छावा : फॅशिस्ट भोंग्यांतून बाहेर आलेला आणखी एक चित्रपट
सर्वात पहिलं सत्य हे आहे की हा चित्रपट कोणत्याही ऐतिहासिक घटनेवर आधारित नसून शिवाजी सावंत यांच्या एका कादंबरीवर आधारित आहे. पण तो असा सादर केला जातो की जणू काही तो इतिहासच उलगडतो आहे. दुसरं म्हणजे, जर आपण ऐतिहासिक तथ्यांकडे बारकाईने पाहिलं, तर ही गोष्ट स्पष्ट होते की औरंगजेब आणि शिवाजी यांमधील लढाई ही कोणत्याही धर्माच्या रक्षणासाठीची लढाई नव्हती, तर ती पूर्णपणे राजकीय सत्तेच्या विस्तारासाठीची लढाई होती. शिवाजींच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या सैन्यात आणि दरबारात मोठ्या प्रमाणात हिंदू मंत्री, सरदार आणि सैनिक होते. जर औरंगजेबाचं उद्दिष्ट खरंच सर्वांना मुसलमान बनवणं असतं, तर सर्वप्रथम त्याने आपल्या दरबारात आणि सैन्यात नेतृत्वाच्या भूमिकेत असलेल्या हिंदूंना मुसलमान बनवलं असतं. त्याने जेव्हा धर्मांतराचा वापर केला, तोदेखील राजकीय वर्चस्व आणि अहंकाराच्या लढाईचा एक भाग होता—भारतावर मुस्लिम राजवट प्रस्थापित करण्याची मोहीम नव्हे.