कविता : भिकारी
मनबहकी लाल
भिकारी आले
नवयुगाचे मसीहा बनून
लोकांना अज्ञान, निरक्षरता आणि निर्धनतेपासून
मुक्ती देण्यासाठी
अद्भुत वक्तृत्व, लेखन-कौशल्य आणि संघटन क्षमतेने सज्ज
स्वस्थ-सुंदर-सुसंस्कृत भिकारी आले
आमच्या वस्तीमध्ये
आशिया-आफ्रिका-लॅटिन अमेरिकेच्या
तमाम गरिबांमध्ये
ज्याप्रकारे पोहचले ते यान व वाहनावर स्वार होऊन
त्याच प्रकारे आले ते आमच्यामध्ये
भीक, दया, समर्पण आणि भयाच्या संस्कृतीचे प्रचारक
जुन्या मिशनऱ्यांपेक्षा वेगळे होते ते,
तसे त्यांचे दातेही भिन्न होते
आपल्या पूर्वजांपेक्षा
वेगळे होते ते त्या सर्वोदयी याचकांपेक्षा
ज्यांच्या गांधीवादी बनियानीमध्ये पडून राहत होता
आणि आजही पडून राहतो
विदेशी अनुदानाचा नारा.
भिकाऱ्यांनी भिकेला नवी उंची दिली
जागतिकीकरणाच्या काळात
भिकेला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा दिली
भिकाऱ्यानी क्रांती आणि परिवर्तनाच्या
नव्या व्याख्या रचल्या…
भिकाऱ्याने म्हटलं-‘भुकेने तडफडून मरून जाल
जर संपूर्ण भाकर मागाल
आम्ही तुमच्यासाठी मागून आणत राहू
भाकरीचे छोटे-छोटे तुकडे,
तुम्ही ते खात जा
एक दिवस तुमच्या पोटात होईल
एक पूर्ण भाकर
नका करू गोष्टी सारे कारखाने
आणि कोळसा आणि खनिजे आणि
देशाच्या हुकुमतीवर ताबा मिळविण्याच्या,
असे प्रयत्न असफल झालेले आहेत.
आम्ही विचारतो व्याकूळ होऊन,
“शेवटी कुठवर चालेल याप्रकारे”
ते मान उचलून आम्हाला रोखतात,
“आम्ही एक अर्ज लिहित आहोत”
मग ते एक रिपोर्ट लिहितात,
मग चिंतन करतात,
मग दौरा करण्यास अन्य दिशेत
चालू लागतात
आम्ही जाणतो, भिकारी नाहीत ते
अपहरणकर्ते आहेत
परिवर्तनाच्या विचारांचे, स्वप्न आणि आशेचे.
हृदयाच्या उष्म्या-विरोधात सतत सक्रीय
थंडीच्या लाटा आहेत
हे भिकारी.
मूळ हिंदी कविता: दायित्वबोध
संपादित अनुवाद. मूळ अनुवाद साभार: अज्ञात