कविता : कामगार बंधो!
नामदेव ढसाळ
नामदेव ढसाळांचे नाव मराठी क्रांतिकारी आंदोलनाच्या अग्रणी कवींमध्ये आहे. दलित पॅंथर नंतरचे त्यांचे राजकीय जीवन चढ-उतारांनी भरलेले होते आणि शेवटी ते ज्या राजकारणासोबत गेले तो एका स्वतंत्र वादाचा मुद्दा आहे. परंतु त्यांच्या त्या बंडखोर काळातील एक क्रांतिकारक कविता आपल्यासमोर सादर करत आहोत.
हे जग तुझ्या श्रमावर चालले आहे
किती रे करतोस रक्ताचे पाणी
मी तुलाच सर्जनाचा निर्माता मानतो
बाकीच्यांचा हिशोब कशाला?
एकतृतीयांश जगावर रक्ताने रंगलेला ध्वज फडकावणारा तूच
ह्या देशाच्या रक्तधमनीतून वाहणाराही तूच
लोखंड वितळवणारा आणि आकार देणाराही तूच
जिथे जिथे यंत्राचा वावर झाला त्या शहरांना
क्रांतिकारक वारसा देणाराही तूच
तुझे घामेजलेले स्नायू चित्र मी माझ्या
कवितेत प्रतिमेसाठी वापरतो.
माझ्या कवितेला सप्राण करतो.
मला माहिताहे की तूच लढू शकतोस गुलामगिरीविरुद्ध
मला माहित आहे की तूच पर्दाफाश करू शकतो सरंजामशाहीचा
मला माहित आहे की तूच मूठमाती देऊ शकतो भांडवलशाहीला
मला माहित आहे की तूच वितरणासाठी वापरू शकतो शासनयंत्रणा
तुझा मी स्तुतिपाठक भाट
त्यांच्या लेखी मी देशद्रोही आणि गुन्हेगार
ते वल्गना करत आहेत माझ्या घरा वरून नांगर फिरवण्याची
कामगार बंधो!
ज्या हिटलरचं तू थडगं बांधलंस
त्या थडग्याचाच ह्या कुत्र्यांना विसर पडलाय
‘मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले’या कविता संग्रहा मधून
कामगार बिगुल, जुलै 2018