लेक वाचवा, भाजपवाल्यांपासून!!!
भाजप नेत्यांच्या दुष्कृत्यांची शिकार झाली आणखी एक मुलगी!
रुपा (अनुवाद: पूजा)
‘बेटी के सम्मान में, भाजपा मैदान में, आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ सारख्या प्रभावी घोषणांच्या कोलाहलात ह्या देशाच्या लेकींसोबत होणाऱ्या क्रूरतेला लपविण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. परंतु 6 वर्षांत स्त्रियांविरोधी झालेल्या अपराधांचे आकडे ओरडून ओरडून सांगत आहेत की भाजपा सरकारचे हे पोकळ नारे केवळ मतं गोळा करण्यासाठी केलेलं एक नाटक आहे. कठुआ आणि उन्नाव सारख्या क्रूर, मानवताद्रोही, स्त्री विरोधी घटनांची आठवण अजून ताजीच आहे की एक नवी घटना आपल्या समोर आहे.
ही घटना शाहजहॉंपुर मधील आहे. संतांच्या गोटातून येणाऱ्या आणि भाजपचे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेल्या स्वामी चिन्मयानंद याच्यावर वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. चिन्मयानंदवर असा आरोप पहिल्यांदा लागलेला नाही, यापूर्वी देखील त्याच्या आश्रमातील अनेक स्त्रियांवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आलेल्या आहेत. 2011 मध्ये देखील एका साध्वीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. त्या प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्र सुद्धा दाखल झाले होते, पण योगी आदित्य महाराजांच्या कृपेने मागच्या वर्षी तो निर्दोष सुटला होता. चिन्मयानंद आणि योगी आदित्यनाथ यांच्या जवळच्या संबंधांचा एक मोठा इतिहास आहे. 1980 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाच्या दरम्यान चिन्मयानंदने योगी आदित्यनाथ चे गुरू असलेल्या महंत अवैद्यनाथ बरोबर खांद्याला खांदा लावून काम केले होते. दोघांनी मिळून ‘राम जन्मभूमी मुक्ती संघर्ष समिती’ ची स्थापना केली होती. पुढे चिन्मयानंदने योगीच्या ‘हिंदू युवा वहिनी’ नामक भगव्या दलाचे काम शाहजहाँपुरमध्ये सुरू केले.
कठुआ आणि उन्नाव प्रकरणांत ज्या प्रकारे ह्या फॅसिस्टांनी गुन्हेगारांना वाचविण्याचा, त्यांच्या दुष्कृत्यांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तरीदेखील शाहजहाँपुर मधील ही शूर मुलगी स्वतःसोबत झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि याचा परिणाम काय होतो? तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा चिन्मयानंदला अटक झाली नाही जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश आहे की बलात्कारासारख्या प्रकरणांत तक्रारी नंतर लगेच अटक झाली पाहिजे. त्यानंतर ही मुलगी स्वतःची चित्रफित बनवून सर्वत्र पसरवते, शिवाय स्वतः पुढे येऊन पत्रकार परिषद बोलावते, आत्मदहन करेल म्हणून सांगते तेव्हा कुठे जाऊन चिन्मयानंदला अटक होते, पण बलात्काराच्या गुन्ह्याखाली तक्रार नोंदवली जात नाही. अशाप्रकारे त्या मुलीची हिंम्मत तोडण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु ती हार मानत नाही.
चिन्मयानंदने स्वतः हे स्विकारले आहे की त्याने असे दुष्कृत्य केले; तरी देखील त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जात नाही, पोलीस खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी त्याला स्वतःच्या गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन जातो. दुसरीकडे जेव्हा मुलीला घाबरविण्यासाठी तिच्यावर स्वामी चिन्मयानंद कडून पैसे मागण्याचा खोटा आरोप लावला जातो, तेव्हा पोलीस तिला बळजबरी घरातून घेऊन जातात, तिला व्यवस्थितरित्या कपडे घालण्याची संधी सुद्धा देत नाहीत! पोलीस प्रशासनाचा हा घृणास्पद चेहरा इथेच उघड होतो. पोलीस प्रशासनाची ही पक्षपाती वागणूक हे दाखवून देते की ते वास्तवतः कुणाची सेवा करतात. एकीकडे बलात्कारी दवाखान्यात मजा मारतोय आणि दुसरीकडे पिडीतेला तुरुंगवासात पाठवले जाते. लगेचच प्रसार माध्यमांचे सूर देखील बदलतात. ह्या बातमीला खूप तिखट-मीठ लावून सादर केले जाते आणि चिन्मयानंदच्या गुन्ह्याला सौम्य करून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला जातो.
उन्नाव आणि कठुआ येथे देखील हेच झाले होते. उन्नाव येथील भाजपाचा आमदार कुलदीप सिंह सेंगर याला घटनेच्या 13 महिन्यांनंतर अटक झाली. सर्वप्रथम पीडितेच्या वडिलांना तुरुंगात छळ करून जिवानिशी मारून टाकण्यात आले. त्यांनतर तिच्या संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर अपघातात मारून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि उत्तर प्रदेशातील फॅसिस्ट सरकार गुपचूप बघत राहिले. कठुआतील घटनेला देखील अजून फार काळ लोटला नाही. तिथे ह्या फॅसिस्टांनी तिरंगा घेऊन गुन्हेगारांच्या समर्थनात फेरी काढली होती. तोंडाने रामाचे नाव घ्यायचे आणि वास्तविकतेत गुन्हेगारांना, बलात्काऱ्यांना उत्तेजन द्यायचे ही यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही.
मागील वर्षी देवरिया, मुजफ्फरपूर मधील बालिका संरक्षण गृहात मुलींसोबत झालेल्या दुष्कृत्याबाबतीत अनेक भाजपा नेत्यांची नावे आली. इतक्यातच एक भाजपा नेता एका सेक्स रॅकेट मध्ये पकडला गेला. आपल्यासमोर अनेक उदाहरणे आहेत जे हे सिद्ध करतात की फॅसिस्टांच्या भाजपा सरकारच्या लेखी ह्या देशातील लेकीं च्या संरक्षणाचे काहीच महत्व नाही. संरक्षण तर लांबची गोष्ट आहे, हे स्वतःच मुलींचे सर्वात मोठे शत्रू आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ए.डी.आर.) च्या एका अभ्यासाने हे स्पष्ट केले आहे की देशभरात स्त्रियांवर होणाऱ्या घृणास्पद अत्याचारांमध्ये भाजपाचे आमदार आणि खासदार पहिल्या नंबरवर आहेत.
खरे पाहता असल्या गुन्हेगारांना, बलात्काऱ्यांना उत्तेजन देणे, गुन्ह्यांवर पांघरूण घालणे हे फॅसिस्टांच आताचं काम नव्हे, तर याचा एक संपूर्ण इतिहास राहिला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हिंदुत्वाचे विचारवंत सावरकर यांनी देखील स्वतःच्या ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’ ह्या पुस्तकात हिंदू पुरुषांकडून मुस्लिम स्त्रियांवर करण्यात येणाऱ्या बलात्कारांना न्याय्यसंमत ठरवले होते. दिल्लीत जेव्हा निर्भया प्रकरण घडले होते तेव्हा मोहन भागवतां पासून ते भाजप च्या अनेक प्रतिष्ठित नेत्यांनी खालच्या दर्जाचे वक्तव्य केले होते जे सगळ्या बाजूने अश्या दुष्कृत्यांसाठी मुलींनाच जबाबदार ठरवत होते आणि स्त्रियांना घर-गृहस्थीच्या चार भिंतीत बंदिस्त करण्याचं समर्थन करणारे होते.
जर तुम्ही विचार करत असाल की आज ही तुमच्या मुली सुरक्षित आहेत तर ह्या गैरसमजात राहू नका कारण फॅसिस्ट कधीही काहीही करू शकतात. जेव्हा कायदा बनवणारेच संसदेत बसून अश्लील सिनेमा बघतांना पकडले जातात, तेव्हा त्यांच्याकडून स्त्री सुरक्षिततेची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला धोका देण्यासारखे आहे. ‘बेटी के सम्मान मे भाजपा मैदान में’ ह्या घोषणेची वास्तविकता ह्यावरून समजून घेतली जाऊ शकते की ‘निर्भया फंड’ साठी जी रक्कम जमा झाली होती त्याचा एक तृतियांश भाग देखील आजतागायत सरकार खर्च करू शकलेली नाही. जेव्हा की अशा घटना दिवसागणिक वाढतच आहेत.
हिंदुत्वाचे हे पहारेकरी, जे स्त्रियांना मुलं जन्माला घालण्याचे यंत्र व पुरुषांची दासी समजतात, त्यांच्याकडून ही अपेक्षाच केल्या जाऊच शकत नाही की ते मुलींच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊलं उचलतील. मुलींच्या सुरक्षिततेची घोषणा केवळ मतांसाठी केलेले नाटक आहे. ह्यांचे राजकारण समाजातील पितृसत्ताक विचारांना प्रोत्साहन देण्याचे काम करते आणि ह्यांच्या रुग्ण मानसिकतेला दर्शवते. आज गरजेचे आहे की आपण त्या प्रत्येक घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरायला हवे आणि प्रत्येक स्त्री विरोधी विचाराला आव्हान द्यायला हवे. कारण आज आपण जागे झालो नाही तर हे दुष्ट फॅसिस्ट आपल्या प्रत्येक दुष्कृत्याला कायदेशीर ठरविण्यात यशस्वी होतील.
कामगार बिगुल, जानेवारी 2020
ही एक हुकूमशाही आहे, हिटलरचे सर्व तंत्र हे उपयोगात आणत आहे लोकशाही वाचविण्याच्या नावाखाली लोकशाहीचा गळा दाबला जास्त आहे वेळीच ओळखून यांना सत्तेबाहेर करणे काळाची गरज आहे