“गोमाते”च्या नावाने हत्याकांडांचे सत्र

कार्टुनिस्ट – तन्मय त्यागी

मुस्लिमांचा जाहीर तिरस्कार करणाऱ्या मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील फॅसिस्ट हिंदुत्ववादी गोभक्तांचा हैदोस वाढला असून गोरक्षणाच्या नावाने गुंड टोळ्य़ांकडून बेमुर्वतपणे निर्दोष लोकांच्या, विशेषत: दलित आणि मुस्लिमांच्या हत्या केल्या जात आहेत. 2015 साली दादरी येथे मोहमंद अखलाख यांच्या घरात घुसून त्यांची हत्या करण्यात आली, 2016 मध्ये गुजरातेत उना येथे मृत गाईचे कातडे सोलल्याच्या बहाण्याने सहा दलित युवकांना बेदम मारहाण करण्यात आली, 2017 साली अल्वर येथे पेहलू खान याची 200 जणांच्या जमावाने हत्या केली आणि अगदी काही दिवसांपूर्वी 20 जून रोजी उत्तर प्रदेशातील मिरत येथे कासिम यांची हत्या करण्यात आली. अशा असंख्य घटना देशात घडल्या आहेत. 2010 सालानंतर झालेल्या 63 हल्ल्यांपैकी बहुसंख्य हल्ले 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर झाले आहेत. या सर्व घटना घडत आहेत कारण हत्याऱ्यांना माहित आहे की सरकारचे त्यांना समर्थन आहे. गोरक्षकांकडून होणाऱ्या हत्यांबद्दल मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या मोदी सरकारचा खरा चेहरा पुन्हा एकदा तेव्हा समोर आला जेव्हा मोदी सरकारमधील विमान उड्डयण मंत्री जयंत सिन्हा यांनी नुकतेच, 2017 साली झारखंड मध्ये अलिमुद्दीन अन्सारी यांची हत्या करण्याबद्दल शिक्षा झालेल्या, 7 खुन्यांचे लाडू खाऊ घालून कौतुक केले.

 

कामगार बिगुल, जुलै 2018