कुठवर अंधश्रद्धेच्या बळी ठरत राहतील महिला?
श्वेता
गेल्या ७ ऑगस्टच्या रात्री झारखंडमधील कांझिया माराएतोली गावातील पाच महिलांना हडळी घोषित करून व त्यांना विवस्त्र करून अत्यंत निर्घृण पद्धतीने ठार मारण्यात आले. या महिला गावातील मुलांवर काळी जादू करीत होत्या व त्यामुळे मुले आजारी होऊन मृत्यूमुखी पडत होती, असा गाववाल्यांचा आरोप होता. गावातील एका १८ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूसाठीदेखील याच पाच महिलांना जबाबदार धरण्यात आले व त्यानंतर त्यांना ठार मारण्यात आले. सात ऑगस्टच्या रात्री सुमारे १०० गावकरी शस्त्रे घेऊन या पाच महिलांच्या घरात घुसले व त्यांना फरफटत मैदानात घेऊन आले. यानंतर पंचायत बोलावण्यात आली व या महिलांना विवस्त्र करून चाकू, काठ्या आणि दगडांनी त्यांचा जीव जाईपर्यंत मारण्यात आले. मृत्यूचे हे तांडव पाच तास सुरू होते. मृतांच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवले, परंतु पोलिस कोणतीही कारवाई न करताच परत गेले.
ही अशा प्रकारची ना पहिली घटना आहे, ना शेवटची. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानुसार २००८ ते २०१३ या वर्षांमध्ये अशाच प्रकारे झारखंडमध्ये २२० महिलांना, ओरिसामध्ये १७७ महिलांना, आंध्रप्रदेशमध्ये १४३ महिलांना आणि हरयाणामध्ये ११७ महिलांना हडळी घोषित करून मारून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. या कालावधीमध्ये देशभरात अशा प्रकारे २२५७ हत्या करण्यात आल्या. येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे आकडे वास्तविक चित्र सादर करीत नाहीत, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये मृतांचे कुटुंबिय गुन्हेगारांच्या दहशतीपायी तक्रार नोंदवीत नाहीत किंवा पोलिस अशा घटनांची नोंद करण्यास टाळाटाळ करतात.
एकट्या राहणाऱ्या विधवा प्रामुख्याने अशा प्रकारच्या रानटी प्रथांच्या बळी ठरतात. हडळी घोषित करून त्यांना अपमानित केले जाते व त्यांच्यावर भीषण अत्याचार केले जातात. विवस्त्र करणे, मुंडन करणे, दात पाडणे, मल-मूत्र खाण्यास किंवा जनावरांचे रक्त पिण्यास भाग पाडले जाणे, जीवे मारणे ही या रानटीपणाची फक्त काही उदाहरणे आहेत. ज्या महिलांना जिवे मारण्यात येत नाही त्यांना गावातून हद्दपार केले जाते. जीवनाच्या मूलभूत संसाधनांपासून वंचित करून नव्या प्रदेशात राहण्यास त्यांना भाग पाडले जाते. खरे तर झारखंड, छत्तीसगढ, बिहार, ओरिसा, आणि राजस्थान या राज्यांमध्ये हडळ प्रथेच्या विरोधात कायदे अस्तित्त्वात आहेत, परंतु पुस्तकांची शोभा वाढवण्यापलीकडे त्यांना काहीही महत्त्व नाही.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अशा प्रकारच्या अनेक घटनांमध्ये या निरंकुश प्रथेच्या आडून जमीन बळकावण्याचे वा जमिनीसंबंधीचे वाद कायदाबाह्य मार्गाने सोडवण्याचे प्रकार चालतात. जेव्हा पतीच्या मृत्यूनंतर जमिनीची मालकी पत्नीकडे जाते तेव्हा तिची जमीन गिळंकृत करण्यासाठी नातेवाईक या कुप्रथेचा आधार घेतात. विधवा महिलेला हडळ ठरवून तिला वेगवेगळ्या संकंटांसाठी, दुर्घटनांसाठी, रोगांसाठी जबाबदार धरून तिची सामूहिक हत्या केली जाते व अशा प्रकारे जमीन बळकावण्याचे इरादे पार पाडले जातात. आपल्या दुःखांसाठी हडळींनी केलेली काळू जादू कारणीभूत असल्याचा अंधविश्वास भारतीय जनमानसात खोलवर रुजलेला असल्याने हडळी घोषित करून महिलांच्या होणाऱ्या हत्यांना न्याय्य ठरवतानाच या अत्यंत क्रूर हत्या घडवून आणण्याच्या प्रक्रियेतही सर्वसामान्य माणसे सहभागी होत असतात. खाजगी संपत्तीवर हक्क प्रस्थापित करण्याची भूक अशा निरंकुश महिला विरोधी कुप्रथेद्वारे शांत केली जाते.
आजच्या आधुनिक काळातही आपला समाज अशा प्रकारच्या आदिम कुप्रथांना चिकटून कां राहिला आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे कारण भारताच्या वासाहतिक इतिहासात आहे. भारताची सरंजामशाहीतून (जमीनदार, राजे-रजवाडे असलेली व्यवस्था) भांडवलशाहीपर्यंतची वाटचाल पाश्चात्य जगाप्रमाणे झाली नाही. पाश्चात्य समाजातील भांडवलशाहीला पुनर्जागरण, प्रबोधनाच्या चळवळींचा आधार होता. क्रांत्यांनी तेथील तमाम मागासलेल्या, पुराणमतवादी मूल्यांना उपटून फेकून दिले व त्यांच्या जागी तर्क आणि विज्ञानावर आधारित दृष्टिकोणाची पताका फडकवली. आज पाश्चात्य भांडवलशाहीदेखील रोगट व ऱ्हासोन्मुख झालेली आहे हे खरे, परंतु कधी काळी ती विज्ञान, लोकशाही, तर्क यांची वाहक होती. भारतीय समाज या उलथापालथीपासून नेहमीच वंचित राहिला. वसाहतपूर्व काळात भारतात स्वतंत्र भांडवली विकासाच्या ज्या शक्यता अस्तित्त्वात होत्या त्या ब्रिटिश वसाहतवादाने नष्ट केल्या. भारतीय भांडवलशाही वसाहतवादाच्या गर्भातून जन्माला आलेली विकलांग आणि थोटी भांडवलशाही आहे जिने आपल्या अनुरूप संस्कृती निर्माण केली आहे. भारतीय भांडवलशाहीने शतकांपासून चालत आलेल्या वेगवेगळ्या निरंकुश, महिलाविरोधी सडक्या मूल्यांना, अंधविश्वासांना ध्वस्त करण्याऐवजी त्यांचा स्वीकार केला व नव्याच्या नावाखाली जे काही स्थापन केले तेदेखिल निरंकुश होते. ही सारी पुराणपंथी मूल्ये समाजाच्या रोमारोमात अशी काही भिनली आहेत की आजही भारतीय माणूस जादू टोना, तंत्र मंत्र इत्यादींवर विश्वास ठेवतो. नैसर्गिक आणि सामाजिक परिघटनांकडे पाहण्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव त्यांना अंधविश्वासाकडे घेऊन जातो.
आज भांडवलशाही मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाचा वरवंटा चालवून जनतेपासून आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसारख्या मूलभूत सुविधासुद्धा हिरावून घेते आहे आणि लोकांना परिघावर ढकलते आहे. वास्तविक भांडवलशाहीची गती अशीच असते. कोट्यावधी कष्टकऱ्यांना दारिद्र्य आणि अडचणींच्या समुद्रात ढकलूनच ती बहरत असते. तर्काच्या अभावामुळे जनता आपल्या विपन्नावस्थेसाठी भांडवलशाहीला जबाबदार ठरवण्याऐवजी भूत-प्रेत, मागच्या जन्माचे कर्म, अलौकिक शक्ती यांना जबाबदार ठरवते आणि त्यांना शांत करण्यासाठी मग जादू टोणा, भूतप्रेत, तंत्र मंत्र, वेगवेगळ्या प्रकारचे बाबा यांचा आधार घेते. भांडवलशाही आज जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अंधविश्वासांना उत्तेजन देण्याचे काम करते आहे आणि तिने या गोष्टींचे रूपांतर एका संघटित उद्योगामध्ये केले आहे, ते उगीच नाही. अळंब्यांसारखे पसरलेले बाबा आणि तथाकथित चमत्कारिक लॉकेट इत्यादींचे व्यापारी याचे जिवंत उदाहरण आहेत. लोकांना अंधविश्वासाच्या कैदेत जखडून ठेवणे म्हणजे भांडवलशाहीसाठी वरदान आणि जनतेसाठी अभिशाप आहे.
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१५