जोतीराव फुले – स्‍त्रीमुक्ती चे पक्षधर आणि जाती अंताच्‍या संघर्षाचे योद्धे

जोतीराव फुलेंची १९०वी जयंती (११ एप्रिल) नुकतीच झाली. तब्‍बल १६९ वर्षांपूर्वी मुलींची पहीली शाळा उघडण्‍याचा निर्णय जोतीराव फुल्‍यांनी घेतला होता. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशोपन थांबविण्‍यासाठी नाव्‍ह्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन अशा एक ना अनेक गोष्‍टींतून जोतीराव-सावित्रीबाईंचा स्‍त्री समतेचा, स्‍त्री स्‍वातंत्र्याचा दृष्‍टीकोन समोर येतो. स्‍त्री मुक्‍ती व जाती उच्‍चाटनाच्‍या संघर्षांमध्‍ये फुल्‍यांनी महत्‍वाचे योगदान दिलेले आहे. आज आपण सगळे जाणतोच आहोत की स्‍त्री मुक्‍ती आणि जाती उच्‍चाटन एकामेकां मध्‍ये जोडले गेले आहे. जाती उच्‍चाटनासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे आणि आंतरजातीय विवाह तेव्‍हाच होतील जेव्‍हा स्‍त्री मुक्‍त होईल. त्‍याचबरोबर स्‍त्रीसुद्धा खऱ्या अर्थाने तेव्‍हा स्‍वतंत्र होईल जेव्‍हा जाती नष्‍ट होतील.

सामाजिक परिवर्तनासाठी जोतीराव फुले कधीही सरकार कडे जोडे झिजवत बसले नाहीत. उपलब्‍ध साधनांसहीत त्‍यांनी आपल्‍या संघर्षास सुरुवात केली. सामाजिक प्रश्‍नांबाबतही फुले, शेटजी आणि भटजी या दोघांना शत्रू म्‍हणून चिन्‍हीत करतात. आयुष्‍याच्‍या उत्‍तरार्धात ते ब्रिटीश शासनाच्‍या आणि भारतातील ब्राम्‍हणवाद्यांच्‍या यूतीला ओळखायला लागले होते म्‍हणूनच ते म्‍हणाले होते की इंग्रजांच्‍या सत्‍तेमध्‍ये बहुतेक अधिकारी ब्राम्‍हण आहेत आणि जरी काही अधिकारी इंग्रज असले तरी ते हाडाने ब्राम्हणच आहेत.
आज जेव्‍हा संघी फासीवादी, जातीप्रथा आणि पितृसत्‍तेच्‍या आधारावर आणि सांप्रदायिक ध्रूवीकरणातून दलित, अल्‍पसंख्‍यांक व स्‍त्रीयांवरील हल्‍ले तीव्र करत आहेत, खाण्‍या-पिण्‍यापासून-जोडीदाराच्‍या निवडीचे व प्रेमाचे अधिकारही हिसकावून घेऊ इच्छितात, अशा काळात फुल्‍यांची जयंती साजरी करण्‍याचं औचित्‍य विशेष महत्‍वाच आहे. फुल्‍यांना अपेक्षित समाज निर्माण करण्‍यासाठी जोरदार संघर्ष करुणच त्‍यांच्‍या स्‍मृती जपल्‍या जाऊ शकतील. ब्राम्‍हणवाद व भांडवलशाहीच्‍या विरोधातला संघर्ष तीव्र करुनच जोतीराव फुलेंना खरेखुरे अभिवादन करता येईल.

शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

कामगार बिगुल, एप्रिल २०१७