जालियनवाला बाग नूतनीकरणाच्या नावाने इतिहासाचे विकृतीकरण
पूजा
13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग येथे जमलेल्या शेकडो निःशस्त्र आणि निरपराध भारतीयांवर ब्रिटिश सरकारने बेधुंद गोळीबार करून हजारो भारतीयांची हत्या केली. हा दिवस ब्रिटिश कालीन भारतीय इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो. ब्रिटिश सरकारने तेव्हा नुकत्याच काढलेल्या रौलेट कायद्याविरोधात तसेच डॉ. सैफुद्दीन किचलु आणि डॉ.सत्यपाल यांच्या अटके विरोधात शांततेत आंदोलन करण्यासाठी बैसाखीच्या दिवशी सुमारे 10,000 भारतीय जालियनवाला बागेत उपस्थित होते. ह्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारला कुणालाही, केव्हाही अटक करून, त्या व्यक्तीवर खटला न चालवता कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळाला होता (ठीक त्याचप्रकारे ज्याप्रमाणे आज देशात फॅसिस्ट मोदी-योगी सरकारने यु.ए.पी.ए. सारख्या कायद्यांच्या आधारे राजकीय विरोधकांना पुराव्याशिवाय, खटला न चालवता तुरुंगात डांबण्याचे सत्र चालवले आहे)! आंदोलकांना चिरडण्यासाठी ब्रिगेडियर जनरल रेगिनाल्ड एडवर्ड हॅरी डायर जालियनवाला बाग मैदानाच्या एकमेव निमुळत्या प्रवेशद्वारातून आत आला व बाहेर जाण्यासाठीचा तो एकमेव मार्ग त्याने अडवून धरला. शांततेत आंदोलन करणाऱ्या जमावाला कसलीही पूर्वसूचना न देता, लहान मुले, वयस्क, महिला-पुरुष काहीही न बघता त्याने सोबत आणलेल्या सैन्याला गोळीबाराचा आदेश दिला. सुमारे 100 सैनिकांनी जवळजवळ 1650 फेऱ्यांचा गोळीबार न थांबता केला. ब्रिटिश सरकारी आकड्यानुसार 379 लोकं मारली गेली आणि 1200 जखमी झाले, पण इतर आकडे सांगतात की मरणाऱ्यांची संख्या ही हजारावर होती! गोळीबारानंतर जखमींना रक्ताच्या थारोळ्यात तसंच सोडून डायर आणि त्याचं सैन्य मैदानातून निघून गेलं. त्यानंतर अमृतसरसह संपूर्ण पंजाब मध्ये मार्शल कायदा लागू करण्यात आला. ज्यामुळे जखमींना दवाखान्यात नेणे, उपचार करणे देखील शक्य झाले नाही. संपूर्ण भारतात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ब्रिटिश सरकार च्या विरोधात भारतीय जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला. अनेक भारतीयांच्या मनात ह्या घटनेची जखम खोलवर कोरली गेली, ज्याचा परिणाम म्हणून देशभरात असहकार चळवळीने जोर धरला. भारताचे क्रांतिकारी शहीद भगतसिंह आणि त्यांच्या इतर क्रांतिकारी साथींवर देखील ह्या घटनेचा गंभीर प्रभाव होता. ह्या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने त्यांना बहाल केलेला ‘नाईटहूड’ चा किताब परत केला. काही इतिहासकारांच्या मते ब्रिटिश राजवटीच्या भारतातील अस्ताची ती पहिली पायरी होती, जिने कोटी भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यासाठी प्रेरित केले. एकीकडे जालियनवाला बाग हत्याकांडामुळे भारतात ब्रिटिश सत्तेविरूद्ध असंतोष वाढत होता तर दुसरीकडे जनरल डायर ला ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ कडून ‘पंजाबचा रक्षणकर्ता’ लिहिलेली तलवार भेट दिली गेली. आजही अनेक भारतीय ह्या घटनेच्या आठवणीत अस्वस्थ होतात, ह्या घटनेला कधीही भरून न निघणारी खोल जखम मानतात.
जालियनवाला बाग नूतनीकरणाच्या वेळी करण्यात आलेले बदल
जालियनवाला बाग मैदानाला 13 एप्रिल, 1961 रोजी शहीद स्मारक बनवण्यात आले. जिथे गरजेपुरती डागडुजी करून 13 एप्रिल 1919 च्या दुपारी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडातील वेदना, आक्रोश जतन करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नुकतेच नरेंद्र मोदी सरकारने या स्मारकाला आधुनिक चेहरा देत इतिहासाचे विकृतीकरण केले आहे. लॉकडाऊन मध्ये मोठ्या थाटामाटात ‘देशाला समर्पित जालियनवाला बाग स्मारकाचे नवे रूप’ म्हणून या स्मारकाचे ‘व्हरच्युअल उद्घाटन’ मोदीने केले. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 100 वर्षांनिमित्त 2019 मध्ये 20 कोटी रुपये खर्च करून एका खाजगी कंपनीला कंत्राट देऊन जालियनवाला बागेचे मूळ स्वरूप मोदी सरकार कडून पालटण्यात आले आहे. ह्या नवीन रुपात अनेक असे बदल करण्यात आले ज्यामधून जालियनवाला बागेच्या इतिहासाचे स्वरूपच बदलवून टाकले आहे. फक्त देशभरातूनच नाही तर अनेक विदेशातील इतिहासकारांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. ज्या निमुळत्या व्हरांड्यातून जनरल डायर आणि त्याचे सैन्य आत आले होते त्याला सोनेरी रंगाचे आकर्षक छत आणि टाइल्स बसवल्या आहेत व दोन्ही बाजूंना हसत खेळत मैदानात प्रवेश करणाऱ्या लोकांच्या मूर्त्या बसवल्या आहेत. व्हरांड्याची रुंदी यात वाढवली गेली आहे. पूर्वी हा निमुळता व्हरांडा, ज्यातून डायर ने मैदानात प्रवेश घेतला होता, त्या दिवशी मैदानात उपस्थित हजारो भारतीयांच्या बलिदानाची जाणीव करून द्यायचा. आज त्याचे पालटलेले रूप उत्सव साजरे करण्याची भावना उत्पन्न करते. शिवाय जनरल डायरच्या सैन्याने चालवलेल्या गोळ्यांचे निशाण जतन केलेल्या भिंतींपैकी एक भिंत काढून टाकण्यात आली आहे तर एक भिंत दर्शनी भागापासून मागे लोटण्यात आली आहे. जनरल डायरच्या गोळ्यांपासून वाचण्यासाठी अनेकांनी मैदानातील एका खोल विहिरीत उद्या घेतल्या. ती विहीर त्या दिवशी माणसांनी खच्च भरली होती जिला पुढे ‘शहीद विहीर’ नाव देण्यात आलं. त्या विहिरीला मोठ्ठाल्या काच लावून बंदिस्त करण्यात आले असून तिला ‘मॉडर्न’ बनवण्यात आले आहे. पूर्वी विहिरीची खोली बघून घटनेची जाणीव तीव्र होत असे, आता विहिरीला एखाद्या उच्चभ्रू, श्रीमंत मंदिरातील भाविकांच्या दर्शनासाठी असलेल्या जागेचे स्वरूप आले आहे. बागेत ठिकठिकाणी फुलांचे ताटवे उभे केले गेले आहेत, गवताला आकार देऊन विविध प्रकारची सजावट केली आहे, मूळ शहीद स्मारकाभोवती कमळांचा तलाव बनवला गेला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचे वर्णन करणारा 28 मिनिटांचा लाईट आणि साउंड शो देखील बनवण्यात आला आहे जो दररोज त्या ठिकाणी दाखवला जाईल जे ठिकाण शांततेत बसून शहीदांना स्मरण करण्यासाठी बनवले गेले होते! मैदानातील खोल्यांमध्ये 4 नवीन संग्रहालय देखील सुरू करण्यात आली आहेत ज्यात पंजाबच्या, भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या घटनांचे वर्णन करण्यात आले आहे. जागेला एक लोभस-ग्लॅमरस रूप देऊन, महागडे तिकीट ठेवून जालियनवाला बाग मैदानात कैद हजारो भारतीयांच्या आक्रोशस्थळाला एक पर्यटकांचं आकर्षण केंद्र, सेल्फी पॉइंट म्हणून विकसित करण्याचा मानस मोदी सरकारचा आहे. जर्मनी मध्ये ज्यू लोकांच्या प्रचंड मोठ्या नरसंहाराला कधीही विसरले जाऊ नये म्हणून बांधलेल्या स्मारकाला अश्याच प्रकारे सुशोभित केले गेले आणि आज त्या जागेला तरुण मुला मुलींना टाईमपास करण्यासाठी, सेल्फी, फोटोज काढण्यासाठी असलेल्या जागेचे स्वरूप आले आहे. ज्यू नरसंहराची साक्ष देणाऱ्या त्या स्मारकाचा आवाज दाबून टाकण्यात आला आहे. याचप्रकारे भारतीय इतिहासातील अत्यंत प्रखर आणि संवेदनशील घटनेला विकृत करून, खऱ्या इतिहासावर भंपकपणा चा सोनेरी मुलामा चढवून फॅसिस्ट मोदी सरकारने स्वतःची असंवेदनशील बाजू पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
इतिहासकार आणि जे.एन.यु चे माजी प्राध्यापक चमन लाल यांच्या मते ही घटना म्हणजे इतिहासाचे विकृतीकरण आहे. जालियानवाला बाग मैदानाला भेट दिल्यानंतर दुःख आणि वेदना यांची जाणीव व्हायला हवी. परंतु आता त्या जागेला एका सुंदर बागेचे रुप देण्यात आले आहे, जेणे करून लोकं तिथे येऊन मौज-मजा करू शकतील. जलियनवाला बाग एक सुंदर बगिचा नव्हता! इतिहासकार इरफान हबीब यांनी जालियनवाला बाग स्मारकाच्या ह्या नव्या रूपाला इतिहास आणि ऐतिहासिक वारश्याच्या किमतीवर करण्यात आलेले कंपनीकरण म्हटले आहे. डॅनिश-ब्रिटिश इतिहासकार किम वॅगनर, जे वसाहतकालीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक आहेत, यांनी ह्या ‘सौंदर्यीकरणा’ बाबत मांडले की जालियनवाला बाग हत्याकांडाचे शेवटचे अवशेष प्रभावी पणे मिटवण्यात आले आहेत. येणारी पिढी हा इतिहास आहे तसा कधीच समजू शकणार नाही. इतिहासकार पुष्पेश पंत यांनी म्हटले की प्रत्येक भारतीयाने सरकारच्या या कृत्याला विरोध केला पाहिजे. जालियनवाला बाग ही जागा इतिहासाच्या आठवणीने प्रत्येकाला विचलित, अस्वस्थ करणारी जागा होती, आनंद देणारं प्रेक्षणीय स्थळ नव्हती. भिंतीवर फॅन्सी मूर्त्या लावून एका वेदनादायक घटनेची खिल्ली उडवली गेली आहे. एकंदरीत देशस्तरावर तसेच जागतिक स्तरावर देखील जालियनवाला बाग नूतनीकरणामुळे झालेले इतिहासाचे विकृतीकरण आणि मोदी सरकारची कॉर्पोरेटपरस्त मानसिकता ह्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. यात शोबाजी, भपकेदार, दिखाऊपणामागे मोदी सरकारचे मूळ उद्दिष्ट जनतेला खऱ्या इतिहासाच्या वास्तवापासून तोडून जनतेपुढे एक काल्पनिक इतिहास उभा करणं हेच आहे!
सौंदर्यीकरणाच्या नावाखाली विकासाची दवंडी पिटवून वास्तव लपवण्याचे मोदी सरकारचे कसब आपण ट्रम्पच्या गुजरात भेटीवेळी गरीब वस्त्यांसमोर बांधलेली भिंत, 20 कोटी रुपयांचा मोदीच्या राहण्यासाठी घर बांधणारा सेंट्रल विस्टा प्रकल्प, सरदार पटेल ची 300 कोटी रुपयांची एकतेची मूर्ती व त्यासाठी बळजबरीने हडपलेल्या स्थानिक जनतेच्या जागा यातून बघितलेच आहे. आर. एस.एस चा मुख्य अजेंडा नेहमी अंधराष्ट्रवाद पसरवून जनतेत जातीय, धार्मिक तेढ निर्माण करणे हाच राहिलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील आर. एस. एस. च्या “वीरांनी” ब्रिटिश दरबारी मागितलेले माफीनामे, कधीही ब्रिटिश वसाहत वाद्यांविरुद्ध न लढलेले लढे यांसोबतच आजचे जालियनवाला बागेचे पालटलेले स्वरूप आर.एस एस चे ब्रिटिश सरकार प्रती असलेले ‘प्रेम’ दाखवून देते. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ती घटना जनतेच्या विस्मृतीत टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने तिथे कपड्यांची मोठी बाजारपेठ सुरू केली कारण ब्रिटिशांना हा इतिहास कायमसाठी पुसून टाकायचा होता! आज जालियनवाला बागेच्या इतिहासाच्या शेवटच्या अवशेषांना मिटवून, त्यांचे सुशोभीकरण करून आर.एस.एस.च्या वारसांनी ब्रिटिशांप्रती असलेली ‘स्वामीनिष्ठा’ पुन्हा सिद्ध केली आहे. भारत छोडो आंदोलनाच्या वेळी संघाने देशव्यापी जन उभारात शून्य भागीदारी केली. उलट आंदोलनाचा बहिष्कार करून इंग्रज सरकारला साथ दिली. शामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील खुलेआम ब्रिटिश सरकारच्या समर्थनात वक्तव्य केलीत. ब्रिटिश सरकारने देखील फॅसिस्टांच्या ह्या ‘स्वामीनिष्ठे’च्या बदल्यात हिंदू सांप्रदायिक गुंडांना कधीच आपल्या निशाण्यावर धरले नाही. आज हेच लोक सत्तेत आहेत. संघाने, योगी-मोदीने, स्वतःच्या राष्ट्र भक्तीचे कितीही गुणगान गायले तरी ब्रिटिशांना साथ देऊन भारतीय जनतेसोबत केलेल्या विश्वासघाताचा डाग कधीच मिटवू शकत नाही. इतिहासाला ह्या प्रकारे विकृत करून नव्याने काल्पनिक इतिहास घडवण्यामागचं मुख्य कारण हेच आहे की संघ स्वतःच्या काळ्या आणि गद्दारीच्या इतिहासाला घाबरतो. हिम्मतपूर्ण संघर्ष संघाने कधीच केला नाही आणि करणारही नाही. भ्याड हिंसक हल्ले करणं, हिंदू-मुस्लिम दंगे भडकवणे आणि भांडवलदारांची मनोभावे सेवा करणे हेच संघाचं सूत्र राहिलेलं आहे. पंजाब, यू.पी. निवडणुका जवळ आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर बीजेपी अंधराष्ट्रवादाची लाट पसरवत आहे. योगी-मोदी जोमात अनेक ‘महापुरुषांच्या’ मूर्त्यांची स्थापना करत आहेत. ब्रह्मलीन महंत दिग्विजय नाथ, राजा सुहेल देव, महाराणा प्रताप, राजा रुद्रेंद्र विक्रम सिंग, राजा मिहिर भोज, हेमवती नंदन बहुगुणा, विरांगना उदा देवी पासून ते आंबेडकरांची मूर्ती! अस्मितेचे राजकारण करण्यासाठी भाजपने कुणालाही सोडले नाही. हे इतकं आवश्यक आहे की प्रधानमंत्री, मुख्यमंत्री प्रत्येक मूर्ती उद्घाटनाला जातीने हजर असतात. शिवाय ह्या मूर्त्यांच्या संरक्षणासाठी विशेष फौज निर्माण केली आहे. जालियनवाला बाग स्मारकात बसवण्यात आलेल्या अनेक मूर्त्या ह्याच शृंखलेचा भाग आहेत.
या सर्व क्रियाकलापामागे कारण हे आहे की जनतेच्या इतिहास निर्मितीच्या शक्तीला फॅसिस्ट घाबरतात आणि मग इतिहासाला वास्तवापासून तोडून जनतेत आपली विचारधारा आणि राजकारण योग्य असल्याचे भासवतात.
सध्या सततच्या आर्थिक मंदीमुळे भांडवलशाही संकटग्रस्त असताना फॅसिस्ट शक्तींची भांडवलशाहीला स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नितांत आवश्यकता आहे. ऐतिहासिक रित्या फॅसिस्टांनी नेहमी कामगार वर्गाच्या शत्रुची भूमिका निभावली आहे. कामगार कष्टकरी जनतेला आज फॅसिस्टांद्वारे होणाऱ्या इतिहासाच्या विकृतीकरणाचा विरोध करणे, पुढच्या पिढ्यांसाठी इतिहासातील वास्तव जतन करून ठेवणे गरजेचे आहे कारण हा इतिहासच आपल्याला सांगतो की फॅसिस्ट उभाराला प्रतिरोध निर्माण करणं अशक्य नाही! धूळ आणि राखेच्या हजारो थरांखाली सत्य दाबून ठेवले तरी सत्य मिटवणे शक्य नाही. क्रांतीचा वारसा मागच्या पिढ्यांकडून येणाऱ्या पिढ्यांमध्ये प्रवाहित होत असतो. कामगार वर्गीय दृष्टिकोनातून तर्क, विज्ञान, लोकशाही मूल्य यांचा प्रचार प्रसार करत, कामगार वर्गाच्या संघर्षाच्या इतिहासाचे संरक्षण करत, फॅसिस्टांविरोधातला लढा मजबूत करणे आज अनिवार्य आहे.