कविता – शिक्षणाची गाडी चालली
ज्योति म्हापसेकर
शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली
पैसेवाल्या पोरांनी जागा बळकावली
गरिबांची पोरं बघा कशी खाली राहिली
मुली कितीक चढती निम्म्या खाली उतरती,
शिक्षणाची गाडी चालली …
वाटेत येती बाई ही किती जंक्शनं
कधी पैसा आणि विघ्न कधी मधे येई लग्न
मुली कितीक चढती निम्म्या खाली उतरती,
शिक्षणाची गाडी चालली …
लाडकी ही मैनी म्हणं, आई साळंत घाल गं मला
लई वाटतं ग मैने मला, पण मी जाते मजुरीला
तू गेलीस साळंत तर, कोण बघंल धाकल्याला
मैनी रडली धाई धाई, काय करू मी बाई
शिक्षणाची गाडी धाड धाड घरावरून जाई
माझी मैनी घरातच राहिली, शिक्षणाची गाडी चालली …
कामगार बिगुल, नोव्हेंबर 2020