कॉम्रेड लेनिन यांच्या स्मृतीदिना (21 जानेवारी) निमित्त – लेनिन च्या मृत्यूवर कँटाटा
बर्टोल्ट ब्रेष्ट (अनुवाद: अभिजित)
1.
ज्या दिवशी लेनिन गेले
म्हणतात की, शवाच्या निगराणीत तैनात एका सैनिकाने
आपल्या साथींना म्हटले: मी
विश्वास नाही ठेवू इच्छित यावर.
मी आत गेलो आणि त्यांच्या कानात ओरडलो: ‘इल्यिच
शोषक येत आहेत.’ ते हलले सुद्धा नाहीत.
तेव्हा मी जाणले की ते गेले आहेत.
2.
जेव्हा एखादा भला माणुस जाऊ इच्छितो
कसे थांबवू शकता तुम्ही त्याला?
त्याला सांगा की आत्ता का आहे त्याची गरज
हाच मार्ग आहे त्याला थांबवण्याचा.
3.
अजून कोणती गोष्ट थांबवू शकली असती लेनिनला जाण्यापासून?
4.
विचार केल्या त्या सैनिकाने
जेव्हा ते ऐकतील, शोषक येत आहेत
उठतील ते, असोत कितीही आजारी
कदाचित कुबड्यांवर चालत येतील
कदाचित परवानगी देतील की
त्यांना उचलून आणले जावे, पण
उठतील तर नक्कीच ते आणि येऊन
सामना करतील शोषकांचा
5.
जाणत होता तो सैनिक, की लेनिन
लढत राहिले सारं आयुष्य
शोषकां विरोधात
6.
आणि सामील होता तो सैनिक
शीतप्रासादावरच्या हल्ल्यात,
आणि घरी जाऊ इच्छित होता
कारण तिथे वाटली जात होती जमीन
तेव्हा लेनिनने त्याला म्हटले होते:
आत्ता इथेच थांब !
शोषक आहेत अजूनही हजर
आणि जोपर्यंत हजर आहे शोषण
लढावे लागेल त्याच्या विरोधात
जोपर्यंत आहे तुझे अस्तित्व
तुला लढावे लागेल त्याच्या विरोधात
7.
जे कमजोर आहेत ते लढत नाहीत . थोडे मजबूत
कदाचित तासभर लढतात.
जे अजून मजबूत आहेत ते लढतात अनेक वर्षे
सर्वात मजबूत ते असतात
जे लढतात आयुष्यभर.
तेच आहेत ज्यांच्याशिवाय दुनिया चालत नाही.
8.
क्रांतिकारकासाठी सन्मानगीत†
अनेकदा ते असतात खूप
गायब झाले, तर बरं होईल.
पण तो झाला गायब, तर भेडसावते त्याची उणीव.
तो करतो संघटीत आपला संघर्ष
मजुरी, चहा-पाणी
आणि राज्यसत्तेकरिता.
तो विचारतो संपत्तीला:
कूठून आलीस तू?
जिथेही आहे शांतता
तो बोलेल
आणि जिथे आहे शोषणाचे राज्य
आणि बोलले जाते नशिबाबद्दल
तो उंचावेल त्याचे बोट.
जेव्हा तो बसतो टेबलावर
पसरतो असंतोष
बिघडते चव
आणि खोली भासू लागते अरुंद.
त्याला जिथेही पळवून लावले जाते,
विद्रोह जातो सोबत आणि जिथून त्याला पळवले जाते
असंतोष राहतो मागे.
9.
जेव्हा लेनिन गेले आणि
लोकांना आली त्यांची आठवण
विजय तर झाला होता, पण
देश होता छिन्न-विछिन्न
लोक उठून लागले होते चालू, पण
रस्ता होता अंधारा
जेव्हा लेनिन गेले
फूटपाठवर बसलेले सैनिक रडले आणि
मजूरांनी आपल्या मशिनींवर काम बंद केले
आणि मुठी आवळल्या.
10.
जेव्हा लेनिन गेले,
तेव्हा ते असे होते
जणू झाडाने म्हटले पानांना
मी जातो.
11.
पालटलीत पंधरा वर्षे तेव्हापासून
जगाचा सहावा हिस्सा
स्वतंत्र आहे आता शोषणापासून.
‘शोषक येत आहेत!’ या हाकेवर
जनता पुन्हा उठून उभी राहते
नेहमीप्रमाणे.
झुंझण्यासाठी तैयार.
12.
लेनिन वसलेले आहेत
मजूर वर्गाच्या विशाल हृदयात,
ते होते आमचे शिक्षक.
ते लढत राहिले आमच्या सोबत.
ते वसलेले आहेत
मजूर वर्गाच्या विशाल हृदयात.
(1935)
* कॅंटाटा – संगीत वाद्यांसह गायली जाणारी संगीत रचना, जी मुख्यत्वे वर्णनात्मक आणि अनेक भागांमध्ये असते. या कॅंटाटाच्या संगिताला अंतिम रुप दिले होते ब्रेष्ट चे साथी आणि महान जर्मन संगीतकार हान्स आईस्लर यांनी. या रचनेचा आठवा भाग ‘क्रांतिकारकाच्या सन्मानात सन्मानगीत (ode)’ ब्रेष्ट ने पहिल्यांदा 1933 मध्ये गॉर्की च्या ‘आई’ कादंबरीवर आधारित आपल्या नाटकात लिहीला होता.
† ओड, ode, एखाद्या व्यक्तीच्या सन्मानार्थ रचलेली अनियमित वृत्ताची कविता