क्रांतिकारी शहीद साथी प्रीतिलता वड्डेदारच्या शहादत दिनाच्या (23 सप्टेंबर) निमित्ताने …
प्रीति‍लता वड्डेदार :चटगाव विद्रोहाची अमर सेनानी

अनुवाद: अभिजित.

कोणत्याही व्यक्तीसाठी आपल्या देशाकरिता प्राण देण्याचा मार्ग निवडण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे: प्रेरणा, उर्मी किंवा स्पिरीट. कोणत्याही व्यक्तीच्या क्रांतिकारी बनण्यात अनेक गोष्टींचे महत्त्व असते, त्यांची पार्श्वभूमी, अभ्यास, जीवनाची समज, तसेच सामाजिक जीवनाच्या कक्षा आणि बाजू. परंतु या सर्व परिस्थिती असतील आणि प्रेरणा किंवा स्पिरीट नसेल तर कोणताही व्यक्ती क्रांतीच्या मार्गावर अग्रेसर होऊ शकत नाही. देशासाठी प्राण देण्याची उर्मी ती शक्ती आहे जी विविध पार्श्वभूमीतून आलेल्या क्रांतिकारकांना एकमेकांवर तसेच जनतेवर अगाध विश्वास आणि प्रेम देते. आजच्या तरुण पिढीला सुद्धा आपल्या पूर्वजांबद्दल आणि त्यांच्या क्रांतिकारी प्रेरणेबद्दल काहीतरी माहिती नक्कीच असली पाहिजे.
आजच्या युवकांच्या मोठ्या हिश्श्यापर्यंत तर शिक्षणाची पोहोचच नाहीये आणि ज्यांच्यापर्यंत पोहोच आहे त्यांचा एक मोठा हिस्सा करियर बनवण्याच्या उंदीर-शर्यतीत धावत आहे. एका विद्वानाने म्हटले होते की उंदीर-शर्यतीची सर्वात मोठी समस्या ही आहे की या शर्यतीत जिंकल्यावरही तो उंदीरच राहतो; थोडक्यात माणसासारखे जगण्याची चिकाटी आणि हिंमत त्यामध्ये निर्माण होतच नाही. तो जीवन जगण्याऐवजी आपले सारे जीवन, जीवन जगण्याच्या तयारीतच लावतो. नक्कीच याचे एक कारण आपला वसाहतिक गुलामीचा भूतकाळ सुद्धा आहे ज्यामध्ये दोनशे वर्षांच्या गुलामीने स्वतंत्र चिंतन आणि तर्कणेऐवजी आमच्या मेंदूला बौद्धिक गुलामीच्या बेड्यांमध्ये जखडून टाकले आहे. आजही आमचे युवक क्रांतिकारकांच्या जन्मदिनी वा शहादत दिनी ‘सोशल मीडीयावर’ फोटो टाकतात, पण या तरुण जनसमुदायाला बहुतेक करून क्रांतिकारी वारशाबद्दल काहीच माहित नसते किंवा अर्धवट माहिती असते. अशामध्ये सामाजिक परिवर्तनाच्या नियतकालिकांची जबाबदारी आहे की आजच्या युवकांना आपल्या गौरवशाली क्रांतिकारी वारशाचा परिचय द्यावा जेणेकरून ते येणाऱ्या काळात जनसंघर्षांमध्ये जनता आपल्या खऱ्या लोकनायकांपासून प्रेरणा घेऊ शकेल.
आज आम्ही अशाच एका क्रांतिकारक साथीचा जीवन परिचय देत आहोत जिने जनतेसाठीच्या संघर्षांमध्ये अत्यंत कमी वयात आपल्या प्राणांचे बलिदान दिले. प्रीतिलता वड्डेदारचा जन्म 5 मे 1911ला चटगाव येथे झाला. तिचे वडील जगतबंधू हे जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याच्या कार्यालयात मोठे कारकून होते आणि आई प्रतिभामयी या ‘महिला जागरण’ मध्ये कार्यरत होत्या. प्रीतिलता वड्डेदार अत्यंत प्रतिभाशाली युवती होती. 1930 मध्ये तिने ढाका कॉलेज मधून 12 वी पास केली आणि कॉलेजमध्ये पहिली आली. शालेच जीवनातच ती बालवीर संस्थेची सदस्य झाली होती. तिथे तिने सेवाभाव आणि शिस्तीचे धडे घेतले होते. बालवीर संस्थेच्या सदस्यांना ब्रिटीश सम्राटाप्रती एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागे. संस्थेचा हा नियम प्रीतिलतेला खटकत होता. तिच्या मनामध्ये बंडखोरीचे बीज येथूनच रूजले गेले. देशातील शेतकरी-कामगारांची दुर्दशा आणि त्यांचे इंग्रज सरकारद्वारे पाशवी शोषण, अत्याचार पाहून प्रीतिलतेच्या मनात काहूर उठले आणि तिने आपल्या प्रतिभेचा आणि क्षमतांचा वापर कारकीर्द घडवण्यासाठी नाही तर शौर्याने क्रांतिकारी मार्गावर चालण्यासाठी आणि जनतेच्या सेवेकरिता करणे योग्य समजले.
ती मास्टर सूर्यसेन यांच्या संपर्कात आली. मास्टर सूर्यसेन हे बंगालचे अग्रणी क्रांतिकारक होते. ते 1930 मध्ये झालेल्या चटगाव (आत्ताच्या बांग्लादेशामधील) शस्त्रागार छाप्याचे नेते होते. त्यांच्या छापामार पथकामध्ये अनेक युवक क्रांतिकारी सामील होते. मास्टर सूर्यसेन आणि त्यांचे छापामार पथक इंग्रजांवर हल्ले करून त्यांना जरब बसवू पहात होते आणि भारतातील युवकांना क्रांतिकरता जागवू पहात होते. सूर्यसेनच्या मागे सतत पोलिस हात धूवून लागले होते, त्यामूळे ते सतत लपत-छपत, पळापळीतच असत. त्यांना भेटणे जोखमीचे होते पण प्रीतिलता वेष बदलून त्यांना भेटायला जाई आणि त्यांचे आदेश संघटनेमध्ये लागू करवत असे. प्रीतिलतेने कॉलेज संपल्यावर आर्थिक तंगीमुळे शिक्षिकेची नोकरी सुद्धा केली आणि एका विद्वान शिक्षिकेच्या रूपात नावाजली गेली. शिक्षकी पेशातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा ती क्रांतिकारकांवर खर्च करत असे. 12 जून 1932 रोजी सूर्यसेन आपल्या साथीदारांसोबत गुप्त योजना बनवत असताना पोलिसांनी त्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू झाला. यामध्ये इंग्रज पोलिस कॅप्टन कॅमरान हा मारला गेला, अनेक क्रांतिकारक सुद्धा शहीद झाले पण मास्टर सूर्यसेन आणि प्रीतिलता पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर प्रीतिलता पोलिसांच्या नजरेत खुपू लागली. पोलिसांनी प्रीतिलतेची खबर देणाऱ्याला मागेल तेवढ्या बक्षिसाची घोषणा केली. ही बातमी वर्तमानपत्रांमध्ये छापली गेली तेव्हा तिच्या आई-वडिलांना ती क्रांतिकारक असल्याचे समजले. यानंतर क्रांतिकारकांमध्ये प्रीतिलतेचा सन्मान बराच वाढला. मास्टर सूर्यसेन यांना आपल्या युवक महिला साथीच्या हिंमतीचा अभिमान होता. त्यांच्या लक्षात आले होते की प्रीतिलताने आपले जीवन देशाला अर्पण केले आहे. ती इराद्याची पक्की होती आणि तिचे ध्यान नेहमीच उद्दिष्टावर असायचे. ती एक मजबूत आणि समर्पित कमांडर बनली.
चटगाव मध्ये युरोपियन क्लब होता. तिथे इंग्रज अधिकारी संध्याकाळी नाचगाण्यासाठी आणि मनोरंजनासाठी येत असत. सूर्यसेनने या क्लबला उध्वस्त करण्याची योजना बनवली कारण क्रांतिकारकांना आश्रय देणाऱ्या एका महिलेला इंग्रजांनी गोळ्या घातल्या होत्या. प्रीतिलतेला हल्ल्याचे नेतृत्त्व सोपवले गेले. तिने सैनिकी वेशभूषा धारण केली आणि पिस्तुल आणि बॉंब घेऊन सज्ज झाली. सूर्यसेन आणि प्रीतिलतेला माहित होते की झुंझ तगडी होईल आणि इंग्रजही भारी पडू शकतात. ते प्रीतिलतेला पकडून तिच्याकडून संघटनेची रहस्ये काढण्याकरिता प्रयत्न करू शकतात. प्रीतिलतेने सोबत एक विषाची पुडीही ठेवली होती. पोलिसांनी घेरल्यास विष घेऊन प्राण देण्याचा तिने निश्चय केला होता. प्रीतिलतेसोबत महेंद्र चौधरी, सुशिला डे, प्रफुल्ल दास, प्रभात बल, मनोरंजन सेन सारखे क्रांतिनायक होते. याशिवाय पासष्ट युवक आणि युवती सुद्धा क्रांतिदलामध्ये सामील होत्या.
योजनेनुसार प्रीतिलतेने युरोपियन क्लबवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये डझनभर इंग्रज अधिकारी जखमी झाले. एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सुद्धा कळले. प्रीतिलतेने हिंमतीने हल्ला केला. हल्ला इतका घातक होता की कोणालाही सावरण्याची संधीच मिळाली नाही. प्रीतिलतेचे सर्व लक्ष आपल्या लक्ष्यावर होते. ती एका कमांडरप्रमाणेच वागत होती. इंग्रज पोलिस आणि क्रांतिकारकांमध्ये अनेक तास गोळीबार चालला. शेवटी क्रांतिकारकांच्या गोळ्या संपल्या आणि इंग्रज शिपायांनी त्यांना मारणे चालू केले. बघता-बघता क्रांतिकारकांचे देह पडू लागले. प्रीतिलतेला सुद्धा पोलिसांनी घेरले. तिला हे समजायला वेळ लागला नाही की आता वाचणे अवघड आहे. थोडाही वेळ न गमावता तिने त्वरीत विष तोंडामध्ये टाकले, ‘इंकलाब जिंदाबाद’ चा नारा दिला आणि आपले प्राण त्यागले. प्रीतिलतेच्या बलिदानानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी तलाशी घेतल्यावर मिळालेल्या पत्रात लिहिलेले होते की “चटगाव शस्त्रागार हल्ल्यानंतर जो मार्ग अवलंबला जाईल, तो भावी विद्रोहाचे प्राथमिक रूप असेल. हा संघर्ष भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालूच राहिल.”

मुक्तिकामी छात्रों-युवाओं का आह्वान” ,मे-जून 2016 मधून साभार