अमेरिकेत अमेझॉन कंपनीत लेबर युनियनची स्थापना
रिटेल क्षेत्रातील कामगारांनो एक व्हा!
सुस्मित
1 एप्रिलला अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या स्टॅटन आयलंड या भागात ऐतिहासिक घटना घडली. येथील अमेझॉन वेअरहाऊस मधील कामगारांनी आपसात मतदान आयोजित करवून बहुमताने युनियन बनवण्याचा निर्णय घेतला. 1 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर, युनियन बनवण्याच्या प्रयत्नाविरोधातील कारवाया हाणून पाडत, भाडोत्री गुंडांना सामोरे जात, अमेझॉन लेबर युनियन (ALU) ही युनियन बनवणे शक्य झाले. ही अमेरिकेतल्या अमेझॉन कंपनीतील कामगारांची पहिलीच युनियन आहे. कामगारांच्या या विजयाने अमेझॉन, वॉलमार्ट सारख्या बलाढ्य रिटेल कंपन्यांमधील इतर कामगारांना तसेच रिटेल क्षेत्रातील इतर कामगारांना संघटित होण्यासाठी दिशा तसेच आत्मविश्वास मिळेल. भारतात सुद्धा अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मिंत्रा सारख्या रिटेल क्षेत्रातील कंपन्या वाढल्या आहेत. भारतातही या क्षेत्रातील कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते. अमेझॉन मध्ये कामगार युनियन बनण्याच्या प्रक्रियेतून, आणि त्यांच्या मागण्यांमधून शिकवण घेत आज भारतातील रिटेल क्षेत्रातील कामगारांनी संघटित होण्याची गरज आहे.
रिटेल क्षेत्रातील कामाची परिस्थिती
अमेझॉन, वॉलमार्ट या रिटेल क्षेत्रातील जगभरातील सगळ्यात मोठ्या कंपन्यांमध्ये येतात. आजच्या घडीला मध्यमवर्गातून येणाऱ्या ग्राहकाला कुठलीही गोष्ट एका क्लिक द्वारे मिळवण्याची सवय या कंपन्यांनी लावली आहे. ग्राहकांना एका क्लिकवर मिळणाऱ्या या सेवेमागे रिटेल क्षेत्रातील वेअरहाऊस (कोठार) आणि डिलीव्हरी करणाऱ्या कामगारांचे हाडं गळवणारे काम आहे. वेअरहाऊस मधल्या वस्तू पॅक करणाऱ्या कामगारापासून ते घरापर्यंत आणून देणाऱ्या “डिलिव्हरी बॉय” पर्यंत अनेक कामगारांच्या हातातून जाऊनच वस्तू घरपोच मिळते.
एकीकडे कंपन्यांचा नफा कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असताना याच कंपन्यांच्या कामगारांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अमेझॉन, वॉलमार्ट सारख्या बलाढ्य कंपन्यांचा नफा अनेक लहान प्रगत देशांपेक्षाही जास्त असतो. उदाहरणासाठी कोरोना महामारीपूर्वी 2019 मध्ये अमेझॉनचा नफा 92,640 कोटी रुपये इतका होता, तोच 2021 संपताना 2,64,000 कोटी रुपये इतका प्रचंड झाला. या कंपन्यात काम करणारे कामगार मुख्यतः कंत्राटी पद्धतीने नेमले जातात. अमेझॉन तर एका कामगाराला 3 वर्षाच्या पलीकडे कामावर ठेवत नाही तसेच कामगारांची बढती न करता मुख्यतः बाहेरून व्यवस्थापनातली माणसं नेमली जातात. कामगारांनी जास्तकाळ कंपनीत राहू नये याकरिता 3 वर्षानंतर कामगारांना कंपनी सोडण्यासाठी बोनस सुद्धा दिला जातो. याद्वारे तरुण कामगारांची संख्या जास्त राहून कामाची उत्पादकता वाढते आणि सोबतच कामगारांचे पगार सुद्धा कमी ठेवले जातात. यात जे कामगार तासानुसार काम करतात त्यांना अमेरिकेमध्ये तासाचे फक्त 15 ते 18 डॉलर इतके पगार दिले जातात (याला रूपयात बदलवून पगाराचा अंदाज घेऊ नये, कारण अमेरिकेमध्ये खर्चही डॉलर मध्ये करावा लागतो. उदाहरणार्थ पाण्याची बाटली 1डॉलरखाली मिळत नाही. तेव्हा हा पगार अमेरिकेत आत्यंतिक गरिबीचाच पगार ठरतो). याशिवाय कामगारांवर सतत पाळत ठेवली जाते. थोडा जरी वेळ तुम्ही विश्रांती घेतली तर तो “निष्क्रिय वेळ” धरला जातो आणि लगेचच मॅनेजर ची बोलणी खावी लागतात. यात पाणी पिण्याचा वेळ सुद्धा धरला जातो! असे सातत्याने होत राहिले तर तुम्हाला कामावरून काढूनही टाकले जाते. कामगारावर कामाचा इतका ताण असतो की वेळ वाचवायला अनेक कामगार मुतारी वा शौचालयात न जाता कामाच्या ठिकाणीच प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करतात! याशिवाय 10 तासाच्या शिफ्ट मध्ये 15 मिनिटांचे दोन ब्रेक आणि जेवणाचा 30 मिनिट ब्रेक एवढीच विश्रांती मिळते. अमेझॉन सारख्या कंपन्यांचे वेअरहाऊस हे अतिप्रचंड म्हणजे 10-15 फुटबॉल मैदाने मावतील एवढे असते त्यामुळे चालत जाण्याचा वेळ वाचवण्यासाठी जेवणाच्या ठिकाणी जाणे सुद्धा कामगार टाळतात आणि कामाच्या ठिकाणीच जेवण करतात. कामाच्या ठिकाणी बसायला खुर्च्याच नसतात आणि 10-12 तास उभे राहावे लागते.
वेअरहाऊसमध्ये मोठमोठी यंत्रे, मालाच्या वाहतुकीसाठी ट्रॉलीज यांचा भरणा असतो. यात अपघात ही नित्याचीच बाब आहे. यात एकच काम सतत केल्याने हाडांचे-स्नायूंचे (मसक्युलो-स्केलेटल) आजार होतात. पण या कंपन्यांसाठी फक्त आणि फक्त नफाच महत्वाचा असल्याने माणसाच्या जीवाची पर्वा यांना नसते. कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेसाठी नियमावली असतानाही याकडे दुर्लक्ष केले जाते. सणासुदीच्या काळात जेव्हा बाजारात या कंपन्या ‘सेल’ लावतात तेव्हा तर सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवले जातात. कोरोना काळात जेव्हा लोक घराबाहेर निघायला घाबरत होते तेव्हा वस्तू विकत घ्यायला लोक ऑनलाईनच वस्तूंची खरेदी करत होते. त्या काळात सर्व कामगारांना सक्तीचा ओव्हरटाईम होता. यात कहर म्हणजे कोरोना काळात वेअरहाऊसमध्ये कोरोनाचा रोगी आढळलेला असूनही कामगारांपासून हे लपवून ठेवले गेले, कामाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात नाही आली आणि कामगारांचा जीव धोक्यात घातला गेला. क्रीस स्मॉल्सने, जो नवीन अमेझॉन लेबर युनियनचा अध्यक्ष आहे, जेव्हा ही परिस्थिती व्यवस्थापनाच्या सतत निदर्शनास आणून दिली आणि काहीच होत नाही पाहून इतर 60 जणांसोबत काम बंद करून मीडिया समोर ही परिस्थिती सांगितली, तेव्हा त्याला कामावरून काढून टाकण्यात आले.
ही झाली वेअरहाऊसमधल्या कामगारांची परिस्थिती. यानंतर या संपूर्ण साखळीत येतात “डिलिव्हरी बॉईज” जे आपल्याला वेअरहाऊसमधून घरापर्यंत वस्तू आणून देतात. या कामगारांची परिस्थिती त्यांच्या वेअरहाऊसमधल्या साथींपेक्षा फार काही वेगळी नाही. या “डिलिव्हरी बॉईज” ना तर कंपनीचे कामगार सुद्धा समजले जात नाही यांना “स्वतंत्र रोजगारी व्यक्ती” समजले जाते. दिवसाचे कामाचे तास ठरलेले नसतात. महिन्याला 10-15 हजार रुपयांसाठी 10-12 तास काम करावेच लागते. प्रत्येक डिलिव्हरी मागे फक्त 10-15 रुपये मिळतात बाकी सगळे या कंपन्या हडप करतात. याशिवाय डिलिव्हरी लवकरात लवकर पोहोचवण्याचा मानसिक ताण वेगळाच! डिलीव्हरी कामगारांचा मुद्दा एक स्वतंत्र लेखाचाच मुद्दा बनतो.
या सगळ्यातून हे स्पष्ट होते की या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या कामगारांच्या शोषणावरच उभ्या आहेत. या शोषणाविरुद्ध, भांडवलाच्या ताकदीपुढे जर लढायचे असेल तर कामगारांची युनियनरूपी एकजूट हे पहिले पाऊल तर उचलावेच लागेल.
अमेझॉन लेबर युनियनच्या मागण्या
अमेझॉन लेबर युनियनच्या मागण्या प्रामुख्याने खालील प्रमाणे आहेत. तासाला किमान 30 डॉलर पगार, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, शिस्तभंगाच्या मीटिंग मध्ये युनियनचे प्रतिनिधित्व, सक्तीचा ओव्हरटाईम काढून ऐच्छिक ओव्हरटाईम, 30 मिनिटांचे 2 ब्रेक, 1 तासाचा जेवणाचा ब्रेक, मोबाईलचा वापर करण्याची मुभा, आणि पगारी रजा या आहेत. ही युनियन सध्यातरी कुठल्याही भांडवली पक्षाच्या किंवा मालकांच्या मांडीवर जाऊन बसलेली नाहीये आणि कामगारांची एक स्वतंत्र युनियन आहे. अशी युनियनच खऱ्या अर्थाने कामगारांच्या हक्कांचे रक्षण करू शकते.
कामगारांची परिस्थिती सगळीकडे सारखीच
वर वर्णिलेली परिस्थिती ही आज जगातल्या सगळ्या कामगारांची आहे. कामगार चळवळींच्या पिछाडीवर जाण्याचाच परिणाम आहे की 21व्या शतकातल्या कामगार चळवळीच्या मागण्या आणि 20 व्या शतकातल्या चळवळीच्या मागण्या त्याच आहेत, कारण कधीकाळी लढून मिळवलेले अधिकार पुन्हा मिळवण्यासाठी आज संघर्ष करावे लागत आहेत. दिडशे वर्षांपूर्वी “8 तास काम, 8 तास आराम आणि 8 तास मनोरंजन” या मागणीसाठी लढा उभा करून कामगारांनी आंदोलन उभे केले आणि मागणी काही प्रमाणात पदरात पाडून घेतलीही, पण आज चक्र उलटी फिरत आहेत आणि कामगारांना पुन्हा याच प्रकारच्या मागण्यांसाठी लढे उभे करावे लागत आहेत.
युनियन बनवणे ही कामगार वर्गाच्या दीर्घकालीक लढ्याची पहिली पायरी असते. अमेझॉन कामगारांच्या युनियनच्या निर्मितीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की कामगारांची वर्गीय चेतना जिवंत असतेच. पण फक्त आर्थिक-वर्गीय मागण्यांनी क्रांतिकारी परिवर्तन होऊ शकत नाही, तर मार्क्सवादी, क्रांतिकारी वैज्ञानिक कामगार वर्गीय विचाराच्या आधारावर राज्यसत्तेच्या वर्गचरित्राच्या प्रश्नापर्यंत कामगारांची चेतना विकसित करवून आणि क्रांतिकारी आंदोलनाचा भाग बनूनच ते होऊ शकते. अमेझॉनच्या युनियनच्या एकंदरीत घडणीमध्ये योग्य मार्क्सवादी समजदारीवर आधारित नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे ही युनियन सुद्धा अर्थवादाच्या घेऱ्यातच अडकून पडण्याची शक्यता मोठी आहे.
कामगार बिगुल एप्रिल, 2022