पीएमसी बँकेतील घोटाळा आणि बँक व्यवस्थापन व भांडवलदारांचे गलिच्छ राजकारण

जयवर्धन

देशात मंदीचे वातावरण असतांना ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आलेल्या पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे देशातील जनतेवर चिंतेचे सावट पसरले आहे. आपला पैसा बँकेत सुरक्षित नाही अशी भीती नागरिकांना वाटत आहे. पीएमसी बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर खातेधारकांनी स्वतःचे पैसे बँकेतून काढण्यासाठी एकच गर्दी केली होती, परंतु त्यांना स्वतःचे कष्टाचे पैसे बँकेतून काढण्यासाठी मज्जाव करण्यात आला आणि निर्बंध लादण्यात आले. आपल्याच कष्टाचा पैसा गरजेच्या वेळी आपल्याला मिळत नाही हे बघून नागरिक पण हवालदिल झाले. आधीच देशात मंदी आणि बेरोजगारीचे संकट असताना ह्या घोटाळ्यामुळे खातेधारकांवर दुहेरी संकट कोसळले.

 पीएमसी बँकेविषयी थोडेसे

पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) 13 फेब्रुवारी 1984 ला स्थापन झाली. सहकारी बँक म्हणून ही नावारूपाला आली आणि देशातील पहिल्या 10 सहकारी बँकांत पीएमसी ला स्थान मिळाले. 11,600 कोटी रुपये एवढी बँकेची जमापुंजी आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दिल्ली सहित देशातील 6 राज्यात 137 शाखांमध्ये ही बँक पसरली आहे.

असा झाला घोटाळा

हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ही बांधकाम क्षेत्रातील एक मोठी कंपनी आहे. म्हणजे जणू एक मोठी बिल्डरच! पीएमसी बँकेचा माजी अध्यक्षच स्वतः “हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड” म्हणजे एचडीआयएल च्या संचालक मंडळावर होता! पीएमसी बँकेने त्यांच्या एकूण कर्जरकमेपैकी म्हणजे 8,880 कोटी रुपयांपैकी 6,500 कोटींचे कर्ज एकट्या हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) ह्या कंपनीला दिले आहे. ही रक्कम एकूण कर्जरकमेच्या तब्बल 73 टक्के एवढी भरते. बडतर्फ आणि नंतर अटक करण्यात आलेले बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी कबुली दिली की त्यांनी 44 लोन खाती लपविण्यासाठी 21049 खाती बोगस नावांनी तयार केली.

अशाप्रकारे एचडीआयएलच्या मदतीसाठी पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 44 गुप्त खाती बनवली आणि ही खाती गोपनीय पद्धतीनं चालवली जात असल्याचे चौकशीत समोर आले. रिझर्व्ह बँकेच्या ऑडिटमध्ये ही खाती दाखवली गेली नव्हती. ह्या कर्जाची एचडीआयएल कडून परतफेड होत नाहीये आणि हे कर्ज अनुत्पादित कर्जामध्ये बदललेले आहे ही माहिती रिझर्व बँकेपासून दडवून ठेवण्यात आली. क्रेडिट विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी बोगस खात्यासंबंधीची माहिती रिझर्व्ह बँकेला दिल्यानंतर हा सर्व घोटाळा उघडकीस आला. आधी घोटाळ्याची रक्कम 4,355 कोटी सांगितल्या जात होती परंतु नंतरच्या चौकशीत ही रक्कम 6,500 कोटींपेक्षाही वर असल्याचे समोर आले. रिझर्व्ह बँकेने त्वरित खातेधारकांच्या पैसे काढण्यावर बंधने आणली आणि बँकेत प्रशासकाची नेमणूक केली. सहा महिन्यातून एकदा केवळ 1,000 रुपये काढता येणार असा नियम केल्यानंतर खातेधारकांचा रोष लक्षात घेऊन ती मर्यादा पुढे फक्त 10,000 रुपये आणि नंतर 25,000 रुपये एवढी करण्यात आली. कुणीही व्यक्ती हे सहज समजू शकतो की ज्या लोकांनी आयुष्यभर मेहनत करून आपला पैसा बँकेत जमा केला जेणेकरून अडी-अडचणीला आणि भविष्यात त्यांना ही बचत कामाला येईल, त्यांच्यासाठी हा नियम किती धक्कादायक असेल. कुणाला वेळेवर दवाखान्यात जायला पैसे राहले नाही म्हणून मृत्यू ओढवला तर काहींना जगण्यासाठीच पैसे राहिले नाहीत या चिंतेने तर काहींना भविष्यात आपले काय होईल या चिंतेने ग्रासले. बऱ्याच जणांचे तणावाखाली येऊन आणि इतर कारणांनी मृत्यू ओढवले.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला आदेश दिला की पुढची दिशा काय असेल यासंदर्भात न्यायालयाला माहिती सादर करावी. त्यासंबंधीची सुनावणी 19 नोव्हेंबर ला होईल असे न्यायालयाने सांगितले. 19 नोव्हेंबर ला काही सकारात्मक निर्णय लागेल या आशेने मोठया संख्येने खातेधारक न्यायालयाच्या आवारात जमले. स्वतःच्या मेहनतीचे खात्यातील पैसे त्यांना काढता यावे यासाठी त्यांनी कोर्टाच्या आवारात घोषणाबाजी करत “हमारा पैसा वापस दो”, “आरबीआय चोर है” ह्या घोषणा दिल्या. परंतु न्यायालयाने ही सुनावणी 4 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलली.

बँका आणि भांडवलदारांचे संगनमत! सामान्य जनतेचे मरण!

ह्या सर्व प्रकरणावरून आणि याआधीही नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी इत्यादी प्रकरणांवरून आपल्याला हे स्पष्ट लक्षात येते की असे सर्व मोठे भांडवलदार, उद्योगपती आणि मालकवर्ग मिळून बँकांना आणि त्यांच्या व्यवस्थापनाला खिशात घेऊन फिरतात. ते म्हणतील तशा मनमानी पद्धतीने बँका त्यांचा कारभार चालवतात. एचडीआयएल चे मालक राकेश आणि सारंग वाधवान आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी संगनमत करून गुप्त पद्धतीने व्यवहार करून बँकेकडून 6,500 कोटींची रक्कम सर्व नियम कायदे धाब्यावर बसवत एचडीआयएल ला वळती केली. ह्या रकमेची परतफेड होत नाहीये आणि हे कर्ज अनुत्पादक कर्ज बनलेले आहे ही माहिती रिझर्व्ह बँकेपासून दडवून ठेवली. रिझर्व बँकेने पाठवलेल्या तपासणीसाची भूमिका सुद्धा यात संशयास्पद ठरते. सामान्य जनता मेहनतीने पै-पै करून आपली बचत बँकेत ठेवते. त्याच्या भरवशावरच सर्व भांडवलदार वर्ग त्यांचं भांडवल उभे करतो. अशा वेळी कंपनीचे दिवाळे निघाल्यानंतर त्याचा भुर्दंड मात्र सामान्य जनतेला सहन करावा लागतो. मोठमोठ्या भांडवलदारांच्या राहणीमानात मात्र तसूभरही फरक पडत नाही. यात मरण आहे ते सामान्य जनतेचे, कामगार-कष्टकरी माणसाचेच. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारख्यांनी बँकेला लाखो कोटींचा चुना लावला त्याची भरपाई सामान्य कष्टकरी जनता अजूनही करतेच आहे, बेरोजगारी आणि मंदीचा मार सुद्धा सहन करत आहे परंतु या देशातील धनाढ्य मालक वर्ग ऐशोआरामात मश्गुल आहे. अतिशय निर्लज्जपणे जनतेच्या पैशावर डल्ला मारून पसार होत आहेत आणि आपणा सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की तात्पुरती वेळ टाळून नेण्यासाठी होणाऱ्या चौकश्या आणि अटकेतून पुढे काहीही होत नाही.

पीएमसी ही सहकारी बँक आहे. मात्र अनेक सहकारी आणि सरकारी बँकांतील घोटाळे उघडकीसच येत नाहीत किंवा त्यांना घोटाळाच ठरविण्यात येत नाही. मोठमोठे उद्योगपती, भांडवलदार असे हजारो कोटी रुपये बुडवतात आणि त्यांचे काहीच होत नाही. ह्या घोटाळ्यांवर सरकारच पडदा टाकते. बडे उद्योगपती ह्या बँकांचा त्यांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतात आणि त्यांच्याच बाजूचे असलेले सरकार सुद्धा असा उपयोग होऊ देते आणि त्याकडे सोयीस्कर डोळेझाक करते. बँक बुडायला लागली की तिला वाचवण्यासाठी जनतेच्या पैशावर डल्ला मारून बॅंकेत जनतेच्याच कराच्या किंवा बचतीच्या पैशाने पुन्हा भांडवलभरणी केली जाते. नजीकच्या काळातीलच अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आयडीबीआय वाचवण्यासाठी आयुर्विम्यातील पैसा वापरल्या गेला तसेच अन्न महामंडळ, लघुबचत संचालनालय इत्यादी आस्थापनांमधील पैसा सरकारने फेरभांडवलभरणी करण्यासाठी वापरला. यावरून आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हे भांडवली सरकार भांडवलंदारांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कष्टकरी कामगारांच्याच खिशाला कात्री लावत आहेत. जीएसटी सारखे कर वाढवून, पेट्रोल-डिझेल महाग करून, आपल्या शिक्षण-आरोग्याच्या खर्चात कपात करून, तर कधी बॅंकेमध्येच ‘बॅलन्स’ कमी म्हणून किंवा ‘एटीएम’ जास्त वापरले म्हणून दंड लावून हे पैसे आपल्याच खिशातून वसूल केले जात आहेत आणि हे गुन्हेगार मात्र मोकाट आहेत! जो कष्टकरी कामगार आज 12-12 तास कंबरतोड मेहनत करून हा देश चालवतो आणि सर्व संपत्ती निर्माण करतो तो आज अतिशय दारिद्र्यात पिचत पडला आहे आणि दुसरीकडे बँका चालवणारे, उद्योगपती, कारखानदार, भांडवलदार, मालक लोकं कष्टकऱ्यांच्या जीवावर ऐशोआरामात जगत आहेत. प्रसिद्ध साहित्यिक बर्टोल्ट ब्रेख्त यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे “हौशी चोर दरोडे टाकतात, परंतु व्यवसायिक चोर बँका स्थापन करतात”. हे वाक्य ह्या दरोडेखोरांसाठी अगदी तंतोतंत लागू पडतं, नव्हे हाच भांडवली व्यवस्थेचा नियम आहे.

कामगार बिगुल, जानेवारी 2020