भाजप-संघाच्या अफवा कारखान्याचे अजून एक कुंभांड फुटले

कात्यायनी

अफवा पसरवणे हा सर्व फॅसिस्टांच्या रणनीतीचा मूलभूत भाग आहे आणि संघाची हिंदुत्ववादी यंत्रणा हे काम जुन्या फॅसिस्टांपेक्षा अधिक प्रभावीपणे, सरकारी प्रचार यंत्रणा आणि गोदी मीडियासोबतच सोशल मीडियावर आयटी सेलची भाडोत्री माणसे वापरून करत आहे. जातीय तणाव आणि दंगलीच्या प्रत्येक प्रकरणात त्यांची कटकारस्थानांची यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. अफवांचे हे कारखाने अहोरात्र काम करत असतात, सतत जातीयवादी प्रचार करतात आणि खोट्या बातम्या तयार करतात, मुस्लिम लोकसंख्येला लक्ष्य करतात, धार्मिक कट्टरतावादी उन्माद पसरवतात आणि अंधराष्ट्रवादाची लाट निर्माण करतात.

नुकतेच त्याचे असेच एक घृणास्पद कृत्य समोर आले आहे. भाजपच्या आयटी सेलने अलीकडे सोशल मीडियावर असेच पाच व्हिडिओ व्हायरल केले होते ज्यात उत्तर भारतातील कामगारांना तमिळनाडूमध्ये धमकावले जात आहे, शिवीगाळ केली जात आहे आणि मारहाण केली जात आहे हे दाखवण्यासाठी छायाचित्रे लबाडीने बदलण्यात आली होती. याला दुजोरा देण्यासाठी भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के. अण्णामलाई यांनीही द्रमुक नेत्याच्या जुन्या विधानाच्या आधारे ट्वीट केले. हास्यास्पद बाब म्हणजे वस्तुस्थिती न तपासता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यावर निवेदन सुद्धा प्रसिद्ध केले!

पण अल्ट-न्यूजचे प्रतीक सिन्हा आणि मुहम्मद जुबेर यांनी केलेल्या तपासणीनंतर पाचही व्हिडिओ बनावट असल्याचे आढळून आले. पत्रकार कलीम अहमद यांचा या संदर्भातील लेखही 2 मार्च रोजी ‘अल्ट न्यूज’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला. चेन्नईच्या सायबर गुन्हे शाखेने तमिळनाडू भाजप अध्यक्षाविरुद्ध खोटा प्रचार करून तणाव आणि तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटच्या प्रवक्त्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘हिंदू-मुस्लीम’ नंतर ‘उत्तर-दक्षिण’ मध्ये तणाव आणि भांडण भडकवण्यामागे संघी फॅसिस्टांचा हेतू काय आहे, हे समजणे फारसे अवघड नाही. खरे तर हे सर्व 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा एक भाग आहे. काशी-मथुरासारखे मुद्दे, गोहत्या, मदरसे आदी ध्रुवीकरणाचे मुद्दे आणि निवडणुकीपूर्वी ‘पाकिस्तान-पाकिस्तान’चा ओरडा करत राष्ट्रविरोधी लाट निर्माण करणे ही भाजपच्या भात्यातील हत्यारे आहेतच, पण आता महागाई आणि बेरोजगारीचा मारा सहन करत असलेल्या जनतेमध्ये ज्या प्रकारे “विकासपुरुषा”चे सर्व फुगे फुटत आहेत, ते पाहता भाजप आपला विजय निश्चित करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे. यानंतर जिथे गरज आणि शक्यता असेल तिथे ईव्हीएमचा वापर केला जाईल आणि मग निवडणुकीनंतर संसदीय घोडेबाजारात घोडे खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांच्या पोत्यांची तोंडे उघडणे हाच शेवटचा पर्याय आहेच. तरी पण, शेवटचा पर्याय वापरण्या अगोदर इतर डावपेच तर खेळले जातीलच!

तामिळनाडूमध्ये उत्तर भारतीय मजुरांवर हल्ले झाल्याच्या अफवा पसरवणे हा त्याच विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग आहे. भाजपला माहीत आहे की तामिळनाडूमध्ये आपली व्होटबँक नगण्य आहे आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी करणे किंवा भाजपचे दुसरे डावपेच वापरणे तेथे कठीण जाईल आणि तेथील निवडणूक निकालांवर त्याचा फारसा फरक पडणार नाही. पण होय, तिथल्या उत्तर भारतीयांवर हल्ल्यांच्या अफवा पसरवून ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ संघर्षाला खतपाणी घातलं, तर उत्तर भारत, विशेषतः यू.पी. आणि बिहारमध्ये मतांची चांगली बेगमी होऊ शकते.

आता या फॅसिस्ट गुंडगिरीचा पर्दाफाश झाला असला तरी मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मीडियावर संघी फॅसिस्ट व्यवस्थेची पकड आणि त्याचा प्रचार घरोघरी पोहोचवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे पाहता असे म्हणता येईल की ही अफवा जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल तितक्या लोकांपर्यंत या खोट्या गोष्टीचा पर्दाफाश पोहोचणार नाही.

अशा प्रत्येक घटनेने अधिकच खोलवर जाणवते की फॅसिस्टांच्या अशा कारवायांना जनतेच्या क्रांतिकारी संघर्षांसोबत पर्यायी मीडिया निर्माण करूनच रोखता येईल.  सोबतच, जेव्हा कामगार वर्गाच्या कॅडर आधारित क्रांतिकारी नेतृत्वकारी संघटनेच्या पुढाकाराने, आणि तिच्या नेतृत्वात,  तळागाळातून कामगारांचे विविध प्रकारचे मंच, संस्था, आणि जनसंघटना उभ्या करून फॅसिस्टांविरोधात एका दीर्घकालिक निर्णायक संघर्षाची तयारी पुढे जाईल, तेव्हा घराघरांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यात कामगार वर्गाचा क्रांतिकारी पक्षसुद्धा प्रभावी बनेल, आणि तो फॅसिस्ट प्रचाराला सडेतोड उत्तर देऊ शकेल.

अनुवाद: राहुल

कामगार बिगुल, मार्च 2023