वृत्तपत्र केवळ सामूहिक प्रचारकाचे आणि सामूहिक आंदोलनकर्त्याचेच नव्हे तर सामूहिक संघटकाचे सुद्धा काम करते

लेनिन 

(‘कामगार बिगुल’ सारख्या वर्तमानपत्राची एका क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्षाच्या निर्मितीसाठी काय भुमिका असते हे सांगणारा कॉ. लेनिन यांचा हा लेख, त्यांच्या जन्मदिनानिमित्त (22 एप्रिल) प्रकाशित करत आहोत. लेखामध्ये ‘सामाजिक-जनवादी’ म्हणून जो उल्लेख आहे तो कम्युनिस्टांबद्दल आहे कारण त्याकाळात रशियात कम्युनिस्टांना सामाजिक-जनवादी म्हटले जाई. — संपादक मंडळ)
आमच्या मते आपल्या कामांची सुरवात, जी संघटना आपण निर्माण करू इच्छितो त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून एका अखिल रशियन राजकीय वृत्तपत्राची स्थापना हे होय. हाच तो मुख्य धागा असेल ज्याला पुढे नेऊन आपल्याला आपली संघटना वाढवता येईल, विस्तृत करता येईल, खोलवर रुजवता येईल. आपल्याला एका वृत्तपत्राची खूप गरज आहे; त्याच्याशिवाय सिद्धांतपूर्ण, सुव्यवस्थित आणि चौफेर प्रचार आणि आंदोलनाचे काम आपल्याला करता येणार नाही जे साधारणपणे सामाजिक-जनवाद्यांच्या प्रमुख आणि स्थायी कामांपैकी एक आहे. जनतेच्या व्यापक भागामध्ये राजकारण आणि समाजवादासंबंधित प्रश्नांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे अशा वेळी हे काम अजूनच महत्त्वाचे बनले आहे. वैयक्तिक कारवाया, स्थानिक पत्रके, पत्रिका यांच्या माध्यमातून चालणाऱ्या विखुरलेल्या आंदोलनाला एका सामान्य आणि सुव्यवस्थित आंदोलनाच्या मदतीने बळ देण्याची गरज आजपर्यंत कधीच एवढी भासली नव्हती. हे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही की ज्या वारंवारतेने आणि नियमिततेने वृत्तपत्र छापले (आणि वितरित केले) जाते त्यावरून याचा अचूक अंदाज बांधला जाऊ शकतो की आपल्या लढाऊ कारवायांच्या मुख्य आणि सर्वात महत्वाच्या अंगाला किती चांगल्या प्रकारे पूर्ण केले जात आहे. याशिवाय आपले वृत्तपत्र हे अखिल रशियन असले पाहिजे. लिखित शब्दाद्वारे जनता आणि सरकारला प्रभावित करायच्या प्रयत्नांना एकत्र करण्यात जर आपण अपयशी राहिलो तर—आणि जो पर्यंत अपयशी राहू तोपर्यंत—प्रभाव पाडणारी इतर जटिल, अवघड आणि निर्णायक माध्यमं जोडून आणि संघटित करून त्यांचा वापर करण्याचा विचार केवळ कल्पना ठरेल. छोट्या-छोट्या गटांत विखुरल्यामुळे तसेच जवळजवळ सर्वच सामाजिक जनवादी लोक स्थानिक कामात बुडून गेल्याने, आपल्या आंदोलनाला सर्वप्रथम वैचारिकरित्या तसेच व्यावहारिक आणि सांघटनिकरित्या सुद्धा नुकसान पोहोचत आहे. स्थानिक कामात सामाजिक जनवादी असे बुडून गेल्याने त्यांचा दृष्टिकोन, त्यांच्या कामाची व्याप्ती तसेच गुप्त स्वरूपात काम करण्याचे व आपली तयारी सुरु ठेवण्याचे त्यांचे कौशल्य यांमध्ये संकुचितपणा येतो. ज्या अस्थैर्याचा आणि लहरीपणाचा वर उल्लेख केला आहे त्याची खोलवर गेलेली मुळे आंदोलनाच्या याच विखुरलेल्या परिस्थितीत सापडतील. या उणिवेला दूर करण्यासाठी आणि स्थानिक आंदोलनांना एका अखिल रशियन आंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी अखिल रशियन वृत्तपत्राची स्थापना पहिले पाऊल असले पाहिजे. शेवटी, आपल्याला नक्कीच एका राजकीय वृत्तपत्राची गरज आहे. राजकीय मुखपत्राशिवाय कोणत्याही राजकीय आंदोलनाची, असे कोणतेही आंदोलन जे हे नाव धारण करण्याचा अधिकारी असेल, आजच्या युरोपात कल्पनाच करता येणार नाही. अशा वृत्तपत्राशिवाय आपण आपल्या कामाला, राजकीय असंतोष आणि विरोधाच्या सर्व तत्वांना एकत्र करण्याच्या आणि त्याद्वारे सर्वहारा वर्गाच्या क्रांतिकारी चळवळीत प्राण फुंकण्याच्या कामाला कधीच पूर्ण करू शकणार नाही.
कामगार जनतेमध्ये “आर्थिक” प्रश्नांसंबंधी, कारखान्यांसंबंधी भांडाफोड करण्यासाठी चैतन्य निर्माण करून आपण पहिले पाऊल उचलले आहे, आपण आता पुढचे पाऊल टाकले पाहिजे; जे राजकीय दृष्ट्या थोडेही सजग आहेत त्या जनतेच्या प्रत्येक भागात गेले पाहिजे आणि राजकीय भांडाफोडीसाठी त्यांच्यात चैतन्य निर्माण केले पाहिजे. आज राजकीय भांडाफोडीचा आवाज अतिशय कमजोर, बुजरा आणि क्वचितच ऐकू येणारा आहे यामुळे आपण निराश होता कामा नये. याचं कारण सगळेच पोलिसांच्या दडपशाही समोर झुकलेत हे नाहीये तर ज्यांची भांडाफोड करायची क्षमता आहे आणि जे यासाठी तयार आहेत त्यांच्याकडे असा कोणताही मंच नाहीये जिथे ते बोलू शकतात, असे कोणतेही उत्सुक आणि उत्साह वाढवणारे श्रोते नाहीयेत ज्यांच्याशी ते बोलू शकतील, त्यांना जनतेत ती शक्ती दिसत नाही जिच्यापुढे ते “सर्वशक्तिशाली” रशियन सरकारची तक्रार करू शकतात.
पण सध्या हे सगळं जलद गतीने बदलत आहे. एक शक्ती अस्तित्वात आहे, ती म्हणजे क्रांतिकारी सर्वहारा वर्ग. ह्या शक्तीने फक्त राजकीय संघर्षाच्या आवाहनांना ऐकण्यात आणि समर्थन करण्यातच तत्परता दाखवली असे नव्हे तर साहसाने संघर्षात उतरण्याची सुद्धा तत्परता दाखवली आहे. झारशाही सरकारचा देशभर भांडाफोड करण्यासाठी एक मंच देण्याच्या स्थितीत आपण आहोत आणि हे काम पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. तो मंच म्हणजे सामाजिक-जनवादी वृत्तपत्रच असले पाहिजे. रशियन कामगार वर्ग, इतर वर्गांपासून तसेच रशियन समाजाच्या इतर स्तरांपेक्षा वेगळा आहे. राजकीय ज्ञान प्राप्त करण्यात हा वर्ग सतत रस दाखवतो तसेच बेकायदेशीर साहित्यासाठी सतत (फक्त तीव्र उलथापालथीच्या काळात नव्हे) आणि मोठ्या संख्येने मागणी करतो. जेव्हा जनतेची अशी मागणी स्पष्टपणे दिसत आहे, अनुभवी क्रांतिकारकांचे प्रशिक्षण आधीच सुरु झालेले आहे आणि जेव्हा मोठ्या शहरांतील कामगार मोहल्ल्यांमध्ये आणि कारखाण्याच्या वस्त्यांमध्ये, जनसमुदायांमध्ये केंद्रीत झाल्यामुळे तो वास्तविक रित्या त्या जागांचा मालक बनला आहे, तेव्हा कामगार वर्गाला एक राजकीय वृत्तपत्र काढणे सर्वथा शक्य बनले आहे. हे वृत्तपत्र सर्वहारावर्गाकडून शहरी निम्न भांडवलदारापर्यंत, ग्रामीण हस्तकलाकारांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि अशा प्रकारे ते जनतेचे खरेखुरे राजकीय वृत्तपत्र बनेल.
वृत्तपत्राची भूमिका फक्त विचारांच्या प्रसारासाठी, राजकीय शिक्षणासाठी आणि राजकीय सहयोगींची भरती करण्यापर्यंत मर्यादित नाही. वृत्तपत्र केवळ सामूहिक प्रचारक आणि सामूहिक आंदोलनकर्ता नसून सामूहिक संघटक सुद्धा आहे. शेवटच्या मुद्द्यासंदर्भात याची तुलना एखाद्या बांधकाम चालू असणाऱ्या इमारती भोवती उभ्या केलेल्या मचाणाशी करता येईल, जे इमारतीची रूपरेषा स्पष्ट करते, कामगारांचा एकमेकांशी संपर्क व जाणेयेणे सुलभ करते ज्यामुळे त्यांना कामं विभागता येतात आणि त्यांनी केलेल्या एकत्रित श्रमाचे परिणाम बघता येतात. वृत्तपत्राच्या मदतीने आणि त्याच्या माध्यमातून साहजिकरित्या एक कायमस्वरूपी संघटना रूप घेईल जी केवळ स्थानिक कामांमध्ये नाही तर नेहमीच्या साधारण कामात भाग घेईल आणि त्याच्या सदस्यांना राजकीय घटनांचे काळजीपूर्वक निरीक्षण करत राहणे, त्यांचे महत्व तसेच जनतेच्या विविध भागांवर त्यांचे होणारे परिणाम समजावून घेणे तसेच क्रांतिकारी पक्षाने हस्तक्षेप करण्याची प्रभावी माध्यमं विकसित करणे याचे प्रशिक्षण देईल. वृत्तपत्राला नियमित सामग्री पुरविणे तसेच त्याचे नियमित वितरण या केवळ तांत्रिक कामाला सुद्धा स्थानिक एजंटांचे* जाळे लागेल जे एकमेकांच्या सतत संपर्कात असतील, सामान्य परिस्थितीची माहिती ठेवतील, अखिल रशियन कार्य-योजनेअंतर्गत त्यांची तपशीलवार कामं नियमित पार पाडण्याची सवय लावतील आणि विविध क्रांतिकारी कामांच्या आयोजनाच्या माध्यमातून त्यांची शक्ती तपासतील.
*हे वेगळे सांगायला नको की हे एजंट स्थानिक कमिटींच्या( गट/अभ्यासवर्ग) सोबत घनिष्ट संबंध ठेवूनच यशस्वीरीत्या काम करू शकतात. सर्वसाधारणपणे आम्ही जी योजना मांडत आहोत ती अशा स्थानिक कमिटींच्या सक्रिय समर्थनानेच पूर्णत्वाला नेली जाऊ शकते, ज्यांनी पार्टीला एकजूट करण्याचे वारंवार प्रयत्न केले आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आज ना उद्या ही एकजूट या मार्गाने नाही तर दुसऱ्या मार्गाने नक्कीच बनेल.
(‘व्हेअर टू बिगिन?’ या लेखातून.)
रशियाच्या सर्व भागातील कारखान्यात आणि ऑफिस मध्ये काम करणाऱ्या कामगारांची पत्रे तसेच कामगारांनी गोळा केलेला सहयोगाचा अहवाल वाचून प्रावदाच्या वाचकांना, ज्यातले जवळपास सगळेच रशियाच्या बाह्य खडतर परिस्थितीमुळे एकमेकांपासून विखुरलेले आणि दूर-दूर आहेत, याची कल्पना येईल की वेगवेगळ्या व्यवसायातले आणि भागातले कामगार कशा प्रकारे लढत आहेत, कशा प्रकारे त्यांच्यात कामगार वर्गीय लोकशाहीच्या रक्षणाची चेतना निर्माण होत आहे.
कामगारांचा जीवन वृत्तांत आता कुठे प्रावदाचा कायमस्वरूपी स्तंभ बनत आहे. यामध्ये काहीच शंका नाहीये, की कारखान्यात होणारे गैरवर्तन, सर्वहाराच्या नवनवीन हिश्श्यांमध्ये होणारी जागृती, कामगार हितांच्या या किंवा त्या कामांसाठी उभा राहणारा सहयोग यांबद्दल लिहिल्या गेलेल्या पत्रांशिवाय कामगारांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या भावनांविषयी, निवडणूक अभियानांविषयी, कामगारांच्या प्रतिनिधींच्या निवडणुकांविषयी, कामगार काय वाचत आहेत, कोणत्या प्रश्नांत त्यांना विशेष रस आहे इत्यादी विषयांबद्दलचे अहवाल कामगाराच्या वृत्तपत्रापर्यंत येतील.
कामगाराचे वृत्तपत्र हा कामगारांचा मंच आहे. या मंचावरून सगळ्या रशियासमोर कामगारांनी सर्वसाधारणपणे कामगारांच्या आयुष्यातील विविध प्रश्न आणि विशेष करून कामगार वर्गीय लोकशाहीबद्दलच्या प्रश्नांना उचलले पाहिजे.
(‘कामगार आणि प्रावदा’ या लेखातून)

कामगार बिगुल एप्रिल, 2022