काॅम्रेड नवकरणला ‘कामगार बिगुल’तर्फे लाल सलाम
आमचा प्रिय तरुण कॉम्रेड नवकरण आता आमच्यात नाही. पंजाबच्या या क्रांतिकारी कार्यकर्त्याने २३ जानेवारी रोजी मृत्यूला आलिंगन दिले. एका अत्यंत संवेदनशील, विवेकशील आणि क्रांतीच्या ध्येयाला सर्वस्वी समर्पित तरुणाने आत्महत्येचा दुःखद मार्ग निवडावा, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. आपल्या सोबत्यांसाठी जगणारा नवकरण आज त्यांनाच सोडून गेला आहे, यावर विश्वास बसत नाही. अशा प्रकारच्या घटना नेहमीच क्रांतिकारी आंदोलनासाठी मोठा आघात असतात. ही वाट किती कठीण आणि किती दीर्घ लांब पल्ल्याची आहे, याची नव्याने आठवण अशा घटना क्रांतिकारकांना करून देत असतात..
शेवटी क्रांतिकारकसुद्धा याच समाजातून येतात आणि आपल्या आत असलेल्या समाजाच्या जन्मचिन्हांसह क्रांतीकार्यात उतरत असतात. स्वतःच्या उणिवा, दोष यांच्याशी ते सतत संघर्ष करीत असतात आणि एक एक करून त्यांच्यावर मात करीत असतात. हा संघर्ष जीवनाच्या अंतापर्यंत संपत नाही. तो वेगवेगळी रूपे धारण करीत असतो. एका क्रांतिकारकासाठी हा संघर्ष त्याच्या मृत्यूपर्यंत सुरूच असतो. एक संघर्ष तो या व्यवस्थेच्या विरोधात चालवीत असतो, जेणेकरून एका अशा जगाची निर्मिती करता येईल जेथे अशा दोषांची बीजे असणार नाहीत जे एकूण समाजाबरोबरच त्या क्रांतिकारकामध्येसुद्धा असतात आणि ज्यांच्याशी तो सतत लढत असतो. बर्याचदा लोक क्रांतिकारकांना आदर्श बनवून त्यांच्याकडे पाहतात आणि समाजाने देऊ केलेल्या दोषांच्या वर ते आहेत असे मानतात. परंतु हे एका माणसाला देवत्त्व प्रदान करण्यासारखे नाही का? क्रांतिकारकसुद्धा एक माणूस असतो आणि त्याच्या आतसुद्धा वेगवेगळ्या प्रश्नांचे अखंड द्वंद्व सुरू असते. एका क्रांतिकारकाच्या आयुष्यातसुद्धा कित्येक वेळा निराशेचे टप्पे येत असतात हे खरे आहे. आयुष्याशी सतत चालणार्या स्वातंत्र्यप्रेमींच्या या झगड्यात नवकरण पराभूत झाला. नवकरण आता पुन्हा कधीच येणार नाही हे माहीत असूनही त्याच्या सोबत्यांच्या नजरा आज त्याला शोधत आहेत. परंतु यामुळे त्याचा निवाडा करण्याचा अधिकार कुणालाही मिळू शकत नाही. कम्युनिस्ट आंदोलनामध्ये पाल लफार्ग, इलियानोर मार्क्स (मार्क्सच्या कन्यांपैकी एक) फदयेव मायकोवस्की, वाल्टर बेंजामिन आणि कित्येक अज्ञातांनी आत्महत्येद्वारे आपल्या जीवनाचा अंत केला. ना त्यांची आत्महत्या म्हणजे त्यांचे विचार, त्यांची संघटना किंवा त्यांचे ध्येय याचा निवाडा होता, ना अन्य एखादी व्यक्ती या दुःखद निर्णयावरून त्यांचा निवाडा करू शकते. येथे प्रश्न तुलना करण्याचा नाही. मित्र नवकरण निर्विवादपणे आमचा एक धडाडीचा कार्यकर्ता होता, व त्याच्या जाण्याच्या धक्क्यातून आणि दुःखातून आम्ही अजून सावरू शकलेलो नाही.
नवकरण पंजाबमधील संगरूर येथे राहणारा. तीन वर्षांपूर्वी तो क्रांतिकारी चळवळीच्या संपर्कात आला. भगतसिंहांना त्याचा आदर्श होते. या व्यवस्थेच्या सर्व क्लेशदायक खुणा- गरीबी, शोषण, बहुसंख्य जनतेचे अगदी भकास जीवन- हे सारे त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिले होते, भोगले होते. चांदीचा चमचा मुखात घेऊन तो जन्माला येणाऱ्यापैकी तो नव्हता. जनतेच्या दुःखाची त्याला जाणीव होती. क्रांतिकारी आंदोलनाशी स्वतःला जोडून समाजातील सर्व समस्या वैज्ञानिक पद्धतीने समजून घेण्यास त्याने सुरूवात केली आणि एका नव्या जगाचे स्वप्न डोळ्यांमध्ये घेऊन त्याने या कार्यात स्वतःला मनोभावे झोकून दिले. आक्टोबर २०१३ मध्ये त्याने व्यावसायिक क्रांतिकारी कम्युनिस्ट कार्यकर्त्याचे जीवन अंगिकारले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या ध्येयासाठी खंबीरपणे काम करीत राहिला. नव्या गोष्टी शिकून घेणे आणि कठीण काम हाती घेणे हा तर त्याचा स्वभावच होता. काही काळासाठी तो नौजवान भारत सभेच्या लुधियाना युनिटचा संचालकही होता. त्याचबरोबर तो पंजाब स्टुडेंट्स युनियन (ललकार) च्या नेतृत्त्वकारी कमिटीचाही सहस्य होता. त्याच्यामुळे लुधियानामध्ये नौजवान भारत सभा आणि पंजाब स्टुडेंट्स युनियनच्या कामाला गती मिळाली. कामगार आघाडी असो, विद्यार्थी-युवक आघाडी असो, तो सर्वच आघाड्यांवर सारख्याच ताकदीने सक्रिय होता. सर्वत्र त्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. कामगार वस्त्यांमध्ये जाऊन प्रचार करणे, कामगारांच्या मुलांना शिकवणे, जनतेची वेगवेगळ्या मुद्द्यांवर एकजूट निर्माण करणे, वर्तमानपत्रे, पत्रिका, पुस्तके घेऊन क्रांतिकारी साहित्याचा प्रचार करणे, सर्वच कामांमध्ये तो बघता बघता पारंगत झाला. त्याचे भाषण श्रोत्यांना चेतविणारे होते. तो नियमित अभ्यास करायचा, व पंजाबी पत्रिका ललकारसाठी त्याने वेगवेगळ्या राजकीय सामाजिक मुद्द्यांवर लेखन करण्यासही सुरुवात केली होती. एका धुमकेतूप्रमाणे अल्प काळासाठी आपला प्रकाश विखरून तो आमच्यामधून निघून गेला.
त्याला गाण्याची आवड होती आणि त्याचा आवजही बुलंद होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तो गीते सादर करायचा, परंतु त्याच्या प्रतिभेचा खरा विलास सोबत्यांमध्ये अनौपचारिकपणे गाताना पाहायला मिळायचा. सर्वच त्याच्या सुरात सूर मिसळून गाऊ लागत. तो गिटार वाजवण्यासही शिकत होता. संगीत आणि कलेचे महत्त्व त्याला ठाऊक होते, म्हणूनच अत्यंत लाजरा असूनसुद्धा तो गाण्याची वेळ येताच अगदी मोकळेपणाने गात असे. मंचावरून तो पाशच्या कवितांचे पठण करी तेव्हा जोशाने श्रोत्यांच्या मुठी आवळल्या जात. तो चांगला अनुवादकसुद्धा होता आणि इंग्रजीतून पंजाबीत जलत अनुवाद करायचा. अलीकडेच त्याने स्तालिन यांच्या संघटनेसंबंधी या पुस्तिकेचा इंग्रजीतून पंजाबीत अनुवाद केला होता, अन्य दोन तीन पुस्तकांचे अनुवाद तो करीत होता.
नवकरणचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे त्याला श्रमाची आवड होती. जेवण बनवणे, साफसफाई करणे, कपढे धुणे, भांडी घासणे, ही कामे तर तो स्वतः करायचाच, शिवाय सामूहिक कामेसुद्धा तो निव्वळ कतर्व्यभावनेने नाही तर आनंदाने करायचा. आपल्या समाजात शारिरीक श्रमाला तुच्छ लेखले जाते, परंतु नवकरण शारीरिक श्रमाचे मोठेपण जाणून होता. तो अवश्य थकायचा, पण थकल्यामुळे गळून गेलेला कधी कुणी त्याला पाहिले नाही.
तो फार कमी बोलायचा, अंतर्मुख होता. आपल्या अडीअडचणी, समस्या यांच्याबद्दल उघडपणे कधी बोलत नसे. बराच आग्रह केल्यानंतरच सोबत्यांना काही गोष्टी कळायच्या. त्याच्या जवळच्या सोबत्यांच्या मते त्याच्या राजकीय जीवनामध्ये बऱ्याचदा निराशेचा काळ यायचा. बहुतेकदा आपल्या मनातील गोष्टी तो आपल्या सर्वांत जवळच्या मित्रांशीसुद्धा बोलून दाखवायचा नाही. त्याचा स्वभाव फारच बुजरा होता. कदाचित त्यामुळेच, त्याच्या मनात चाललेल्या ज्या वादळामुळे त्याने असा निर्णय घेतला त्याचा थांगपत्ता त्याच्या सोबत्यांनासुद्धा लागू शकला नाही. शेवटी, त्याच्या आठवणी तेवढ्या आता आमच्यापाशी मागे राहिल्या आहेत.
क्रांतीच्या वाटेवरुन चालणे हे अतिशय कठीण काम आहे, हे नाकारता येणार नाही. अशा वेळी कधीकधी निराश होणे, हीसुद्धा एक सामान्य बाब आहे. परंतु एक क्रांतिकारक अशा वेळी क्षणभर थांबतो आणि पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त ताकद आणि ऊर्जेसह आपल्या मार्गावर पुढे चालू लागतो. आपल्या आत अनेक दुःखांचे ओझे घेऊनसुद्धा तो चालत राहतो. तसे पाहता, बरेच लोक क्रांतिकारी आंदोलनात पडतात आणि काही दिवसांनंतर जेव्हा मार्ग खडतर वाटू लागतो तेव्हा ते हा मार्ग सोडून पुन्हा आपल्या खाजगी जीवनाकडे वळतात. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की आपले दोष झाकण्यासाठी ते चळवळीवर दोषारोप करू लागतात आणि पळ काढतात. नवकरण या दोन्ही प्रकारांपैकी नव्हता, हे महत्त्वाचे आहे. थकवा आणि निराशेने त्याला अवश्य जखडले होते, परंतु दुनियादार बनणे त्याच्या तारुण्याला पटले नाही. ज्या जीवनातून तो आला होता, तेथे पुन्हा जाणे त्याच्या मनाला पटले नाही. तसे जीवन त्याला मंजूर नव्हते. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत नवकरण लुटीवर उभ्या असलेल्या या व्यवस्थेचा तिरस्कार करीत राहिला. तिच्या विरोधात चाललेल्या संघर्षाकडे कानाडोळा करून घरी बसणे आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थांसाठी जगत राहणे, हा त्याचा मार्ग नव्हता.
त्याच्या जाण्याने क्रांतिकारी चळवळीवर मोठा आघात झाला आहे. ही कोणत्याही एका संघटनेची क्षती नाही तर एकूण क्रांतिकारी चळवळीची क्षती आहे. अशा जिंदादिल तरुणाला श्रद्धांजली अर्पण करून आज त्याने पाहिलेले स्वप्न डोळ्यांत घेऊन क्रांतीच्या खडतर मार्गावरून आपल्याला पुढे चालत जावे लागेल. ज्यांच्यामुळे आमचा प्रिय साथी नवकरण आज आमच्यामध्ये नाही ती कारणे कायमची नष्ट करावी लागतील. नवकरण जीवनाच्या लढ्यात पराभूत झाला खरा, परंतु त्याचे लहानसे राजकीय जीवन इतरांना प्रेरणा देण्यासाठी पुरेसे आहे. कामगार बिगुलची त्याला श्रद्धांजली. त्याचे स्वप्न साकार करण्यासाठीचा संघर्ष सुरू ठेवण्याची शपथ आम्ही यावेळी पुन्हा एकदा घेत आहोत.
कॉम्रेड नवकरणला लाल सलाम. इंकलाब जिंदाबाद.
कामगार बिगुल, फेब्रुवारी २०१६