भारत असो किंवा सिंगापूर: कामगारांचे शोषण सगळीकडे सारखेच!
‘मजदूर बिगुल’ या हिंदी पत्रकाच्या वाचक बिंदर कौर यांनी आम्हाला हे पत्र पाठवलं आहे. बिंदर कौर सिंगापूर मधे एका घरी घरकाम करतात. ‘मजदूर बिगुल’च्या त्या नियमित वाचक आहेत. शिक्षित असलेले असे बरेच कामगार आहेत जे वेगवेगळ्या जागी आज अतिशय कमी मजुरीवर काम करतात व ते राजकीयदृष्ट्या सजग आहेत. ते बिगुलला वेळोवेळी पत्र लिहून किंवा फोन करून त्यांचे विचार मांडतात. इतर कामगार वाचकांना सुद्धा आम्ही हे आवाहन करतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यातील अनुभवाविषयी बिगुलला पत्र लिहावे जेणेकरून देशातील सर्व कामगारांना हे कळेल की त्यांच्या समस्या आणि मागण्या एकच आहेत, भलेही त्यांची जात-धर्म-देश काहीही असो. बिंदर कौर यांचे हे पत्र आम्ही इथे कुठल्याही संपादनाशिवाय देत आहोत.
कोणी म्हणतात इंग्रजीत मेड
कोणी म्हणतं हेल्पर
कोणी वर्कर तर कोणी मोलकरीण
तुम्ही लोक आम्हाला फक्त नाव देता
आमच्या घरातील परिस्थिती काय आहे
हे तुम्हाला नाही माहीत
आमच्या भाषेत इथे राहण्याला फक्त
मजबूरी हेच नाव आहे
माझे नाव बिंदर कौर आहे आणि वय 25 वर्षे. मी पंजाबची राहणारी आहे. भारतात माझ्यासाठी काही काम नव्हते म्हणून मी सिंगापूर ला काम करायला आली. घरातील सर्व काम, जेवण बनवणे इत्यादी काम मी करते.
22 सप्टेंबर 2017 ला मी सिंगापूरला आले. मी जसजसे इतर मुलींना भेटत गेले तसतसे त्या कशा परिस्थितीत राहतात, त्यांना काय काय सहन कराव लागतं हे माहीत पडायला लागलं. इथे छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणे, शिव्या सहन करणे, अर्धपोटी उपाशी राहणे, घरात कैद राहणे आणि नेहमी भीतीखाली दबून राहणे हे त्यांना रोजचंच झालं होतं.
एक दिवस जेव्हा मी एजन्सी मधे गेले तेव्हा मी बघितलं की एक मुलगी घरातून पळून आलेली आहे. तिला विचारल्यावर माहीत पडलं की ज्या घरी ती काम करायची त्या घरचे लोक तिला खूप त्रास द्यायचे. जेव्हा ते घरी असायचे तेव्हा तिच्याकडून काम करून घ्यायचे, जेव्हा घरातून बाहेर पडायचे तेव्हा तिला बांधून ठेवायचे. इथपर्यंत की तिच्याकडून काही चूक झाली तर तिला थापड किंवा जोड्याने मारायचे, केस पकडून पण मारायचे. तिचं बाहेर जाणं येणं बंद होतं आणि तिचा फोन पण तोडून टाकला होता. जेव्हा एक दिवस ते लोक तिला बांधून गेले नाही तेव्हा खिडकीतून ती घराबाहेर पळाली. तिचा पासपोर्ट सुद्धा तिच्याजवळ नव्हता.
रविवारी सर्वांना सुट्टी असते. आम्ही रविवारची सुट्टी घेतल्यामुळे खूप साऱ्या मुलींसोबत बोलण्याची संधी मिळाली. त्यातील एका मुलीने सांगितले की तिच्याकडून दिवसातून तीन तीन वेळा घर साफ करून घेतल्या जातं.
दुसऱ्या एका मुलीने सांगितलं की एकदा तिच्याकडून चुकीने कपडा जळाला तर तिच्या मालकिणीने तिच्या पाठीवर इस्त्री लावली. एजन्सी मधे आणखी एक मुलगी भेटली तिचं नाव मनजिंदर होत व ती पंजाब मधील जालंधर शहराची राहणारी होती. ती एमए पास होती. ती खेळायची, खेळामध्ये पण तिने गोल्ड मेडल मिळवलेलं होत. नाईलाजानं तिला सिंगापूरला यावं लागलं. तिने सांगितलं की दीदी हे लोक मला नेहमी शिव्या देऊन बोलतात. काही चूक झाली तर म्हणतात ‘अशिक्षित, गावंढळ कुठली. कुठून आले आहे कोण जाणे’. पूर्ण दिवस एक काम 2-2 किंवा 3-3 वेळा करून घेतात. सुट्टी चे पैसे पण देत नाहीत. सहा महिने झाले एक सुद्धा सुट्टी दिली नाही. बाहेर जाताना लॉक करून जातात.
नक्कीच सुंदर असतील
दगड व काचांच्या इमारती
परंतु बंद आहेत इथे
आई, बहिणी व मुली
आणि बंद आहेत त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने
तुमची साथी
बिंदर कौर,
सिंगापूर
(अनुवाद : जयवर्धन)
कामगार बिगुल, जुलै 2018