महान ऑक्टोबर क्रांतीच्या शताब्दी वर्षाची सुरुवात
ऑक्टोबर क्रांतीच्या स्मृतींतून प्रेरणा घ्या! नव्या शतकाच्या नव्या समाजवादी क्रांतीची तयारी करा!!

गेल्या ७ नोव्हेंबर रोजी महान ऑक्टोबर क्रांतीला ९९ वर्षे पूर्ण झाली आणि तिचे शताब्दी वर्ष सुरू झाले. जगभरातील कष्टकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे. हे वर्षभर जगभरातील क्रांतिकारी कामगार आणि कम्युनिस्ट संघटना ऑक्टोबर क्रांतीच्या गौरवशाली वारशाचे स्मरण करतील तसेच भविष्यातील संघर्षासाठी संकल्प करतील. कामगार वर्गाच्या ऐतिहासिक विजयाचा हा उत्सव आहे.

जगभरात भांडवली व्यवस्था संकटात सापडलेली असताना आपण ऑक्टोबर क्रांतीच्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहोत. गेल्या ८ वर्षांपासून भांडवली व्यवस्थेला विळखा घालून बसलेली मंदी ओसरता ओसरत नाहीय. संकटातून बाहेर पडण्याचे दावे दर वर्षी कार्पोरेट घरण्यांचे बोरूबहाद्दर अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिजीवी करीत आहेत. परंतु अति उत्पादन आणि भांडवलाच्या अति संचयाच्या संकटातून बाहेर पडण्याऐवजी भांडवली व्यवस्थेचा पाय खोलातच जात आहे. या संकटाचे ओझे कष्टकरी जनतेच्या पाठीवर लादण्याचे काम जगभरातील सत्ताधारी करीत आहेत. म्हणूनच नफ्याची आंधळी हाव आणि जुगारातून झटपट नफा कमावण्याच्या शर्यतीने जे संकट निर्माण केले आहे, त्याचे ओझे सरकारी खर्चातील कपात (म्हणजेच शिक्षण, आरोग्य, शेती, खाद्यान्न आणि इतर मूलभूत वस्तूंच्या दरातील वाढ), कामगार कपात, तालाबंदीतून होणारी बेरोजगारी आणि महागाईच्या रूपात कामगार वर्गाच्या खांद्यावर टाकले जात आहे. त्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कष्टकरी जनता रस्त्यावर उतरते आहे. कित्येक देशांमध्ये लोकविद्रोहसुद्धा भडकले. अरब देशांमध्ये गेल्या काही वर्षांत काही मोठे लोकविद्रोह झाले. ट्यूनिशिया आणि इजिप्तमध्ये या विद्रोहांनी अलोकप्रिय सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचले.  इजिप्तमध्ये मुस्लिम ब्रदरहूडच्या धार्मिक कट्टरतावादी सत्तेलाही लोकविद्रोहाने उलथून टाकले. परंतु तिच्या जागी आलेली हुकूमशाहीसुद्धा सामान्य कष्टकरी जनतेचे दमन करणारीच ठरली. म्हणूनच इजिप्त आजही धुमसते आहे. संकटातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी साम्राज्यवादी अमेरिका आणि युरोप जगभरात, आणि प्रामुख्याने मध्य-पूर्व आणि युक्रेनमध्ये युद्धे भडकवीत आहेत. भारतीय भांडवलदार वर्गसुद्धा संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, गरीबी आणि महागाई यांच्यापासून कष्टकरी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी युद्धाचा उन्माद पेटवण्यापासून धार्मिक तणाव आणि जातीय झगडे पसरवण्यापर्यंत वेगवेगळे डावपेच खेळतो आहे. आर्थिक संकटाच्या या काळात जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये फासीवादी शक्ती बळकट होत आहेत. कित्येक ठिकाणी त्यांनी सत्ता हस्तगतही केली आहे. कित्येक देशांमध्ये प्रतिक्रियावादी, उजवे आणि कामगारविरोधी पक्ष किंवा नेते सत्तेचे सोपान चढत आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये वंशवादाला खतपाणी घालून कामगार वर्गामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रवासी कामगारांच्या विरोधात गोऱ्या कामगारांना भडकवले जात आहे. गोऱ्या जनतेमध्येच वर्ग अंतर्विरोध वाढत आहेत, हे यामागचे खरे कारण आहे. भारतातही कामगार वर्गामध्ये जाट आणि बिगर जाट, पटेल-पाटीदार आणि बिगर पटेल पाटीदार तसेच मराठा आणि बिगर मराठा अशी फूट पाडण्याची आणि आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांच्यामध्ये झगडे लावून देण्याची कारस्थाने शिजत आहेत. या सर्व कारस्थानांवरून हेच दिसून येत आहे की भांडवलदार शासक वर्ग आर्थिक संकटामुळे राजकीय संकटाच्या भोवऱ्यातही अडकला आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रंप यांची निवडसुद्धा हेच सुचवीत आहे. परंतु ही कारस्थाने जगाच्या कानाकोपऱ्यात कामगार वर्गाला स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्यापासून अडवू शकलेली नाहीत. ग्रीस, इटली, पोर्तुगाल आणि स्पेनसारखे दक्षिण युरोपमधील अनेक देशसुद्धा आज कामगार आणि तरुणांच्या व्यवस्थाविरोधी आंदोलनांच्या कचाट्यात सापडले आहेत. आपल्या देशातसुद्धा होंडाच्या कामगारांपासून लुधियानातील टेक्सटाइल पट्ट्यातील कामगार, दिल्लीच्या इस्पात कामगारांपासून तिरुपूर आणि यनमचे कामगार आणि चेन्नईच्या आटोमोबाइल कामगारांपासून केरळमधील मुन्नारचे चहा मळ्यातील कामगार गेल्या काही वर्षांपासून रस्त्यावर उतरत आहेत. अशा खळबळजनक काळात आपण ऑक्टोबर क्रांतीच्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहोत. अशा वेळी ऑक्टोबर क्रांतीचे स्मरण कामगार वर्गाने नेमके कशासाठी करायचे? त्यासाठी अगोदर ऑक्टोबर क्रांतीमध्ये नेमके काय झाले होते ते थोडक्यात समजून घेतले पाहिजे. कारण आज असंख्य कामगार आपल्या या महान जागतिक वारशाबद्दल अनभिज्ञ आहेत.

महान ऑक्टोबर क्रांतीत नेमके काय झाले?

१९१७ साली रशियामध्ये एक असे परिवर्तन झाले ज्याने जगाच्या इतिहासाला नवे वळण दिले. एक नवे युग सुरू झाले. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासूनच जागतिक भांडवलशाही संकटाला तोंड देत होती. युरोपमधील वेगवेगळे साम्राज्यवादी देश जगभरातील कष्टकरी जनतेच्या आणि गुलाम राष्ट्रीयतांच्या लुटीमध्ये हिस्सेदारीसाठी आपापसात झगडत होते. त्या वेळेपर्यंत ब्रिटन साम्राज्यवादी जगातील सर्वात प्रमुख शक्ती होता. फ्रान्स हा दुसरी महत्त्वाची वसाहतवादी साम्राज्यवादी शक्ती होता. परंतु एकोणिसावे शतक संपता संपता जर्मनी वेगाने एक प्रमुख आर्थिक शक्ती बनून पुढे आला. दुसरीकडे संयुक्त राज्य अमेरिकेचासुद्धा सर्वात मोठ्या औद्योगिक शक्तीच्या रूपात उदय झालेला होता. परंतु जर्मनीकडे आपल्या विपुल भांडवलाच्या गुंतवणुकीसाठी आणि त्याचबरोबर स्वस्त कच्चा माल आणि स्वस्त श्रमाच्या लाटण्यासाठी वसाहती नव्हत्या. जर्मनीच्या वाढत्या आर्थिक बळाने त्याला ब्रिटन आणि फ्रान्सच्या विरोधात उभे केले. या वाढत्या सम्राज्यवादी प्रतिस्पर्धेचा परिणाम म्हणून १९१४ मध्ये जगाच्या पुनर्विभाजनासाठी पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले.

एका बाजूला जर्मनी, आस्ट्रिया आणि हंगेरी होते तर दुसरीकडे ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आणि रशिया. रशिया हा त्या वेळी एक मागास साम्राज्यवादी देश होता. तो पूर्व युरोपच्या मागास देशांसाठी एक साम्राज्यवादी देश होता. परंतु स्वतः ब्रिटीश, फ्रेंच आणि अमेरिकी वित्तीय भांडवलाच्या वर्चस्वाच्या अधीन होता. रशियामध्ये अजून जारची राजेशाही होती. पहिल्या महायुद्धामध्ये त्याने मित्र शक्ती म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या बाजूने भाग घेतला. रशियाची मागास अर्थव्यवस्था आणि सैन्य शक्ती युद्धामध्ये जर्मनीच्या उन्नत सैन्य बळाचा मुकाबला करण्यास अपुरी होती. लवकरच वेगवेगळ्या मोर्चांवर रशियाचा पराभव होऊ लागला. रशियाच्या सैनिकांकडे ना पुरेशा बंदुका होत्या, ना पुरेसे अन्नधान्य. युद्धाचा खर्च रशियाच्या अर्थव्यवस्थेला परवडणारा नव्हता आणि लवकरच देशात खाद्यान्नाच्या तुटवड्याचे संकट निर्माण झाले. सैनिकांची मोठी संख्या शेतकरी कुटुंबांतून आलेली होती.  खरे तर गणवेशांच्या आत शेतकरीच होते. रशियामध्ये शेतकऱ्यांची अवस्थासुद्धा भीषण होती. भूदास प्रथेचे कायद्याने १८६१ सालीच उच्चाटन झाले होते, परंतु तिचे अवशेष बऱ्यापैकी टिकून होते. शेतकऱ्यांना भूमीचे वाटप करण्यात आले नव्हते आणि देशातील बहुतेक शेतीयोग्य जमीन एक तर जारच्या मालकीची होती किंवा चर्च आणि मोठ्या जमीनदारांच्या मालकीची. जी भूमी ग्राम समुदायाकडे होती तिच्या चक्रीय वाटपाचा निर्णयसुद्धा मोठे श्रीमंत शेतकरी आणि कुलकच घेत होते आणि प्रत्येक व्यावहारिक मामल्यात या जमिनीवर त्यांचेच नियंत्रण होते. जारची सत्ता युद्धाचे ओझे शेतकऱ्यांच्या पाठीवर टाकत होती आणि भूस्वामींनी शेतकऱ्यांवर दबाव वाढवला होता. जी काही संसाधने होती ती युद्धाच्या मोर्च्यावर उधळली जात होती.

कामगारांची अवस्थासुद्धा वेगळी नव्हती. अन्नाच्या संकटामुळे शहरांमध्ये अन्नाचा भयंकर तुटवडा झाला. कामगारांना जेवणसुद्धा मिळेनासे झाले होते. कामगारांच्या कामाचे तास १२ वरून १४ होणे ही एक सामान्य बाब होती. पोटभर अन्न मिळण्याइतपतसुद्धा मजुरी मिळेनाशी झाली होती. काही कामगारांना थो़डा बरा पगार मिळत होता परंतु अन्नाचा भयंकर तुटवडा आणि अन्नाच्या वाढत्या किमतींमुळे त्यांनासुद्धा पुरेसे अन्न मिळत नव्हते. देशाची जवळपास ८५ टक्के जनता ही गरीब आणि मध्यम शेतकऱ्यांची होती आणि कामगारांची लोकसंख्या १० टक्के. कामगारांना अधिक चांगली कार्यपरिस्थिती, चांगली मजुरी आणि पोटभर अन्न हवे होते आणि शेतकऱ्यांना जमीन हवी होती. कामगार आणि शेतकरी या दोघांनाही युद्धापासून सुटका हवी होती. १९१७ साल उजाडेपर्यंत सामान्य कष्टकरी जनतेचा संयम ढळू लागला. उपासमार, गरीबी आणि महागाईच्या असह्य परिस्थितीने रशियाच्या सामान्य कष्टकरी जनतेमध्ये एक विद्रोहाची परिस्थिती निर्माण केली होती. शेवटी फेब्रुवारी १९१७ मध्ये एका उत्स्फूर्त लोकविद्राहाने जारची सत्ता उपटून फेकून दिली. तोपर्यंत रशियातील क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टी, जिचे नाव रशियाची सामाजिक लोकशाही कामगार पार्टी (बोल्शेविक) होते, या लोकविद्रोहाच्या नेतृत्त्वाचे स्थान मिळवण्यात अपयशी ठरली होती. त्यामुळे, जारच्या सत्तेच्या पतनानंतर एक अस्थायी युती सरकार बनले. या सरकारामध्ये वेगवेगळे भांडवली आणि निमभांडवली पक्ष सामील झाले होते. शेतकऱ्यांना जमीन आणि शांतता देण्याचे, कामगारांना चांगली मजुरी, छोटा कार्यदिवस आणि ट्रेड युनियन बनवण्याचा अधिकार देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. रशिया मित्र देश म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेसोबत केलेल्या करारांचं पालन करेल आणि युद्धात सहभाग चालू राहील अशी घोषणा सरकारने केली. त्याचबरोबर भूमीसुधारणा म्हणजे जमिनीचे शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्याचे काम संविधान सभा तयार होईपर्यंत आणि त्यानंतर कायदा होईपर्यंत पुढे ढकलले. कामगार आणि कष्टकरी जनतेला काही तात्पुरते लोकशाही अधिकार आणि नागरिक अधिकार प्राप्त झाले. त्यामुळे रशियातील वर्गसंघर्ष  पुढे नेण्यास तात्पुरती मदत झाली. एवढे करणे हा अस्थायी सरकारचा नाईलाज होता. परंतु जी सर्वांत महत्त्वाची आश्वासने त्याने दिली होती, म्हणजेच जमीन आणि शांततेचे आश्वासन, त्याचा मात्र सरकारला विसर पडला. रशियाचा युद्धामध्ये सहभाग चालूच राहिल्यामुळे देशातील अर्थव्यवस्था, आर्थिक संकट आणि अन्नाचे संकट वाढत जात होते. त्यामुळे देशातील नव्या भांडवली अस्थायी सरकारच्या विरुद्ध लोकसंतोष वाढत चालला होता. देशभरातील औद्योगिक केंद्रांमध्ये संपांची लाट पसरली. त्याचबरोबर, गावातील शेतकऱ्यांचाही संयम ढळू लागला होता आणि त्यांच्यामध्येसुद्धा बंडाची परिस्थिती निर्माण झाली. कित्येक ठिकाणी त्यांनी भूमीसमित्या बनवून जमिनींवर कब्जा करायला सुरुवात केली. जार सरकार जे करीत होते त्याच प्रकारे नव्या सरकारने केरेंस्की नामक भांडवली नेत्याच्या नेतृत्त्वाखाली कामगार संप आणि शेतकरी विद्रोहांचे दमन करायला सुरुवात केली. देशात एक क्रांतिकारी परिस्थिती निर्माण झाली होती आणि अस्थायी सरकार लोकविद्रोह चिरडून ही क्रांतिकारी शक्यता दडपण्याचा प्रयत्न करीत होती. अशा वेळी, बोल्शेविक पक्षाचा नेता लेनिन यांनी एप्रिलमध्ये एप्रिल थिसिस मांडला. यामध्ये त्यांनी बोल्शेविक पक्षाने बंड करून सत्ता हस्तगत करावी असे आवाहन केले. भांडवली अस्थायी सरकार लोकशाही क्रांती पूर्णत्त्वाला नेणार नाही, म्हणजेच जमिनीचे वाटप करणार नाही आणि युद्धापासून सुटकाही मिळू देणार नाही, हे त्यांनी सांगितले. कामगारांच्या लोकशाही मागण्यासुद्धा पूर्ण केल्या जाणार नाहीत. लोकविद्रोहाची शक्यता लक्षात घेऊन सरकार साम्राज्यवाद, भांडवलदार वर्ग आणि त्याचबरोबर देशी जमीनदारांमध्ये समझोते करीत आहे. अशा वेळी, सरकार प्रतिक्रियावादी शक्तींच्या कुशीत शिरून क्रांतीचा गळा आवळण्याचाही धोका निर्माण झाला आहे.  अशा परिस्थितीत कामगार वर्गाने आपल्या अग्रदूत पक्षाच्या म्हणजेच बोल्शेविक पक्षाच्या नेतृ्त्त्वाखाली सत्ता हस्तगत करून समाजवादी क्रांती केली पाहिजे. आता जर कामगार वर्गाने समाजवादी क्रांतीचे कार्यभार पार पाडले नाहीत तर फक्त लोकशाही क्रांती अपूर्ण राहणार असे नाही तर तिची हत्यासुद्धा होईल, अशी मांडणी लेनीन यांनी केली. लेनिन यांचा हा प्रस्ताव अगोदर बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्त्वानेच अमान्य केला. परंतु जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्त्वातील मोठा हिस्सा त्यांचा प्रस्ताव मान्य करू लागला. शेवटी बोल्शेविक पक्षाच्या केंद्रिय समितीने विद्रोह आणि समाजवादी क्रांतीचा लेनिन यांचा प्रस्ताव मान्य केला.

बोल्शेविक पार्टी कित्येक वर्षांच्या वर्गसंघर्षातून तावून सुलाखून निघाली होती. जारच्या हुकूमशाहीच्या काळात तिने कामगारांच्या अनेकानेक संघर्षांचे नेतृत्त्व केले होते आणि पार्टीचे सतत कामगारांमध्ये अस्तित्त्व होते. बोल्शेविक पार्टीने सर्वाधिक उन्नत जाणीव असलेल्या, कट्टर आणि शूर कार्यकर्त्यांची भरती केली होती आणि एका पोलादी अनुशासन असलेल्या आणि गुप्त संरचना असलेल्या बळकट पार्टीची उभारणी केली होती. जारशाही आणि भांडवली सरकारच्या दमनाचा सामना करणे आणि कामगार वर्ग आणि सामान्य शेतकरी जनसमूहांना नेतृत्त्व देणे अशाच पार्टीला शक्य होते. बोल्शेविक पार्टीने सैनिकांमध्येसुद्धा प्रचार केला. ती तर शेतकऱ्यांचीच मुले होती. सैनिकांचा एक मोठा हिस्सा जमीन आणि शांततेच्या मागणीशी सहमत होता. जमीनीचे वाटप आणि युद्धातून माघार या दोन गोष्टी तत्काळ लागू करण्याची मागणी फक्त बोल्शेविक पार्टीच करीत होती.  फेब्रुवारी १९१७ पासूनच सामान्य कष्टकरी जनतेमध्ये हे स्पष्ट होऊ लागले होते की भूमी सुधारणा आणि शांतता हवी असेल तर भांडवली अस्थायी सरकार उपटून फेकावेच लागेल.  या मार्गावर जनतेला नेतृत्त्व देण्यास फक्त बोल्शिविक पार्टीच तयार होती. लवकरच कामगारांचा एक मोठा हिस्सा बोल्शेविक पार्टीच्या बाजूने उभा राहिला. सैनिकांच्या सिविेएतांमध्येसुद्धा बोल्शेविक पार्टीचे नियंत्रण प्रभावी ठरू लागले. कामगार आणि सैनिकांच्या सोविएतांमध्ये बोल्शेविक पार्टीचे नेतृत्त्व स्थापित होताच बोल्शेविक पार्टी विद्रोह करण्याच्या स्थितीमध्ये येऊन पोहोचली.

शेतकऱ्यांमध्ये अगोदर समाजवादी क्रांतिकारी पार्टी नावाच्या एका निम्न भांडवली पक्षाचा प्रभाव होता. बोल्शेविक पार्टीचे स्थान खूपच लहान होते. परंतु भूमीसुधारणेच्या मुद्द्यावर समाजवादी क्रांतिकारी पार्टीसुद्धा घटनेद्वारे कायदा करण्याच्या भूमिकेचे समर्थन करीत होती आणि भूमी सुधारणा टाळल्या जात होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांची एक मोठी संख्यासुद्धा लवकरच बोल्शेविक पार्टीच्या बाजूने आली कारण बोल्शेविक पार्टीच फक्त तत्काळ भूमी सुधारणा करण्याबद्दल बोलत होती. आता बोल्शेविक पार्टीला बहुसंख्य सामान्य कष्टकरी जनतेचे, म्हणजेच कामगार आणि सामान्य शेतकरी वर्गाचे पाठबळ मिळाले. म्हणजेच आता, बोल्शेविक पार्टीकडे आता क्रांतिकारी अनुशासन असलेली एक गुप्त संरचनासुद्धा  होती जी क्रांतीचे नेतृत्त्व करण्यासाठी आवश्यक होती आणि त्याचबरोबर पार्टीला व्यापक जनसुदायाचे समर्थनही मिळाले होते. पार्टीने घोषणा दिली – भूमी, शांतता, भाकरी. युद्ध, गरीबी, उपासमार, बेरोजगारी आणि महागाईमुळे भरडल्या जाणाऱ्या रशियाच्या जनतेला याच गोष्टी हव्या होत्या. बोल्शेविक पार्टीने एक क्रांतिकारी सैन्य समिती स्थापन केली. या समितीचे संचालन विद्रोहाच्या आधी लेनिन यांनी स्वतःच्या हाती घेतले. देशभरात कामगार आणि सैनिक रस्त्यावर होते आणि गावांमध्येसुद्धा शेतकऱ्यांचा विद्रोह उकळत होता. २४ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासूनच बोल्शेविक पार्टीच्या नेतृत्त्वाखाली क्रांतिकारी सैनिक आणि कामगारांनी भांडवली सत्तेच्या वेगवेगळ्या स्तंभांवर कब्जा करायला सुरुवात केली.  सर्व पोस्ट आणि टेलिग्राफ कार्यालये, सैनिक मुख्यालये, पोलिस मुख्यालये, बॅंक, बंदरे, रेल्वे स्टेशनांवर बोल्शेविकांनी आपले नियंत्रण प्रस्थापित केले. भांडवली सत्ता ज्या स्तंभावर उभी राहून काम करते ते आता कोलमडले होते आणि संपूर्ण भांडवली राज्यसत्ता पूर्णपणे असहाय झाली होती. यानंतर २५ ऑक्टोबर रोजी रशियाच्या राजसत्तेचे प्रतीक असलेल्या शीतमहालात बसलेल्या अस्थायी सरकारच्या मंत्र्यांना शरणागती पत्करण्यासाठी मुदत देण्यात आली.  मुदत संपुष्टात येण्याआधी शरणागती न झाल्यामुळे बोल्शेविक सैनिकांनी हल्ला चढवला आणि थोड्याशा प्रतिरोधावर मात करून विजयश्री मिळवली.  अशा प्रकारे रशियाच्या जुन्या कॅलेंडरनुसार २५ ऑक्टोबर (७ नोव्हेंबर) रोजी बोल्शेविक क्रांतीच्या नेतृत्त्वाखाली जगातील पहिली यशस्वी समाजवादी कामगार क्रांती झाली.  सर्व शक्ती कामगार आणि सैनिकांच्या सोविएतांच्या हवाली करण्यात आली. क्रांतीनंतर ताबडतोब भूमीसंबंधी आदेश काढून भूमी सुधारणांना सुरुवात झाली. दुसरा आदेश युद्धातून माघार घेण्याचा होता. समाजवादी क्रांतीने त्या दोन प्रमुख मागण्या तत्काळ पूर्ण केल्या ज्या भांडवली अस्थायी सरकार ८ महिन्यांपासून पूर्ण करू शकले नव्हते. क्रांतीनंतर साम्राज्यवादी युद्धातून रशियाने माघार घेतली आणि १९१८ चा मध्य येईपर्यंत रशिया या विनाशकारी युद्धातून पूर्णपणे बाहेर पडला.

प्रतिक्रियावादी कुलक आणि जमीनदारांचे उठाव आणि साम्राज्यवादी हस्तक्षेपाचा सामना करण्यासाठी आता रशियातील कामगार सत्तेला सुमारे ३ वर्षांच्या गृहयुद्धात उतरावे लागले खरे, परंतु हे नफ्याच्या लुटीतील वाट्यासाठी चालणारे साम्राज्यवादी युद्ध नव्हते. या गृहयुद्धात कामगार आणि सैनिकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनाच्या आधारे तीन वर्षांत जमीनदारांचे उठाव मोडून काढले आणि त्याचबरोबर १४ साम्राज्यवादी देशांच्या वेढ्यावरसुद्धा मात केली. १९२१ येईपर्यंत क्रांतिकारी समाजवादी रशियाचा गृहयुद्धामध्ये विजय झालेला होता आणि कामगार सत्ता पक्की झाली होती. यानंतर सुमारे साडेतीन दशके रशियातील कष्टकरी जनतेने समाजवादी व्यवस्था उभारली.  सर्व कारखाने, खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. सर्व बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. राज्यसत्तेवर आता क्रांतिकारी बोल्शेविक पक्षाच्या माध्यमातून कामगार वर्गाचे अधिपत्य स्थापन झाले होते, म्हणूनच या सर्व संसाधनांचा साहूमिक मालक कामगार वर्ग आणि गरीब शेतकरी जनता होती. १९१७ मध्ये ज्या भूमिसुधारणा झाल्या त्यांद्वारे अनेक शेतकरी जमीनींचे खाजगी मालक झाले. परंतु १९३१ पासून १९३६ या काळात सोविएत संघामध्ये जमीनीची खाजगी मालकी नष्ट करण्यात आली आणि सामूहिक शेतीची व्यवस्था स्थापन करण्यात आली. १९३० च्या दशकातसुद्धा सोविएत रशियामध्ये अभूतपूर्व गतीने उद्योगीकरण झाले व काही कालावधीतच रशिया जगातील दुसऱ्या क्रमांकाची औद्योगिक शक्ती बनला.  एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग उभारण्यास जगातील सर्वांत मोठी औद्योगिक शक्ती असलेल्या अमेरिकेला जवळजवळ दीडशे वर्षे लागली होती. परंतु रशियामध्ये हे कार्य कामगार शक्तीच्या बळावर दीड दशकात पूर्ण केले गेले. देशात साक्षरतेचे प्रमाण १०० टक्केच्या जवळपास गेले. कामगार वर्गाच्या जीवनमानात मोठी सुधारणा झाली. उपासमार आणि बेरोजगारी संपुष्टात आली. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा रशिया हा जगातील पहिला मोठा देश बनला. (त्याआधी न्यूझिलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला होता) लिंग आणि संपत्तीच्या कोणत्याही अटीशिवाय खऱ्या अर्थाने सार्विक मताधिकार पहिल्यांदा रशियामध्ये लागू झाला. सोविएत संघाने प्रथमच दमित राष्ट्रीयता आणि जातीय समूहांना साम्राज्यवादी दमनापासून मुक्त केले आणि त्यांना आत्मनिर्णयाचा अधिकार दिला. या सर्व दमित राष्ट्रीयता समाजवादी प्रयोगांमध्ये समान वाटेकरी झाल्या आणि आपल्या कपाळावरून हीनतेचा डाग त्यांनी पुसून टाकला. सोविएत संघाच्या समाजातून वेश्यावृत्ती समाप्त करण्यात आली. सर्व आर्थिक बाबतीत रशिया पूर्णपणे स्वतःच्या पायांवर उभा राहीला.  आणि वेशेष म्हणजे हा चमत्कार रशियाच्या कामगार वर्गाने हिटलरच्या नाझी सैन्याला पराभूत करीत, दुसऱ्या महायुद्धात कोट्यावधी लोकांची आहुती देऊन आणि उभ्या साम्राज्यवादी भांडवली जगाच्या फोडाफोडीच्या प्रयत्नांना तोंड देत केला.  १९५३ साली स्तालिन यांच्या मृत्यूनंतर बोल्शेविक पार्टीचे नेतृत्त्व दुरुस्तीवाद्यांनी काबीज केले. रशियातील समाजवादी प्रयोगांदरम्यान झालेल्या काही चुका त्याला कारणीभूत होत्या. त्यांच्याबद्दल आम्ही कामगार बिगुलमध्ये या शताब्दी वर्षामध्ये विस्ताराने लिहिणार आहोत. हा एक वेगळ्या प्रकारचा अभूतपूर्व प्रयोग होता. ही एक नव्या प्रकारची राज्यसत्ता होती. पहिल्यांदाच शोषक अल्पसंख्येवर शोषित बहुसंख्येचे अधिनायकत्व आणि सर्वहारा लोकशाही स्थापन करण्यात आली होती. कुठल्याही नव्या प्रयोगाप्रमाणेच यामध्येसुद्धा चुका होणे स्वाभाविक होते. ही पहिली कामगार क्रांती होती. तिने उभारलेले समाजवादी प्रयोग चार दशकांनंतर कोलमडले याबद्दल ऐतिहासिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या कुणालाही नवल वाटणार नाही. आश्चर्य याचे वाटू लागते की चार दशकांच्या अल्पावधीत समाजवादी रशिया ते सर्व काही करू शकला जे भांडवलशाही आपल्या ३०० वर्षांच्या इतिहासात करू शकलेली नव्हती. समता, स्वातंत्र्य आणि भ्रातृत्त्वाची घोषणा तर भांडवली क्रांतीनेसुद्धा दिली होती.  चार दशकांतच सोविएत संघाने येऊ घातलेल्या अधिक चांगल्या जगाची एक झलक दाखवली. भांडवलाचे शासन अमर- शाश्वत नाही, हे त्याने दाखवून दिले. भांडवलशाही ही माणसासाठी सर्वोत्तम व्यवस्था नाही, भांडवलशाही हा इतिहासाचा अंत नाही. अधिक चांगले जग घडवणे शक्य आहे व ते जग जगातील सर्वहाराच घडवू शकतो, हे सोविएत संघाने दाखवून दिले.

असंख्य कामगारांना या महान प्रयोगांबद्दल माहिती नाही. कारण भांडवली वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेल, चित्रपट आणि एकूण शिक्षण व्यवस्था आपल्याला त्याबद्दल काहीच सांगत नाही. आपल्याला फक्त त्याच्या अपयशाबद्दल सांगितले जाते. अपप्रचार केला जातो. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर भांडवली शासक वर्गाने जाणीवपूर्वक ऑक्टोबर क्रांतीला विस्मृतीच्या गर्तेत लोटण्याचा प्रयत्न केला आहे.  कामगार वर्गाने आपल्या पूर्वजांच्या या महान प्रयोगापासून शिकवण आणि प्रेरणा घेऊ नये, त्यांनी नेहमी हीनताबोध आणि आत्मविश्वासाच्या अभावात जगावे, हा त्यामागचा हेतू. आपल्या गौरवशाली आणि महान वारशापासून तोडलेला कामगार वर्ग भविष्यातील संघर्षांसाठीसुद्धा आत्मविश्वास आणि आत्मशक्ती एकवटू शकत नाही. म्हणूनच शासक वर्ग ऑक्टोबर क्रांतीला घाबरतो व सतत तिला राख आणि धुळींच्या थराखाली गाडून टाकण्याचा प्रयत्न करतो.  अशा वेळी आपण या महान कामगार क्रांतीचे ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व समजून घेण्याची मोठी गरज आहे. तिच्यातून आपण भावी संघर्षांसाठी प्रेरणा आणि शक्ती प्राप्त करू शकतो.

ऑक्टोबर क्रांतीचे महान ऐतिहासिक, युगप्रवर्तक आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व

महान ऑक्टोबर क्रांतीचे ऐतिहासिक महत्त्व अभूतपूर्व आणि अद्वितीय असे आहे. माणसाच्या इतिहासात त्याआधीसुद्धा क्रांत्या आणि लोकविद्रोह झाले होते. आजपासून सुमारे २०९० वर्षांपूर्वी रोममध्ये गुलामांनी उठाव केला. गुलामांच्या उठावामुळे दास प्रथा कमकुवत झाली आणि कोसळली. दास स्वामींचे शासन संपुष्टात आले तेव्हा जमीनदारांची आणि सामंतांची सत्ता स्थापन झाली. ही अगोदरच्या दास व्यवस्थेहून अधिक चांगली व्यवस्था होती. अगोदर दासांना बोलणारे अवजार समजले जायचे. आपल्या मनोरंजनासाठी दास स्वामी त्यांना एकमेकाशी मरेस्तेवर लढवत. बेशुद्ध होऊन पडेस्तोवर त्यांना राबवून घेतले जाई. दासांना मनुष्य मानलेच जात नव्हते. परंतु सामंती व्यवस्थेत भूदासांची अवस्था दासांपेक्षा बरी होती. या अर्थाने सामंती व्यवस्था म्हणजे माणसाच्या इतिहासातील एक पुढचे पाऊल होते. परंतु तीसुद्धा भूदास आणि शेतकऱ्यांच्या अमानुष शोषणावर आधारलेली व्यवस्था होती. भूदासांना कोणतेही राजकीय स्वातंत्र्य नव्हते. ते जमीनीशी बांधले गेले होते. त्यांना सामंतांच्या जमिनीवर कंबर मोडेपर्यंत काम करावे लागे आणि त्याच्या बदल्यात त्यांना जेमतेम जगण्यापुरते अन्न मिळायचे. शेतकऱ्यांनासुद्धा साऱ्याच्या रूपात सामंतांच्या जमिनीवर बेगारी करावी लागत असे किंवा धान्याच्या किंवा रोख रक्कमेच्या रूपात खंड भरावा लागत असे. पुढे जगभरात सामंती व्यवस्थेच्या विरोधात शेतकऱ्यांचे उठाव होऊ लागले. या उठावांमुळे सामंती व्यवस्था थरथरू लागली. पुढे उदयोन्मुख क्रांतिकारी भांडवलदार वर्गाने शेतकरी आणि दस्तकार व कारागिरांना सोबत घेऊन सामंतांच्या विरुद्ध लोकशाही क्रांत्या केल्या कारण सामंती व्यवस्थेच्या चौकटीत त्यांचा आर्थिक विकास आणि राजकीय सत्ता अशक्य होती. या लोकशाही क्रांत्यांमुळे भांडवलदार वर्ग सत्तेवर आला व त्याने भांडवली लोकशीहीची स्थापना केली. या व्यवस्थेत भांडवलदार वर्ग शासित आणि शोषित अशा कामगार आणि सामान्य कष्टकरी वर्गाकडून सत्ता चालवण्याची संमती मिळवतो. ही संमती निवडणुकांच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे भांडवलदार सरकार आपणच निवडले आहे असा भ्रम लोकांच्या मनात पक्का होता.  परंतु वास्तवात ही संमती भांडवलदार वर्गाने आपला मिडिया, शिक्षणतंत्र आणि इतर राजकीय उपकरणांच्या द्वारे निर्माण केलेली असते. गेल्या निवडणुकीत प्रचारावर दहा हजार कोटी रुपये खर्च करून अंबानी आणि अदानीसारख्या भांडवलदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानप बनवण्यासाठी एकूण समाजात मत तयार केले, अगदी त्याच प्रकारे. असो. अशा प्रकारे भांडवली लोकशाहीच्या रूपात पहिल्यांदाच अशी एक शोषक सत्ता अवतिर्ण झाली जी किमानपक्षी वर वर तरी संमती घेऊन शोषितांवर राज्य करते. शासक वर्गाचे शासन योग्य ठरवण्याचे कार्य प्रत्यक्षपणे धर्माच्या किंवा एखाद्या दिव्यतेच्या सिद्धांताच्या आधारे केले जात नाही.  अशा प्रकारे भांडवलशाही ही आपल्या पूर्वीच्या समाजांपेक्षा, म्हणजेच दास व्यवस्था आणि सामंती व्यवस्था यांच्याहून निराळी आहे. परंतु एका अर्थाने ती त्यांच्यासारखीदेखील आहे. भांडवलशाहीतसुद्धा एका शोषित बहुसंख्येवर एका शोषक अल्पसंख्येची हूकूमशाही असते. भांडवली लोकशाहीचा हाच अर्थ आहे – बहुसंख्य कामगार वर्ग आणि सामान्य कष्टकरी जनतेवर भांडवलदारांची हुकूमशाही. ही हुकूमशाही भांडवलदारांची कोणती पार्टी राबवणार याचा निर्णय तेवढा निवडणुकांमध्ये होत असतो. नागनाथ जातो, सापनाथ येतो. तात्पर्य, ऑक्टोबर क्रांतीच्या आधी सर्वच क्रांत्यांनंतर किंवा उठावांनंतर जी सत्ता अस्तित्त्वात आली ती कोणत्या ना कोणत्या शोषक अल्पसंख्येची शोषित बहुसंख्येवरील शासनाचे प्रतिनिधित्व करीत होती. दास व्यवस्था म्हणजे बहुसंख्य दासांवर व सामान्य कष्टकरी जनतेवर अल्पसंख्य दास स्वामींचे राज्य होते, सामंती व्यवस्था म्हणजे बहुसंख्य भूदास, शेतकरी आणि दस्तकार जनतेवर अल्पसंख्य सामंती राजांचे शासक होते आणि भांडवली व्यवस्था म्हणजे बहुसंख्य कामगार वर्ग आणि सामान्य कष्टकरी जनतेवर अल्पसंख्य भांडवलदार वर्गाच्या राज्याचे प्रतिनिधित्व होय. ऑक्टोबर क्रांतीने पहिल्यांदाच अशी एक सत्ता स्थापन केली जिच्या अतंर्गत शोषक अल्पसंख्येवर शोषित बहुसंख्येची सत्ता स्थापन झाली. या अर्थाने ऑक्टोबर क्रांतीने मानवाच्या इतिहासात एका नव्या युगाचा शुभारंभ केला. हे नवे युग आहे समाजवादी संक्रमणाचे दीर्घकालिक ऐतिहासिक युग. या दीर्घ कालावधीमध्ये जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये कामगार वर्ग समाजवादाचे अनेक अयशस्वी प्रयोग करणार हे स्वाभाविकच होते. विसाव्या शतकात कामगार वर्गाने वेगवेगळ्या देशांमध्ये अनेक प्रयोग केलेसुद्धा. ते महान उपलब्धी प्राप्त करून नंतर कोलमडले. ऱशिया, चीन, पूर्व युरोप, विएतनाममध्ये. परंतु या प्रयोगांमध्ये रशियाच्या ऑक्टोबर क्रांतीचे विशेष महत्त्व आहे. कारण या क्रांतीने त्या शृंखलेची सुरूवात केली आणि जगातील पहिली समाजवादी कामगार सत्ता स्थापन केली.

भांडवली क्रांतीची कर्तव्ये जी खुद्द भांडवली वर्गाने कधी पूर्ण केली नव्हती ती सर्वाधिक क्रांतिकारी आणि परिपूर्ण रूपात ऑक्टोबर क्रांतीने पूर्ण केली. सर्वांत अमूलाग्र भांडवली क्रांत्यांनीसुद्धा भूमी सुधारणा आणि लोकशाही अधिकार देण्याची आश्वासने दिली होती, परंतु ही आश्वासने पूर्ण करण्यात त्यांनी तेवढा प्रामाणिकपणा आणि अमूलाग्रता दाखवली नाही, जी ऑक्टोबर क्रांतीने दाखवली. ऑक्टोबर क्रांतीने आठवड्याभरात ते सारे काही केले जे भांडवलदार वर्गाने वेळोवेळी आश्वासने देऊनसुद्धा दोनशे वर्षांत केले नव्हते. म्हणूनच लेनिन यांनी ऑक्टोबर क्रांतीच्या पाचव्या वर्षपूर्तीच्या प्रसंगी केलेल्या भाषणात म्हटले की रशियाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये लोकशाही क्रांतीची भांडवली वर्गाकडून हत्या झाली असती ती समाजवादी क्रांतीनी रोखली. समाजवादी क्रांतीने कामगार वर्गाच्या हाती सत्ता सुपूर्द करण्याच्या व समाजवादी निर्माणाच्या दिशेने अग्रेसर होण्याच्या आधी उरलेसुरले लोकशाही कार्यभारसुद्धा पूर्ण केले. रशियाच्या विशिष्ट परिस्थितींमध्ये सर्वहारा वर्गास इतिहासाने सत्ता तत्काळ हाती घेण्यास भाग पाडले होते. लेनिन यांनी म्हटल्याप्रमाणे ऑक्टोबर क्रांतीची वेळ आम्ही आमच्या इच्छेनुसार निवडली नव्हती. दुसरे महायुद्ध, त्यामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, खाद्यान्न संकट, देशभरातील कामगार संप आणि कारखान्यांवर कब्जा करण्याची लाट, सोविएतांचा उत्स्फूर्त उदय आणि भूमी समित्यांचे जमीन कब्जा करण्याचे आंदोलन यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सर्वहारा वर्ग आणि त्याच्या अग्रदूत पक्षासमोर वेळेच्या आधीच अशी परिस्थिती निर्माण केली की सर्वहारा वर्गासमोर दोनच पर्याय राहिले – सत्तेवर कब्जा करून समाजवादी क्रांती करायची आणि भांडवली लोकशाही क्रांतीची ती आश्वासने पूर्ण करायची जी पूर्ण करण्यास भांडवलदार वर्ग टाळाटाळ करीत होता, किंवा  सर्वहारा वर्ग आणि त्याची अग्रदूत असलेल्या बोल्शेविक पार्टीने भांडवलदार वर्ग, प्रतिक्रियावादी कुलक आणि भूस्वामी वर्ग तसेच राजेशाहीच्या उरल्यासुरल्या प्रतिक्रियावादी तत्त्वांच्या युतीला लोकशाही क्रांतीचा गळा आवळण्याची व कामगार वर्गाला इतिहासाच्या रंगमंचावरून कित्येक दशकांसाठी उचलून बाहेर फेकण्याची परवानगी द्यायची. लेनिन यांचे हे मूल्यांकन अगदी योग्य सिद्ध झाले. जर त्यावेळी कामगार वर्गाने सत्ता आपल्या हाती घेतली नसती तर सम्राज्यवाद, रशियातील भांडवलदार वर्ग आणि भूस्वामी वर्ग यांनी मिळून रशियाच्या लोकशाही क्रांतीचा गळा आवळला असता. अशाच प्रकारे रशियाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कामगार वर्गाने केलेल्या समाजवादी क्रांतीने लोकशाही क्रांतीची हत्या रोखली आणि लोकशाही क्रांतीचे अनेक कार्यभारसुद्धा तिलाच पूर्ण करावे लागले. साहजिकच या परिस्थितीने रशियाच्या समाजवादी क्रांतीसमोर आणि कामगार वर्गासमोर समाजवादी निर्माणासंबंधी अनेकानेक महत्त्वपूर्ण आव्हाने आणि अडचणी उभ्या केल्या ज्यांना रशियाच्या बोल्शेविक पार्टीला बराच काळ तोंड द्यावे लागले आणि ज्यांच्यामुळे अनेक समस्या आणि विकृतींचा सामनासुद्धा रशियाच्या समाजवादी प्रयोगाला करावा लागला. ही परिस्थिती लक्षात घेता रशियाच्या समाजवादी क्रांतीने लोकशाही क्रांतीचे कार्यभार पूर्ण करणे आणि त्यानंतर समाजवादी निर्माणाच्या दिशेने आगेकूच करणे ही एक अभूतपूर्व उपलब्धी होती.

दमित राष्ट्रियतांचा एक मोठा समुद्र्च रशियाच्या साम्राज्याच्या परिघावर हेलकावत होता. जारच्या शासनाने या राष्ट्रियतांवर दशकानुदशके पाशवी दमन आणि उत्पीडन केले होते. त्याचबरोबर या उत्पीडित राष्ट्रियतांमधील सामंत आणि जमीनदार वर्गाने हे उत्पीडन वाढवण्याचे काम केले होते. भांडवली सरकार अस्थायी सरकार बनवून सत्तेत आला त्यावेळी त्याने जगातील इतर देशांच्या भांडवलदार वर्गासारखेच दमित राष्ट्रियतांना आत्मनिर्णयाचा अधिकार देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते कधीच पूर्ण केले नाही. रशियातील कामगार वर्गाने आपल्या समाजवादी सत्तेची स्थापना करताच त्वरित या दमित राष्ट्रियतांना आत्मनिर्णयाचा अधिकार प्रदान केला. त्यामुळे काही राष्ट्रियता व देश सोविएत समाजवादी गणराज्याच्या संघातून काही काळासाठी बाहेर पडले. यामागेसुद्धा तेथील कट्टरतावादी भांडवली राष्ट्रवादाची प्रमुख भूमिका होती. परंतु लवकरच या दमित राष्ट्रियतांच्या कामगार वर्गाने  या देशांच्या राष्ट्रीय मुक्ती आंदोलन आपल्या हाती घेतले व त्याला रशियाच्या समाजवादी निर्माणाशी जोडले. या देशातील शेतकरी आणि सामान्य कष्टकरी जनतेनेदेखील पाहिले की रशियाच्या नव्या समाजवादी सत्तेचा त्यांच्यावर बळजबरीने आपले राज्य लादण्याचा कोणताही इरादा नाही आणि आत्मनिर्णयाचे त्यांचे धोरण इनामदार आणि पारदर्शक आहे. त्यामुळे १९२३ पर्यंत सर्व दमित राष्ट्रियतांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सोविएत समाजवादी गणराज्य स्थापित झाले होते आणि ते रशिया समाजवादी सोविएत गणराज्याच्या संघाचा भाग बनले. त्यामुळे सोविएत संघ अस्तित्त्वात आला आणि त्यामध्ये पूर्वी जारकालीन साम्राज्यात जबरदस्तीने सामील करण्यात आलेले देशसुद्धा स्वेच्छापूर्वक समाज दर्जासह सामील झाले. कामगार वर्ग कधीच कोणत्याही दमितत राष्ट्रियतांच्या दमन आणि उत्पीडनाचे समर्थन करीत नाही, हेच यावरून दिसून येते. तो स्वतः आपल्या स्वातंत्र्यासाठी लढतो आहे. अशा वेळी, तो इतर कुणाला बळजबरीने आपल्या आधीन कसा ठेवू शकतो? रशियाच्या कामगार वर्गाने भांडवली अंधराष्ट्रवादा नाकारत खऱ्या अंतरराष्ट्रीयतावादाचे दर्शन घडवले आणि दमित राष्ट्रियतांच्या दमनाचा आणि वसाहतीकरणाचा खात्मा करून एक समाजवादी सोविएत गणराज्य स्थापन केले.

महान ऑक्टोबर क्रांतीने हे दाखवून दिले की समाजवादी क्रांतीशिवाय तमाम देशांना साम्राज्यवादी युद्धाच्या शोकांतिकेपासून आणि विनाशापासून मुक्ती मिळू शकत नाही. जोपर्यंत साम्राज्यवादी युद्धाचे बळी ठरत असलेल्या वेगवेगळ्या देशांमध्ये कामगार वर्ग सत्तेत येत नाही तोपर्यंत तेथील निरपराध जनता साम्राज्यवादी नफ्याच्या हावेमुळे उद्ध्वस्त होत राहील.  आज मध्य पूर्वेच्या देशांच्या बाबतीत हेच घडते आहे. त्या वेळी रशियासोबत एका वेगळ्या प्रकारे हे होत होते. मध्य पूर्वेमध्ये आज जे देश पाश्चात्य साम्राज्यवादाचे बळी ठरत आहेत ते स्वतः मागच्या रांगेतील साम्राज्यवादी देश नाहीत. रशिया स्वतः मागच्या रांगेतली साम्राज्यवादी देश होता.  परंतु पहिल्या महायुद्धात त्याची अवस्था ब्रिटन आणि फ्रान्सहून फार वेगळी होती व त्यांच्या नफ्यासाठी रशियाचे सैनिक आणि सामान्य जनतेचा बळी दिला जात होता. या साम्राज्यवादी युद्धाचा सगळा फायदा मोठ्या साम्राज्यवादी शक्ती घेत होत्या आणि त्याचे मोल रशियाच्या कष्टकरी जनतेकडून वसूल केले जात होते. समाजवादी क्रांतीने रशियाला याच भयंकर परिस्थितीतून बाहेर काढले आणि रशियाच्या जनतेला शांतता प्रदान केली.  रशिया साम्राज्यवादी जगापासून वेगळा झाला आणि त्याने १९१८ उजाडेपर्यंत साम्राज्यवादी युद्धाच्या प्रत्येक मोर्चाहून आपल्या सैनिकांना माघारी बोलावले. रशियाचा कामगार वर्ग शांततावादी होता असा याचा अर्थ नाही. त्यानंतर त्याने तीन वर्षेपर्यंत रक्त सांडून जमीनदारांचा उठाव चिरडला आणि त्याबरोबर १४ साम्राज्यवादी देशांच्या वेढ्यालासुद्धा धूळ चारली. परंतु हे युद्ध एक क्रांतिकारी युद्ध होतं. या युद्धात कामगार वर्ग आणि शेतकरी वर्गाच्या शूर लढवय्यांनी स्वेच्छेने आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना आपल्या समाजवादी सत्तेचे रक्षण करायचे होते, साम्राज्यवादी भांडवली धनपशूंच्या नफ्यासाठी त्यांनी आपला देह ठेवला नाही.

ऑक्टोबर क्रांतीची आणखी एक महान उपलब्धी म्हणजे स्त्री पुरुषांमधील वर्गसमाजात असलेल्या घृणास्पद असमानतेवर प्रहार. ही विषमता काही वर्षांतच नष्ट करता येईल असे म्हणता येणार नाही, परंतु ऑक्टोबर क्रांतीने लैंगिक विषमतेच्या मुळांवर प्रहार केला. स्त्रियांना मतदानाचा अधिकार, समान वेतनाचा अधिकार आणि सामाजिक जीवनात प्रखर आणि मुखर उपस्थितीचा अधिकार मिळाला. समाजवादाच्या निर्माणामध्ये सोविएत संघात स्त्री कामगार आणि सामान्यपणे स्त्रियांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पहिल्यांदाच इंजिन ड्रायव्हरपासून वैज्ञानिकासारख्या पेशांमध्ये स्त्रियांचा प्रवेश झाला. स्त्रियांना मिळालेल्या या स्वातंत्र्याने रशियाच्या सामाजिक इतिहासात एक क्रांतिकारी आणि युगप्रवर्तक भूमिका पार पाडली.

परंतु या सर्व उपलब्धींबरोबर जे सर्वांत मोठे पाऊल ऑक्टोबर क्रांतीनंतर समाजवादी सत्तेने उचलले ते म्हणजे भंडवली खाजगी संपत्तीचा खात्मा आणि अशा प्रकारे भांडवली उत्पादन संबंधांतील सर्वांत प्रमुख आयाम म्हणजे भांडवली खाजगी संपत्ती संबंधांवर प्राणांतक प्रहार. क्रांतीनंतर काही महिन्यातच सर्व बॅंका, वित्तीय संस्था आणि मोठे कारखाने आणि खाणींचे राष्ट्रीयीकरण तत्काळ प्रभावासह करण्यात आले. १९२० उजाडता उजाडता १० कामगार असलेल्या लहान कारखान्यांचेसुद्धा राष्ट्रीयीकरण करण्यात आले.  जमिनीचेसुद्धा राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र रॅडिकल भांडवली भूमि सुधारणांच्या अंतर्गत जमिनी वेगवेगळ्या शेतकरी कुटुंबांना देण्यात आल्या. १९२१ मध्ये नवे आर्थिक धोरण लागू झाल्यानंतर समाजवादी सत्तेला काही पाउले मागे यावे लागले कारण १९१७ पासून १९२० पर्यंत सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे निर्माण झालेल्या संकटाने समाजवादी सत्तेला शेककऱ्यांच्या एका मोठ्या हिश्शापासून वेगळे केले होते. याच काळात शेतकरी समुदायापैकी मध्यम आणि उच्च मध्यम हिश्शाने (जो क्रांतीनंतरच्या भूमिसुधारणांनंतर बहुसंख्य हिस्सा बनला होता) धान्याची साठेमारी करायला सुरुवात केली तसेच समाजवादी सत्तेबरोबर असहकार पुकारला. यामुळे उद्योग आणि शेतीमधील विनिमय थांबला होता आणि औद्योगिक उत्पादनालासुद्धा फटका बसला होता,, कारण कामगारांसाठी अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली होती आणि त्याचबरोबर उद्योगांना पुरेसा कच्चा मालसुद्धा मिळेनासा झाला होता. जमीनदार आणि साम्राज्यवादी वेढ्याच्या विरोधात चाललेल्या गृहयुद्धात या दोन्ही गोष्टींची आवश्यकता होती, नाहीतर समाजवादी सत्ता टिकून राहणे कठीण होते. त्यामुळे गृहयुद्धाच्या काळात जेव्हा कम्युनिस्ट पक्षाने युद्ध कम्युनिझमची धोरणे लागू केली त्यावेळी कामगार वर्गाच्या राज्यसत्तेला शेतकऱ्यांच्या एका बऱ्यापैकी हिश्शाकडून बळजबरीने पीकाची वसुली करावी लागली. बळजबरीने पीक वसूल करण्याचा निर्धारित निशाणा सुखवस्तू श्रीमंत आणि मध्यम शेतकरी होते  परंतु कित्येकदा निम्न मध्यम शेतकऱीसुद्धा तावडीत सापडायचे, जे एकूण शेतकरी समुदायाचा बहुसंख्य हिस्सा होते. त्यामुळे शेतकरी वर्गाच्या एका मोठ्या हिश्शाने श्रीमंत शेतकऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली सोविएत सत्तेशी असहकार पुकारला आणि गृहयुद्धाने अशी परिस्थिती निर्माण केली की सोविएत सत्ता ताबडतोब कामगार शेतकरी संश्रयाला पुन्हा बळकटी देण्यासाठी काही करू शकला नाही. त्यामुळे गृहयुद्ध संपेपर्यंत कामगार सत्तेला शेतकऱ्यांच्या असहाकाराचा सामना करण्यासाठी नाईलाजाने बळजबरीने पिकाची बसुली करावी लागली. परंतु १९२० च्या अखेरीस गृहयुद्धात विजय संपादन केल्यानंतर ताबडतोब जबरदस्ती बसुलीची ही व्यवस्था रद्द करण्यात आली आणि पिकाच्या रूपात करव्यवस्था लागू करण्यात आली. १९२१ सालीच छोट्या उद्योगांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली आणि मोठ्या उद्योगांमध्ये एका व्यक्तीच्या प्रबंधनाचा सिद्धांत आणि बाजार अर्थव्यवस्थेला सूट देण्यात आली. याचे कारण म्हणजे रशियाचा कामगार वर्ग अजून राजकीय आणि तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण औद्योगिक प्रबंधन आणि उत्पादन व विनिमयाचे संचालन व प्रबंधन आपल्या हातात घेण्याइतपत परिपक्व झालेला नव्हता. म्हणूनच लेनिनच्या नेतृत्त्वाखाली हे आर्थिक परिवर्तन करण्यात आले. ते नवे आर्थिक धोरण म्हणून ओळखले जाते.  लेनिन यांनी म्हटले होते की गृहयुद्ध आणि युद्ध कम्युनिझमचा हा टप्पा रशियाच्या क्रांतीवर परिस्थितीने लादलेला होता. या काळात रशियाच्या समाजवादी सत्तेने असे काही किल्ले काबीज केले ज्यांच्यावर टिकून राहणे शक्य नव्हते. म्हणूनच कामगार सत्तेच्या रक्षणासाठी हे आवश्यक होते की सर्वहारा सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काही पाउले मागे जावे आणि शेतकरी वर्गाशी गृहयुद्धाच्या काळात कमकुवत झालेली एकता पुन्हा करावी. याचे कारण म्हणजे रशियातील समाजवादी सत्ता विशिष्ट परिस्थितीमुळे एका अशा देशात स्थापन झाली जेथे कामगारांची संख्या फक्त १० ते १२ टक्के होती तर मध्यम शेतकऱ्यांसमवेत एकूण शेतकऱ्यांची लोकसंख्या ८० टक्क्यांहन जास्त होती. अशा देशामध्ये समाजवादी निर्माण करताना सर्वहारा सत्तेला कित्येकदा पाऊल मागे घ्यावे लागेल आणि पुन्हा सावधपणे पुढे जावे लागेल, हे लेनिन यांनी स्पष्ट केले होते. १९२१ मध्ये नवे आर्थिक धोरण लागू केल्यानंतर ३ ते ४ वर्षांत रशियाची आर्थिक परिस्थिती सुधरली. १९२३ साली लेनिन यांच्या मृत्यूनंतर समाजवादी निर्माणाच्या कार्याचे नेतृत्त्व स्तालीन यांच्याकडे आले.

बोल्शेविक पार्टीमध्ये बुखारीनच्या उजव्या संधीसाधू धोरणाच्या विरुद्ध ( बुखारीन भांडवली पद्धतीने उत्पादक शक्तींचा विकासाचा मार्ग सुचवीत होता) आणि ट्राट्स्कीच्या डाव्या दुस्साहसवादी लाइनच्या विरुद्ध संघर्ष करीत, जिनोवियेव व कामनेव यांच्या संधीसाधू धोरणाला तोंड देत स्तालिन यांनी समाजवादी निर्माणाचे कार्य  पुढे नेले. १९२७-२८ पर्यंत उद्योगांमध्ये राजकीय नियंत्रण पुन्हा बळकट करण्यात आले आणि १९३० पासून १९३५ पर्यंत स्तालिन यांच्या नेतृत्त्वाखाली समाजवादी सामूहिकीकरणाचे आंदोलन चालविण्यात आले. या आंदोलनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बहुसंख्येची संमती मिळवून आणि मोठ्या शेतकऱ्यांचा आणि कुलकांचा प्रतिरोध चिरडून शेतीमधूनसुद्धा खाजगी भोगाधिकाराची व्यवस्था संपुष्टात आणण्यात आली व सामूहिक शेते आणि राजकीय शेतांमधून शेतीचे उत्पादन सुरू झाले. १९३६ पर्यंत सोविएत संघात उद्योग आणि शेती दोन्हींतून भांडवली खाजगी संपत्ती नष्ट करण्यात आली. त्यामुळे सोविएत संघाला मोठ्या प्रमाणात उत्पादन करून विकासाची मोठी भरारी घेण्याची संधी मिळाली आणि १९३० च्या दशकाच्या अखेरपर्यंत सोविएत संघ हा जगातील दुसऱ्या क्रमांकाची औद्योगिक शक्ती बनला. हे सारे कार्य भांडवली नफेखोरी आणि लुटीच्या आधारे नाही तर कामगार वर्गाचा पुढाकार आणि सामूहिक मालकीच्या व्यवस्थेच्या बळावर झाले. कामगार वर्गाच्या जीवनमानात मोठी सुधारणा झाली. कामगार वर्गाच्या मुलामुलींना आता असे जीवन मिळाले की त्यांच्यामधूनसुद्धा कलाकार, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, बुद्धिजीवी, अध्यापक आणि मोठे खेळाडू तयार झाले. सोविएत संघाने विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आणि समाजवादी टप्प्यातील उपलब्धींच्या बळावरच १९५० च्या दशकाच्या अखेरीस सोविएत संघाने मानवाच्या इतिहासात पहिल्या माणसाला अंतरिक्षात पाठवले. त्याचे नाव होते गागरिन. या समाजवादी विकासाच्या एकूण प्रक्रियेमध्ये  स्तालिन आणि बोल्शेविक पार्टीकडून अनेक चुकासुद्धा झाल्या. यापैकी मुख्य चूक म्हणजे भांडवली खाजगी संपत्ती नष्ट करणे म्हणजे समाजवादी क्रांतीचा प्रमुख कार्यभार पूर्ण करणे व आता उत्पादक शक्तींचा विकास हा एकमेव कार्यभार शिल्लक राहतो, हा विचार होय. या विचारामुळे आर्थिक विकासाचा एक असा मार्ग चोखाळण्यात आला ज्यामुळे व्यापक कामगार वर्गाच्या जीवनात हजारो पटीने सुधारणा घडवताना कुशल आणि अकुशल, मानसिक श्रम आणि शारीरिक श्रम, शेती आणि उद्योग व गाव आणि शहर यांमधील अंतर वाढले. त्यामुळे वेतन विषमता आणि अन्य भांडवली अधिकार निर्माण झाले. त्यामुळे समाजात एक असा वर्ग पैदा झाला जो वास्तविक एक नवीन भांडवलदार वर्ग होता. हा नवीन भांडवलदार वर्ग निर्माण होताच पार्टी आणि राज्यसत्तेमध्ये घुसखोरी करू लागला आणि त्याने पार्टी आणि राज्यसत्तेच्या आत मोर्चेबांधणी केली. याच समस्या वाढत गेल्यामुळे स्तालिन यांच्या मृत्यूनंतर सोविएत संघात भांडवली पुनर्स्थापना झाली आणि समाज, पार्टी आणि राज्यसत्ता यांच्यामध्ये एक विशेषाधिकार प्राप्त केलेल्या आणि अधिशेषाचा एक मोठा हिस्सा गिळंकृत करणाऱ्या भांडवलदार वर्गाने पार्टीमध्ये तख्तापलट केले आणि १९५६ च्या विसाव्या कांग्रेसपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली.

लेनिन आणि नंतर स्तालिन यांनी (१९४८ ते १९५२ पर्यंत) स्वतः या धोक्याकडे लक्ष वेधले होते. परंतु स्तालिन यांना समाजवादाच्या या समस्या सोडवण्याची कधी संधी मिळाली नाही. याचे कारण म्हणजे सोविएत संघात पार्टी आणि राज्यसत्तेमध्ये चालू असलेला वर्गसंघर्ष आणि त्याचबरोबर दुसरे महायुद्ध आणि नाझी धोक्याचा सामना करण्याचे आव्हान आणि त्याचबरोबर बोल्शेविक पार्टीमध्ये असलेला उत्पादक शक्तींच्या विकासाच्या सिद्धांताचा प्रभाव हे होय. लेनिन यांनी ऑक्टोबर क्रांतीच्या पाचव्या वर्षपूर्तीच्या प्रसंगी म्हटले होते की आम्ही चुका करणार हे स्वभाविक आहे, व चुका करूनसुद्धा आम्ही समाजवादी सत्ता टिकवून ठेवू शकणार की नाही, हे काळच सांगेल. परंतु जर आपण समाजवादी सत्ता शेवटर्पयंत टिकवून ठेवू शकलो नाही तर त्यात कोणतेही नवल वाटून घेण्याचे कारण नाही. कारण हा कामगार सत्ता आणि समाजवादी निर्माणाचा पहिलावहिला प्रयोग आहे आणि तोसुद्धा अशा एका देशामध्ये जेथे कामगार वर्ग अल्पसंख्य आहे आणि निमभांडवली शेतकरी बहुसंख्येत आहेत. त्याच्या जोडीला आहेत अत्यंत प्रतिकूल बाह्य परिस्थिती. सोविएत संघामध्ये समाजवादी प्रयोग अखेरीस कोसळला, तरीदेखील चार दशकांमध्ये तिने दाखवून दिले की कामगारांची सत्ता स्थापन होऊ शकते आणि समाजवाद खरोखरच भांडवलशाहीला एक अधिक चांगला पर्याय देऊ शकतो. तो आपल्याला उपासमार, बेरोजगारी, गरीबी, वेश्यावृत्ती, उच्चनीच भेदभाव, राष्ट्रीय उत्पीडन आणि युद्धांपासून मुक्तता देऊ शकतो. ज्या कामगार समुदायाला अडाणी, ग्राम्य, मागास समजले जाते तो एक विशाल देशामध्ये फक्त आपली सत्ता स्थापन करू शकतो एवढेच नाही तर ती सत्ता चालवू शकतो आणि एका अधिक चांगला समाज घडवू शकतो, हे या प्रयोगाने दाखवन दिले. या दृष्टीने ऑक्टोबर क्रांतीने मानव इतिहासामध्ये एक निर्णायक विच्छेद घडवून आणला आणि एका नव्या युगाचा आरंभ केला. समाजवादी संक्रमाणाचे युग. या युगाच्या आरंभानंतर कामगार वर्गाने इतर देशांमध्येसुद्धा समाजवादी प्रयोग करून , प्रामुख्याने चीनमध्ये, नवे मापदंड स्थापन केले आणि नवे चमत्कार केले. परंतु हे सर्वच प्रयोग म्हणजे पहिल्या टप्प्यातील समाजवादी प्रयोग होते. कामगार वर्गाने आपल्या किशोरावस्थेमध्ये काही महान केले परंतु त्यांत त्रुटी होत्या. पहिल्या टप्प्याच्या प्रयोगांनंतर आपण एका दीर्घ निराशेच्या टप्प्यातून जात आहोत. परंतु आता या निराशेच्या टप्प्याचासुद्धा शेवट जवळ आला आहे. भांडवली व्यवस्था जगाला काय देऊ शकते ते आपण पाहतो आहोत. विसाव्या शतकातील हे सगळे प्रयोग म्हणजे आपणा कामगारांचा सामूहिक वारसा आहे आणि या वारशाची नक्कल करून नाही तर त्याच्याकडून वैज्ञानिक दृष्टीने धडा घेऊन आपण एकविसाव्या शतकात नव्या समाजवादी क्रांतीच्या प्रयोगांची अंमलबजावणी करू शकतो. त्यांच्याकडून चिकित्सक भूमिकेतून धडा घेतल्याशिवाय किंवा हा वारसा विसरून आपण नवीन प्रयोग करू शकत नाही. आज भारतात आणि जगभरात कित्येक धुरीविहीन मुक्त चिंतक तथाकथित कम्युनिस्ट क्रांतिकारी संघटना हे करीत आहेत. या महान प्रयोगांतून धडासुद्धा घेतला पाहिजे आणि या प्रयोगांच्या पुढेदेखील गेले पाहिजे. निश्चितच, या सर्व प्रयोगांमध्ये महान ऑक्टोबर क्रांतीचे नेहमीच एक महान स्थान राहिले आहे, आणि पुढेही राहील. 

पुढील अंकात– ऑक्टोबर क्रांतीचा वारसा आणि एकविसाव्यात शतकात समाजवादी क्रांतीच्या मार्गातील आव्हाने.

 

कामगार बिगुल, डिसेंबर २०१६