गो–रक्षणाच्या नावाखाली हरियाणात हिंदू युवक सुद्धा बळी! मुस्लिमांवर सतत वाढते हल्ले!
निवडणुकीत पराभवाच्या भयाने पसरवत आहेत जातीयवादाचे विष!

सुस्मित

 24 ऑगस्ट रोजी हरियाणामध्येच आर्यन मिश्रा या 12 वी च्या मुलाची गो तस्कर असल्याच्या संशयावरून हत्या झाली. काही स्वयंघोषित गोरक्षकांनी हा हल्ला केला. हल्यानंतर या गुंडसेनेचा म्होरक्या असलेला मोनु मनेसर याने आर्यनच्या वडिलांची माफी मागत म्हटले की त्यांना वाटले की तो मुलगा मुस्लिम आहे  आणि चुकून एका ब्राह्मणाची हत्या झाली. म्हणजे मृत व्यक्ती मुस्लिम असता तर हा खून क्षम्य होता? खरेतर एका निरपराध व्यक्तीची हत्या झाली आहे, आणि ती अशा लोकांनी केली आहे जे धर्मवेडे आहेत.   मुस्लिमद्वेषाचे संघ परिवाराने लागलेली आग सतत अशाप्रकारे निरपराधांचे बळी घेत आहे. प्रश्न आहे की जर लोकशाही आणि कायद्याचे राज्य आहे तर हे तथाकथित गोरक्षक कोण आहेत की ज्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार मिळाला आहे?

साबिर मलिक हरियाणातील चरखी दादरी येथे कचरा गोळा करून उदरनिर्वाह चालवत होता. बीफ खाल्याच्या संशयावरून काही तथाकथित गोरक्षकांनी त्याची 27 ऑगस्ट रोजी निर्घृण हत्या केली. साबिर ज्या गावात रहायचा तिथे मुख्यतः पश्चिम बंगाल भागातील स्थलांतरित दलित आणि जाट कामगार राहतात. या घटनेनंतर गावतल्या स्थलांतरित कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेवर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी म्हटले कीगावकरी गायीची पूजा करतात. जर त्यांना अशा घटनांबद्दल समजत असेल तर त्यांना कोण रोखू शकते?”जर मुख्यमंत्रीच अशाप्रकारे जमावाद्वारे हत्येचे समर्थन करत असतील तर देशात राज्य कायद्याचे आहे की झुंडीचे हा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही. या घटनेवरील वक्तव्य सांगून जातं की कशाप्रकारे जमिनीवरील मुस्लिमांवरच्या हिंसेला संघ परिवारातील संघटना चालना देत आहेत आणि सरकारे गो रक्षकांना समर्थन आणि संरक्षण देत आहेत.

1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये जळगावकल्याण ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या 72 वर्षीय वयोवृद्ध अश्रफ मणियार यांना बीफ घेऊन जात असल्याच्या संशयावरूनपोलिस बनण्यास निघालेल्याकाही तरुणांनी शिवीगाळ केली, त्यांचे कपडे फाडले, त्यांच्याकडचे सगळे पैसे काढून घेतले आणि त्यांना मारहाण केली. हे सर्व करत असताना या घटनेचा विडिओ पण त्यांनी रेकॉर्ड केला. जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये पसरला तेव्हा अश्रफ यांच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल समजले. केस झाली आणि 3 आरोपींना अटक केली गेलीपण त्यांना एका दिवसात जमीन सुद्धा मंजूर झाला. जेव्हा या घटनेबद्दल जनतेमधून आवाज उठवला जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी जास्त गंभीर कलमे लावली आणि जामीन रद्द झाला आहेपोलिसांनी अजूनही मॉब लिंचिंग संदर्भातले कलम 103 (2) लावले नाहीये. अजूनही 3 हल्लेखोर फरार आहेत.     

गेल्या वर्षी जून 2023 ला नाशिकमध्ये बजरंग दलच्या गुंडांनी अफन अन्सारी आणि नासिर कुरेशी यांच्यावर बीफच्या तस्करीच्या संशयावरून यांच्यावर हल्ला केला होता. यामध्ये अफनचा मृत्यू झाला तर नासिर कुरेशी गंभीर जखमी झाला होता. अफन वर पोलिसांनी प्राणी क्लेश प्रतिबंधक (Prevention to Cruelty To Animals) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. लखमन अन्सारीला अशाच प्रकारे काही आठवडे आधी बजरंग दलच्या गुंडांनी मारून टाकले. 15 फेब्रुवारी 2023 ला राजस्थानमध्ये राहणाऱ्या नासिर आणि जुनेद या दोन मुस्लिम तरुणांची बजरंग दलच्या गुंडांनी गायीच्या तथाकथित तस्करीच्या संशयावरून अपहरण करून हत्या केली आणि त्यांचे मृतदेह जाळून टाकले. ज्या कार मधून नासिर, जुनेद प्रवास करत होते ती कार त्यांच्या घरापासून 150 किलोमीटर दूर हरियाणामध्ये सापडली. नासिर आणि जुनेदच्या हत्येमध्ये बजरंग दलचे कर्यकर्ते सामील होते. जुनेद आणि नासिरच्या हत्येमधील मुख्य आरोपी, जो स्वतः लागोरक्षकम्हणवतो, त्या मोनू मानेसरवर गुडगावमध्ये दंगे घडवल्याचे आरोप आहेत.

केंदात भाजपचे सरकार आल्यानंतर गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या हत्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2010 ते 2018 मध्ये अशा प्रकारच्या हिंसेच्या 123 घटनांची नोंद आहे त्यापैकी 98 टक्के घटना 2014 मध्ये  भाजपचं सरकार केंद्रात आल्यानंतर घडल्या आहेत. या घटनांमध्ये हत्या करण्यात पीडितांपैकी 86 टक्के मुस्लिम धर्मीय होते. यातल्या एक तृतीयांश घटनांमध्ये पोलिसांनी पिडीतांवरच गुन्हा दाखल केला आहे(!).

एप्रिल 2023 मध्ये आग्र्यामध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी  तथाकथित गोहत्या झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आणि 4 मुस्लिम व्यक्तींना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला. नंतर तपासात हे स्पष्ट झाले की  हिंदू महासभेच्याच कार्यकर्त्यांनीच संबंधित मुस्लिम व्यक्तींसोबत असलेल्या भांडणातून आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी  स्वतःच गायीला कापले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संलग्न इतर संघटना (जसे की, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद) अशाप्रकारे गोरक्षेच्या नावाखाली देशातल्या दलित, मुस्लिम, कामगार, तरुणांच्या हत्या घडवून आणत आहेत आणि देशामध्ये धार्मिक, जातीय तणाव वाढवण्याचे काम करत आहे. देशात फॅसिस्ट भाजप सरकार सत्तेत आल्यापासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या फॅसिस्ट संघटनांना मोकळे रान मिळाले आहे.

आर.एस एस. च्या गोप्रेमाचे वास्तव

आर.एस एस.साठीगोमाताहा फक्त देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणासाठीचा एक मुद्धा आहे. भाजपचा नेता संगीत सोम जो की 2013 च्या मुझ्झफरपूर दंग्यांमधला आरोपी आहे आणि गोरक्षणाच्या नावाने भडकाऊ भाषणं करतो आणि तो अल दुआनावाच्या कत्तलखान्याचा संचालक होता! जर आर.एस एस. भाजप साठी गाय जर माता असेल तर नागालँडमध्ये बीफ बंदी कधीच होणार नाही असे नागालँडचे भाजप नेते विसासोली होंगू का म्हणाले? मणिपूरमध्ये गोमांस खाण्यावर बंदी नाही, काय खावे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, असे भाजप नेते आणि मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह का म्हणाले? हे तर योग्यच आहे की अन पेहराव, जीवनशैली ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे आणि त्यात कोणत्याही पक्षाला किवा सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही मग भाजप हा दुटप्पीपणा का करतो? मेघालयातील भाजप नेते अर्नेस्ट मावरी यांनीमी गोमांस खातो. ही मेघालयातील जीवनशैली आहे आणि कोणीही ते रोखू शकत नाहीअसे का म्हटले? केरळमधील मलप्पुरममधील उमेदवार भाजप नेते श्रीप्रकाश यांनी गोमांसाचा पुरवठा कमी होऊ देणार नाही आणि गोमांस खाण्यावर कधीही बंदी घातली जाणार नाही असे आश्वासन का दिले? गोव्यात गोमांसावर बंदी घालण्याचा भाजपचा कोणताही हेतू नाही, असे 2017 मध्ये अमित शहा यांनी का म्हटले? भाजपचे माफीवीर गुरु विनायक सावरकर म्हणाले होते की गाय हा केवळ प्राणी आहे माता नाही! यावर आर.एस एस. चे सध्या काय म्हणणे आहे? आर.एस एस.साठी गाय नागालँड, मणिपूर, मेघालय, केरळ इथे फक्त प्राणी आहे आणि इतर ठिकाणी माता आहे? आर.एस.एस., भाजप च्या दुतोंडीपणातून हे स्पष्ट आहे की आर.एस.एस. साठी गोप्रेम हे फक्त नाटक आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना भडकावून नकली मुद्दे उभे करायचे आणि धार्मिक तणाव भडकवायचे आणि  महागाई, बेरोजगारी, शिक्षण आरोग्य या जनतेच्या खऱ्या मुद्द्यांवर पांघरूण घालायचे. याचा परिणाम आहे की आता गोरक्षकांच्या गुंडसेना उभ्या झाल्या आहेत ज्यांना खुलेआम खून करण्याची परवानगी सरकारी यंत्रणा देत आहे.

काँग्रेसचे चारित्र्य: आतापर्यंत फॅसिस्ट संघटनांसोबत करत आला आहे तडजोडी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची सगळी पिलावळ यांची वाढ काँग्रेस देशभरात सत्तेमध्ये असतानाच झाली. काँग्रेस सुरवातीपासूनच अशा संघटनांसोबत तडजोडी करत आलेला आहे. काँग्रेसचा हा इतिहास एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. पण नुकत्याच घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांनंतर काँग्रेसचे केलेल्या कृतींवरून काँग्रेसचे चारित्र्य स्पष्ट होऊ शकेल.

नासिर आणि जुनेद राजस्थान मध्ये राहत होते जिथे गेल्या वर्षी काँग्रेसचे गेहलोत सरकार होते. नासिर आणि जुनेदच्या हत्येनंतर त्यांच्या गाववाले तसेच कुटुंबियांकडून सुद्धा कॉंग्रेसच्या गेहलोत सरकारकडून दबाव टाकण्याचा आरोप केला गेला आहे. नासिर आणि जुनेदच्या हत्येनंतर त्यांच्या गावकऱ्यांना राजस्थान पोलीसने नोटीस बजावली होती त्यात त्यांना स्थानिक कोर्टात हजार राहण्यास सांगण्यात आले. काँग्रेसच्या राज्यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदकडून मोनू मानेसरच्या समर्थनार्थ महापंचायत भरवली गेली.गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसने जाहीर केले होते की जर काँग्रेस सत्तेत आले तर बजरंग दलावर बंदी टाकू. पण सत्तेत आल्यानंतर हा कॉंग्रेसचा जुमला होता हे स्पष्ट झाले कारण  काँग्रेसने काहीही केलेले नाही.  

यावरूनच आपण काँग्रेसचे खरे चारित्र्य समजले  पाहिजे जो सत्तेसाठी  फॅसिस्ट संघटनांसोबत नेहमीच तडजोडी करत आला आहे. सध्या सगळे विरोधी पक्ष युती करून भाजपला निवडणुकांमध्ये हरविण्याचे मनसुबे रचत आहेत. पण फॅसिसमला निवडणुकांच्या मार्गाने हरवणे शक्य नाही. कामगार कष्टकऱ्यांची वर्गीय एकजुटच फॅसिझमला कायमसाठी परास्त करू शकते.

धर्माच्या नावाने मतांचे राजकारण ओळख! जात धर्माचे झगडे सोडा!

मोदी सरकाराच्या काळात महागाई अभूतपूर्व प्रमाणात वाढली आहे. गॅस सिलेंडर जे 2014 मध्ये 450 रुपयाला मिळत होते ते आज 1100 रुपयाला मिळत आहे. पेट्रोल जे 2014 मध्ये  70 रु. प्रति लिटर दराने मिळत होतं ते आज 100 रु. प्रति लिटर दराने मिळत आहे. प्रत्येकच जीवनावश्यक गोष्ट महाग झाली आहे. “बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकारअसे म्हणत सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळात महागाई अजूनच वाढली आहे. आज अच्छे दिनाचे वास्तव सर्वांसमोर उघडे पडले आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर सुद्धा मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दर वर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिलेल्या मोदींनी गेल्या 10 वर्षात फक्त जवळपास 7 लाख नोकऱ्या दिल्या आहेत आणि यासाठी 22 कोटी तरुणांनी अर्ज केले होते. मोदी सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या रेट्यामुळे ज्यांना नोकऱ्या आहे त्यांनासुद्धा नोकऱ्यांची  शाश्वती नाहीये. सैन्यामध्ये अग्नीवर योजना आणून कंत्राटी पद्धतीने भरती करत आहे. मुंबई पोलीस दलात सुद्धा आता कंत्राटी पद्धतीने भरती होत आहे. पक्का रोजगार कमी होत चालला आहे. अलीकडेच, अमेझॉनने आपल्या 18,000 आणि एच.पी.ने आपल्या 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबद्दल बोलले आहे. जुलै 2022 पासून, मायक्रोसॉफ्टने तीन वेळा आणि नेटफ्लिक्सने दोनवेळा छाटणी केली आहे. ज्या  काही नोकऱ्या आहेत त्या कंत्राटी पद्धतीच्या, कमी पगाराच्या आणि जास्त तास राबवून घेणाऱ्या आहेत. मागच्याच आठवड्यात तलाठ्याच्या 4644 जागांसाठी 11,50,265 अर्ज आले होते. यावरूनच बेरोजगारीची समस्या किती गंभीर आहे हे समजू शकते. मोदींने 2014 मध्ये म्हटले होतेना खाऊंगा ना खाने दूंगापण गेल्या 10 वर्षात मोदी सरकार भ्रष्टाचाराचे नवनवीन विक्रम रचत आहे. राफेल घोटाळ्यापासून, कोरोनाच्या काळातला पी.एम.केअर्स घोटाळा, सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीचा व्यापम घोटाळा, एन.पी.. घोटाळा, अडाणी घोटाळा ते नीट परीक्षा घोटाळा. मोदी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांबद्दल लिहायचे तर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. सध्या तरी एवढे स्पष्ट आहे की भ्रष्टाचारांमध्ये काँग्रेसपेक्षा भाजप मागे नक्कीच नाही किंबहुना दोन पाऊले पुढेच आहे.

 हरियाणामध्ये निवडणूका होऊ घातल्या आहेत, आणि अशातच हे हल्ले वाढले आहेत! स्पष्ट आहे की निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण घडवण्यासाठीच हे केले जात आहे. अशा स्थितीत जनतेच्या महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारासारख्या खऱ्या प्रश्नांवर पांघरून घालण्यासाठीच लव्ह जिहाद, गो माता अशा प्रकारचे नकली धार्मिक मुद्दे आपल्यामध्ये आणले जातात. भांडवलदार वर्गाच्या भिकेवर जगणारा भाजप अर्थातच दुसरे तिसरे काही नसून भांडवलदार वर्गाचा साखळीने बांधलेला हिंस्त्र कुत्रा आहे जो की भांडवलदार वर्ग गरज पडल्यास कामगारकष्टकरी वर्गावर सोडत असतो. सध्या देशातील भांडवलदारांचा नफ्याचा दर घसरतो आहे, आणि त्यामुळेच त्यांना  भाजप सारख्या पक्षाची गरज आहे, जो हिंदुत्व वापरून जनतेला विविध जाती, धर्मांमध्ये विभागण्याचे काम करेल, जनतेसमोर नकली शत्रू उभा करेल आणि जनतेला आपसातच भांडायला लावेल. यामुळे सध्याच्या शोषणकारी व्यवस्थेची निरंतरता टिकून राहण्यास मदत होतेनिश्चितपणे धर्माच्या नावाने गुंडागर्दी करणाऱ्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे, पण राजकारणात विचार करावा लागेल की आपल्यासाठी महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य हे खरे मुद्दे आहेत की लव्ह जिहाद, गौ हत्या, मंदिरमस्जिद हे  मुद्देधर्मजातीपलीकडे कामगारकष्टकऱ्यांनी एकजूट होऊनच या फॅशिस्टांच्या मागे बसलेल्या त्यांच्या पोशिंद्या भांडवलदारांना टक्कर दिली जाऊ शकते. इतिहासात याची उदाहरणे आहेत.

इस बार दंगा बहुत बड़ा था

खूब हुई थी

ख़ून की बारिश

अगले साल अच्छी होगी

फसल

मतदान की

(कवी: गोरख पाण्डेय)