चांगले जीवन, स्वच्छ पाणी, शौचालय आणि परिसरातील स्वच्छतेच्या अधिकारासाठी भारताच्या क्रांतिकारी कामगार पक्षाने मुंबईच्या मानखुर्द विभागात चालवले जनसाफसफाई अभियान

बिगुल पत्रकार

भारताच्या क्रांतिकारी कामगार पक्षाने ४ जुलै रोजी चांगले जीवन, पाणी, शौचालय व स्वच्छतेच्या मुद्याला घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभाग (गोवंडी) येथे आयुक्तांना निवेदन दिले. या अगोदर या प्रश्नावर मानखुर्द गोवंडी विभागातील लल्लुभाई कंपाऊंड, साठेनगर, झाकीर हुसेन नगर मध्ये अभियान चालवण्यात आले. लोकांमध्ये अभियान चालवत असतांना समर्थनात हजारो स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

सोबतच पत्रके वाटून चौक सभा घेत सांगण्यात आले कि आपल्या या भारतात दोन चित्र पाहायला मिळत आहेत. पत्रकाद्वारे देशातील आर्थिक विषमतेचे चित्र मांडले गेले. एका बाजूला कुपोषणामुळे होणारे मृत्यू आणि दुसरीकडे धनदांडग्यांची ऐयाशी, एकीकडे महासत्तेच्या वल्गना आणि दुसरीकडे पाणी, साफ-सफाई, शौचालय व स्वच्छते सारखे मुलभूत प्रश्न सुद्धा वर्षानुवर्षे प्रलंबित असणे हा विरोधाभास यातून प्रकर्षाने मांडण्यात आला. मुंबई शहराची दोन चित्र, ज्यात एका बाजूला मोठ-मोठे रुंद रस्ते, हॉस्पिटल, स्वच्छ पाणी, चोवीस तास वीज यासारख्या अनेक सुविधा आणि दुसरीकडे याच सगळ्या सुविधा निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांच्या गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, मंडाला सारख्या गरिबांच्या वस्त्या जिथे सर्वत्र घाणीचे, प्रदूषणाचे, देवनार डम्पिंग ग्राउंड व दुसरीकडे बायोगॅस ट्रीटमेंट प्लांट (एस एम एस) चे साम्राज्य आणि नरकासमान जिंदगी या पत्रकातून जनतेसमोर मांडली गेली. ‘सुंदर’ मुंबईला सुंदर ठेवणाऱ्यांचे जीवन नरक बनवणाऱ्या नफेखोर, भांडवली व्यवस्थेचा यात पर्दाफाश करण्यात आला.

मानखुर्दच्या गरीब, कामगार, कष्टकरी जनतेने आपल्या मूलभूत अधिकारांसाठी खालील मागण्यांना घेऊन आयुक्तांना निवेदन दिले.

१) २४ तास ३६५ दिवस स्वच्छ पिण्याचे पाणी द्या. डब्ल्यू. एच .ओ (जागतिक आरोग्य संघटना) च्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीला १५० लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला पाहिजे पण झोपडपट्ट्या,वस्त्या, चाळी व लल्लुभाई कंपाऊंड सारख्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना ५० ते २५० रुपये पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी खर्च करावे लागतात. तेव्हा मुंबईच्या श्रीमंत भागांप्रमाणे मानखुर्द मध्ये 24 तास नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

२) लोकसंख्येच्या प्रमाणात निशुल्क शौचालयाची व्यवस्था असावी व त्याची साफसफाई आणि देखरेखेची जबाबदारी सरकारने म्हणजे बीएमसीने घ्यावी. स्वच्छ भारत अभियानाच्या मते २५ महिला व ३० पुरुषावर एक शौचालये असायला पाहिजे. परंतु मानखुर्द मधील झोपडपट्यात परिस्थिती अशी आहे की १९० पेक्षा जास्त लोकसंख्येवर एक शौचालय आहे. त्यात देखील कुठे पाणी नाही, कुठे वीज नाही, तर बहुतेक ठिकाणी साफ-सफाई देखील केली जात नाही. बहुतेक ठिकाणी वेळच्यावेळी दुरुस्तीच्या अभावाने भिंत पडणे, छत कोसळणे, किंवा शौचालये कोसळल्याने कित्येक लोकांचे जीव देखील गेले आहेत. त्यामुळे शौचालयाचे बांधकाम देखील त्वरित पक्के करण्यात यावे.

३) साठणारे व तुंबणारे खराब सांडपाणी या समस्येला थांबण्यासाठी पक्के नाले व गटार बनविण्यात यावे. जुने गटार व नाले दुरुस्ती करून त्वरित पक्के बनविण्यात यावे. पावसाळ्यात साठणाऱ्या खराब पाण्याच्या प्रकाराला रोखण्यासाठी त्वरित कारवाई केली जावी. त्यामुळे डेंगू मलेरिया लेप्टोसायरोसीस सारखे आजार पसरणार नाहीत.

४) रस्त्यावर जागोजागी कचरा पेट्या लावण्यात याव्यात. विभागात कुठेही रस्त्यावर कचरा साठणार नाही याची गांभीर्याने काळजी घेण्यात यावी व तशी ठोस पावले उचलावीत. बीएमसीच्या दत्तक वस्ती योजने अंतर्गत झोपडपट्टी व रस्त्यांची साफसफाई नियमित करण्यात यावी. या जागेवर तात्काळ जबाबदारीने पावले उचलून किंतु-परंतु न करता काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

निवेदन दिल्यानंतर उपस्थित लोकांना या अभियानाला पुढे देखील सुरु ठेवण्याचे आव्हान करण्यात आले. हा या अभियानाचा पहिला टप्पा होता. आपल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर हा संघर्ष अजून तीव्र रूप धारण करेल असा इशारा देण्यात आला.