जर कोणी मालकच नसेल तर कामगाराला काम कोण देईल?
काही  साधी-सोपी समाजवादी तथ्‍य

पॉल लफार्ग
द सोशलिस्ट, सप्टेंबर 1903  मध्ये प्रकाशित  (अनुवाद : नागेश धुर्वे)

आपल्या आसपासच्या लोकांकडून विचारला जाणारा हा प्रश्न तुमच्या कानावर नेहमीच पडत असेल किंवा हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. चला तर मग, या प्रश्नाचे उत्तर समजून घेऊयात. अनुवाद करताना पैशाचे चलन आणि समप्रमाणात आकडे बदलण्यात आले आहेत.

कामगार: जर कोणी मालकच नसेल तर मला काम कोण देईल?

समाजवादी: हा प्रश्न मला नेहमीच विचारला जातो. चल याचे उत्तर शोधूयात. मला सांग काम करण्यासाठी तीन वस्तूंची गरज पडते ना? कारखाना, मशीन ,आणि कच्चा माल.

कामगार: हो बरोबर.

समाजवादी: मग कारखाना कोण बनवतो?

कामगार: मिस्त्री.

समाजवादी: मशीन कोण बनवतात?

कामगार: इंजिनीयर.

समाजवादी: कपडे तयार करण्यासाठी तुम्हाला लागणारा कापूस कोण उगवतो, मेंढराची लोकर कोण काढतो? ज्याचा वापर करून तुझी बायको चरख्यावर धागा तयार करते. तुझा मुलगा हे खनिज भट्टीत भरतोय ते खनिज खाणीतून कोण काढतो?

कामगार: शेतकरी, धनगर, आणि खाणीत काम करणारे माझ्यासारखे कामगार.

समाजवादी: अगदी बरोबर…. तु, तुझा मुलगा आणि तुझी बायको यामुळेच काम करू शकता कारण अन्य कामगार, शेतकरी तुम्हाला कारखाना, मशीन, आणि कच्चामाल पुरवण्यासाठी मेहनत करत असतात.

कामगार: पण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, मी कापूस आणि चरख्याशिवाय कपडा विणू शकत नाही.

समाजवादी: म्हणजेच तुला काम भांडवलदार किंवा मालक देत नाही तर मिस्त्री, इंजिनीयर, शेतकरी हे देतात. तुला माहित आहे का की, तुझ्या मालकाने अशा कामासाठी लागणाऱ्या अन्य वस्तू कशा मिळवल्या?

कामगार: त्याने या वस्तू  विकत घेतल्या.

समाजवादी: त्यासाठी लागणारे पैसे कोणी दिले?

कामगार: मला काय माहित? आज तो करोडपती आहे. कदाचित त्याच्या बापाने त्याच्यासाठी काही पैसे कमावून ठेवले असतील.

समाजवादी:  त्याने हे करोडो रुपये स्वतः मशीन वर कपडे विणून कमवले का?

कामगार: त्याने स्वतः तर नाही. आमच्याकडून काम करवून कमावले हे मात्र नक्की.

समाजवादी: म्हणजेच तो कष्ट न करताच श्रीमंत झाला. नशीब आजमावण्याचा हा एकमात्र उपाय आहे. जे काम करतात त्यांना मात्र पोटापाण्यापुरतेच काही ते मिळते. मग मला सांग तू आणि तुझे सहकारी कामगारांनी जर काम नाही केले तर तुझ्या मालकाच्या मशीनिंना गंज नाही का लागणार? त्याचा कापूस किडे मुंग्या खाऊन नाही का टाकणार?

कामगार: आम्ही जर काम नाही केले तर कारखान्यातील सर्व वस्तू गंजून जातील आणि शेवटी त्या भंगारात जातील.

समाजवादी: बरोबर, तुम्ही काम करून उलट त्याच्या मशीनची आणि कच्च्या मालाचे रक्षण करत आहात.

कामगार: अरेच्चा, मी याबद्दल कधीच विचार केला नव्हता.

समाजवादी: बरं मला सांग, तुझा मालक कधी कारखान्यात होत असलेल्या कामाची देखभाल करतो का?

कामगार: जास्त नाही, तो कारखान्यात मात्र रोज येतो. परंतु आपले हात खराब होण्याच्या भीतीने खिशात ठेवतो. कारखान्यातच दुसऱ्या विभागांमध्ये माझी बायको आणि मुलगा काम करतात तिथे तो कधीच येत नाही. हो, पण तिथेच चार मालक आहेत. पण ते देखील कधीच दिसत नाहीत. मालक कोण आहेत हेसुद्धा कळत नाही. एवढेच काय, तर कारखान्यातील तीन-चतुर्थांश कामगारांनी मालकाची सावलीसुद्धा बघितलेली नाहीये. असं समजा की तुम्ही आणि मी बचत करून पन्नास हजार जमा करतो आणि एका भागाची(शेअर) खरेदी करून कार्यस्थळावर पाऊल न ठेवतात मालकांमधील एक बनतो.

समाजवादी: कारखान्यात कधी मालक येत नाही, भागधारक येत नाही, तर मग तुमच्याकडून काम करवून घेण्याचे आणि लक्ष ठेवण्याचे काम कोण करतो? मालक येत नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी तर तुम्हाला भरपूर स्वातंत्र्य मिळते. याचा कामावर काही परिणाम होत नाही का?

कामगार: कसलं डोंबलाचं  स्वातंत्र्य, मॅनेजर आणि फोरमन असतात की आमच्याकडून काम करून घेण्यासाठी.

समाजवादी: मग जर कारखाना उभा करण्यापासून ते मालाचे उत्पादन करण्यापर्यंत कामगार, शेतकरी हे सगळं काही करतात. तुमच्याकडून मॅनेजर आणि फोरमन काम करवून घेतात तर मग मालक काय करतो?

कामगार: काहीच नाही. बस आमच्या कष्टावर मजा मारण्याचं काम करतो.

समाजवादी: अरे, जर इथून चंद्रापर्यंत ट्रेन गेली असती तर आपण मालकांना बिना रिटर्न  तिकिटाचे चंद्रावर पाठवून दिले असते आणि तुझे कपडे विणणे, तुझ्या बायकोचं चरख्याचं काम, तुझ्या मुलाचं साच्याचं काम यावर यामुळे काही एक फरक पडला नसता, ते चालूच राहिलं असतं. असो, तुला माहित आहे का की, मागच्या वर्षी तुझ्या मालकाला किती नफा झाला ते?

कामगार: आम्ही तो मोजला आहे. साधारण एका कोटीच्या आसपास रुपये  त्याला मिळाले असतील.

समाजवादी: त्याने पुरुष-महिला तरुण यांना धरून एकूण किती लोकांना रोजगार दिला आहे?

कामगार: शंभर.

समाजवादी: त्यांना किती पगार मिळतो?

कामगार: मॅनेजर आणि फोरमनचा  पगार धरून सरासरी वर्षाला 1 लाख रुपये

समाजवादी: म्हणजे शंभर कामगारांना एकूण पगाराच्या स्वरूपात वर्षाला 1 कोटी रुपये मिळतात. जे फक्त एवढेच आहेत  की तुम्ही उपाशी मेले नाही पाहिजे. आणि तुमचा मालक मात्र एकटाच एक कोटीपर्यंत आपल्या खिशात घालतो. हे दोन कोटी रुपये   येतात कुठून?

कामगार: हे पैसे आभाळातून तर पडत नाहीत हे मात्र नक्की आणि तसंही मी कधी रुपयाचाचा पाऊस पडलेला देखील कधी बघितला नाही.

समाजवादी: तुम्हाला जे पगाराच्या  स्वरूपात एक कोटी रुपये मिळालेत आणि जे मालकाच्या खिशात फायदा म्हणून एक कोटीरुपये गेलेत हे सगळे पैसे  कामगारांनीच निर्माण केलेत. तुझा मालक याच फायद्याचा वापर नवीन मशिनरी खरेदी करण्यासाठी करतो आणि तुझ्यासारख्याच अन्य कामगारांना रोजगार देतो. या पद्धतीने तो सतत नफा कमावत राहतो.

कामगार: हे नाकारता येणार नाही.

समाजवादी: या पद्धतीने कामगारच ते पैसे निर्माण करतो जे मालक त्यांना काम करण्यासाठी लागणाऱ्या मशीन खरेदी करण्यासाठी वापरतो. तुमच्याकडून काम करून घेणारे मॅनेजर आणि फोरमन हे देखील तुमच्या सारखेच वेतन घेणारे गुलाम असतात. मग इथे  मालकाचे काय काम? तो  कोणत्या कामासाठी चांगला आहे?

कामगार: श्रमाच्या शोषणासाठी

समाजवादी: आपण म्हणू शकतो की, ‘श्रमिकांना लुटण्यासाठी’ असं म्हणणं जास्त स्पष्ट आणि योग्य असेल.