भांडवलाच्या गुलामी पासून मुक्ततेसाठी बॉलीवूड चित्रपटांची नव्हे तर कामगारांच्या संघर्षाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे!
मनन
तसे तर बहुतांश कारखान्यांमध्ये साप्ताहिक सुट्टी नसतेच आणि सातही दिवस काम ही एक सामान्य बाब बनली आहे. पण जेव्हा केव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपल्यापैकी बरेच लोक सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान किंवा बॉलीवूड ताऱ्यांचे चित्रपट बघणे पसंत करतोत. हे चित्रपट बघितल्या नंतर आपण काही काळ का होईना आपण आपले खडतर आयुष्य विसरून जातो. पण त्यामुळे आपल्या वास्तविक जीवनात काहीही फरक पडत नाही. सकाळ झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा घाण्यावर काम करणाऱ्या बैलासारखे १६-१७ तास राबत मालकांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आपापल्या कारखान्यांकडे रवाना होतोत.
बहुतेक चित्रपटांमध्ये नायकाला सामान्य कष्टकरी जनतेचा सहानुभूतीदार व श्रीमंताचा शत्रूच्या रुपात दाखवतात. पण हे सर्व लोक कष्टकरी जनतेबद्दल काय मत ठेवतात ह्याचा दाखला नुकताच मुंबई मधील एका न्यायालयाने सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर ह्यांच्या प्रतिक्रियांमधून मिळू शकतो. यांच्यापैकी काहींनी तर हे सुद्धा म्हटले की फूटपाथ झोपण्यासाठी नसतात, त्यामुळे ह्या घटनेसाठी खऱ्या अर्थाने जबाबदार सलमान खान नसून त्या रात्री फुटपाथवर झोपलेले लोकच आहेत. न्यायालयाने सलमान खानला २००३ मध्ये फुटपाथवर झोपलेल्या माणसांवर दारूच्या नशेत गाडी चढवण्याच्या गुन्ह्यामध्ये, ज्यात एका माणसाचा मृत्यू झाला होता व ४ लोक गंभीर जखमी झाले होते, ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तरीही सर्व कायदे धाब्यावर बसवून त्याला २ दिवसांमध्येच जामीन सुद्धा मिळाला आहे.
शिक्षा जाहीर झाल्यानंतर सर्व बॉलीवूड सलमानच्या बचावासाठी व समर्थनार्थ पुढे आले. त्यापैकी प्रत्येक जण सलमान निर्दोष असून त्याचे मन खूप निर्मळ असल्याचे सांगत होता. परंतु ह्या सर्व तामाश्यामध्ये ह्या अपघातामध्ये बळी गेलेल्या माणसाला न्याय मिळण्याचा संपूर्ण मुद्दाच निकालात काढण्यात आला. ह्यातून हे सिद्ध होते की आपल्या देशात कायदे हे फक्त कामगार व गरिबांवर लागू होतात. त्यामुळेच एकीकडे सलमान खान सारखे लोक गुन्हा करून सुद्धा तुरुंगाबाहेर राहतात आणि दूसरीकडे आपल्या न्याय मागण्यासाठी प्रदर्शन करणाऱ्या कामगारांना कुठल्याही पुराव्याशिवाय तुरुंगात खितपत ठेवले जाते. खरी गोष्ट ही आहे की ह्या चित्रपट सृष्टीमधील नायाकांमध्ये व कारखाना मालकांमध्ये काडीचाही फरक नाही. ज्या प्रमाणे कारखान्यामध्ये सर्व मेहनत कामगार करतो आणि नफा मालक हडप करतो, त्याच प्रमाणे एक चित्रपट बनवण्यामध्ये शेकडो कष्टकऱ्यांची मेहनत लागलेली असते पण श्रेय, नफा केवळ नि केवळ निर्माता, दिग्दर्शक, नायक-नायिका परस्परांमध्ये वाटून घेतात. ह्या व्यतिरिक्त, आपले आलिशान बंगले, महागडे कपडे तसेच आलिशान गाड्यांचा रुबाब दाखवत असताना हे लोक विसरून जातात की ह्या सर्व गोष्टींच्या मागे कित्येक कष्टकऱ्यांची मेहनत लपलेली आहे. पण मित्रांनो, ह्या सर्व परिस्थितीबद्दल आपण सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत, कारण आपणच आपल्या कष्टाच्या पैश्यांनी ह्यांच्या टुकार चित्रपटाचे तिकीट, सीडी विकत घेतोत. प्रत्यक्षात आपले खरे नायक हे नसून अमरीकेतील शिकागोमध्ये प्राणार्पण केलेले कामगार नेते आहेत, ज्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान केले, ज्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी १ मे ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, जर आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ह्या दमघोटू वातावरणातून मुक्त करून त्यांना मोकळ्या हवेत श्वास घेऊ देऊ इच्छित असू तर आपल्याला आपला गौरवशाली इतिहास जाणून घ्यावा लागेल. त्यासाठी गरजेचे आहे की आपण आपला रिकामा वेळ ह्या लोकांचे फालतू चित्रपट बघण्यात वाया घालवण्यापेक्षा अशी पुस्तके किंवा साहित्य वाचण्यात घालावा जी आपल्याला आपल्या अधिकारांबद्दल जागरूक करण्यास मदत करतील.
कामगार बिगुल, ऑगस्ट २०१५