स्वतंत्र पत्रकारितेवर होत असलेल्या फॅसिस्ट हल्ल्यांविरोधात आवाज उठवा!

भारत (अनुवाद: राहुल)

गेल्या काही दिवसांमध्ये स्वतंत्र न्यूज चॅनेल्स (ऑनलाईन बातम्या देणारे चॅनेल्स) असलेल्या न्युजक्लिक आणि न्युजलॉंड्रीच्या कार्यालयांवर इन्कमटॅक्स विभागाने धाडी टाकल्या. म्हणायला तर इन्कमटॅक्स विभाग या न्यूज चॅनेल्सकडे “सर्व्हे” करायला गेला होता परंतु हा कोणता सर्व्हे होता ज्यात इन्कम टॅक्स विभागाने या संस्थांचा आर्थिक अहवाल घेण्याऐवजी तेथे काम करणाऱ्या लोकांचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले, त्यांची खाजगी माहिती गोळा केली? हे स्पष्ट आहे की इन्कम टॅक्स विभाग या चॅनेल्सचा आर्थिक अहवाल बनवण्यासाठी नाही तर तेथे काम करणाऱ्या लोकांना धमकावण्यासाठी आणि त्यांना गप्प बसवण्यासाठीच मोदी सरकारद्वारे तेथे पाठवला गेला होता. न्युजलॉंड्री वर 2014 मध्ये सुद्धा धाड टाकली गेली होती, आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये न्युजक्लिकवर छापा मारला गेला.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला तीव्र झाला आहे. सरकारी धोरणांवर टीका करणाऱ्या या न्यूज पोर्टल्सवर हल्ले वाढले आहेत. हे ध्यानात ठेवले पाहिजे की मोदी सरकार सत्तेवर आल्यावर लगेचच एन.डी.टी.व्ही.वर एक दिवसांची बंदी आली होती. गोदी मीडिया चॅनेल्स सोडले तर सर्व मीडिया संस्था आज मोदी सरकारच्या डोळ्यात खुपणारे कुसळ झाले आहेत. आज काही मोजके स्वतंत्र मीडिया चॅनेल आहेत जे युट्युब आणि इतर सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे धर्मवादी भगव्या टोळ्यांचे सत्य दाखवतात आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात.
भांडवली मीडिया, ज्याला तसे तर भांडवली लोकशाहीचा चौथा खांब म्हटले जाते, आज सर्वांसमोर नागडा पडला आहे. सध्याच्या काळात तर गोदी मीडिया फक्त खोट्या बातम्या देणे, अश्लिल जाहिराती, धर्मवादी-अंधराष्ट्रवादी उन्मादाचा खुराक देणारी यंत्रणा बनला आहे. वाढती बेरोजगारी, महागाई सारख्या मुद्यांना समोर येऊ न देण्यासाठी भाजप सरकार सतत सर्व न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रांचा वापर करून आपल्या फॅसिस्ट सांस्कृतिक राजकीय़ प्रचाराला वाढवण्याचे काम करत आहे. धर्मवाद, उन्माद, आणि अंधराष्ट्रवादाच्या प्रचाराद्वारे तो सामान्य जनतेच्या जीवनाच्या भौतिक आणि आर्थिक प्रश्नांना नजरेआड करत आहे. त्यांच्या या अजेंड्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक आवाजाला ते निशाणा बनवत आहेत.
सरकारचे विचारधारात्मक उपकरणच फक्त जनतेच्या चेतनेचे निर्माण करत नाही; जनतेच्या जीवनाच्या स्थिती सर्वात अगोदर आणि निर्णायकरित्या जनतेच्या चेतनेचे निर्माण करतात. अशामध्ये जनता शोषण आणि अत्याचारा विरोधातील आपल्या अनुभवांच्या चेतनेने सज्ज होते. नक्कीच, अशा चेतनेच्या आधारावर ती स्वयंस्फूर्त पद्धतीचेच आंदोलन करू शकते, क्रांती नाही. या विरोधाच्या चेतनेला एका क्रांतिकारी प्रचाराद्वारेच व्यवस्थित रूप दिले जाऊ शकते. इथेच पर्यायी मीडियाचे कार्यभार येतात. वैकल्पिक मीडियाचा कार्यभार आहे जनतेला अशी व्याख्यांची संरचना उपलब्ध करावी जी सरकारद्वारे वापरल्या जाणाऱ्या विचारधारातम्क उपकरणांद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याख्यांना नाकारू शकेल. आजच्या काळात जेव्हा देशातील जनता स्वतंत्र असूनही देशी-विदेशी भांडवलाच्या शोषणाची शिकार आहे, तेव्हा एका नव्या टोकापासून एका नव्या प्रकारच्या परिवर्तनकारी चेतनेला जन्माला घालणे गरजेचे आहे. याकरिता क्रांतिकारी विचारांनी सज्ज एका नव्या पर्यायी मीडियाची गरज आहे जो एकाप्रकारे अनुपस्थित आहे. त्यामुळे आज गरजेचे आहे की अशा सर्व घटनांचा जोरदार विरोध केला जावा. यासोबतच फॅसिस्टांच्या संपूर्ण सांस्कृतिक आणि राजकीय प्रचाराच्या मुळावर पावलोपावली हल्ले चढवावे लागतील आणि त्यांचे खरे चरित्र जनतेसमोर उघडे पाडावे लागेल. तेव्हाच फॅसिस्ट सरकारचे असे इरादे नेस्तनाबूत केले जाऊ शकतात.
भांडवलाच्या सेवेत आणि नफा कमावण्याच्या चढाओढीत गुंतलेल्या भांडवली मीडियाच्या वर्चस्वाच्या विरोधात एक पर्यायी क्रांतिकारी मीडीया उभे करण्याचे काम सुद्धा आपल्या समोर आहे. देशभरातील प्रगतिशील मीडिया संस्थांची मुख्य जबाबदारी ही आहे की आज त्यांना देशातील कामकरी जनतेशी जोडून घ्यावे लागेल, त्यांच्या समस्यांना तोंड फोडावे लागेल, तेव्हाच जाऊन या भांडवली मीडियाच्या घृणेच्या विषाच्या विरोधात जनतेच्या खऱ्या समस्या योग्य रूपात समोर येऊ लागतील आणि या फॅसिस्ट हल्ल्यांचे उत्तर आपण संघटितरित्या देऊ शकू.