उत्तर-पूर्व दिल्लीमधील खजूरी भागात सांप्रदायिक वातावरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा सक्रिय

दिल्ली वार्ताहर

मोदी सरकारच्या ‘सबका साथ-सबका विकास’ आणि सगळ्यांसाठी ‘अच्छे दिन’च्या घोषणांची हवा एका वर्षातच निघून गेली आहे. आता सामान्य कष्टकरी जनतेला हे समजून चुकले आहे मोदी सरकार कोणाचा विकास करू इच्छिते आणि कोणाच्या ‘अच्छे दिन’साठी मोदी जगभर फिरत आहेत. परंतु मोदींनी निवडणुकांदरम्यान जी आश्वासने दिली होती त्यावर सामान्य कष्टकरी जनतेने प्रश्न उपस्थित करू नये व ती सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात एकजूट होऊ नये याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) देशभरात आता आपला खरा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवण्याच्या कामी लागला आहे.
rss shakha khajoorieदिल्ली-एनसीआर मध्ये ठीक-ठिकाणी असे प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी फरीदाबाद जवळील अटाली गावामध्ये लोकांची घरे व मस्जिद तोडण्यात आली. त्यामुळे शेकडो लोक आज बेघर झाले आहेत आणि उघड्यावर राहत आहेत. मुरादाबाद पासून मुजफ्फरनगर पर्यंत कित्येक भागांमध्ये आर.एस.एस. सांप्रदायिक सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे. ह्याच मालिके मध्ये उत्तर-पूर्व दिल्लीतील खजूरी भागातील श्रीराम कॉलोनी मधील दोन समुदायांच्या मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाला सांप्रदायिक रंग देण्यासाठी आर.एस.एस. हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. २७ जून, २०१५ रोजी ह्या कॉलोनीतील रामलीला ग्राउंडवर (राजीव पार्क) काही मुस्लिम मुले बैटमिंटन खेळत होते. त्याच मैदानावर आर.एस.एस.ची शाखा लावत असलेल्या मुलांनी दुसऱ्या समाजाच्या मुलांना शाखा सुरु असतानाच्या वेळी तिथे खेळण्यास मज्जाव केला. आर.एस.एस. शी संबंधित ह्या मुलांनी दुसऱ्या समाजाच्या ह्या मुलांना शिवीगाळ करत मैदानातून हुसकावून लावले. ह्या कामी त्यांना आर.एस.एस. मधील जेष्ठ लोकांची साथ सुद्धा मिळाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ जून रोजी जेव्हा आर.एस.एस.शी संबंधित मुलं मैदानावर पोहोचली तेव्हा दुसऱ्या समाजाच्या मुलांनी योजना करून त्यांना जबरदस्त मारहाण केली. त्यानंतर आर.एस.एस.ने त्याच दिवशी पोलिस स्टेशन मध्ये दुसऱ्या समाजातील मुलांविरोधात एफ.आई.आर. दाखल केली. एक-दोन दिवसांनंतर सर्व पाच मुलांना अटक करण्यात आली. पोलिस त्याच्या कडून कारवाई करत आहेत.
परंतु दुसऱ्याच दिवशी (२९ जून, २०१५) आर.एस.एस. चे शेकडो स्वयंसेवक रामलीला मैदानावर जमा झाले आणि दुसऱ्या समाजाविरोधात भडकाऊ भाषणे देऊ लागले. त्याच बरोबर “जो मैदानात पाय ठेवेल तो मरेल” अश्या घोषणा देऊ लागले. त्याच दिवशी आर.एस.एस. कडून घोषणा करण्यात आली की १७ ते १९, जुलै, २०१५ दरम्यान त्याच मैदानावर त्यांचे ‘महा-संमेलन’ होईल आणि त्या दरम्यान कुठल्याही अन्य व्यक्तीला मैदानावर येऊ दिले जाणार नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की १८ किंवा १९ जुलै, २०१५ दरम्यान ईद सुद्धा आहे आणि दरवर्षी ह्याच मैदानावर ईदची नमाज होते. आर.एस.एस. कडून त्याच वेळी ‘महा-संमेलनाची’ घोषणा करण्यात आल्यामुळे मुस्लीम बहुल भागांमध्ये तणावाची स्थिती तयार झाली आहे. त्या दिवसापासून दररोज सकाळी सकाळी आर.एस.एस.चे लोक शाखा लावत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस सुद्धा देण्यात आले आहेत आणि शाखेच्या वेळी अन्य कोणालाही मैदानावर प्रवेश दिला जात नाही.
ह्या कॉलनी मधील लोकांनी सकारात्मक पाउल उचलत ईद दिवशी आर.एस.एस. कडून शाखा लावण्यात येऊ नये आणि योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी ह्या मागणी साठी दिल्ली पुलिस कमिश्नर सोबत भेट सुद्धा घेतली होती. परंतु त्यांच्या कडून सुद्धा ह्या बाबतीत कुठलेच ठोस आश्वासन मिळाले नाही. उलट राजकीय दबावामुळे ह्या भागातील एस.एच.ओ. व डी.सी.पी.ने स्पष्टपणे सांगितले आहे की ईद दिवशीसुद्धा आर.एस.एस.चे लोक तिथे येतील आणि प्रशासन त्यांना मज्जाव करणार नाही. त्यांच्या मते शाखा संपल्यानंतर मैदानात नमाज होऊ शकेल. इथे हे सांगणे आवश्यक आहे की मागच्या वर्षी ईद (बकरी ईद)च्या वेळी सुद्धा हेच ठरले होते. पण संघाच्या लोकांनी वेळेत मैदान रिकामे न केल्यामुळे मुस्लिम समाजाचे काही लोक भडकले होते आणि त्यांची संघाच्या काही जणांशी बाचाबाची सुद्धा झाली होती. आर.एस.एस. च्या लोकांनी मुस्लिम समाजातील बऱ्याच जणांवर मारहाणीचे खोटे दावे दाखले केले होते आणि त्यानंतर ह्या मुद्द्याला धार्मिक रंग देण्यात आला. ह्या वेळी सुद्धा दोन समाजातील मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणांना धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. अर्थातच आता ह्यात मुस्लिम कट्टरपंथी सुद्धा मागे नाहीयेत. त्यामुळे शक्यता आहे की ह्यावर्षी ईद दिवशी सांप्रदायिक तणावाची स्थिती निर्माण होईल. ही रिपोर्ट लिहिली जाई पर्यंत हे ठरले होते की इथे काम करणारी संघटना ‘नौजवान भारत सभा’ सोबत कॉलनी मधील लोक दिल्ली पुलिस कमिश्नरला भेटतील आणि गरज पडली तर सर्व लोकांना सोबत घेऊन ह्या संबंधी याचिका न्यायालयात दाखल करतील.
दिल्ली-एनसीआर मध्ये घडत असलेल्या ह्या घटनांमधून हे अगदी स्पष्ट आहे की संघ परिवार (आर.एस.एस.) सांप्रदायिक तणावाचा विस्तव निर्माण करू इच्छित आहे, जेणे करून वेळ पडल्यास त्याला हवा देऊन धार्मिक उन्माद निर्माण करता येईल आणि लोक संघटीत होऊन शोषक व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याऐवजी एकमेकांमध्ये संघर्ष करत राहतील. परंतु कष्टकरी जनतेने हे समजून घेतले पाहिजे की धार्मिक कट्टरपंथी आपल्याला एकमेकांमध्ये लढवतात आणि स्वतः सुरक्षित घरांमध्ये राहतात. आपण त्यांच्या जाळ्यात अडकून आपल्याच वर्ग बांधवांच्या विरोधात लढतोत. खरे तर आपले जीवन बदलण्यासाठीच्या संघर्षासाठी सर्व कष्टकरी जनतेची एकजुटता ही पहिली अट आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

कामगार बिगुल, ऑगस्‍ट २०१५