भारतातील बीपीओ कामगारांची दुर्दशा
रवी
जसा दिवस उजाडतो तशी २४ वर्षीय सुमन आपला लांब, कंटाळवाणा, थकवणारा प्रवास सुरु करते. तब्बल दीड तासाच्या ह्या रोजच्या प्रवासामध्ये पुण्यातील हिंजवडीला पोचण्यासाठी तिला दोन बस बदलाव्या लागतात. ऑफिसला पोचल्यावर सुमनचे रूपांतर अमेरिकन सुझीमध्ये होते. तिला पुढचे साडे आठ तास अमेरिकन पद्धतीने बोलून ग्राहकांना हे पटवून द्यावे लागते की ती ७००० मैल दूर भारतात बसलेली नसून त्यांच्या शेजारी असलेल्या परिसरातूनच त्यांची मदत करत आहे. सुमन/सुझी एका कॉल सेंटरमध्ये काम करते. एका बीपीओ कामगाराच्या दैनंदिन जीवनाचे हे एक जुजबी वर्णन.
भारत ही बीपीओ कंपन्यांची आवडती बाजारपेठ. १३००० अब्ज रुपयांच्या जागतिक सेवा देणाऱ्या बाजारपेठेचा ५५% वाटा भारताचा आहे. स्वस्त श्रम दर आणि कुशल, इंग्रजी बोलणारे कामगार हे या अफाट नफा कमावणाऱ्या उद्योगाचे कारक आहेत. परंतु अनेक सर्वेक्षणांमधून असे दिसून येते की आय.टी. क्षेत्रातील सर्वात जास्त शोषण याच कामगारांचे होते. सतत कॅमेऱ्यांतून नजर ठेवून आणि कामावर जास्त तास राबवून त्यांचे शोषण केले जाते ज्यातून आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवतात.
कॉल सेंटरमधील कामगारांवर कामाचा व्याप, स्पर्धेचा दबाव आणि मॅनेजमेंटच्या पाळतीमुळे सतत ताण असतो. कॉल्सची संख्या, सरासरी कॉलचा वेळ आणि कॉल्स मधला वेळ यांद्वारे कामगारांचे परीक्षण केले जाते. सी.सी.टी.व्ही. आणि इलेक्ट्रॉनिक टाइमर द्वारे डेस्कपासून दूर असण्याच्या वेळेसोबतच बाथरूममध्ये असण्याच्या वेळेवरसुद्धा लक्ष ठेवले जाते. कामाचे तास सुद्धा कडक आणि ठरलेले असतात. लघवीला जाण्यासाठी दिलेल्या वेळेची वाट बघावी लागते. ग्राहकसुद्धा बहुतेकवेळा दीर्घ प्रतीक्षेनंतर चिडून बोलतात. कॉल ऑपरेटरच्या बोलतानाच्या भावना, शब्द उच्चारण, दक्षता आणि व्याकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी टीमचे लीडर अनियतपणे कॉल्स ऐकतात. चुका झाल्यावर त्याची नोंद होऊन त्वरित चेतावणी दिली जाते. नोंदींच्या एका मर्यादेनंतर कॉउंसेलिंगसाठी जावे लागते किंवा नोकरीला मुकावे लागते.
वी. वी. गिरी राष्ट्रीय श्रम संस्थानाने सादर केलेल्या बीपीओ कामगारांच्या अहवालानुसार कॉल्स घेण्याचा दर मॅनेजमेंट असा ठेवते की कामगाराने दिवसाअखेर शक्तिहीनतेच्या स्थितीत असावे. दररोज शेकडो कॉल्स घेण्याच्या किंवा करण्याच्या या परिस्थितीची तुलना या अहवालामध्ये असेम्बली लाईन उत्पादन प्रक्रियेसोबत केली आहे. सर्वात जास्त तणाव वाढवणारा पैलू म्हणजे कॉल ऑपरेटरच्या भावना. कामगारांना नेहमीच प्रसन्न आणि दक्ष राहावे लागते. या सर्वांमुळे यांच्यातील एक मोठा भाग ‘बर्न आऊट अँड स्ट्रेस सिन्ड्रोम'(अतिश्रमाने गळीतगात्र आणि तणावग्रस्त होणे) या रोगाने त्रस्त आहे. हा आजार कामगाराच्या अपेक्षा व आदर्श आणि सध्या काम करत असलेल्या पदाच्या गरजा यांच्या भेदामुळे निर्माण होतो. यात अजून भर म्हणून कामगारांच्या मूल्यांकनाच्या माध्यमातून मॅनेजमेंट स्पर्धेचे वातावरण तयार करते आणि कामगारांच्या श्रमाची घनता वाढवून अजून श्रम करवून घेते.
बीपीओ कंपन्या नेहमीच आज्ञाधारक कार्यबळाच्या शोधात असतात म्हणजेच असे कामगार ज्यांच्याकडे नोकरीची सुरक्षा नसते. त्यामुळे हे कामगार दबूनच राहतात आणि त्यांच्याकडून कितीही, कसेही काम करून घेता येते, हे गणित मालकांना आणि मॅनेजमेंटला चांगले माहित असते. बऱ्याच राज्यांनी बीपीओ कंपन्यांना इंडस्ट्रियल डिस्प्युट कायद्यामधून (औद्योगिक विवाद कायदा) मुक्त केले आहे. या कायद्यामध्ये कामगाराला अवाजवी पद्धतीने कामावरून काढण्यापासून संरक्षण आहे. पश्चिम बंगालमध्ये तर आय.टी./ बीपीओ कंपन्यांनी कामाचे तास ४० वरून ४८ केले आहेत.
कॉल सेंटरमधून सेवा देणारा कामगार ग्राहकांना त्यांच्याच देशाचा आहे असे भासवण्यासाठी कामगारांची खरी ओळख लपवली जाते. त्यासाठी बीपीओ कंपन्या अनेक प्रयत्न करतात. पाश्चात्त्य बोली येण्यासाठी अनेक कामगारांना अमेरिकेत पाठवले जाते. तिथे त्यांचे व्हॉईस मॉड्युलेशन आणि शब्द उच्चाराचे ट्रेनिंग होते. पाश्च्यात्य संस्कृतीचा परिचय होण्यासाठी बेसबॉल सारखे खेळ खेळवतात, बेवॉच सारखे सिनेमे दाखवले जातात. विदेशात जगण्याची स्वप्न बघणाऱ्या काहींना हे आकर्षक वाटत असेल, पण वास्तवात भारतात परत आल्यावरही हे नवीन व्यक्तित्व कामगारांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते. कामाच्या वेळेनंतरसुद्धा ते या नवीन व्यक्तित्वानेच स्वतःला ओळखू लागतात आणि सामाजिक-सांस्कृतिक गोंधळलेपणाचे बळी होतात. संध्याकाळचा वेळ हा सर्वसामान्य माणसासाठी मित्रांसोबत, कुटुंबासोबत घालवण्याचा वेळ असतो. पण बीपीओ कामगारांसाठी मात्र हा सर्वाधिक व्यस्ततेचा वेळ आहे. कामाच्या विचित्र शिफ्टमुळे या कामगारांचे सामाजिक जीवन जवळपास शून्य होऊन जाते. रात्रीची शिफ्ट करणारा कामगार दिवसाचा वेळ झोपण्यात घालवतो, निद्रानाशाचा बळी होतो, शरीरही अशक्त होत जाती, आणि यामुळे त्याचे समाजासोबतचे नाते कमकुवत बनते. कित्येक असे कामगार आज एकटेपणाच्या दरीमध्ये अडकले आहेत जे शेवटी नशेच्या मार्गाला लागले आहेत. एवढेच नाही तर अनेकवेळा पाश्चात्य देशातील ग्राहकांकडून या कामगारांना वांशिक शिवीगाळ केली जाते. गुरुग्राममध्ये केलेल्या ३०० बीपीओ कामगारांच्या सर्व्हेमध्ये ९५% कामगारांना दररोज वांशिक शिवीगाळ ऐकावी लागते.
कॉल सेंटरमध्ये काम करणारा एक साधारण व्यक्ती १८ ते ३० या वयोगटातील आहे. या कामगारांना ८००० ते १५००० एवढा मासिक पगार मिळतो. कामगारांना ‘कॉल सेंटर एक्झिक्युटीव्ह’, ‘कस्टमर केयर एक्झिक्युटीव्ह’ असे गोंडस नाव असलेले पद देऊन मॅनजमेंट त्यांचे पद खूप उच्च दर्जाचे आणि अधिक अधिकार असलेले आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करते. पण हा मोठेपणा फक्त नावालाच आहे, पगार आणि करिअर वाढीमध्ये याचा काही एक उपयोग नाही. विचित्र कामाच्या वेळा आणि तणावामुळे या तरुणांमध्ये उदासीनता, दीर्घकालीन थकवा, अंगदुखी, निद्रानाश, चिंता, अस्वस्थता, चिडचिड आणि औदासीन्य या रोगांची लागण होताना दिसून येते. वैद्यकीय रजा मिळवणे सुद्धा कठीण असते. शिफ्टच्या चार ते सहा तास आधी टीम लीडर कडून रजेची संमती घ्यावी लागते. असे न केल्यास ती रजा ‘अनियोजित’ पकडली जाते आणि नोकरी गमावण्याची शक्यता सुद्धा उद्भवते.
या देशातील राज्यव्यवस्थाच मोठमोठ्या उद्योगपतींच्या खिशात असल्याने आज बीपीओ कामगारांच्या समस्यांना अधोरेखीत करायचे सोडून त्यांच्या ‘सुखी आयुष्या’चे ढोल पिटले जात आहेत. वेळोवेळी त्यांच्या युनियन बांधणीच्या गरजेवर घाव घातला जातो. कामगारांना दिल्या जाणाऱ्या मोठमोठ्या नावाच्या पदांमुळे त्यांना ‘कामगार’ या शब्दापासून दूर ठेवले जाते आणि त्यांची कामगार वर्गीय चेतना विझवली जाते. नफ्यावर आधारलेली भांडवली व्यवस्था या तरुणांकडून कमीत कमी पगारातून जास्तीत जास्त श्रम कसे काढून घेता येईल हाच प्रयत्न करत असते, कारण नफ्याची निर्मिती श्रमाच्या लुटीतूनच होत असते.
कामगार बिगुल, सप्टेंबर 2019