क्रांतिकारी समाजवादाने कशा प्रकारे महामारींवर नियंत्रण आणले
सोवियत संघाचे आणि क्रांतिकारी चीनचे अनुभव
आनंद सिंह (अनुवाद: राहुल)
गेल्या दीड वर्षांपासून चालू असलेल्या करोना जागतिक महामारीने फक्त सर्व भांडवली देशांच्या सरकारांचेच नाकर्तेपण उघडे केले नाही तर भांडवली आरोग्य व्यवस्थेचे जनविरोधी चरित्रही पूर्णत: उघडे पाडले आहे आणि भांडवलशाहीच्या मर्यादांना प्रखरपणे समोर आणले आहे. नफ्याच्या अंतहीन लालसेवर टिकलेल्या भांडवलशाहीचे क्रूर वास्तव आता सर्वांसमोर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील विलक्षण प्रगतीचा वापर महामारीवर नियंत्रण मिळवण्याऐवजी जास्तीत जास्त नफ्याच्या संधी शोधण्यासाठी केला जात आहे. भांडवलशाहीच्या या मानवद्रोही चरित्राचे पितळ उघडे पडत असताना हा प्रश्न अत्यंत प्रासंगिक झाला आहे की समाजवादामध्ये महामारींवर नियंत्रण कशाप्रकारे केले जाते. या लेखामध्ये आम्ही विसाव्या शतकातील दोन महान क्रांत्यांनी, रशियन क्रांती आणि चिनी क्रांतीने, महामाऱ्या आणि आजारांवर नियंत्रणासाठी केलेल्या उपायांची चर्चा करू.
ऑक्टोबर क्रांती नंतर रशियाने महामारींवर नियंत्रण कसे आणले?
रशियात 1917 च्या बोल्शेविक क्रांतीनंतर स्थापित झालेल्या समाजवादी सत्तेला एकीकडे आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी 14 साम्राज्यवादी देशांचा हल्ला, घेरेबंदी आणि देशामध्ये चालू असलेल्या गृहयुद्धाचा आणि भीषण अन्न संकटाचा सामना करावा लागत होता आणि दुसरीकडे त्याचवेळी अनेक महामाऱ्यांचाही सामना करावा लागत होता. हा तोच काळ होता जेव्हा जगामध्ये स्पॅनिश फ्ल्यू नावाची महामारी पसरली होती. रशियामध्ये स्पॅनिश फ्लू पेक्षाही जास्त कहर टायफस नावाच्या आजाराने केला होता. 1918 ते 1922 च्या दरम्यान टायफसने जवळपास 25 लाख लोकांचे बळी घेतले होते. याशिवाय कॉलरा (पटकी), देवी आणि क्षयरोगाने सुद्धा महामारीचे रूप घेतले होते. लक्षात घ्या की हा तोच काळ होता जेव्हा पहिले महायुद्धही चालू होते आणि ज्यामुळे सुद्धा परजीवी विषाणूंच्या पोषणाला सहाय्य होत होते आणि सर्व आजार महामारींचे रूप घेत होते.
हे सुद्धा लक्षात घ्यावे की समाजवादी सत्तेकडे त्यावेळी अत्यंत मर्यादित संसाधने होती आणि युद्ध व गृहयुद्धाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोरचे आह्वान अजूनच कठीण झालेले होते. त्यावेळी जीवशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्रही आजच्या तुलनेत बरेच मागे होते. ॲंटीबायोटिक्स सारखी औषधेही अजून शोधली गेलेली नव्हती. युद्धामुळे दवाखाने, चिकित्सेची उपकरणे, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोठा तुडवडा होता.
अशा बिकट परिस्थितीमध्ये नवजात कामगार सत्तेने महामारीवर काबू मिळवण्यासाठी जे उपाय केले त्यांच्यापासून आजही प्रेरणा घेतली जाऊ शकते. सोवियत सत्तेने क्रांतीनंतर लगेचच आरोग्य सेवांचे राष्ट्रीयीकरण केले ज्यामुळे औषधे आणि इतर आरोग्य सुविधांचा योजनाबद्ध पद्धतीने वापर केला जाऊ शकला. काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करून आरोग्य सुविधा जनतेला मोफत उपलब्ध करवली गेली. औषधे आणि चिकित्सेच्या उपकरणांच्या उत्पादनासाठी नवीन कारखाने सुरू केले गेले आणि प्रत्येक शहरात, आणि गावामध्ये नवीन दवाखाने उघडले गेले. या तातडीने उचलल्या गेलेल्या पावलांमुळेच रशियामध्ये स्पॅनिश फ्लूवर भांडवली देशांच्या अगोदर नियंत्रण मिळवले गेले. क्रांतीचे एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच जुलै 1918 मध्ये सार्वजनिक आरोग्याची जन-कमिसारियत (नारकोमज्द्राव) स्थापन केली जिचे उद्दिष्ट सोवियत संघामध्ये आरोग्या संबंधातील संस्था, शोध आणि संशोधन, महामारीवर लक्ष ठेवणाऱ्या संस्था, चिकित्सेचे शिक्षण आणि प्रशिक्षण तसेच आरोग्य व स्वच्छतेबद्दल जागरूकता पसरवणाऱ्या संस्थांमध्ये ताळमेळ घालून एका एकीकृत आणि सार्वत्रिक व्यवस्थेची स्थापना करणे होते. नारकोमज्द्राव चे सर्व काम दोन वैचारिक स्तंभांवर आधारित होते: पहिला, लोकांच्या आरोग्यासंदर्भात सामाजिक कारकांना प्राधान्य आणि दुसरे, रोग निवारणाऐवजी रोग नियंत्रणाच्या पद्धतींना प्राधान्य.
तत्कालीन रशियन समाजाचे मागासलेपण आणि शिक्षणाचा अभाव पाहता सोवियत सत्तेने लोकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेसंबंधातील मूलभूत माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करणयचा वीडा उचलला आणि आरोग्य व स्वच्छतेला एका जनांदोलनाचे रूप दिले. आजची भांडवली सत्ता टीव्ही, इंटरनेट, आणि सोशल मिडीया असूनही आरोग्य आणि स्वच्छतेसंबंधी खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीये. पण आजपासून एक शतक अगोदर समाजवादी सत्तेने हे काम पोस्टरांद्वारे प्रभावी पद्धतीने पूर्ण करून दाखवले. शहरे, आणि गावखेड्यांमध्ये आरोग्य व स्वच्छतेविषयी जागरूकता पसरवण्याऱ्या पोस्टर्सचा भडीमार केला गेला. विक्तोर देनी आणि दिमित्री मूर सारख्या जनकलाकारांनी अशी रचनात्मक पोस्टर्स बनवण्यात मोठे योगदान दिले. ही पोस्टर्स सोप्या भाषेत आणि तक्ते,नकाशे, आणि फोटोंसहित बनवले जात जेणेकरून कमी शिकलेले आणि निरक्षर लोकही त्यांना समजू शकतील.
महामारींना पसरवण्यापासून थांबवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवणाऱ्या मोहिमेला ‘स्वच्छता प्रबोधन’ नाव दिले गेले. या मोहिमेचे वैशिष्ट्य असे होते की तिला शहरे, गावं, खेड्यांमध्ये कामगार आणि शेतकऱ्यांच्या समित्यांच्या सहभागातून चालवले गेले. मोठ्या प्रमाणात पोस्टर लावण्याखेरीज या समित्या घरांची आणि सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करत आणि लोकांमध्ये आरोग्य व स्वच्छतेसंदर्भातील महत्वाची माहिती देत तसेच नियमित अंघोळ आणि हात साफ करण्यासाठी साबणांचे वितरण करत असत. याशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आरोग्य व स्वच्छतेसंदर्भात माहिती देण्यासाठी विशेष ट्रेन चालवल्या गेल्या ज्यांमध्ये हॉस्पिटलच्या सुविधा उपलब्ध होत्या. इतकेच नाही तर सार्वजनिक स्नानघर आणि शौचालयांची व्यवस्था असलेल्या ट्रेन्स सुद्धा चालवल्या गेल्या.
क्रांती नंतर चिकित्सक, सह-चिकित्सक, नर्स, दाई, दंतचिकित्सक, फार्मासिस्ट आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याला कमी करण्यासाठी विशेष शिक्षण व प्रशिक्षण अभियान चालवले गेले. 1913 आणि 1926 च्या दरम्यान अशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 60 टक्के वाढ झाली.
‘दहा दिवस ज्यांनी दुनियेला हलवून सोडले’ सारख्या ऐतिहासिक पुस्तकांचे लेखक, प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार आणि क्रांतिकारी बुद्धिजीवी जॉन रीड याच दरम्यान रशियाच्या दौऱ्यावर होते. टायफसचा कहर इतका होता की रीड सुद्धा आजारी पडले. टायफसच्या संक्रमणामुळेच 1920 मध्येच त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरच त्यांनी सोवियत रशियातील महामारीच्या बिकट परिस्थितीबद्दल आणि समाजवादी सत्तेद्वारे महामारी संपवण्यासाठी केल्या जात असलेल्या उपायांचे विस्तृत वर्णन ‘लिबरेटर’ नियतकालिकातील एका लेखात केले आहे. या लेखात रीड लिहितात:
“टायफस, एक थांबत-थांबत येणारा ताप, एन्फ्ल्युएंझा कामगारांमध्ये वेगाने पसरत होते; गावांमध्ये एकीकडे पेलाग्रा आजाराचा कहर होता , तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मीठ सुद्धा मिळत नव्हते. दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून अर्धपोटी राहणाऱ्या लोकांची शरीरं आजारांशी लढू शकत नव्हती. मित्र देशांद्वारे रशियाला औषधं पाठवण्यावर बंदीच्या धोरणामुळे हजारो मृत्यू झाले. असे असूनही सार्वजनिक आरोग्याच्या जन-कमिसारियतने एका बलाढ्या स्वच्छता सेवेची निर्मिती केली, जी संपूर्ण रशियामध्ये स्थानिक सोवियतच्या नियंत्रणामध्ये असलेल्या आरोग्य उपविभागांचे एक नेटवर्क होती. त्यांची पोहोच त्या भागांपर्यंतही होती जिथे अगोदर कधी कोणी डॉक्टर पोहोचलाही नव्हता. प्रत्येक टाऊनशीप मध्ये आता कमीत कमी एक आणि अनेकदा तर दोन-तीन हॉस्पिटल बनवले गेले होते. या सेवातंत्रात अगोदर डॉक्टरांना संघटित केले जाई आणि अजूनही केले जात आहे. सांगण्याची गरज नाही की या सेवा पूर्णत: मोफत आहेत. आकर्षक रंगातील लाखो पोस्टर्स प्रत्येक जागी लावले गेले आहेत ज्यांमध्ये चिंत्रांच्या माध्यमातून लोकांना सांगितले गेले आहे की आजारापासून रक्षण कसे करावे आणि त्यांना घरांची, गावाची आणि स्वत:ची स्वच्छता करण्यासाठी आग्रह केला आहे. रशियामध्ये एका अखिल रशियन मातृत्व प्रदर्शनाची सुरूवात केली गेली, जिचे उद्दिष्ट मुलांना जन्म देण्याबद्दल आणि त्यांच्या पालनपोषणाबद्दल महिलांना जागरूक करणे आहे. या प्रदर्शनाला रशियाच्या दुर्गम गावांपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यात नेले गेले. प्रत्येक गावात आणि शहरात कामगार महिलांसाठी मोफत मातृत्व हॉस्पिटल आहे जिथे त्या मूल होण्याच्या आठ आठवडे अगोदर आणि नंतर वेळ घालवतात, आणि त्यांना मुलांची देखभाल करायला शिकवले जाते. या दरम्यान त्यांना पूर्ण वेतन मिळते. इतकेच नाही तर गावातील मोफत दवाखान्यांशिवाय(ज्यांची संख्या झारकालीन संख्येच्या दसपट आहे) दूधपीत्या मुलांच्या आयांसाठी विशेष सल्ला केंद्रही आहेत. इथे मुलांसाठी सगळं काही केलं जातं. अर्धउपासमार भोगणाऱ्या जर्मनीतील मुलं अत्यंत कमजोर पैदा होत आहेत, आणि मोठी होऊन त्यांच्या शरीरांमध्ये विविध विकृती निर्माण होत आहेत, याउलट अर्धउपासमार भोगणाऱ्या रशियामध्ये मुलं बादशहा आहेत.”
रशियान क्रांतीनंतर अस्तित्वात आलेल्या कामगार सत्तेच्या भगिरथ प्रयत्नांचाच परिणाम होता की 1923 पर्यंत ना फक्त तिने साम्राज्यवादी हल्ले, गृहयुद्ध आणि उपासमारीला मात दिली, उलट महामारीवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले. क्रांतीच्या या सुरूवातीच्या आपात्कालीन वर्षांमध्ये महामारीवर नियंत्रणाकरिता केलेल्या प्रयत्नांना पुढे नेते समाजवादी निर्माणाच्या काळात सोवियत रशियाने आरोग्य व स्वच्छतेवर विशेष जोर दिला आणि कष्टकऱ्यांच्या कामाची तसेच जीवनाची स्थिती आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने अभूतपूर्व यश प्राप्त केले.
क्रांतिकारी चीनने महामारींवर नियंत्रण कसे मिळवले?
1949 च्या नव्या लोकशाही क्रांतीनंतर सत्तेत आलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने सुरूवातीपासूनच लोकांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली. क्रांतीच्या एका वर्षातच 1950 मध्ये पहिली राष्ट्रीय आरोग्य कॉंग्रेस आयोजित केली गेली जिच्यामध्ये ग्रामीण आरोग्यावर जोर देणे, अभियानांच्या द्वारे रोगांना अटकाव करणे, आधुनिक आणि पारंपारिक चिकित्सा पद्धतींचा मेळ आणि आरोग्याला जनांदोलन बनवण्याचा संकल्प केला गेला. क्रांतिकारी चीन मध्ये सुरूवातीपासूनच आरोग्य, स्वच्छता आणि लसीकरणाची मोहिम छेडली गेली. 1950 ते 1952 पर्यंत जवळपास 60 कोटी लोकांना देवीची लस दिली गेली ज्यामुळे देवीच्या रोग्यांची संख्या खूप कमी झाली. टायफसच्या केसेसमध्ये 95 टक्के कपात झाली. 1957 पर्यंत चीनच्या दोन तृतीयांशापेक्षाही अधिक हिश्श्यांमध्ये मलेरिया, प्लेग, सिस्टोसोमियासीस, लिश्मैनियासीस, ब्रुसेलोसीस सारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी साथरोग नियंत्रक केंद्र उघडली गेली होती.
याच काळात ‘देशप्रेमी आरोग्य मोहिम’ सुद्धा सुरू करण्यात आली जिचे उद्दिष्ट लोकांमध्ये स्वच्छ वातावरण, सुरक्षित पिण्याचे पाणी, शौचालयांची निर्मिती आणि मलमूत्र विल्हेवाटीबद्दल जागरूकता निर्माण करणे होते. सोवियत संघाप्रमाणेच चीनने सुद्धा लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोस्टर्सचा वापर केला. 1950 च्या दशकाच्या शेवटी चार हानीकारक किड्यांच्या (माश्या, डास, उंदीर आणि चिमण्या – नंतर चिमण्यांच्या जागी ढेकूणांचा समावेश केला गेला) विरोधात जनतेला संघटित केले गेले. याप्रकारे लोकांच्या जुन्या सवयी आणि पद्धती बदलल्या गेल्या आणि स्वच्छतेचा सन्मान करण्याचा दृष्टीकोण लोकांमध्ये मूळ धरू लागला.
1965 मध्ये सांस्कृतिक क्रांती सुरू झाल्यानंतर आरोग्य सुविधांना नीट-नेटके करण्याच्या ध्येयावर अधिक जोर दिला गेला. आरोग्य मंत्रालय आणि चीनी मेडिकल असोसिएशनला “संघर्ष, टीका आणि बदल” यांचे संघर्ष केंद्र बनवले गेले. या दरम्यान मेडिकल कॉलेजांमध्ये कोणताही नवीन वर्ग सुरू केला गेला नाही आणि अगोदरच शिकत असलेल्या मेडिकल च्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देऊन गावांमध्ये पाठवले गेले.
या दरम्यान गावागावात आणि दूरवरच्या भागांपर्यंत आरोग्य सुविधा घेऊन जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची एक पूर्ण फौजच उभी केली गेली जिच्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी-युवकांना आणि विशेषत: मुलींना सामील केले गेले. ‘बेअरफूट डॉक्टर’ (अनवाणी डॉक्टर) म्हटल्या जाणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांना तीन ते सहा महिन्यांचे मूलभूत मेडिकल आणि पॅरामेडिकल प्रशिक्षण दिले जाई. हे आरोग्य कर्मचारी उपचारापेक्षा आजार नियंत्रणावर जास्त जोर देत. त्यांना लस देण्याचे, बाळंतपणाचे आणि इतर प्राथमिक उपचार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. आधुनिक चिकित्सा प्रणाली आणि औषधांसोबतच ते ॲक्युपंक्चर आणि मॉक्सिबशन सारख्या चीनी पारंपारिक चिकित्सा पद्धतींचा आणि औषधांचा वापर करत. गंभीर रोगांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ते कौंटी हॉस्पिटलला पाठवत. 1970च्या दशकात चीनच्या आरोग्य कार्यक्रमाला जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा स्विकारले होते आणि जगातील इतर भागांमध्ये सुद्धा अशाप्रकारच्या आरोग्य कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यास अनुमोदन दिले होते.
सांस्कृतिक क्रांतीच्या काळात शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना एकतर निश्चित जागी – जसे कौंटी हॉस्पिटल आणि कम्युन हॉस्पिटल किंवा ‘फिरत्या मेडिकल टीम्स’ मध्ये तैनात केले गेले. कोणत्याही वेळी प्रत्येक शहरी हॉस्पिटलचा किमान एक तृतीयांश कर्मचारी वर्ग गावांमध्ये असायचा. ते सहा महिन्यांपासून ते एक वर्षांपर्यंतचा काळ तेथे घालवत असायचे आणि वर्षातून दोनदा आपल्या कुटुंबियांना भेटू शकत होते. जर ते जास्त काळ गावांकडे घालवू इच्छित असायचे, तर ते आपल्या कुटुंबालाही सोबत ठेवू शकत होते. काही शहरी डॉक्टर्स तर कायमस्वरूपी गावांमध्ये स्थायिकही झाले.
गावांकडे पाठवण्याचे एक अजून कारण हे होते की शहरी डॉक्टर्स, मेडिकल कॉलेजांचे शिक्षक आणि संशोधक यांना कठीण मेहनत आणि शेतकऱ्यांशी संपर्क याद्वारे ‘पुनर्शिक्षित’ केले जावे. जे लोक गावांमध्ये राहून आले ते सांगत की त्यांना शेतकऱ्यांच्या कठीण जीवनाचा अंदाजही नव्हता आणि शेतकऱ्यांचा गरजा समजल्यामुळे आता वैद्यकीय सेवेप्रती त्यांचे उत्तरदायित्व कशाप्रकारे अजून वाढले आहे. 1965 अगोदरही ‘सहायकां’च्या विकासाचे प्रयत्न झाले होते, परंतु ‘सांस्कृतिक क्रांती’ दरम्यान एका नवीन पद्धतीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची निर्मिती झाली जे ‘नियमित’ डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांपेक्षा खूप वेगळे होते. या नवीन आरोग्य कर्मचाऱ्यांना आकड्यांमध्ये मोजताना आरोग्य कर्मचारी म्हणून मोजले जात नव्हते. त्यांची मोजणी कृषी श्रमिक (अनवाणी डॉक्टर्स), उत्पादन श्रमिक (श्रमिक डॉक्टर्स), किंवा गृहिणी आणि सेवानिवृत्त लोकांमध्ये (रेड मेडिकल वर्कर) केली जाई आणि ते स्वत:लाही तसेच समजत.
याशिवाय आरोग्य सेवांच्या संरचनेत मोठे बदल केले गेले. या संबंधात सर्वात मोठा मुद्दा 1949 नंतर एका उच्चभ्रू मॅनेजर्स आणि बुद्धिजीवींच्या गटाचा विकास होता, ज्याला माओ आणि त्यांचे साथी प्रतिक्रांतिकारी प्रवृत्ती मानत होते. 1971 मध्ये इतर संघटनांप्रमाणेचे आरोग्य संघटनांचे नेतृत्व सुद्धा ‘क्रांतिकारी समित्यां’च्या हातात आले होते. या समित्यांमध्ये ‘जन मुक्ती सेने’चे प्रतिनिधी, कॅडरचे सदस्य आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी ‘तीनास-एक’ प्रमाणात असत.
या प्रयत्नांच्या परिणामी क्रांतिकारी चीनने ना फक्त महामाऱ्यांचा यशस्वी सामना केला, तर तेथील लोकांच्या आयुर्मानात आणि जीवनस्तरात जबरदस्त सुधारही झाला. याचा अंदाज या आकड्यावरून येऊ शकतो की क्रांतीपूर्व चीनमध्ये नवजात मृत्यू दर 1000 पैकी 300 इतका होता, जो 1970 चे दशक येता-येता 40 वर खाली आला होता, जो अमेरिकेसारख्या विकसित देशांच्या समतुल्य होता.
कामगार बिगुल, मे 2021