महान अय्यंकाली यांच्या वारशाला विसरू नका!
क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!

 

आपल्यापैकी कदाचित काही जणांनीच महान जाती-विरोधी योद्धे अय्यंकाली यांचे नाव ऐकले असेल. याचे कारण समजून घेता येऊ शकते. अय्यंकाली त्या जातीविरोधी योद्ध्यांपैकी होते, ज्यांनी ब्राह्मणवादी आणि त्यांच्या सत्तेपासून समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी एक झुंझार लढाई लढली आणि यशस्वी झाले. त्यांनी त्या सरकारची वाट पाहिली नाही, जे सरकार क्वचितच ब्राह्मणवादी आणि उच्चजातीयांच्या सामंतांच्या विरोधात जात होते; कारण सुरूपासून अंतापर्यंत सामंती ब्राह्मणवादी शक्ती या ब्रिटीश सत्तेचे पाय चाटणाऱ्या आणि समर्थक होत्या. अय्यंकाली यांनी सुधारणांसाठी अर्ज विनंत्यांचे काम नाही केले, उलट सडकेवर उतरून ब्राह्मणवाद्यांना खुले आवाहन दिले आणि त्यांना हरवले सुद्धा. अय्यंकालींनी सिद्ध केले की दडपलेली आणि अत्याचार झालेली लोकं ना फक्त लढू शकतात, तर जिंकू सुद्धा शकतात. अय्यंकालींचा संघर्ष आज जातीअंताच्या लढ्यासाठी अत्यंत प्रासंगिक आहे. आज अय्यंकालींच्या संघर्षाची आठवण काढणे जातीअंताच्या आंदोलनाला सुधारवाद आणि व्यवहारवादाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी जरूरी आहे.

कोण  होते अय्यंकाली?

अय्यंकालींचा जन्म 28 ऑगस्ट 1863 ला ब्रिटीश भारतातील दक्षिणेकडील त्रावणकोरच्या संस्थानातील तिरूवनंतपुरम जिल्ह्याच्या वेंगनूर मध्ये झाला. त्यांचा जन्म केरळमधील सर्वाधिक दमित आणि अत्याचारित दलित जातींमधील एक असलेल्या पुलयार जातीमध्ये झाला. त्रावणकोर मध्ये पुलयार लोकांना ब्राह्मणवादी उतरंडी मध्ये सर्वात खालचे स्थान देण्यात आले होते. त्यांना नायर जातीच्या जमिनदारांपासून ते ब्राह्मणांपर्यंत सर्वांचे अपमान आणि पाशवी पद्धतीचे दमन आणि अत्याचाराचा सामना करावा लागत होता. या स्थिती मध्ये अय्यंकालींच्या मनात बंडाची आग लावली. सुरूवातीला तर ते आपल्या इतर पुलयार मित्रांसोबत मिळून काम केल्यावर अशा गीतांची आणि नृत्याची निर्मिती करू लागले जे या स्थितीच्या विरोधात आवाज उचलत होते. यामुळे अनेक युवक दलित त्यांना येऊन मिळू लागले. अय्यंकाली सुरूवातीपासूनच समजत होते की उच्च जातींद्वारे दलितांचे दमन आणि त्यांच्या विरोधात केल्या जाणाऱ्या हिंसेच्या प्रश्नावर इंग्रज सरकार काहीच करणार नाही. त्यामुळे या दमन आणि हिंसेचे उत्तर त्यांनी स्वत: रस्यावर देण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या आजूबाजूला युवकांचा एक समूह अस्तित्वात येऊ लागला आणी हा समूह प्रत्येक हल्ल्याचे उत्तर ब्राह्मणवाद्यांना रस्त्यांवर देऊ लागला. ही हिंसा खरेतर आत्मरक्षणा साठी केली जाणारी हिंसा होती. पण या प्रकारच्या पलटवाराने ब्राह्मणवादी शक्ती धाकात आल्या. अय्यंकालींच्या या मार्गावर चालण्यामुळे दलित सामान्य कष्टकरी जनता त्यांच्यावर प्रेम करू लागली आणि त्यांना अनेक उपाधी दिल्या. जसे की उर्पिल्लई आणि मूथपिल्ला (मोठा भाऊ)।

अय्यंकाली अनेक प्रकारच्या धार्मिक सुधारकांनी प्रभावित झाले ज्यामध्ये अय्यावू स्वामिकल आणि नारायण गुरू हे प्रमुख होते. हे दोघेही हिंदू धर्मामधील जातीय भेदभावा विरुद्ध संघर्ष करत होते. मानवतावाद त्यांच्या धार्मिक तत्वज्ञानाचा आधार होता. हेच कारण होते की नारायण गुरूंनी आपल्या एक रचनेत हिंदू देवतांसोबतच येशू ख्रिस्त आणि पैगंबर मोहंमद यांना सुद्धा ईश्वराच्या रूपात स्विकारले होते आणि म्हटले होते की हे सगळे एकाच मानवतावादी विचाराचे समर्थन करतात आणि हे विचार जाती व्यवस्थेच्या विरोधात आहेत. अय्यंकाली तत्वज्ञानाच्या स्तरावर धार्मिक सुधार आंदोलनाच्या पुढे गेले नाहीत. या रुपाने ते एक सामाजिक आणि राजकीय क्रांतिकारक तर होते, पण वैज्ञानिक भौतिकवादी दृष्टीकोनापर्यंत पोहोचू शकले नव्हते. याचे एक कारण हे पण होते की अय्यंकाली निरक्षर होते आणि त्यांच्याकडे कोणतेही विज्ञानाचे शिक्षण नव्हते. सोबतच, त्यांच्या वेळी केरळच्या समाजामध्ये तर्कवाद आणि भौतिकतावादाला प्रस्थापित करण्याची लढाई अजूनही भ्रुणरूपातच होती. पण कोणत्याही लोकनेत्याचे किंवा संघटनेचे प्रगतीशील असल्याचे परिंमाण हे असू शकत नाही की ते भौतिकतावादी होते की नाही, उलट हे असते की ते आपल्या काळातील दमन आणि शोषणाविरोधात क्रांतिकारी पद्धतीने लढले की नाही. म्हणजे ते दमनकारी सत्तेच्या विरोधात दृष्टीकोण स्विकारतात की नाही. जर कोणी भौतिकतावाद मानूनही राजकीय स्वरूपात सुधारवाद आणि व्यवहारवादावर चालेल, तर ऐतिहासिक रित्या त्यांना क्रांतिकारी प्रगतीशील मानता येणार नाही. जर ही गोष्ट मानली नाही तर संपूर्ण इतिहासामध्ये वैज्ञानिक भौतिकतावाद्यांशिवाय कोणीच प्रगतीशील राहणार नाही: ना स्पार्टाकस, ना मौर्य काळात झालेले पहिले क्षुद्रांचे आणि दलितांच्या विद्रोहांचे नेते, ना बिरसा मुंडा, ना चिनी तायपिंग शेतकरी विद्रोहाचे नेते, आणि ना भारतातील इंग्रजांविरोधातील सुरुवातीच्या काळातील हत्यार उचलणाऱ्या क्रांतिकारक धारा जसे ‘युगांतर’आणि ‘अनुशीलन’.

परंतु असे असूनही सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की अय्यंकाली आपल्या काळातील संघर्षांच्या पद्धतीमध्ये एक वैज्ञानिक आणि भौतिकवादी होते. ते कोणत्याही दलित आणि अत्याचारित जनतेच्या संघर्षांमध्ये बळाच्या वापराच्या भुमिकेला समजत होते. ते समजत होते की लुटखोर आणि दमनकारी शासकांना सल्ला आणि प्रस्ताव देऊन त्यांचे मन बदलणे शक्य नाही कारण त्यांचे शासनच कष्टकरी आणि दलित जनतेच्या लुटीवर आणि दडपशाहीवर टिकलेले आहे. त्यांना संघटीत होऊन आपल्या शक्तीच्या आधारावरच झुकवले जाऊ शकते. त्यामुळे ते कोणत्याही ईश्वरीय शक्तीच्या आधारावर बसून राहिले नाहीत, उलट त्यांनी दमन आणि अत्याचारा विरोधात स्वत: सडकेवर उतरून संघर्ष केला. ते ब्रिटीश सरकार विरोधातही बसून राहिले नाहीत, उलट संघटीत जनतेच्या बळप्रयोगातून त्यांनी ब्राह्मणवादी शक्तींना झुकण्यासाठी बाध्य केले.

अय्यंकालींचे महत्व आज सर्वात जास्त याच गोष्टी साठी आहे. आज सुद्धा सुधारवाद आणि व्यवहारवादाचा विचार जातीअंताच्या आंदोलनात प्रभावी आहे. हाच विचार या आंदोलनाला अनेक दशकांपासून सरकारला अर्ज देणे, विनंत्या करणे, या नाही तर त्या भांडवली पक्षाचे शेपूट पकडून चालणे आणि अस्मितावादाच्या पोकळ विचारांच्या पुढे जाऊ देत नाहीये. अशामध्ये जातीअंताच्या आंदोलनाला योग्य रुपात पुढे नेण्यासाठी अय्यंकालींच्या आंदोलनाचा वारसा अत्यंत महत्वाचा आहे. खेदाची बाब अशी की अधिकांश कष्टकरी दलित भाऊ आणि बहिण त्यांच्याबद्दल जाणतच नाहीत, कारण ज्या प्रकारे भारतातील भांडवली सत्त्तेने दलित आंदोलनामध्ये सुधारवादी आणि व्यवहारवादी प्रवृत्त्तींना प्रोत्साहन दिले आहे, त्याच प्रकारे तिने अशा सर्व जाती विरोधी योद्ध्यांच्या वारशाला लपवले आहे आणि दूर केले आहे, जे जाती अंताच्या लढ्यामध्ये क्रांतिकारी मार्गाने सत्ता विरोधी रस्ता अवलंबणे जाणत होते.

अय्यंकालींनी काय केले?

अय्यंकालींनी खुल्या पद्धतीने ब्राह्मणवादी वर्चस्वाला आह्वान देत 1893 मध्ये एक असे आंदोलन सुरू केले, ज्याने केरळच्या समाजाचा चेहरा बदलला. अय्यंकालींनी एक बैलगाडी विकत घेतली (ज्याची परवानगी दलितांना नव्हती), असे कपडे घातले ज्याचा अधिकार फक्त उच्चजातीयांना होता, आणि एका सार्वजनिक रस्त्यावर मधोमध हातात हत्यार घेऊन निघाले. त्यावेळी पुलयारांना आणि इतर दलितांना हा अधिकार नव्हता की त्यांनी सार्वजनिक रस्त्यांवर चालावे. त्यांना रस्त्याच्या किनाऱ्यावरील माती आणि चिखलात चालावे लागत होते. जेव्हा अय्यंकालींनी ही विद्रोहाची कारवाई केली, तेव्हा ब्राह्मण आणि इतर उच्च जातीच्या लोकांचा रागाने तीळपापड झाला. पण अय्यंकालींच्या हातामध्ये हत्यार पाहून कोणालाही त्यांना थांबवण्याची हिंमत झाली नाही. अय्यंकालींच्या या कारवाईने पूर्ण त्रावणकोर संस्थानातील दलितांमध्ये एक लहर पसरली. जागोजागी दलितांनी या प्रकारच्या बंडखोर कारवाया चालू केल्या. यामुळे अनेक जागी दलित आणि उच्च जातीय सामंती शक्तींमध्ये रस्त्यांवर हिंस्त्र संघर्ष झाले. यांना चेलियार दंगली म्हणून ओळखले जाते. दोन्ही बाजूचे लोक दगावले. पण या विद्रोहामुळे सन 1900 पर्यंत ही स्थिती निर्माण झाली होती की केरळमध्ये बहुतांश सार्वजनिक रस्त्यांवर चालण्याचा अधिकार दलितांना मिळाला होता. हा अय्यंकालींचा पहिला मोठा क्रांतिकरी संघर्ष आणि विजय होता.

काही पुलयारांना ख्रिश्चन मिशनरी शाळांमध्ये शिक्षणाचा मर्यादित अधिकार मिळाला होता. पण शिक्षण घेण्यासाठी त्यांना ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागत होता. पण अय्यंकालींचे मानणे होते की सर्व सार्वजनिक शाळांमध्ये दलितांना बरोबरीने शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे. ब्रिटीश सरकारने म्हणायला 1907 साली दलित मुलांना सरकारी शाळांमध्ये प्रवेशाचा अधिकार दिला, पण स्थानिक अधिकारी सहजपणे हा अधिकार काढून घेत. असे नव्हते की ब्रिटीश सरकारला हे माहित नव्हते. पण त्यांनी कधी अशा ब्राह्मणवाद्यांविरोधात कोणतीच कारवाई केली नाही कारण भारतातील ब्रिटीश सत्तेचा सर्वात प्रमुख आधार ब्राह्मणवादी सामंती शक्तीच होत्या. अय्यंकालींनी 1907 मध्येच साधु जन प्रपालना परिषद (गरिबांच्या रक्षणासाठी संघटन) बनवले होते. पहिले तर अय्यंकालींनी पुलयारांद्वारे संचालित शाळांना स्थापित करण्यासाठी आंदोलन केले. पण यानंतर त्यांनी त्यांचे आंदोलन सरकार आणि ब्राह्मणवादी सामंताविरुद्ध वळवले. याचे कारण हे होते की त्यांनी एका दलित मुलीचा दाखला एका सरकारी शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या उत्तरामध्ये ब्राह्मणवाद्यांनी दलितांवर हिंस्त्र हल्ले केले आणि ऊरुट्टमबलम मध्ये एका शाळेला जाळून टाकले. याच्या उत्तरामध्ये अय्यंकालींनी सर्व भुमीहीन मजुरांचा एक संप घडवून आणला. यामध्ये अधिकांश दलित होते. हा आधुनिक भारतातील दलितांचा पहिला संप होता. या संपाला अय्यंकालींनी तोपर्यंत चालू ठेवले जोपर्यंत सर्व दलित मुलांना सरकारी शाळांमध्ये बिना अडथळा दाखल्याचा अधिकार मिळाला नाही. या काळात जेव्हाही दलितांवर उच्च जातीय सामंतांनी हल्ले केले तेव्हा अय्यंकालींच्या संघटनेच्या नेतृत्वामध्ये दलितांनी सुद्धा परतवार केले. याच कारणामुळे उच्च जातीय सामंतांना आता हल्ला करण्या अगोदर शंभर वेळा विचार करावा लागत होता आणि त्यांचे हल्ले नगण्य होत गेले. याच आंदोलनाने जनतेच्या क्रांतिकारी पुढाकाराला चालना दिली आणि त्यांनी स्वत: संघटीत होऊन सत्तेविरुद्ध आंदोलनाचा रस्ता दाखवला. ही त्या वेळी फार मोठी गोष्ट होती.

अय्यंकालींनी पुलयार जातीतील स्त्रियांच्या शरीराचा वरचा भाग झाकण्याच्या अधिकारासाठी आंदोलनामध्ये केंद्रिय भुमिका निभावली. नादर लोकांना हा अधिकार त्यांच्या आंदोलनामुळे अगोदरच मिळाला होता, पण पुलयारांना हा अधिकार 1915 मध्ये जाऊन मिळाला. या आंदोलनामध्ये सुद्धा अय्यंकालींनी कोणत्याही प्रबुद्ध प्रशासकाला अर्ज देणे वा बुद्धिजीवींद्वारे सरकारला अर्ज विनंत्या करण्यावर नाही तर जनतेच्या संघटीत पुढाकारावर भरवसा केला. या सर्व आंदोलनांद्वारे अय्यंकालींनी दाखवले की समाजामध्ये दलितांना वास्तविक अधिकार मुलगामी जनसंघर्षांच्या माध्यमातून मिळावा. त्यांचा पहिला जोर नेहमीच सरकारच्या विरोधातील जनतेच्या मुलगामी संघर्षांना संघटीत करण्यावर होता. ते सरकारला अर्ज विनंत्या देण्यावर कमी विश्वास ठेवत होते आणि मानत होते की गोष्टी सरकारला दिलेल्या निवेदनांनी बदलत नाहीत कारण सरकार गरिब आणि दलितांच्या बाजूने नसते तर उलट ते शासक वर्गाची बाजू घेते. ते जाणत होते की सरकारच्या विरोधातील झुंझार जनसंघर्षांतूनच गोष्टींना बदलणे शक्य आहे.

अय्यंकालींपासून आजच्या जातीअंताच्या आंदोलनाने काय शिकले पाहिजे?

अय्यंकालीं पासून आजचे जातीअंताचे आंदोलन तीन गोष्टी शिकू शकते आणि शिकल्याच पाहिजेत. पहिले, जनतेची शक्ती पुढाकारावर भरवसा, आणि दुसरे निवेदन, अर्ज, विनंत्यांच्या ऐवजी मुलगामी सत्ताविरोधी जनसंघर्षांमधून दलित मुक्तीचा संघर्ष. खेदाची बाब अशी की दलित मुक्ती संघर्षाचा मोठा हिस्सा आज सुधारवाद, व्यवहारवाद आणि अस्मितावादाच्या दलदलीमध्ये फसत चालला आहे. या व्यवहारवादाच्याच तार्किक परिणामामुळे आज आठवले, मायावती, उदित राज, पासवान आणि थिरुमावलन सारखे लोक निर्माण होत आहेत जे सर्वणवादी प्रतिक्रियावादी आणि भांडवली शक्तींच्या कडेवर जाऊन बसतात आणि दलित अस्मितेच्या नावावर दलित कष्टकरी जनतेला छळतात. जोपर्य़ंत जाती अंताचे आंदोलन या व्यवहारवाद, सुधारवाद आणि अस्मितावादाच्या दलदलीतून बाहेर पडणार नाही तो पर्यंत आपल्या स्थितीमध्ये पायाभूत बदल होणार नाहीत.

तिसरी गोष्ट ही की अय्यंकालींनी जाती अंताच्या आंदोलनाला वर्ग संघर्षाची जोड दिली जेव्हा त्यांनी भुमीहीन कामगारांच्या संपाला संघटीत केले आणि ते सुद्धा यासाठी की सर्व दलित मुलांना सरकारी शाळांमध्ये बिना भेदभाव शिक्षण मिळावे. त्यांनी आपल्या संघटनेला सुद्धा गरिब कष्टकऱ्यांची संघटना म्हटले, ना की एखाद्या विशिष्ट जातीची. आज सुद्धा याच गोष्टीला समजावे लागेल की जर आपण दलित मुक्तीच्या संघर्षामध्ये दलित जातीय अस्मितेला आधार बनवला, तर लढाई सुरू होण्या अगोदरच हारून जाऊ, कारण या प्रकारे आपण ब्राह्मणवादी शक्तींना ही संधी देतो की त्यांनी गैरदलित जातींमध्ये अस्मितावाद भडकवावा. जर जाती आपल्या अस्मितांच्या आधारावर आरुढ झाल्या तर काय आपण जाती अंताची लढाई जिंकू शकतो? कधीच नाही !

ब्राह्मणवादी भांडवली शक्तींना पराजित करण्याचा मार्ग काय? हाच की आपण गैर-दलित जातींमधील गरिब कष्टकरी लोकांना सुद्धा जाती अंताच्या आंदोलनासोबत जोडावे आणि त्यांना दाखवावे की त्यांचा खरा शत्रू खुद्द त्यांच्या आणि इतर जातीतील कुलीन आणि श्रीमंत आहेत, जे सर्व संसाधनांवर कब्जा करून बसले आहेत. सर्व कष्टकरी लोकांच्या वर्ग एकतेच्या बळावरच दलित कष्टकरी लोकसंख्या कष्टकरी म्हणून आपल्या हक्कांना जिंकू शकते आणि सोबतच जाती अंताच्या द्वारे आपली मुक्ती प्राप्त करून घेऊ शकते. अस्मितांच्या टक्करीत आपण नेहमीच हारू. यामध्ये सर्व गरिब कष्टकरी हारतील, मग ते कोणत्याही जातीचे असोत. त्यामुळे आपल्या संघर्षांची जमीन असेच एक राजकारण असू शकते जे जातीअंताच्या प्रश्नाला ठोसपणे उचलत असेल. याच वर्ग आधारित समाईक संघर्षाच्या माध्यमातून सर्व गैर-दलित जातींमधील गरिब कष्टकरी जातीय पूर्वाग्रहांना सुद्धा एका दीर्घ प्रक्रियेत मित्रत्वपूर्ण संघर्षांनी समाप्त केले जाऊ शकते. जरा विचार करा साथींनो! आज अस्मितांच्या टक्करीच्या माध्यमातून सर्व कष्टकरी लोकसंख्येचे जातीय पूर्वाग्रह समाप्त झाले आहेत, की वाढले आहेत. ते सतत वाढले आहेत आणि याचा परिणाम सर्वात जास्त सामान्य कष्टकरी दलित लोकसंख्या आणि सर्व कष्टकरी लोकसंख्येला भोगावे लागत आहेत. अय्यंकालींचा वारसा आपल्याला दाखवतो की सत्तेच्या विरोधात मुलगामी संघर्ष आणि जाती अंताच्या लढाईमध्ये सर्व कष्टकरी जनतेला सोबत घेऊनच आपण जाती व्यवस्थेविरोधात योग्य पद्धतीने लढू शकतो.

अनेक जाती विरोधी व्यक्तीत्वांना खुद्द भारत सरकारनेच स्वातंत्र्यानंतर प्रचारितप्रसारित केले आहे, पण अय्यंकालींना नाही. का? कारण अय्यंकाली मुलगामी पद्धतीने आणि झुंझार पद्धतीने रस्त्यांवर उतरून संघर्षांचा रस्ता स्विकारत होते, कारण अय्यंकाली सरकारच्या सदिच्छेवर किंवा समजदारीवर भरवसा करत नव्हते, उलट जनतेच्या पुढाकारावर भरवसा करत होते. सत्ताधारी वर्ग सुद्धा त्यांच्या मार्गाच्या आणि कार्याच्या या बाजूवर गप्प बसून असतो कारण जर कष्टकरी दलित आणि दडपलेली जनता त्यांच्याबद्दल जाणेल, तर त्यांच्या मार्गाबद्दलही जाणेल आणि हे सध्याच्या भांडवली आणि जातीयवादी सत्तेला कधीच मान्य नसेल की त्यांच्या विरोधात मुलगामी संघर्षांच्या रस्त्याने जनतेने जावे आणि स्वत:च्या पुढाकारावर भरवसा निर्माण करावा. हेच कारण आहे की अय्यंकालींच्या वारशाला जनतेच्या शक्तीने लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या स्मृतींना प्रगतीशील शक्तींनी जिवंत ठेवले पाहिजे.