फॅसिझमची मुलभूत समजदारी विकसित करा आणि पुढे येऊन आपली जबाबदारी उचला

कविता कृष्णपल्लवी

फॅसिझमचा विरोध करणारे अनेक बुद्धिजीवी आणि विविध संघटनांमध्येसुद्धा फॅसिझम संदर्भात अनेक प्रकारचे भ्रम आहेत. कामगार बिगुलच्या वाचकांकडूनही फॅसिझमबद्दल विविध प्रकारचे प्रश्न आमच्याकडे येत असतात. कविता कृष्णपल्लवी यांची खालील टिप्पणी आपल्याला हे समजायला मदत करते की फॅसिझम एक सामाजिक आंदोलन आहे, ज्याची मूळे भारतीय समाजात खोलवर गेलेली आहेत. याला केवळ निवडणुकीत हरवून पराजित किंवा नेस्तनाबूत केले जाऊ शकत नाही. त्याविरुद्ध एका लांब पल्ल्याच्या लढाईची तयारी करावी लागेल. ही टिप्पणी मोदी सत्तेत येण्याच्या आधी लिहिली गेली होती परंतु आज ती अजूनच जास्त प्रासंगिक आहे.

संपादक

  1. फॅसिझम मरणासन्न भांडवलशाही आहे (लेनिन). ती वित्तीय भांडवलाच्या आर्थिक हितांची सर्वात प्रतिक्रियावादी अभिव्यक्ती आहे.
  2. फॅसिझम अनेक विसंगत  तत्वांचे बनलेले एक  प्रतिक्रियावादी  सामाजिक  आंदोलन आहे. मोठ्या वित्तीय-औद्योगिक भांडवलदारांच्या एका हिश्श्याव्यतिरिक्त व्यापारी वर्ग आणि कुलकांचा एक हिस्सासुद्धा याचे समर्थन करतो. उच्च मध्यम वर्गाचा एक हिस्साही याचे समर्थन करतो.
  3. फॅसिझम भांडवली व्यवस्थेमध्ये त्रस्त अशा मध्यमवर्गातील पिवळ्या-रुग्ण चेहऱ्याच्या युवकांना लोकरंजक नारे देऊन आणि “निर्माण केलेल्या” खोट्या शत्रुविरुद्ध उन्माद तयार करून आपल्या भोवती संघटित करतो. विमानवीकरण आणि लंपटपणाचे शिकार असलेल्या बेरोजगार-अर्धबेरोजगार, असंघटित युवक कामगारांमधून फॅसिझम आपल्या गुंड संघटनांमध्ये भरती करत असतो.
  4. फॅसिझम  कठोर  पुरुषसत्तावादी  आणि  स्त्री-विरोधी  असतो. प्रथमपासूनच केले जात असलेले स्त्री विरोधी मानसिक अनुकूलन फॅसिस्ट कार्यकर्त्यांना सदाचाराच्या खोट्या वेशात मनोरोगी आणि कुंठितावस्थेचे शिकार बनवतो.
  5. फॅसिझम एक कॅडर आधारित प्रतिक्रियावादी सामाजिक आंदोलन आहे, जे समाजात तृणमूल स्तरावर काम करते. ते नेहमीच अनेक संघटना आणि आघाड्या बनवून काम करते. प्रत्येक ठिकाणी त्याच्या विविध प्रकारच्या गुंड संघटना असतात. भांडवली लोकशाहीत संसदीय निवडणूक लढवणारा पक्ष त्याची केवळ एक आघाडी असते.
  6. फॅसिझम नेहमीच उग्र अंधराष्ट्रवादी घोषणा देतो. तो नेहमीच संस्कृतीचा बुरखा पांघरून येतो, संस्कृतीचा मुख्य घटक धर्म किंवा वंश सांगतो आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा नारा देतो. अशा प्रकारे देशात बहुसंख्याक धर्म किंवा वंशाचा राष्ट्रवादच मान्य होतो आणि धार्मिक किंवा वांशिक अल्पसंख्यांक बाहेरचे होऊन जातात. या धारणेला आणखी पुष्ट करण्यासाठी फॅसिस्ट इतिहासाला विकृत करतात, मिथकांना ऐतिहासिक सत्य म्हणून पुढे करतात आणि ऐतिहासिक सत्याचे मिथ्याकरण करतात.
  7. फॅसिझम धार्मिक किंवा वांशिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यासाठी संस्कृती आणि इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी तृणमूल प्रचाराच्या विविध रूपांसोबतच शिक्षणाचा कुशलतेने आणि व्यवस्थित उपयोग करतात. धार्मिक प्रतिष्ठानांचा सुद्धा ते भरपूर वापर करतात.
  8. फॅसिस्ट सुव्यवस्थितपणे सैन्य आणि पोलीस तसेच नोकरशाहीमध्ये आपल्या लोकांना घुसवतो तसेच यामध्ये पूर्वीपासून असलेल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना हेरुन आपल्या प्रभावाखाली घेतो.
  9. स्वतःच्या वृत्तपत्र-नियतकालिकांपेक्षाही अधिक फॅसिस्ट मुख्याधारेच्या भांडवली मीडियाचा वापर करून घेतात. यासाठी ते मीडिया प्रतिष्ठानांमध्ये योजनाबद्ध पद्धतीने आपले लोक घुसवतात आणि उजव्या विचारसरणीच्या बुद्धिजीवींना ओळखून त्यांचा वापर करतात.
  10. फॅसिस्ट केवळ इतिहासाचे विकृतीकरण करतात असे नाही तर सामान्यपणे आपल्या हितपूर्तीसाठी कुठल्याही मुद्द्यांमध्ये पूर्णपणे खोट्याला सुद्धा सत्य म्हणून प्रस्तुत करतात. सगळेच फॅसिस्ट गोबेल्सच्या या सूत्र वाक्याला प्रमाण मानतात ‘एका असत्याला शंभरदा सांगितले तर ते सत्य वाटायला लागते’.
  11. फॅसिस्ट नेहमीच आतल्या-आत सुरुवातीपासूनच कम्युनिस्टांना आपला मुख्य शत्रू मानतात आणि योग्य संधी मिळताच त्यांचा सफाया करतात. डाव्या लेखक-कलाकारांना सुद्धा ते सोडत नाहीत.  इतिहासात नेहमीच असे झालेले आहे. फॅसिस्टांबद्दल भ्रमात राहणाऱ्या, निष्काळजीपणे वागणाऱ्या किंवा ढिलेपणाने वागणाऱ्या कम्युनिस्टांना इतिहासात नेहमीच किंमत चुकवावी लागली आहे. फॅसिस्टांनी तर सत्ता सुदृढीकरणानंतर संसदीय कम्युनिस्टांना आणि सामाजिक लोकशाहीवाद्यांना सुद्धा सोडले नाही.
  12. आजचे फॅसिस्ट हिटलर प्रमाणे ज्यूंचा सफाया करण्याबाबत विचार करत नाहीत. ते दंगे आणि राज्य प्रायोजित नरसंहाराच्या माध्यमातून दहशत निर्माण करून धार्मिक अल्पसंख्यांकांना अशा पद्धतीचा दुय्यम दर्जाचा नागरिक बनवून देऊ इच्छितात ज्यांच्यासाठी कायदा आणि लोकशाही अधिकारांचा काही अर्थच राहणार नाही. ते खालच्या दर्जाचे मजुरी गुलाम बनून जातील आणि स्वस्त दरांवर त्यांच्या श्रमशक्तीचे शोषण केले जाऊ शकेल. सोबतच कामगार वर्गामध्ये तयार झालेल्या धार्मिक भिंतींचा वापर करून कामगार आंदोलनाला विभागून कमजोर करतो, जेणेकरून आंदोलनाला तोडणे अजून सोपे होऊन जाते.
  13. फॅसिस्ट गुंड कुठल्याही देशांमध्ये संपाला तोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. जिथे सुद्धा ते सत्तेमध्ये आले, त्यांनी कम्युनिस्टांचा सफाया करण्यासोबतच कामगार आंदोलनाचे पाशवी दमन केले.
  14. भूतकाळातून धडा घेऊन आजचा भांडवलदार वर्ग फॅसिझमचा आपल्या हितपूर्तीसाठी साखळीला बांधलेल्या कुत्र्याप्रमाणेच नियंत्रितपणे वापर करून घेऊ इच्छितो. परंतु हा खतरनाक कुत्रा साखळी तोडू सुद्धा शकतो आणि एवढा उत्पात करू शकतो जेवढी भांडवलदार वर्गाची इच्छासुद्धा नसेल. फॅसिझमच नवउदारवादाच्या धोरणांना दंडुक्याच्या जोरावर लागू करू शकतो, त्यामुळेच संकटग्रस्त भांडवलशाही हा पर्याय निवडण्याकडे जात आहे.
  15. जर आपल्यामध्ये थोडी सुद्धा इतिहासाची समज असेल तर ही गोष्ट योग्य प्रकारे समजून घेतली पाहिजे की फॅसिझम सोबत लढण्याचा प्रश्न म्हणजे केवळ निवडणुकीतल्या जिंकण्या-हरण्याचा प्रश्न नव्हे. या तीव्र प्रतिक्रियावादी सामाजिक-राजकीय आंदोलनाचा सामना केवळ एक झुंजार क्रांतिकारी डावे आंदोलनच करू शकते.

या बाबींसोबत जे साथी सहमत आहेत त्यांनी याचा व्यापक प्रचार करावा आणि स्वतः सुद्धा फॅसिझम विरोधी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याविषयी विचार करावा.

अनुवाद: जयवर्धन