बलात्कारी बाबा रामरहीमला २० वर्षांची शिक्षा
मुद्दा फक्त ‘ढोंगी’ बाबांचा नाही
सोमनाथ केंजळे
नुकतचं २८ ऑगस्टला गुरमीत रामरहीमला विशेष सी.बी.आय. कोर्टाने २० वर्षांची शिक्षा ठोठावली. या ‘पापा’जीवर २ मुलींवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झालाय, तर ३०० पुरुषांना नपुंसक केल्याचा आरोप सुद्धा आहे.
हे ऐकून अनेकांनी ‘ढोंगी बाबाला’ त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा मिळाली, असं म्हणत सुस्कारेरे सोडले असतील तर काहींनी आपला बाबा त्यातला नाही म्हणत मनाचं समाधान करत,, आस्थ किंवा संस्कार चैनल लावला सुद्धा असेल. अनेक तथाकथित पुरोगाम्यांचा सुद्धा बोटचेपी भूमिका घेत ढोंगी बाबाच्या नावानं सोपस्काराचा शिमगा करून झाला असेल व त्यांच्या ढोंगीपणावर बोटं सुद्धा मोडली असतील. मुद्दा फक्त कुण्या ढोंगी बाबाचा नाह तर एकुणच या बाबा संस्कृतीच्या वाढत्या प्रभावाचा व त्यातून निर्माण होणाऱ्या अंधाराच्या साम्राज्याचा आहे.
बाबा किंवा मातांच्या साधना मार्गात चिकीत्सा, संशय किंवा तर्क पूर्णपणे हद्दपार असतात. बाबा उच्चारेल तेच वाक्य प्रमाण मानायला शिकवलं जातं. शंका उपस्थित करणं महापाप समजलं जातं, ज्याच्या परिणामी इप्सित साध्य होत नाही. या बाबा-मातांकडे जाणाऱ्या लोकांचे प्रश्न अध्यात्मिक सुखाचा शोध वगरे अजिबात नसतात. लग्न, मुलं, नोकरी व आर्थिक अस्थैर्य इ. अगदी भौतिक प्रश्न असतात. यांची सोडवणूक करून घ्यायला प्रत्येकजण आतूर असतो. वाढती बेकारी, कामगारांची कपात, नोकरीतील अस्थैर्य, रोजगाराची अनिश्चितता, वाढतं दारिद्रय त्यातून काठावर ढकललं गेलेलं जगणं,सावरण्याचीकुतरओढ, जीवघेणी स्पर्धा, अपेक्षांचं मोडून टाकणार ओझ या सगळ्यांतून बेजार झालेला माणूस मग सहजच रस्त्यावर शेंदूर लावून दगड ठेवला तरी नवस-सायास बोलू लागतो. ही “असुरक्षितता व भीती” या सगळ्यांच्या मुळाशी घर करून असते. याची कारणं सामाजिक-आर्थिक-राजकीय व्यवस्थेत शोधण्याची सवय नसणारी माणसं कुणी गुरू-माता भेटलेच तर त्यांनाच आपला उद्धारकर्ता बनवतात व मुक्तीच्या आशावादाने सुखावली जातात, जे खरं तर भ्रांतसुख असतं.
मग ही गर्दी वाट तुडवत निघते. अगोदरच करार झालेला असतो ‘प्रश्न विचारायचे नसतात’. कुठे पवित्र पाणी पजून, कुठे झाडाचा पाला खाऊ घालून, कुठे हातात राख टाकून, तर कुठे पाठीवर रट्टे देऊन मुक्तीचा आशिर्वाद दिला जातो. या मार्केटमध्ये पैसे घेऊन कुंडलीनी जागृत करण्याऱ्यां पासून हठयोग्यांपर्यंत अनेक व्हरायटीचे बाबा भारतात सापडतील. यांच्या जोडीला कैक आश्रम, डेरे व आखाडयांमधून हजारो पुण्यात्मे ठाण मांडून बसलेले आहेतच. तरीही कुपोषण व भूकबळीनं मरणारी बालकं भारतातच सर्वाधिक आहेत,दारिद्रयानं जनतेचे हाल आहेत, स्त्रीयां घराबाहेर सुरक्षित नाहीत, आतंकवादी हल्ल्यात माणसं मरतात तर चीन व पाकिस्तान सीमेवर “त्रास” देत असतो.
‘बाबा वाक्यम् प्रमाणं’ व ‘श्रद्धावानम् लभते ज्ञानम्’चा जप करणाऱ्या भारतीय मानसात, लोकांच्या तर्कबुद्धीची अशी कत्तल केली जाते की बलात्काराचा गुन्हा असणारा आसाराम व रामरहीम साठी त्याचे गुंड (अनुयायी?) जगातील “सर्वात मोठ्या लोकशाही” समोर अवघड प्रसंग उभा करतात. इतकंच नव्हे तर देशाचं अस्तित्वच मिटवण्याची भाषा केली जाते. बोलण्यावर निभावल तर बेहत्तर, पण प्रत्यक्ष सुनियोजित दंगल घडवली जाते व लोकशाहीच्या चारही खांबांची पळताभुई थोडी केली जाते. प्रसार माध्यमांची वाहने जाळतात, पोलिसांवर हल्ले होतात. या सगळ्यात ४५ माणसं मरतात, २५० हून अधिक जखमी होतात व हे सगळं धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली केलं जातं. एरवी पाच लोकं जमले तरी १४४ खाली अटक करणारे पोलीस २-३ लाख लोकांना ४-५ दिवस गोळा होण्याची संधी देतात. राज्यसरकार त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतं,पण तरीही भारताच्या महान गुप्तचर यंत्रणेला हत्यारांचा सुगावा सुद्धा लागत नाही.
यापूर्वी सुद्धा बाबा रामपालला खुनाच्या गुन्हयात अटक करण्यासाठी पोलीसांची पाचावर धारण बसली होती. शेवटी ४,५०० लष्करी जवानांना ३० तासाहून अधिक काळ घाम गाळावा लागला. भक्तांशी तंडून पाच जणांच्या मृत्युचं ओझं घेऊन मगच बाबाला अटक करणं शक्य झालं. आसारामच्या गुलाबी चेहऱ्यामागचा हैवान उघडा होतो तरीही अनेक भक्त त्यांच्या भक्तीन लीन असतात. आशुतोष महाराजच्या मृत्युला समाधी समजून ३ वर्षे प्रेत सांभाळणाऱ्या भक्तांची पुनर्जिवीत होण्याची भाबडी आशा तोडायला कोर्टात जावं लागतं. बाबा काही जिवंत होत नाही हे वेगळं सांगायला नको. चारसोबीसी करणारा चंद्रास्वामी, अनेक रहस्यमय हत्यांमागचा संशयित सत्यसाईबाबा, बलात्कारी नित्यानंद-भीमानंद, संभोगात समाधी लावणारा रजनीश, श्रीमंताचा बाबा रवीशंकर, निर्मलबाबा, राधेमा, कृपालु महाराज, मोरारी बापू, सारथी बाबा, प्रेमानंद, बिंदू बाबा, नरेंद्र महाराज, आठवले महाराज ते हवा आतबाहेर करायला लावून नूडल्स विकणारा रामदेव बाबा, ही यादी अजून वाढू शकते, अशी अनेकजणं लोकांची मती बधीर करत आपला जनाधार व धर्मश्रद्धेच्या जोरावर राजकीय वलय निर्माण करताहेत, ज्यामुळे त्यांच्या व्यापाराला बाधा येणार नाही व त्यांचं हे काळोखाचं साम्राज्य विस्तारत जाईल. या साठी आपण गुरमीत रामरहीमचच उदाहरण पाहू.
हरियाणा व पंजाब मधे डेऱ्यांचं विशेष प्रस्थ आहे. डेऱ्याचा अर्थ ‘घर’असा होतो. शीख धर्मातील अनेक अपप्रथांच्या विरोधात टीकात्मक सुर ठेवत अशी घरे निर्माण झाली जी मुलतः शीख धर्माचंच आचरण या डेऱ्यामधून करत राहतात. मुख्य धार्मिक प्रवाहात ज्या अनेक लोकांना असमान वागणूक मिळते ते या डेऱ्यांचे अनुयायित्व स्विकारतात. प्रामुख्याने जातीच्या प्रादुर्भावाने जी उतरंड शीख धर्मात सुद्धा उतरली आहे तिच्या विरोधाचं संकिर्तण करणारेही डेरे आहेत ज्यांचा मुख्य आधार दलित शेतमजूरातून येतो. आज रोजी एका अन्दाजानुसार नुसत्या उत्तर भारतात असे तब्बल ३००० डेरे आहेत जे भिन्न भिन्न अध्यात्मिक भुमिकांचं प्रवचन करतात. अश्या अनेक “देवाच्या दुतां”मार्फ़त संदेश गोरगरीब जनतेपर्यत पोहचवले जातात. त्यातील प्रमुख डेरे म्हणजे सच्चा सौदा, राधास्वामी, सचखन्ड बल्लन, निरन्कारी व नामधारी हे हरियाणा व जवळच्या राज्यातील खास डेरे होय. गेल्या कैक वर्षात या डेऱ्यांचही भांडवलीकरण झाले आहे.वस्तुंच्या उत्पादनापासुन ते विक्री पर्यंत सगळ्य़ा गोष्टी या डेऱ्यांमधे होतात. सोबत या डेऱ्यामधुन येणाऱ्या भक्तांसाठी भांडवली व्यवस्थेने महाग करून ठेवलेली आरोग्य सुविधा स्वस्तात उपलब्ध होते. अशा स्थितीत हे डेरे सत्तेची छोटी केंद्र बनून जातात. यातला ‘मेसेन्जर ऑफ़ गाॅड’ जो अगोदरच उद्धारकर्ता बनलेला असतो त्याच्या हातात निरंकुश सत्ता केंद्रित होते. बाहेरच्या जगातील अतीव शोषण व धार्मिक-जातीय भेदभावाच्या विपरीत या डेऱ्यामधींल प्रवचने, गुरु व परंपरांमध्ये लोकं मुक्तीचा मार्ग शोधु लागतात, कट्टर बनतात. प्रसंगी इतर डेऱ्यांशी माराकाटीचा संघर्षही होत असतो. डेऱ्याचं राजकारण न समजून घेता, रामरहीमच्या राजकीय प्रभावाची अन साम्राज्याची कल्पना येणार नाही.
सच्चा सौदा हा डेरा बलुचिस्तानच्या शाह मस्ताना यांनी १९४८ रोजी सिरसा, हरियाणा येथे सुरु केला होता. त्यांच्या मृत्यु नंतर शाह सतनामसिह हे १९९० पर्यन्त डेरा प्रमुख होते. त्या वेळी हा गुरमीत २३ वर्षांचा होता. त्याचा एक चुलत भाऊ खलिस्तानी आतंकवादी होता, ज्याचं नाव गुर्जन्तसिह राजस्थानी असे होते. असे म्हणतात कि गुरमीतला प्रमुखपदी बसवण्यात त्याच्या पिस्तुलाने महत्वाची भुमिका निभावली आहे. प्रपंच सोडुन डेरा प्रमुख झालेल्या गुरमीतने डेऱ्याचा विस्तार वाढवला. डेऱ्याचा कायापालट केला. एक साधा प्रवचनकार न राहता गुरमीत तंत्रज्ञानप्रेमी(टेक्नोसाव्वीवी) पाॅपस्टार पापाजी बनला. त्यानं किरकोळ व्यापार केला, त्याच्या आंधळ्या अनुयायाना करोडो रुपयांच्या वस्तु विकल्या, १०० करोड खर्चुन स्वताला देवाच्या दुताच्या रुपानं प्रक्षेपीत करायला चित्रपटाची निर्मिती केली. इंटरनेटवर व्यापार सुद्धा केला. चंगळवादात फसलेल्या तरुणाईला तिचा मसिहा सापडला होता. भक्तांनी सुद्धा गुरमीतला डोक्यावर घेतलं. जवळपास ५ कोटी पेक्षा अधिक अनुयायी असणारा बाबा गुरमीत रामरहीम इन्सा ज्या गुहेत राहत होता तिथं त्याच्या परवानगी शिवाय कुणालाही जाता येत नसे. पंचतारांकीत सुविधायुक्त घर, महागडे कपडे-गाडीचा शौकिन असलेल्या या बाबाच्या गुहेत २०९ स्त्रियांचा राबता होता. कांग्रेस सरकारच्या काळातच मिळालेली झेड प्लस सिक्युरिटी वगळता स्वत:ची स्वतंत्र हत्यारबंद सुरक्षा व्यवस्था होतीच. अशा अनेक बाबी तुम्ही सुद्धा टीव्हीवर व वृत्तपत्रातुन पाहिल्या असतील, त्यांच्या विस्तारात काही जात नाही.
भारतातल्या भांडवली लोकशाहीतील निवडणूकांच्या औपचारिकतेतही धर्म, जात व पैसा एक महत्वाची भूमिका बजावतात, या मतपेढीचा(व्होट बँकेचा) उपयोग करता यावा म्हणून या बाबांच्या उंबऱ्यावर डोकं टेकवायला आणि सौदा करायला सर्व भांडवली पक्षांचे नेते जातात. धर्माच्या नावावरचा व्यापार व भांडवली राजकारण परस्परांना पुरक असतं म्हणून कधीकाळी कांग्रेसला समर्थन करणारा रामरहीम वारं फिरताच पर्याय शोधू लागतो व भाजपाला पाठींबा देतो व त्या पाठींब्याच्या बदल्यात अमित शहा बरोबर सौदेबाजी करतो. याच निवडणूकांत ज्या पद्धतीने आसाराम-रामदेव पासून अनेक बाबांनी भाजपाला पाठींबा दिला त्यातून त्यांच राजकीय चरीत्र एकदम नागडं झालं आहे. या बाबाबुवांच्या उत्कर्षाचा एक धागा शासकवर्गाच्या राजकारणातही सापडतो. नाहीतर १९७८ साली एका छोट्याशा आश्रमांत ४-५ अनुयांयी असणारा आसाराम २००० साल उजाडता उजाडता ४२५ आश्रमांचा मालक कसा होतो व तब्बल १० हजार कोटी रूपयांची माया गोळा कसा करतो. सत्तेवर आलेल्या शासक वर्गाच्या सत्तेला मान्यता देण्याच्या बदल्यात या बुवांना हजारो एकर जमीन फुकटात दिली जाते. आता सुद्धा रामदेव बाबाला उत्तराखंडात दिलेल्या ३८७.५ एकर जमिनीचा मुद्दा ताजा आहे. मोदी सत्तेवर आल्यापासून या बाबाने २,००० एकर एवढी जमीन ताब्यात घेतली आहे. २०१४ च्या अखेरीस या रामदेवची संपत्ती तब्बल १,१०० कोटी रूपए इतकी होती. बाबा रामरहीमच्या सच्चा सौदाचं साम्राज्यसुद्धा १,००० कोटीपेक्षा जास्त आहे. नुसत्या शिरसाच्या मुख्यालयाचा विस्तार ९०० एकर जमिनीवर आहे. भारतातील एक खास प्रसिद्ध सत्यसाईबाबांची स्थावर जंगम मालमत्ता ४० हजार कोटी ऐवढी अवाढव्य आहे. नुसत्या बारा एकराच्या आश्रमांत राहणाऱ्या रामपालला बी.एम.डब्ल्यु व मर्सीडीज सारख्या अतीमहागड्या गाड्या दिमतीला होत्या. त्याच्याही डेऱ्याचा विस्तार १०० कोटीहून अधिक सांगता येईल. या सोबत भक्तांच्या रूपात दासदासीचा मोठा राबता कायम हजर असतोच. हे सगळे महान आत्मे सामान्य जनतेला त्याग, आत्मसुधार, विकारमुक्ती शिकवतात व स्वत:मात्र आरामात, सुखात, खुशालचेंडू जगणे पसंद करतात.
या बाबागिरीच्या उत्कर्षाचा काळ १९८० पासून तपासला तर अनेक बाबांचा अवतार याच काळात भरभराटीला आल्याचे समोर येईल. त्यानंतर १९९१ स्विकारलेले जागतिकीकरणाचे धोरण व त्याचा जनतेवर होणारा परिणाम या सगळ्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतोच. जागतिकीकरणाच्या वारूवर स्वार होण्याचं स्वप्न बघणारा मध्यमवर्ग व लाभारथी उच्चमध्यम वर्ग दोन्ही वर्ग भिन्न भिन्न कारणांमूळे या बाबांचा कट्टर समर्थक बनलेत, सोबत कष्टकऱ्यांची मोठी संख्याही याला बळी पडली आहे. प्रत्येक वर्गाची जशी काही खास कारणं आहेत, तसा प्रत्येक वर्गाचा असा एक खास बाबा सुद्धा आहे.
आज धर्माचं पूर्णता भांडवलीकरण झालं आहे. गुरमीत पासून राधेमा पर्यंत त्याचं हे रूप अतिशय विकृत व कुरूप आहे. भांडवली राजकारणाशी याचं असलेलं साटंलोटं समजायला व भांडवली व्यवस्थेनं निर्माण केलंलं दु:ख, दारिद्रय अनिश्चितता व भीतीचा ठाव घ्यायला सामान्य जनतेची वैज्ञानिक तर्कबुद्धी अजून तितकीशी सक्षम नाही. याची कारणं प्रबोधन व पुनरुज्जीवानाच्या न लाभलेल्या वारश्यात शोधता येतात. भांडवली व्यवस्थेला आरोपीच्या पिंजऱ्यात जनतेनं उभं करू नये म्हणून दैववादाचा उपयोग जनतेची मती बधीर करायला केला जातो. यासाठीच अशा बाबाबुवामाताचं पालनपोषण केलं जातं. सगळे बाबा एकजात धूर्त, प्रतिक्रियावादी, कट्टर फासीवादी प्रवृत्तीचे आहेत. निर्भया बलात्कारानंतर आसारामची भाषा असो की साक्षी महाराजाची बेताल वक्तव्य असो, मग ते कुठल्याही धर्मातले असोत ते घोर स्त्री विरोधी, धर्मांध, तर्कदुष्ट व विज्ञानविरोधी आहेत यात शंकाच नाही. निश्चितच या बाबा बुवांच्या जाळ्यांतून सामान्य जनतेला सोडवायला तिचं प्रबोधन तर करायलाच हवं पण सोबत एक अशी जमिनही घडवायला हवी जीथं ही विषारी बीजं अंकुरणारचं नाहीत कधीही. मुद्दा फक्त ‘ढोंगी बाबाचा’ नाहीच.
जेव्हा धर्मशास्त्र नैतिकतेचे आधार असतील,जेव्हा अधिकार कोण्या दैवी सत्तेवर विसंबून असतील, तेव्हाच सर्वात अनैतिक, अन्यायी, कुख्यात गोष्टी योग्य ठरवल्या व प्रस्थापितही केल्या जाऊ शकतील
लुडविक फायरबाख (१८४०-१८७२)
(जर्मन तत्वज्ञानी)जेव्हा विवेक झोपी जातो, तेव्हा राक्षस पैदा होतात
फ्रांसिस्को द गोया (१७४६-१८२८)
(विख्यात स्पॅनिश चित्रकार)जर आपण मानवी इतिहासाच्या आरंभी जाऊन पहालं तर दिसेल कि अज्ञान व भीतीने देवांना जन्माला घातलंय, कल्पना, उत्साह वा भ्रमांनी त्यांच महीमामंडन वा त्यांना लांछीत केलंय, दौर्बल्याने त्याचं पुजन केलंय, अंधविश्वासांन त्यांच रक्षण केलंय आणि प्रथा, श्रद्धा आणि निरंकुशतेन त्यांच समर्थन केलं आहे जेणेकरून माणसाच्या आंधळेपणाचा फायदा आपल्या हितांच्या पुर्तीसाठी करता यावा
बैरेन द’होल्बाख (१७२३-१७८९)
(प्रबोधनकालीन फ्रान्सचे तत्वज्ञानी)
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१७