दारुकांडातील पीडितांना मदत मिळवून देण्यासाठी संघर्ष समिती स्थापन
मालवणी दारुकांडानंतर सरकार तसेच लोकप्रतिनिधींचे उपेक्षेचे धोरण लक्षात घेऊन पीडितांच्या कुटुंबियांनी न्याय्य मदत मिळविण्यासाठी २८ जून रोजी मालवणी दारूकांड संघर्ष समिती स्थापन केली. बिगुल मजदूर दस्ता तसेच युनिव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमोक्रेसी अॅेण्ड इक्वॉलिटी या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांच्या पुढाकाराने ही संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना रु. १० लाख तसेच अपंगांना रु. ५ लाख मदत, मृतांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी सरकारी नोकरी, भविष्यात राज्यभरातील सरकारी इस्पितळांमध्ये सुयोग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अवैध दारुविक्री बंद या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या वतीने दि. ३० जून रोजी आझाद मैदान येथे निषेध मोर्चा तसेच धरणे आयोजित करण्यात आली.
या धरण्याच्या वेळी बोलताना बिगुल मजदूर दस्ताच्या सत्यनारायण यांनी सांगितले की एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी अवैध दारुविक्री पोलिस व अबकारी अधिकारी यांच्या आशिर्वादानेच होत होती हे उघड आहे. त्यामुळे सरकारला या हत्याकांडाची जबाबदारी झिडकारता येणार नाही. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, पण त्याचबरोबर या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले बहुतेक जण हे कुटुंबाचा एकमेव आधार होते. त्यामुळे त्यांच्या मागे कुटुंबियांना भरीव साहाय्य देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. नारायण खराडे यांनी सांगितले की या एकंदर प्रकरणात पीडित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल असल्याने सरकारने त्यांची उपेक्षा चालविली आहे. म्हणूनच न्याय्य मदत मिळवण्यासाठी पीडितांनाच आपली एकजूट बांधून संघर्ष करण्यावाचून पर्याय नाही. ज्यांच्या कार्यक्षेत्रात या दारुभट्ट्या चालत होत्या त्या आमदार व खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली. दीपिका इंदुलकर यांनी सांगितले की पोलिसांनी आपले कर्तव्य अगोदर बजावले असते तर असंख्य लोकांना जीव गमवावा लागला नसता. पोलिस फक्त हप्ते गोळा करण्याचे काम करतात. बेघर माणसाला एक झोपडी बांधायची असेल तर पैसे मागायला पोलिस ताबडतोब पोचतात. पैसे दिले नाही तर झोपडे मोडून टाकतात. या प्रकरणात डॉक्टरांनीदेखील रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी काहीही धडपड केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. श्रीमती भालेकर यांनी सांगितले की पती इस्पितळात दाखल असताना मानसिक ताणामुळे त्यांना स्वतःला भोवळ आली असता त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला. विषारी दारूने बाधित रुग्णांनासुद्धा अशाच प्रकारे फक्त ऑक्सिजन लावण्यात येत होता. एकूणच ऑक्सिजन लावून उपचार करण्याचे निव्वळ नाटक शताब्दी इस्पितळात केले जात होते, असे त्यांनी सांगितले. अमित जाधव यांनी सांगितले की त्यांचे वडील धडधाकट होते व विषारी दारुने त्यांचा अकस्मात जीव घेतला. इस्पितळात नेले असता त्यांना फक्त बेडवर ठेवण्यात आले. मृत्यूनंतरदेखील मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी नातेवाईकांना रात्रभर ताटकळत राहावे लागले.
यावेळी आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची आंदोलकांची मागणी होती. परंतु मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याने सरकारच्या वतीने एखाद्या वरीष्ठ मंत्र्यांनी भेटावे किंवा मुख्यमंत्र्यांसोबत संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाच्या भेटीची निश्चित तारीख देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी
केली. परंतु ना सरकारच्या वतीने कोणी पीडितांना भेटावयास आले, ना भेटीची तारीखही देण्यात आली. अखेर पीडित कुटुंबियांच्या सह्यांसह मागण्यांचे निवेदन संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.
कामगार बिगुल, ऑगस्ट २०१५