शिकण्याचं कोणतंही वय नसतं!
पितृसत्ताक गुलामीला झुगारत, जुलमी व्यवस्थेविरोधात, शिक्षणाला आपलं हत्यार बनवण्याचा निर्धार करत आहेत द्वारका ताई  आणि अनेक स्त्रिया!

सुरज

कामगार-कष्टकरी वर्गातून येणाऱ्या अनेकांना लिहिता वाचता येत नाही. विशेषत: कोट्यवधी स्त्रिया साक्षर नाहीत. तरीही अनेक जण ‘आता माझे वय झाले, आता शिकून काय होणार’ अशी भाषा करत शिकण्याचा कंटाळा किंवा टाळंटाळ करतात. पुण्यामध्ये स्त्री-मुक्ती लीग तर्फे पौढ महिला शिक्षण वर्ग चालवला जात आहे, ज्यामध्ये अनेक कामगार महिला वयाचे बंधन झुगारून शिकत आहेत. यापैकीच एक आहेत द्वारका सोनवणे. वयाची साठावी पूर्ण झाली तरी शिकण्याची इच्छा अजूनही संपलेली नाही. सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील रऊळ हे त्याचं गाव. पाच भावंडं-चार बहिणी, एक भाऊ आणि आई-वडील अस त्यांचं कुटूंब. आई वडील दुसऱ्याच्या शेतात मजूरीने काम करायचे. पण त्यांना कामाची कधीही शाश्वती नसायची. कधी काम भेटायचं तर कधी नाही. द्वारका ताईंनी तिसरी पर्यंत शिक्षण घेतलं. शिकण्याची खूप तळमळ व आवड. पण परिस्थिती अत्यंत बिकट असल्या कारणामुळे द्वारका ताईंना शाळेत जाताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागायचं. जसं की त्यांना अंगावर घालायला होता फक्त एक फ्रॉक. शाळेत जाताना एक नदी लागे. त्याच नदी काठी सकाळी अंघोळ करायची, आणि ओलेत्यानंच शाळेत जायचं. अशातच सुनामी जशी येते तसा बहात्तर चा दुष्काळ हा तोंडातला घास घेऊन गेला. परिस्थिती अत्यंत बिकट झाली. मजुरी भेटेना झाली. एकेका भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण फिरावं लागू लागलं. घरात खायला काही नसल्यामुळे घराच्या छताचे पत्रे विकावे लागले आणि त्याजागी आसरा म्हणून पालापाचोळा टाकावा लागला. या सगळ्या धकाधकीमध्ये द्वारका ताईंना तिसरीच्या अर्ध्यातूनच शाळा सोडावी लागली.

गावाकडे मजुरी भेटत नसल्या कारणामुळे व अर्धपोटी उपाशी राहावं लागत असल्यामुळे पुण्याकडे येऊन काहीतरी काम भेटेल व रोजी रोटीचा प्रश्न सुटेल ह्या आशेवर शहराकडे येण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आल्यानंतर वयाच्या 10 व्या वर्षांपासूनच आई-वडिलांसमवेत चार ते पाच वर्ष बिगारी काम केलं. आईला अडीच रुपये तर वडिलांना चार रुपये अशी मजुरी भेटत होती. तेवढ्या मजुरीवर कसं तरी घर चालायचं. अशातच अवघ्या वय वर्ष चौदा ते पंधरा असतानाच द्वारका ताईंना संसाराचा गाडा ओढवा लागला. घर चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजेच भांडीकुंडी एकही जवळ नव्हती. काच-पत्रा भंगाराच व बिगारी काम करून आठवड्यातून एक एक वस्तू जमा करत संसाराचा पाया उभा केला. काही वर्ष ही चिमणीच्या प्रकाशाखालीच सरली. पुण्यात असतानाच काही वर्ष द्वारका ताईंनी उसतोडीच पण काम केलं. द्वारका ताईंना तीन मुली व एक मुलगा. चौघांची पण लग्न झाली. मुला-मुलींना व नातू-नातींनी खूप काही शिकावं, स्वतःच्या पायावर उभा राहून मोठं काहीतरी बनावं, समाजासाठी काहीतरी करावं अशी द्वारका ताईंची नातलगांकडून अपेक्षा! त्यांच्यासाठी त्या दिवसरात्र धडपडतात.

द्वारका ताई म्हणतात “मी माझ्या परिस्थिती मुळे शिकू शकले नाही पण मी माझ्या नातलगांना शिकवणार. बाहेरची शिकवणी परवडत नाही तरी मी स्वतः शिकून नातू नातीला शिकवणार. स्त्री मुक्ती लीग तर्फे सुरू करण्यात आलेल्या प्रौढ महिला शिक्षण वर्गाला मी नियमित जाते. प्रौढ महिला शिक्षण वर्गामध्ये मला खूप काही शिकायला भेटतं व ते मी जिद्दीनं शिकत आहे. आम्ही महिलांवर होणारे अत्याचार, समाजात महिलांना दिल जाणारं दुय्यम स्थान, देशभरातील घडामोडी, कविता व विविध मुद्यांवर असलेले लेख हे वाचतो व त्यावर एकत्रित चर्चा करतो. यातून आम्हाला बऱ्याच काही गोष्टी समजून येतात. मला अजून शिकण्याची इच्छा आहे.” द्वारका ताई वर्गाला तर जातातच पण त्या वस्तीतील इतर महिलांना पण शिक्षण वर्गासाठी प्रोत्साहित करतात. त्यांच्याच घरातील उदाहरण म्हणजे त्यांची सून सरिता सोनवणे या दोघी मिळून शिक्षण वर्गासाठी जातात. आणि त्याची बारा वर्षाची नात कार्तिकी ही तर चक्क महिलांना शिकवते सुद्धा.

स्वत:च्या, इतरांच्या आणि समाजाच्या शिक्षणासाठी सुद्धा धडपड करणाऱ्या द्वारका ताईंनी सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारबद्दल सडेतोड मत मांडले की “सरकारने गरिबांचे खूप हाल केले. कोणतंच सरकार हे गरिबांच्या बाजूचे नाही. मतदान आलं की मत देई पर्यंत आपलं म्हणवतात, मोठी मोठी आश्वासन देतात, पाया पडतात. निवडून आल्यानंतर पाच वर्ष तोंड पण दाखवत नाहीत. साधी ओळख पण देत नाहीत. ज्यांनी आपल्याला मत दिलं ती माणसं मेली काय आणि जिवंत काय याच कसलंही त्यांना घेणं देणं नसतं.”

वयाच्या साठाव्या वर्षी सुद्धा द्वारका ताई शिकण्याची जिद्द, मेहनतीची तयारी ठेवून आहेत! तेव्हा शिकायला वयाचं बंधन नसतं. असतात ती फक्त आपल्या डोक्यातली जुनाट बंधनं, आपल्याला मागे खेचणाऱ्या सामाजिक बंधनांची जाळी, जी आपण ओरबाडून फेकून द्यायला हवीत आणि सर्व कामगार-कष्टकऱ्यांनी शिक्षणाची कास धरायला हवी.

यानिमित्ताने कामगार वर्गासाठी कलेचा हत्यार म्हणून वापर करणारे शहीद सफदर हाशमी यांची कविता आठवते

पढ़ना-लिखना सीखो ओ मेहनत करने वालो

पढ़ना-लिखना सीखो ओ भूख से मरने वालो

क ख ग घ को पहचानो

अलिफ़ को पढ़ना सीखो

अ आ इ ई को हथियार

बनाकर लड़ना सीखो!

कामगार बिगुल, एप्र‍िल 2021