मार्क्सचे भांडवल समजून घ्याः चित्रांकनासह भाग पहिला – आदिम संचयाचे रहस्य
अनुवाद : नारायण खराडे
अमेरिकेच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आणि प्रसिद्ध राजकीय चित्रकार ह्युगो गेलर्ट यांनी १९३४ मध्ये मार्क्सच्या भांडवलाच्या आधारे एक पुस्तक कार्ल मार्क्सज कॅपिटल इन लिथोग्राफ लिहिले होते. या पुस्तकामध्ये भांडवलमध्ये दिलेल्या प्रमुख अवधारणा चित्रांच्या माध्यमातून समजावल्या गेल्या होत्या. गेलर्ट यांच्याच शब्दांत या पुस्तकामध्ये मूळ पुस्तकातील सर्वांत महत्त्वपूर्ण अंश तेवढे दिलेले आहेत. परंतु मार्क्सवादाच्या मूलभूत जाणीवेसाठी आवश्यक सामग्री चित्रांकनाच्या साहाय्याने दिलेली आहे. कामगार बिगुलच्या वाचकांसाठी या सुंदर कृतीतील अंश या अंकापासून एका शृंखलेच्या रूपात दले जाणार आहेत. – संपादक
१
धर्मशास्त्रामध्ये मूळ पाप जी भूमिका पार पाडीत असते, साधारणपणे राजकीय शास्त्रामध्ये आदिम संचयाची तीच भूमिका असते. आदमने वर्ज्य असलेले सफरचंद खाल्ले, म्हणून जगात पाप निर्माण झाले. मूळ पापाचा उद्भव एका लोककथेच्या द्वारे सांगण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, आदिम संचयाबद्दल आपल्याला सांगण्यात येते की फार पूर्वी जगात दोन प्रकारचे लोक होते. एकीकडे काही श्रेष्ठ लोक होते, जे कष्टाळू होते, बुद्धिमान होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काटकसर करणारे होते, दुसरीकडे कामचुकार आणि बदमाश लोक होते जे आपली सगळी धनसंपत्ती भोगविलासात उधळत होते. परंतु एक फरक होता. पतनाच्या धर्मशास्त्रीय कथेमध्ये आपल्याला कमीत कमी असे सांगण्यात आले आहे की माणसाला आपल्या भाजीभाकरीसाठी घाम कां गाळावा लागतो. काही लोकांना आपल्या भाजीभाकरीसाठी असे काहीही कां करावे लागत नाही, हे आर्थिक इतिहासाच्या पतनाची कथा आपल्याला सांगते. हे आर्थिक पतनच सामान्य माणसाच्या गरीबीचे कारण आहे. कितीही कष्ट उपसले तरी त्यांच्यापाशी विकण्यासाठी स्वतःखेरीच दुसरे काहीही असत नाही, तसेच काही लोकांच्या संपदेची सुरुवातसुद्धा तेथूनच होत असते. ती सतत वाढत जात राहते, वास्तविक त्या लोकांनी काम करायचे कधीच सोडून दिले आहे.
आजसुद्धा लोक अशा प्रकारची मुक्ताफळे उधळीत असतात. जेव्हा जेव्हा संपत्तीचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा ही घोषणा करणे प्रत्येक व्यक्तीचे पवित्र कर्तव्य ठरते. प्रत्येक वयात आणि मानसिक विकासाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये लोकांना फक्त अक्षरमाला शिकवली जाते. सर्वांना माहीतच आहे, वास्तविक जगाच्या इतिहासात युद्ध, इतरांना परतंत्र बनवणे, दरोडेखोरी, हत्या आणि थोडक्यात सांगायचे तर बळप्रयोगाची मुख्य भूमिका आहे. परंतु राजकीय अर्थशास्त्राचा सभ्य इतिहास नेहमीच मनोहर कहाण्यांना चिकटून राहिलेला दिसतो. अर्थशास्त्र्यांचे ऐकायचे झाले तर , आपला काळ सोडल्यास अधिकार आणि श्रम नेहमीच समृद्धीचे एकमेव माध्यम राहिले आहे. परंतु आदिम संचय ज्या पद्धतीने झाला आहे, ते दुसरे काहीही असू शकेल, मनोरम नक्कीच नाही, हे वास्तव आहे.
२
ज्या प्रकारे उत्पादनाची साधने तसेच जीवननिर्वाहाची साधने आधीपासूनच भांडवल नसतात, तसेच चलन आणि मालसुद्धा आधीपासूनच भांडवल नसतात. त्यांचे भांडवलात रूपांतर करावे लागते. परंतु हे रूपांतर काही निश्चित परिस्थितींमध्येच होऊ शकते, त्यामध्ये निम्नलिखित परिस्थिती अनिवार्य आहेत.
दोन भिन्न प्रकारच्या मालाच्या मालकांचे समोरासमोर असणे आवश्यक आहे आणि त्यांनी एका परस्पर संबंधामध्ये बांधले जाणे गरजेचे आहे. एकीक़डे चलन, उत्पादनाची साधने आणि जीवन निर्वाहाच्या साधनांचे मालक असतात. ते दुसऱ्यांची श्रमशक्ती विकत घेऊन आपल्या मालकीच्या मूल्याची एकूण राशी वाढवण्याची लालसा बाळगून असतात. दुसरीकडे असले पाहिजेत स्वतंत्र कामगार, आपली श्रमशक्ती विकणारे आणि म्हणूनच श्रम विकणारे. त्यांना दोन अर्थांनी स्वतंत्र असावे लागते. पहिली गोष्ट म्हणजे, दास, भूदास आदींप्रमाणे ते स्वत: उत्पादनाच्या साधनांचा प्रत्यक्ष हिस्सा असता कामा नयेत आणि ते उत्पादनाच्या साधनांशी जोडलेले असता कामा नयेत. दुसरे म्हणजे, ज्या प्रकारे मालक शेतकऱ्याकडे उत्पादनाची साधने असतात त्याप्रमाणे त्यांच्यापाशी उत्पादनाची साधने असता कामा नयेत. स्वतंत्र कामगार स्वतः कोणत्याही उत्पादनाच्या साधनांपासून स्वतंत्र आणि त्यांच्या ओझ्यापासून मुक्त असतात.
मालाच्या बाजारपेठेचे अशा प्रकारे धृवीकरण झाल्यानंतर भांडवली उत्पादनासाठी आवश्यक मूलभूत अटी पूर्ण होतात. भांडवली व्यवस्था कामगार आणि जिच्याद्वारे त्यांचे श्रम मूर्त रूप प्राप्त करीत असतात, त्या संपत्तीमध्ये एक परात्मता गृहीत धरून चालते. भांडवली उत्पादन आपल्या पायांवर उभे राहताच, ते ही परात्मता फक्त भूतकाळाचा वारसा म्हणून मिळवत नाही, तर ते सतत वाढत्या प्रमाणात त्याचे पुनरुत्पादन करीत असते. म्हणूनच भांडवली व्यवस्थेसाठी वाट करून देणारी प्रक्रिया म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अशी प्रक्रिया आहे जिच्याद्वारे कामगारांकडून त्यांच्या श्रमाच्या साधनांची मालकी हिरावून घेतली जाते, एक अशी प्रक्रिया जी एकीकडे त्याच्या जीवन निर्वाहाच्या आणि उत्पादनाच्या साधनांना भांडवलात आणि दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादकांना पगारी गुलामांध्ये बदलून टाकते.
म्हणूनच तथाकथित आदिम संचय म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अशी ऐतिहासिक प्रक्रिया आहे जिच्याद्वारे उत्पादकाला उत्पादनाच्या साधनांपासून तोडले जाते.
ती आदीम स्वरूप ग्रहण करते कारण ती अशा प्रारंभिक काळाशी संबंधित आहे जो भांडवलशाहीच्या इतिहासाचा आरंभ आणि भांडवलशाहीला अनुरूप उत्पादन पद्धती स्थापित होण्याच्या आधी येत असते.
३
भांडवलशाही समाजाच्या आर्थिक संरचनेची उत्पत्ती सामंती समाजाच्या आर्थिक संरचनेपासून झाली. सामंती समाजाचे विघटन भांडवलशाही समाजाच्या निर्माणाची तत्त्वे उन्मुक्त करते.
प्रत्यक्ष उत्पादक, म्हणजेच कामगार, तोपर्यंत आपले श्रम विकू शकत नाहीत जोपर्यंत जमिनीशी असलेला त्याचा संबंध समाप्त झालेला नाही, जोपर्यंत दास, भूदास किंवा दुसर्या व्यक्तीचा वेठबिगार होण्यापासून त्याची सुटका झालेली नाही. याशिवाय, श्रमशक्तीचे स्वतंत्र विक्रेता बनण्यासाठी, कोणत्याही बाजारात सौदा करण्यासाठी, शिल्प संघांच्या प्रभुत्वापासून बचाव करण्यासाठी, आपले अप्रैंटिस आणि जर्नीमॅनच्या क्रियात्मक गतिविधीवर निर्बंध लादणाऱ्या शिल्प संघांच्या नियमांपासून आणि कायद्यांपासून मुक्ती मिळवणे त्यांच्यासाठी आवश्यक होते. या दृष्टिकोणातून, उत्पादकांना पगारी कामगारांत बदलणारी ऐतिहासिक प्रक्रिया एकीकडे उत्पादकांना भूदास प्रथा आणि शिल्प संघांच्या निर्बंधातून मुक्त करणारी प्रक्रिया असते. भांडवली इतिहासकारांसाठी फक्त हाच पैलू अस्तित्त्वात असतो. परंतु दुसरीकडे, नुकतेच स्वातंत्र्य मिळवलेले लोक. त्यांच्यापासून उत्पादनाची सर्व साधने आणि त्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवणाऱ्या जुन्हा सामंती व्यवस्थेने त्यांना प्रदान केलेल्या सर्व गोष्टी हिरावून घेतल्या गेल्याशिवाय स्वत:ला बाजारात विकण्यासाठी जात नाहीत. ही संपत्तीहरणाची कहाणी मनुष्यजातीच्या इतिहासात रक्तरंजित आणि धगधगत्या अक्षरांत लिहिली गेली आहे….
पगारी कामगार आणि भांडवलदार दोघांनाही पैदा करणार्या विकास प्रक्रियेचा प्रस्थानबिंदू कामगारांची गुलामी हाच होता. प्रगती होती या गुलामीचे स्वरूप बदलण्यात, सामंती शोषणाचे रूपांतर भांडवली शोषणात होण्यात…
आदिम संचयाच्या इतिहासात अशा तमाम क्रांत्यांना आपण युगांतरकारी मानले पाहिजे ज्या निर्माणाच्या टप्प्यातून जाणाऱ्या भांडवलदार वर्गासाठी पायऱ्यांचे काम करीत असतात. जेव्हा मोठ्या संख्येने माणसांच्या समूहांना अकस्मात आणि जबरदस्तीने त्यांच्या जीवन निर्वाहाच्या साधनांपासून वेगळे करून स्वतंत्र तसेच अनाश्रित सर्वहाराच्या रूपात श्रमाच्या बाजारात फेकून दिले जात असते, अशा क्षणांसाठी ही बाब सर्वाधिक लागू होते. या एकूण प्रक्रियेचा आधार आहे शेतीची उत्पादने, शेतकऱ्यांचे संपत्तीहरण, त्यांना त्यांच्या जमिनीपासून वेगळे केले जाणे.
वेगवेगळ्या देशांमध्ये हे संपत्तीहरण वेगवेगळे रूप धारण करीत असते, वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांमध्ये ते संपत्तीहरण आपल्या अनेक अवस्थांमधून जात असते. परंतु फक्त इंग्लंडमध्येच त्याचे प्रारूपित रूप पाहावयास मिळते, असे म्हटले जाऊ शकते. म्हणूनच आपण इंग्लंडचेच उदाहरण घेत आहोत.
(पुढच्या अंकात क्रमशः)
कामगार बिगुल, फेब्रुवारी २०१६