्यायला गेल्यानंतर *महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की यामध्ये महाविद्यालयाचा काही संबंध नाही आणि चूक समाज कल्याण व विद्यापीठ यांची आहे; पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रावर निवेदन द्यायला गेल्यानंतर तेथील संचालकांनी सांगितले की कॉलेज कडून जेवढी माहिती मिळाली त्यानुसार फी चे मॅपिंग झाले त्यामुळे यामध्ये विद्यापीठाचा काही संबंध नाही, हा सर्व समाज कल्याण व महाविद्यालयाचा घोटाळा आहे; त्यानंतर विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाला निवेदन दिले समाज कल्याण विभागाचे आयुक्तांनी सांगितले की आम्हाला मॅपिंग नुसार जेवढे पैसे येतात तेव्हा आम्ही कॉलेजला वर्ग करत असतो त्यामुळे समाज कल्याणचा यामध्ये काही संबंध नाही. अशा प्रकारे महाविद्यालय, पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र आणि समाज कल्याण विभाग हे तिघेही एकमेकांवर ढकलाढकली करण्याचे काम करत होते.

यानंतर दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी मिळून एक बैठक घेतली, एक समन्वयक कमिटी तयार केली ज्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, मास कम्युनिकेशन व दिशा विद्यार्थी संघटनेचे प्रत्येकी कार्यकर्ते सहभागी होते. बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आपल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपल्या कॉलेजमधील इतर शाखातील विद्यार्थ्यांनाही आंदोलनामध्ये सहभागी करून घ्यावे व त्यानंतर दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन घडलेला प्रकार सांगितला व आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

दोन दिवसांनंतर विद्यापीठ केंद्राद्वारे उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान चालूच होते. 27 जुलैला दिशा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालय, पुणे विद्यापीठ उपकेंद्र व समाज कल्याण विभाग यांना यांच्याकडे या प्रश्नावर लेखी उत्तराची मागणी केली व लेखी दिले नाही तर विद्यार्थी तीव्र स्वरूपात आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.विद्यार्थ्यांनी ठरवले की लेखी उत्तर मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवायचे. विद्यापीठ उपकेंद्राने दिशा विद्यार्थी संघटनेसोबत बोलणी केली, परंतु लेखी उत्तर काही दिले नाही. परिणामी विद्यार्थ्यांनी अगोदर ठरवल्याप्रमाणे 29 जुलै रोजीचे आंदोलन करण्याचे नक्की ठरवले.

सोमवार दिनांक 29 जुलै ठीक सकाळी दहा वाजता ठरलेल्या वेळेत सर्व मास कम्युनिकेशनचे व बायोटेक्नॉलॉजीचे विद्यार्थी व दिशा विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी ठरलेल्या रूट प्रमाणे कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. तिथून रॅलीला सुरुवात करून कॉलेज लायब्ररी,प्रिन्सिपल ऑफिस, रेसिडेन्शिअल हायस्कूल आणि मग उपकेंद्रावर असा मार्ग आखलेला होता. प्रवेशद्वारावर सर्वजण जमल्यानंतर घोषणा देण्यात आल्या. *”शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या मालकीचं” “फी वाढ रद्द करा” “आवाज दो, हम एक है!”* अशा प्रकारे घोषणा देण्यात आल्या. नंतर विद्यार्थ्यांना आवाहन करणारे *”आरे नौजवान”* हे क्रांतिकारक गाणे दिशा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गायले. यानंतर घोषणा देत रॅली कॉलेज लायब्ररी जवळ आली, तेथेही घोषणा व गाणे झाले. त्यानंतर रॅली घोषणा देत प्रिन्सिपल ऑफिस समोरून उपकेंद्रा जवळ गेली. प्रवेशद्वारा पासून ते उपकेंद्राजवळ जाईपर्यंत अनेक विभागांमधील विद्यार्थी रॅलीमध्ये सामील होत गेले. उपकेंद्रा जवळ खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

पुणे उपकेंद्रा जवळ घोषणा व पुन्हा क्रांतिकारक् गीत प्रस्तुत झाले. त्यानंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या इतर विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला व पाठिंबा दिला. यानंतर दिशा विद्यार्थी संघटनेच्या वतीने साथी अतुल यांनी मांडणी केली की जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहिल. समन्वयक समिती मधील समाधान, क्रांती, भरत, अविनाश, अपेक्षा यांनीही निषेध व्यक्त केला व जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असे सर्व जण एक मतावर ठाम राहिले. हे निषेध आंदोलन सुरू असतानाच महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एच. झावरे, पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे संचालक श्री. सोमवंशी, तसेच विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा.सागडे हे आंदोलनांमध्ये आले व विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की पूर्वी जेवढी फी होती तेवढ्याच फी मध्ये तुम्हाला प्रवेश देऊ. श्री सोमवंशींनी सांगितले की आम्ही विद्यापीठात तुमचा प्रस्ताव मांडू, परंतु विद्यार्थ्यांना त्यांच्या तोंडी बोलण्यावर विश्वास नव्हता. आज जर पूर्वीच्या फी मध्ये प्रवेश दिला व नंतर परीक्षेच्या ऐन वेळेस फी मागितली तर काय करणार हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडले. विद्यार्थ्यांनी लेखी आश्वासनाची मागणी केली. त्यावेळेस श्री.सोमवंशी यांचे म्हणणे आले की हा आमचा अधिकार नाही. कोणीही लेखी आश्वासन न दिल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व लेखी देई पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला. पाऊस चालू असताना देखील विद्यार्थी जागचे हलले नाहीत. काही वेळातच उपकेंद्र संचालक सोमवंशी यांनी समन्वय कमिटी मधील विद्यार्थ्यांना आत मध्ये चर्चेसाठी बोलावून घेतले, चर्चा केली की आपण पुण्याला विद्यापीठात जाऊन कुलगुरूं सोबत या विषयावर बैठक घेऊ आणि नंतर समितीने सर्व विद्यार्थ्यांपुढे हा प्रस्ताव मांडला. त्यावेळेस विद्यार्थी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यासाठी तयार झाले. सदर यानंतर ठरवण्यात आले की समितीतील दोन मुलं व दोन मुली पुण्याला कुलगुरूं सोबत होणाऱ्या बैठकीसाठी जातील. विद्यार्थ्यांनी त्यांना इशारा दिला की आम्ही आमचे आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करीत आहोत व आमच्या फीचा मुद्दा पूर्णपणे सुटला नाही तर आम्ही पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.

आंदोलन स्थगित झाल्यानंतर सिनेट सदस्य प्रा. सागडे यांनी दिशा विद्यार्थी संघटने सोबत संवाद साधला की पुणे विद्यापीठामध्ये जाण्याची तसदी न घेता, कॉलेजस्तरावरच प्रयत्न करून हा प्रश्न सोडवू. त्यानुसार 30 जुलै रोजी प्राचार्य बी. एच. झावरे यांच्यासोबत बैठकीत त्यांनी सांगितले की आम्ही पूर्ण दिवसभर मॅपिंग चेक केलं आणि विद्यापीठा सोबतही संपर्क केला आहे व त्यामध्ये दुरुस्ती करून घेणार आहोत, त्यासाठी दोन दिवस वेळ लागेल व तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या फी मध्येच प्रवेश घ्यावा आणि ज्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जास्त फी भरून प्रवेश घेतला होता त्यांची फी मागे दिली जाईल. यावर विद्यार्थ्यांनी लेखी आश्वासनाची मागणी केली.प्राचार्यांनी लेखी नोटीस काढून सदर आश्वासन विद्यार्थ्यांना दिले आहे.

विद्यापीठ, कॉलेज आणि समाज कल्याण विभागाच्या अशा अनुभवानंतर विद्यार्थी अजूनही मॅपिंग झाले का नाही याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत आणि विद्यार्थ्यांनी अजून प्रवेशही घेतलेला नाही. जर लवकर मॅपिंग झालं नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला आहे आणि आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या एकजुटीने सध्यातरी शिक्षण व्यवस्थेला माघार घ्यायला भाग पाडले आहे. येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांची एकता, आणि सतर्कता या आंदोलनाची पुढची दिशा ठरवेल.