अलविदा फिडेल! जगभरातील स्वातंत्र्यप्रिय जनता तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही!
क्यूबाच्या क्रांतीचे नेते आणि अमेरिकन साम्राज्यवाद विरोधी लढ्यातील झूंझार योद्धा असलेल्या फिडेल कास्ट्रो यांचे आपल्यातून कायमचे निघून जाणे, ही जागतिक मानवमुक्तीच्या लढयाची मोठी क्षति आहे. फिडेल बऱ्याच काळापासून आजारी होते, पण तरीही त्यांची केवळ उपस्थिति आणि लोकप्रियता सुद्धा मानव मुक्तिच्या लढ्याचा एक शक्तिस्रोत होती. कास्ट्रो व चे ग्वेरा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्यूबन क्रांतीनंतर अमेरिकेच्या नाकावर टिच्चून, सगळे अडथळे व षडयंत्र यांचा सामना करत क्यूबन जनतेने समाजवाद निर्मितीच्या दिशेने मोठी वाटचाल केली. समाजवादी संक्रमण काळातील समस्या क्यूबा मध्ये सुद्धा सोडवल्या जाऊ शकल्या नाहीत आणि क्यूबन समाज आज एका अनिश्चित भविष्याच्या समोर उभा असूनही तिथे झालेल्या प्रारंभिक समाजवादी प्रयोगांमुळे जनता शतकांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली आणि जनतेचे जीवनमान कित्येक पटीने उंचावले.
आत्यंतिक गरीबी आणि कठोर अमेरिकन प्रतिबन्ध ह्यांचा सामना करत क्यूबामध्ये शिक्षण व आरोग्य सर्वांसाठी विनामूल्य करण्या सारख्या शानदार उपलब्धी खूपच कमी काळात साध्य केल्या गेल्या. क्यूबाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेल्या शेती मध्येसुद्धा नेत्रदीपक पथदर्शक प्रयोग केले गेले. एका कालावधी नंतर ह्या प्रयोगांची गती कुंठित झाली आणि कास्ट्रो यांच्या जाण्याने क्यूबातील समाजवादाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तरीही भांडवलशाही आणि साम्राज्यवाद यांच्या विरोधात कास्ट्रो यांनी दिलेला अथक लढा थक्क करणार आहे, ह्यात शंका नाही. बिथरलेल्या अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी क्यूबामध्ये सत्ता उलथवून टाकण्याचे आणि कास्ट्रो यांची हत्या करण्याचे कैक प्रयत्न केले, पण क्यूबन जनता पूर्ण शक्तिनिशी कास्ट्रो यांच्या पाठीशी उभी राहिली आणि साम्राज्यवाद्यांना त्यांच्या सर्व कारस्थानांमध्ये अपयश बघावे लागले. विसाव्या शतकातील महान मुक्ति योद्धयांपैकी एक, फिडेल कास्ट्रो आज आपल्यात नाहीत परंतु जगभरातील मुक्तिकामी जनतेच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ राहील.
‘कामगार बिगुल’च्या वतीने आम्ही त्यांना क्रांतिकारी श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
कामगार बिगुल, डिसेंबर २०१६