जन्मदिनानिमित्त बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या तीन कविता
ब्रीदवाक्य
जर तेथे वारा वाहत असेल,
तर मी एक झेंडा फडकवू शकतो,
जर तेथे एकही झेंडा नसेल
तर मी काठ्या-कपड्यांनी झेंडा बनवीन.
जेव्हा कूच केले जात असते
जेव्हा कूच केले जात असते
बहुतेक लोकांना माहीत नसतं
की शत्रू त्यांच्या मस्तकावर
कूच करतो आहे.
जो आवाज त्यांना हुकूम देतो
त्यांच्याच शत्रूचा आवाज असतो
आणि जो माणूस शत्रूविषयी बडबडत असतो
स्वतःच त्यांचा शत्रू असतो.
जनरल, तुझा रणगाडा एक मजबूत वाहन आहे
जनरल, तुझा रणगाडा एक मजबूत वाहन आहे
तो जंगल धुळीस मिळवतो
आणि चिरडून टाकतो शेकडो माणसांना
परंतु एक गुण त्याच्यात आहे –
त्याला एका ड्रायवरची गरज असते
जनरल, तुझा बाँबवर्षक मजबूत आहे
तो वादळाहून वेगाने उडतो आणि
हत्तीपेक्षाही जास्त वजन वाहून नेतो
परंतु एक गुण त्याच्यात आहे
त्याला एका मेस्त्रीची गरज असते.
जनरल, माणूस किती उपयोगी आहे
तो उडू शकतो, तो मारू शकतो
परंतु एक गुण त्याच्यात आहे-
तो विचार करू शकतो.